सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन ४१ ते ६०
लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला.
४१
अनतं जीवितस्यार्थे वदन्न स्पृश्यतेऽनृतै: ॥७।१९०।४७॥
जीव वांचविण्याकरितां असत्य भाषण करणाराला असत्य भाषण केल्याचा दोष लागत नाहीं.
४२
अन्त्येषु रेमिरे धीरा न ते मध्येषु रेमिरे ।
अन्त्यप्राप्तिं सुखामाहूर् दु:खमन्तरमन्त्ययो: ॥१२।१७४।३४॥
ज्ञाते लोक कोणती तरी एक तड पतकरतात, मधल्या स्थितींत आनंद मानीत नाहींत. कारण कोणती तरी शेवटची स्थिति ही सुखकारक आहे आणि दोन्ही टोकांच्या मधली स्थिति ही दु:खदायक आहे.
४३
अन्यत्र राजन् हिंसाया वृत्तिर्नेहास्ति कस्यचित् ।
अप्यरण्यसमुत्थस्य एकस्य चरतो मुने: ॥१२।१३०।२८॥
(भीष्म धर्मराजाला म्हणतात) हे राजा, दुसर्याला मुळींच पीडा न देतां जगांत कोणाचीही जीवितयात्रा चालूं शकत नाहीं. मग तो अरण्यांत जन्मलेला व एकटाच राहणारा एकदा मुनिं का असेना.
४४
अन्यथा चिन्तितो ह्यर्थ: पुनर्भवति सोऽन्यथा ।
अनित्यमतयो लोके नरा: पुरुषसत्तम ॥५।८०।६॥
(नकुल श्रीकृष्णाला म्हणतो) हे पुरुषोत्तमा, मनुष्यानें एका प्रकारानें केलेला बेत पुन: फिरलेला दिसतो. (ह्याचें कारण) जगांत माणसांची बुध्दि नेहमीं पालटत असते.
४५
अन्यस्मिन् प्रेष्याप्रमाणे तु पुरस्ताध्य: समुत्पतेत् ।
अहं किं करवाणीति स राजवसतिं वसेत् ॥४।४।४५॥
(राजानें) दुसर्या सेवकाला बोलाविलें असतां (तो गेला नाहीं असें पाहून) जो पुढें जातो आणि ‘मला काय आज्ञा आहे’ असे (राजाला) विचारतो तो राजगृहीं वास्तव्य करुं शकतो.
४६
अन्यान्परिवदन्साधुर् यथा हि परितप्यते ।
तथा परिवदन्नन्यान् तुष्टो भवति दुर्जन: ॥१।७४।९२॥
दुसर्याची निंदा करण्यातं सज्जनाला जितका खेद वाटतो, तितकाच दुर्जनाला परनिंदा करण्यांत संतोष वाटतो.
४७
अन्यो धनं प्रेतगतस्य भुड्क्ते
वयांसि चाग्निश्च शरीरधातून् ।
द्वाभ्यामयं सह गच्छत्यमुत्र
पुण्येन पापेन च वेष्टयमान: ॥५।४०।१६॥
कुडी सोडून गेलेल्या जीवाचें धन दुसरा कोणी भोगतो, (रक्तमांसादि) देहस्थ धातु पक्षी व अग्नी ह्यांच्या भक्ष्यस्थानी पडतात. फक्त दोन गोष्टी बरोबर घेऊन जीव परलोकी जातो. त्या म्हणजे त्यानें इहलोकी केलेलें पुण्य व पाप.
४८
अन्यो धर्म: समर्थानाम् आपत्स्वन्यश्च भारत ॥१२।१३०।१४॥
(भीष्म धर्मराजाला म्हणतात) हे भारता, सामर्थ्य असतां आचरण्याचा धर्म निराळा आणि संकटप्रसंगींचा धर्म निराळा.
४९
अन्योन्यसमुपष्टम्भात् अन्योन्यापाश्रयेण च ।
ज्ञातय: संप्रवर्धन्ते सरसीवोत्पलान्युत ॥५।३६।३६॥
तळ्यांत वाढणार्या कमळांप्रमाणें, परस्परांस साहाय्य करुन व परस्परांचा आश्रय घेऊन ज्ञातींचा उत्कर्ष होत असतो.
५०
अन्यो हि नाश्नाति कृतं हि कर्म
मनुष्यलोके मनुजस्य कश्चित् ।
यत्तेन किंचिध्दि कृतं हि कर्म
तदश्नुते नास्ति कृतस्य नाश: ॥३।२०७।२७॥
मृत्युलोकीं एका मनुष्यानें केलेल्या कर्माचें फळ दुसरा कोणीही भोगत नाहीं. त्यानें जें कांहीं केलें असेल त्याचें फळ त्याला भोगावेंच लागतें. केलेल्याचा नाश केव्हांही होत नाहीं.
५१
अपि च ज्ञानसंपन्न: सर्वान्वेदान् पितुर्गृहे ।
श्लाघमान इवाधीयाद् ग्राम्य इत्येव तं विदु: ॥१३।३६।१५॥
बापाच्या घरीं राहून मोठ्या ऐटींत सर्व वेदांचा अभ्यास करुन जरी कोणी ज्ञानसंपन्न झाला तरी लोक त्याला खेडवळच म्हणणार.
५२
अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक् ।
साधुरेव स मन्तव्य: सम्यग्व्यवसितो हि स: ॥६।३३।३०॥
(श्रीकृष्ण सांगतात) अत्यंत दुराचारी असलेला मनुष्यही जर अनन्यभावानें मला भजेल तर तो साधुच समजावा. कारण (तो मला भजूं लागला म्हणजे) त्याचा निश्चय चांगला झाला. (तो चांगल्या मार्गाला लागला.)
५३
अपिचेदसि पापेभ्य: सर्वेभ्य: पापकृत्तम: ।
सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि ॥६।२८।३६॥
(श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुना,) सर्व पापी लोकांहून तूं जरी अधिक पापी असलास तरी ज्ञानरुप नौकेच्या योगानेंच तूं सर्व पाप तरुन जाशील.
५४
अपि पापकृतो रौद्रा: सत्यं कृत्वा पृथक्पृथक् ।
अद्रोहमविसंवादं प्रवर्तन्ते तदाश्रया: ॥१२।२५९।११॥
पाप करणारीं आणि भयंकर अशीं जरी मनुष्यें असलीं, तरी तींसुध्दां परस्परांशीं सत्यानें वागण्याची शपथ घेऊन त्या सत्याच्या आधारानें, परस्परांशी विश्वासघात व फसवणूक न करितां वागतात.
५५
अपि शाकं पचानस्य सुखं वै मघवन् गृहे ।
अर्जितं स्वेन वीर्येण नाप्यपाश्रित्य कंचन ॥३।१९३।२९॥
(बकमुनि म्हणतात) हे इंद्रा, कोणावर अवलंबून न राहतां स्वत:च्या हिंमतीनें मिळविलेली मीठभाकरसुध्दां स्वत:च्या घरीं खाण्यांत सुख आहे.
५६
अपि सर्वस्वमुत्सृज्य रक्षेदात्मानमात्मना ॥१२।१३८।१७९॥
सर्वस्वाचा त्याग करुन देखील आपण आपलें रक्षण करावें.
५७
अप्युन्मत्तात्प्रलपतो बालाच्च परिजल्पत: ।
सर्वत: सारमादध्यात् अश्मभ्य इव काञ्चनम् ॥५।३४।३२॥
वेडाच्या लहरींत बरळणार्या वेडयापासून, तसेंच बोबडे बोल बोलणार्या बालकापासून, सर्वांपासून, दगडांतून सोने निवडावें त्याप्रमाणें, चांगलें तेवढें ग्रहण करावें.
५८
अप्रयत्नागता: सेव्या गृहस्थैर्विषया: सदा ।
प्रयत्नेनोपगम्यश्च स्वधर्म इति मे मति: ॥१२।२९५।३५॥
(पराशर मुनि जनकराजाला म्हणतात) मुद्दाम प्रयत्न न करितां ओघानें प्राप्त होतील तेवढ्याच विषयांचें गृहस्थाश्रमी पुरुषानें सेवन करावें आणि स्वधर्माचें आचरण प्रयत्नपूर्वक करावें असें माझें मत आहे.
५९
अप्राप्तकालं वचनं बृहस्पतिरपि ब्रुवन् ।
लभते बुध्द्यवज्ञानम् अवमानं च भारत ॥५।३९।२॥
(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) हे भारता, समयाला न शोभण्यासारखें भाषण करणारा बृहस्पति जरी असला तरी त्याच्या बुध्दीचा तिरस्कार होतो व तोही अपमानालाच पात्र होतो.
६०
अबलस्य कुत: कोशो ह्यकोशस्य कुतो बलम् ।
अबलस्य कुतो राज्यम् अराज्ञ: श्रीर्भवेत्कुत: ॥१२।१३३।४॥
दुर्बळाला द्रव्य कोठून मिळणार ? व ज्याच्यापाशीं द्रव्य नाहीं त्याला सामर्थ्य कोठलें ? तसेंच ज्याला सामर्थ्य नाहीं त्याचें राज्य कसें राहणार ? व राज्य नाहीसें झालें म्हणजे संपत्ति तरी कशी टिकणार ?
N/A
References : N/A
Last Updated : February 15, 2022
TOP