मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|महाभारतसुभाषितानि|
वचन ४८१ ते ५००

सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन ४८१ ते ५००

लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला.


४८१
न हि सर्वत्र पाण्डित्यं सुलभं पुरुषेण वै ॥३।२८।२७॥
मनुष्याची बुध्दि सर्वच विषयांत चालणें खचित सोपें नाहीं.

४८२
न हृष्यत्यात्मसंमाने नावमानेन तप्यते ।
गाड्गो हृद इवाक्षोभ्यो य: स पण्डित उच्यते ॥५।३३।३१॥
आपला सन्मान झाला असतां जो आनंद मानीत नाहीं, अपमान झाला असतां कष्टी होत नाहीं आणि गंगेच्या डोहाप्रमाणें ज्याची शांति केव्हांही ढळत नाहीं, त्याला पंडित म्हणतात.

४८३
न ह्यनुप्तं प्ररोहति ॥१३।१६३।११॥
पेरल्याविना उगवत नाहीं.

४८५
न ह्यात्मन: प्रियतरं किंचिभ्दतेषु निश्चितम् ॥११।७।२७॥
प्राणिमात्राला स्वत:पेक्षां प्रिय कांहींच नाहीं हें निश्चित होय.

४८६
न ह्यात्मस्तवसंयुक्तं वक्तव्यमनिमित्तत: ॥१।३४।३॥
आत्मस्तुतीनें युक्त असें भाषण कारणावांचून करुं नये.

४८७
न ह्युत्थानम् ऋते दैवं राज्ञामर्थं प्रसाधयेत् ॥१२।५६।१४॥
उद्योगावांचून नुसतें दैव राजांचे मनोरथ सिध्दीस नेणार नाहीं.

४८८
न ह्रृतेऽर्थेन वर्तेते धर्मकामविति श्रुति: ॥१२।१६७।१२॥
अर्थाला (द्रव्याला) सोडून धर्म व काम हे पुरुषार्थ राहत नाहींत अशी श्रुती आहे.

४८९
नाकारो गृहितुं शक्यो बृहस्पतिसमैरपि ॥७।१२।१४॥
मनांतील हेतु छपविणें बृहस्पतीसारख्यांनाही शक्य नाहीं.

४९०
नाकालतो म्रियते जायते वा
नाकालतो व्याहरते च बाल: ।
नाकालतो यौवनमभ्युपैति
नाकालतो रोहति बीजमुप्तम् ॥१२।२५।११॥
वेळ आल्याशिवाय कोणी मरत नाहीं किंवा जन्माला येत नाहीं. योग्य काळ आल्यावांचून लहान मूल बोलूं लागत नाहीं. योग्य काळाशिवाय कोणास तारुण्यावस्था प्राप्त होत नाहीं आणि पेरलेलें बीं अकालीं उगवत नाहीं.

४९१
नाकृतात्मा वेदयति धर्माधर्मविनिश्चयम् ॥३।२१५।१८॥
मनोनिग्रह केल्याशिवाय धर्म कोणता आणि अधर्म ह्याचें निश्चित ज्ञान होत नाहीं.

४९२
नाकृत्वा लभते कश्चित् ।
किंचिदत्र प्रियाप्रियम् ॥१२।२९८।३०॥
कांहीं तरी केल्याशिवाय ह्या लोकीं कोणालाही कांहीं सुखदु:ख प्राप्त होत नाहीं.

४९३
नागामिनमनर्थं हि प्रतिघातशतैरपि ।
शक्नुवन्ति प्रतिव्योढुम् ऋते बुध्दिबलान्नरा: ॥१२।२२७।३२॥
शेकडों प्रकारचें उपाय केले तरी मनुष्यांना बुध्दिसामर्थ्य असल्यावांचून भावी अनर्थाचा प्रतिकार करितां येणें शक्य नाहीं.

४९४
नाघ्नत: कीर्तिरस्तीह न वित्तं न पुन: प्रजा: ।
इन्द्रो वृत्रवधेनैव महेन्द्र: समपध्यत ॥१२।१५।१५॥
शत्रूचा वध न करणार्‍या राजाला ह्या लोकीं कीर्ति लाभणार नाहीं, धन मिळणार नाहीं आणि त्याची प्रजाही सुरक्षित राहणार नाहीं, इंद्रसुध्दां वृत्रासुराचा वध करुनच महेंद्रपदवीला पोचला.

४९५
नाच्छित्त्वा परमर्माणि नाकृत्वा कर्म दारुणम् ।
नाहत्वा मत्स्यघातीव प्राप्नोति महतीं श्रियम् ॥१२।१४०।५०॥
शत्रूच्या मर्मस्थानांवर घाव घातल्याशिवाय, भयंकर पराक्रम गाजविल्याशिवाय आणि मासे मारणार्‍या कोळ्याप्रमाणें हत्या केल्याशिवाय मोठया लक्ष्मीचा (राजलक्ष्मीचा) लाभ होणार नाहीं.

४९६
नात: पापीयसीं कांचित् अवस्थां शम्बरोऽब्रवीत् ।
यत्र नैवाध्य न प्रातर् भोजनं प्रति दृश्यते ॥५।७२।२२॥
आजच्या अथवा उद्यांच्याही अन्नाची तजवीज ज्या अवस्थेमध्यें दृष्टीस पडत नाहीं, त्या अवस्थेपेक्षां कोणतीही अवस्था अधिक दु:खदायक नाहीं, असें शंबरानेंही सांगितलें आहे.

४९७
नात्मच्छन्देन भूतानां जीवितं मरणं तथा ।
नाप्यकाले सुखं प्राप्य दु:खं वापि यदूत्तम ॥५।७२।५०॥
(युधिष्ठिर श्रीकृष्णाला म्हणतो) हे यदुश्रेष्ठा, प्राण्यांना आपल्या इच्छेप्रमाणें जन्म किंवा मरण येत नाहीं. तसेंच, सुख काय किंवा दु:ख काय, अकालीं प्राप्त होत नसतें.

४९८
नात्मच्छिद्रं रिपुर्विध्यात् विद्याच्छिद्रं परस्य तु ।
गृहेत्कूर्म इवाड्गानि रक्षेव्दिवरमात्मन: ॥१२।१४०।२४॥
आपलें मर्मस्थान शत्रूला समजूं देऊं नये. आपण मात्र शत्रूचें मर्मस्थान शोधून काढावें. कासव ज्याप्रमाणें आपलें सर्व अवयव आपल्या शरीरांतच दडवून ठेवतें त्याप्रमाणें राज्याचीं सर्व अंगें गुप्त राखावीं आणि आपल्या छिद्रांविषयीं जपून असावें.

४९९
नात्यन्तं गुणवत् किंचित् न चाप्यत्यन्तनिर्गुणम् ।
उभयं सर्वकार्येषु दृश्यते साध्वसाधु वा ॥१२।१५।५०॥
सर्वस्वी गुणसंपन्न असें कांहीं नाहीं आणि सर्वथा गुणहीनही कांहीं नाहीं. सर्व गोष्टींत बरें व वाईट हीं दोनही असलेलीं दिसून येतात.

५००
नादेशकाले किंचित्स्यात् देशकालौ प्रतीक्षताम् ॥३।२८।३२॥
देशकाल अनुकूल नसतां कांहीं होणार नाहीं. ह्यास्तव, देशकालाकडे नजर द्यावी.

N/A

References : N/A
Last Updated : March 27, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP