मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|महाभारतसुभाषितानि|
वचन ८४१ ते ८६०

सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन ८४१ ते ८६०

लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला.


८४१
विद्या तपो वा विपुलं धनं वा
सर्वं ह्येव्ध्यवसायेन शक्यम् ॥१२।१२०।४५॥
विद्या, तप, अथवा विपुल द्रव्य हें सर्व उद्योगानेंच मिळविणें शक्य आहे.

८४२
विद्यामदो धनमदस्तृतीयोऽभिजनो मद: ।
मदा एतेऽवलिप्तानाम् एत एव सतां दमा: ॥५।३४।४४॥
विद्येचा मद, धनाचा मद व तिसरा कुळाचा मद हे तीन गर्विष्ठ लोकांच्या बाबतींत मद म्हणजे अहंकार वाढविणारे ठरतात, तेच सज्जनांच्या बाबतींत दमाला म्हणजे इंद्रियनिग्रहाला कारण होतात.

८४३
विद्या हि सा ब्रह्मचर्येण लभ्या ॥५।४४।२॥
विद्या म्हणून जी आहे ती ब्रह्मचर्यानेंच साध्य होत असते.

८४४ विना वधं न कुर्वन्ति तापसा: प्राणयापनम् ॥१२।१५।२४॥
जीवहत्या घडल्याविना तपस्व्याचेंसुध्दां प्राणधारण होत नाहीं.

८४५
विरुपो यावदादर्शे नात्मन: पश्यते मुखम् ।
मन्यते तावदात्मानम् अन्येभ्यो रुपवत्तरम् ॥१।७४।८७॥
कुरुप मनुष्य जोंवर आरशांत आपलें तोंड पाहत नाहीं, तोंवर त्याला वाटत असतें कीं आपण इतरांपेक्षां अधिक रुपवान् आहों.

८४६
विवर्जनं ह्यकार्याणाम् एतत्सुपुरुषव्रतम् ॥४।१४।३६॥
दुष्कृत्य सर्वथा वर्ज्य करणें हें सत्पुरुषांचें व्रत होय.

८४७
विवाहकाले रतिसंप्रयोगे
प्राणात्यये सर्वधनापहारे ।
विप्रस्य चार्थे ह्यनृतं वदेत
पञ्चानृतान्याहुरपातकानि ॥८।६९।३३॥
विवाहकालीं, संभोगसमयीं, प्राणसंकट ओढवलें असतां, सर्वस्वाचा नाश होण्याचा समय आला असतां, तसेंच एकाद्या ब्राह्मणाचें हित साधत असेल तर मनुष्यानें असत्य भाषण केलें तरी चालेंल. ह्या पांच प्रसंगीं असत्य भाषणाच्या योगानें पातक लागत नाहीं.

८४८
विश्वासयित्वा तु परं तत्त्वभूतेन हेतुना ।
अथास्य प्रहरेत्काले किंचिद्विचलिते पदे ॥१२।१४०।४४॥
खरेंखुरें कारण दाखवून शत्रूचा विश्वास संपादन करावा आणि कालान्तरानें त्याचें आसन जरासें डळमळीत झालें कीं त्याच्यावर प्रहार करावा.

८४९
विश्वासयेत्परांश्चैव विश्वसेच्च न कस्यचित् ।
पुत्रेष्वपि हि राजेन्द्र विश्वासो न प्रशस्यते ॥१२।८५।३३॥
(भीष्म युधिष्ठिराला म्हणतात) दुसर्‍यांचा विश्वास संपादन करावा. पण आपण मात्र कोणावरही विश्वास ठेवूं नये. हे राजश्रेष्ठा, फार काय, पण पोटच्या मुलाचासुध्दां पूर्ण विश्वास धरणें प्रशस्त नव्हे.

८५०
विश्वासाभ्दयमभ्येति ।
नापरीक्ष्य च विश्वसेत् ॥१२।१४०।४३॥
(भलत्याच मनुष्यावर) विश्वास टाकिल्यानें भीति उत्पन्न होत असते. ह्यास्तव, परीक्षा पाहिल्यांवाचून कोणावरही विश्वास ठेवूं नये.

