७४१
यभ्दूतहितमत्यन्तं तत् सत्यमितिधारणा ॥३॥२०९।४॥
ज्याच्या योगानें जीवाचें अतिशय कल्याण होतें तेंच सत्य असा सिध्दान्त आहे.
७४२
यद्यप्रियं यस्य सुखं तदाहुस्तदेव दु:खं प्रवदन्त्यनिष्टम् ॥१२।२०१।१०॥
ज्याला जें प्रिय वाटतें त्याला तो सुख म्हणतो, तेंच अप्रिय झालें कीं त्यालाच दु:ख म्हणतो.
७४३
यद्यदाचरित श्रेष्ठ: तत्प्रजानां स्म रोचते ॥१२।७५।४॥
राजा जें जें करतो तें तें प्रजेला आवडूं लागतें.
७४५
यध्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा ।
तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंऽशसंभवम् ॥६।३४।४१॥
(भगवान् श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात) जी जी वस्तु मोठेपणा, ऐश्वर्य किंवा वैभव ह्यांनीं युक्त असेल, ती ती प्रत्येक माझ्या (परमेश्वराच्या) तेजाच्या अंशापासून उत्पन्न झालेली आहे असें तूं पक्कें समज.
७४६
यद्यपि भ्रातर: क्रुध्दा भार्या वा कारणान्तरे ।
स्वभावतस्ते प्रीयन्ते नेतर: प्रीयते जन: ॥१२।१३८।१५४॥
कारणपरत्वें भाऊ जरी रागावले किंवा बायको रागावली तर तीं स्वभावत:च प्रिय असतात. तसे इतर लोक प्रिय नसतात.
७४७
यन्निमित्तं भवेच्छोक: तापो वा दु:खमेव च ।
आयासो वा यतो मूलम् एकाड्गमपि तत्त्यजेत् ॥१२।१७४।४३॥
ज्याच्यामुळें शोक, ताप, दु:ख किंवा कष्ट होतात, तें कारण जरी आपल्या शरीराचा एक अवयव असलें तरीही त्याचा त्याग केला पाहिजे.
७४८
यमाजीवन्ति पुरुषं सर्वभूतानि संजय ।
पक्वं द्रुममिवासध्य तस्य जीवितमर्थवत् ॥५।१३३।४३॥
(विदुला म्हणते) हे संजया, पक्व वृक्षाप्रमाणें ज्याच्याजवळ गेल्यानें सर्व जीवांचें प्राणरक्षण होतें त्याचेंच जीवित सफल झालें.
७४९
ययोरेव समं वित्तं ययोरेव समं श्रुतम् ।
तयोर्विवाह: सख्यं च न तु पुष्टविपुष्टयो: ॥१।१३१।१०॥
ज्यांची श्रीमंती सारखी, ज्यांचें ज्ञान सारखें, त्यांचाच विवाहसंबंध किंवा स्नेहसंबंध होत असतो. एक समर्थ आणि दुसरा असमर्थ अशांचा अशा प्रकारचा संबंध कधींही होत नसतो.
७५०
य: शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारत: ।
न स सिध्दिमवाप्नोति न सुखं न परां गतिम् ॥६।४०।२३॥
शास्त्रांत सांगितलेला विधि सोडून जो मनास वाटेल तें करुं लागला, त्याला सिध्दि प्राप्त होत नाहीं, सुख नाहीं आणि श्रेष्ठ गतिही नाहीं.
७५१
यस्तु नि:श्रेयसं श्रुत्वा प्राक्तदेवाभिपध्यते ।
आत्मनो मतमुत्सृज्य स लोके सुखमेधते ॥५।१२४।२४॥
आपलें खरें कल्याण कशांत आहे हें ऐकल्यावर, स्वत:च मत बाजूला सारुन जो प्रथमत: त्याचेंच आचरण करतो त्याला जगांत सुख होतें.
७५२
यस्तु वृध्द्या न तृप्येत क्षये दीनतरो भवेत् ।
एतदुत्तममित्रस्य निमित्तमिति चक्षते ॥१२।८०।१६॥
आपला अभ्युदय कितीही झाला तरी तृप्ति न होणें आणि हानि झाल्यास अत्यंत दीन होणें हें उत्तम प्रतीच्या मित्राचें लक्षण होय असें सांगितलेलें आहे.
७५३
यस्माददान्तान् दमयत्यशिष्टान् दण्डयत्यपि ।
दमनाद्दण्डनाच्चैव तस्माद्द्ण्डं विदुर्बुधा: ॥१२१५।८॥
ज्या अर्थीं (राजदंड हा) स्वैराचरण करणार्यांना वठणीस आणतो आणि असभ्यपणें वागणारांना शिक्षा करतो, त्या अर्थीं दमन करणें आणि दंड करणें ह्या दोन गुणांमुळें ज्ञाते लोक त्याला दंड असें म्हणतात.
७५४
यस्मिन्क्षमा च क्रोधश्च दानादाने भयाभये ।
निग्रहानुग्रहौ चोभौ स वै धर्मविदुच्यते ॥१२।१४।१७॥
ज्याच्या ठायीं (प्रसंगानुरुप) क्षमा व क्रोध, दान देणें व दान घेणें, भय व अभय, तसेंच निग्रह व अनुग्रह हीं दोनही आढळतात तोच खरोखर धर्म जाणणारा होय.
७५५
यस्मिन्नर्थे हितं यत्स्यात् तद्वर्णं रुपमादिशेत् ।
बहुरुपस्य राज्ञो हि सूक्ष्मोऽप्यर्थो न सीदति ॥१२।१२०।६॥
ज्या बाबतींत जें योग्य दिसेल त्या प्रकारचें रुप (राजानें) धारण करावें. कारण (प्रसंगाप्रमाणें) निरनिराळीं रुपें धारण करणार्य़ा राजाची बारीक सारीक गोष्टींतसुध्दां फसगत होत नाहीं.
७५६
यस्मिन्यथा वर्तते यो मनुष्य:
तस्मिंस्तथा वर्तितव्यं स धर्म: ।
मायाचारो मायया वर्तितव्य:
साध्वाचार: साधुना प्रत्युपेय: ॥५।३७।७॥
ज्याच्याशीं जो मनुष्य ज्या प्रकारें वागतो, त्याच्याशीं त्यानें त्याच प्रकारें वागावें, असें करण्यांतच धर्म आहे. कपट करणाराशीं कपटानें वागावें आणि सरळपणानें चालणाराशीं सरळपणा ठेवावा.
७५७
यस्मै देवा: प्रयच्छन्ति पुरुषाय पराभवम् ।
बुध्दिं तस्यापकर्षन्ति सोऽवाचीनानि पश्यति ॥५।३४।८१॥
देवांच्या मनांतून ज्याचा नाश करावयाचा असतो, त्याची बुध्दि ते हिरावून घेतात, आणि मग त्याला (आपल्या हातून) नीच कर्में झालेलीं दिसतात.
७५८
यस्य कृत्यं न जानन्ति मन्त्रं वा मन्त्रितं परे ।
कृतमेवास्य जानन्ति स वै पण्डित उच्यते ॥५।३३।२३॥
ज्याचें पुढें करावयाचें कृत्य अथवा योजलेला बेत दुसर्यांना कळत नाहीं, काय तें प्रत्यक्ष कृतींत आल्यावरच समजतें, त्याला पंडित म्हणतात.
७५९
यस्य दानजितं मित्रं शत्रवो युधि निर्जिता: ।
अन्नपानजिता दारा: सफलं तस्य जीवितम् ॥५।३९।८३॥
ज्यानें उदारपणानें मित्र आपलासा केला, युध्द करुन शत्रूंना जिंकलें आणि अन्नपानादिकांच्या योगानें स्त्रीला स्वाधीन ठेवलें त्याचें जीवित सफल झालें.
७६०
यस्य धर्मो हि धर्मार्थ: क्लेशभाड्ग न स पण्डित: ।
न स धर्मस्य वेदार्थं सूर्यस्यान्ध: प्रभामिव ॥३।३३।२३॥
(तत्त्व न जाणतां) केवळ धर्मासाठीं जो धर्माचरण करतो तो शहाणा नसून दु:खाचा मात्र वांटेकरी होतो. आंधळ्याला ज्याप्रमाणें सूर्याची प्रभा समजत नाहीं, त्याप्रमाणें त्याला धर्माचा अर्थ समजत नाहीं.