८५१
विषमं न हि मन्यन्ते प्रपातं मधुदर्शिन: ॥५।५१।२६॥
मध पाहणारे (मधाच्या ठिकाणाचा) तुटलेला कडा किती भयंकर आहे इकडे लक्ष देत नाहींत.

८५२
विषमां च दशां प्राप्तो देवान् गर्हति वै भृशम् ।
आत्मन: कर्मदोषाणि न विजानात्यपण्डित: ॥३।२०९।६॥
मूर्ख मनुष्य दुर्दशेच्या फेर्‍यांत सांपडला म्हणजे देवांच्या नांवानें खडे फोडतो, पण आपलें चुकतें कोठें, हें त्याला समजत नाहीं.

८५३
विषमावस्थिते दैवे पौरुषेऽफलतां गते ।
विषादयन्ति नात्मानं सत्त्वोपाश्रयिणो नरा: ॥३।७९।१४॥
दैव प्रतिकूळ होऊन प्रयत्न फुकट गेला असतां, सत्त्वशील पुरुष अंत:करण खिन्न होऊं देत नाहींत.

८५४
विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिन: ।
रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते ॥६।२६।५९॥
निराहारी पुरुषाला विषय सोडून जातात, पण त्यांची आवड शिल्लक राहतेच, ही आवडसुध्दां परब्रह्माचा साक्षात्कार झाल्यानंतर नष्ट होते.

८५५
विष्वग्लोप: प्रवर्तेत भिध्येरन्सर्वसेतव: ।
ममत्वं न प्रजानीयुर्यदि दण्डो न पालयेत् ॥१२।१५।३८॥
दंडानें जर संरक्षण केलें नसतें तर सर्वत्र लोप होऊन गेला असता. सर्व प्रकारच्या मर्यादांचा भंग होऊन गेला असता आणि कोणाची कशावर मालकी राहिली नसती.

८५६
विहीनं कर्मणाऽन्यायं य: प्रगृह्णाति भूमिप: ।
उपायस्याविशेषज्ञं तद्वै क्षत्रं नपुंसकम् ॥१२।१४२।३१॥
(सामादिक) उपाय व त्यांचे भेद ह्यांचें ज्ञान नसणारा जो राजा, अन्यायानें प्रजेकडून कर वसूल करतो; पण आपलें (प्रजापालनरुप) कर्तव्य मात्र करीत नाहीं तो क्षत्रिय केवळ नपुंसक होय.

८५७
वृक्षमूलेऽपि दयिता
यस्य तिष्ठति तद्गृहम् ।
प्रासादोऽपि तया हीन:
कान्तार इति निश्चितम् ॥१२।१४४।१२॥
कोणी झाडाखालीं राहिला, तरी त्याची स्त्री बरोबर असेल, तर तें त्याचें घरच होय, आणि तिजवांचून जरी एखादें राजमंदिर असलें तरी तें नि:संशय अरण्यच होय.

८५८
वृत्तं यत्नेन संरक्षेत् वित्तमेति हतो हत: ॥५।३६।३७॥
शीलाचें यत्नपूर्वक रक्षण करावें. द्रव्य काय, मिळतें आणि जातें, जो केवळ द्रव्यानें क्षीण झाला तो खरोखरच क्षीण नव्हे, पण ज्याचें शील भ्रष्ट झालें त्याचा सर्वस्वीं नाश झाला.

८५९
वृत्ते: कार्पण्यलब्धाया अप्रतिष्ठैव ज्यायसी ॥५।९०।७४॥
मिंधेपणानें उपजीविका करण्यापेक्षां अगदीं निराधार असणेंच चांगलें.

८६०
वृत्तेन हि भवत्यार्यो न धनेन न विद्यया ॥५।९०।५३॥
शीलानेंच मनुष्य आर्य गणला जातो; धनानें नव्हे, अथवा विद्येनेंही नव्हे.

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP