६१
अब्रुवन्कस्यचिन्निन्दाम् आत्मपूजामवर्णयन् ।
न कश्चिद्गुणसंपन्न: प्रकाशो भुवि दृश्यते ॥३।२०७।५॥
कोणाचीही निंदा न करतां व आत्मस्तुती न करतां कोणताही गुणसंपन्न पुरुष जगांत प्रसिध्दीस येत असल्याचें दृष्टीस पडत नाहीं.
६२
अभिमानकृतं कर्म नैतत्फलवदुच्यते ।
त्यागयुक्तं महाराज सर्वमेव महाफलम् ॥१२।१२।१६॥
(नकुल युधिष्ठिराला म्हणाला) (मी कर्ता अशा) अभिमानानें केलेलें कर्म सफल झालें असें म्हणता येत नाहीं. त्यागबुध्दीनें केलेल्या प्रत्येक कर्माचें फळ फार मोठें मिळतें.
६३
अभिवादनशीलस्य नित्यं वृध्दोपसेविन: ।
चत्वारि संप्रवर्धन्ते कीर्तिरायुर्यशो बलम् ॥५।३९।७६॥
नेहमीं वृध्दजनांना वंदन करुन त्यांच्या समागमांत जो राहतो, त्याची कीर्ति, आयुष्य, यश व सामर्थ्य हीं चार वृध्दिंगत होतात.
६४
अभिशस्तं प्रपश्यन्ति दरिद्रं पार्श्वत: स्थितम् ।
दरिद्रं पातकं लोके न तच्छंसितुमर्हति ॥१२।८।१४॥
दरिद्री मनुष्य जवळ उभा राहिला तर एकाद्या पातकी मनुष्याप्रमाणें लोक त्याजकडे पाहतात. ह्या लोकामध्यें दारिद्र्य हें एक पातकच आहे ! म्हणूनच त्याची प्रशंसा करणें योग्य नाहीं.
६५
अभ्यावहति कल्याणं विविधं वाक् सुभाषिता ।
सैव दुर्भाषिता राजन् अनर्थायोपपध्यते ॥५।३४॥७७॥
(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) हे राजा, वाणीनें चांगलें भाषण केलें असतां त्यापासून अनेक प्रकारें कल्याण होतें, परंतु दुर्भाषण केलें असतां तीच वाणी अनर्थाला कारण होते.
६६
अमर्षजो हि संताप: पावकाद्दीप्तिमत्तर: ॥३।३५।११॥
असहिष्णुतेमुळें होणारा संताप अग्नीपेक्षांही अधिक प्रखर असतो.
६७
अमित्रमुपसेवेत विश्वस्तवदविश्वसन् ।
प्रियमेव वदेन्नित्यं नाप्रियं किंचिदाचरेत् ॥१२।१०३।९॥
(बृहस्पति इंद्राला म्हणतात) शत्रूवर विश्वास न ठेवतां विश्वास ठेवल्याचा बहाणा करुन त्याच्या कलानें वागावें. त्याच्याशीं सदा गोड बोलावें व त्याला न रुचणारी कोणतीही गोष्ट करुं नये.
६८
अमित्रो न विमोक्तव्य: कृपणं वडपि ब्रुवन् ।
कृपा न तस्मिन्कर्तव्या हन्यादेवापकारिणम् ॥१।१४०।२२॥
शत्रु अत्यंत दीनवाणीनें बोलूं लागला तरी त्याला मोकळा सोडूं नये. त्याच्यावर दया न करतां त्या अपकार करणार्याला ठार मारावें.
६९
अमित्रो मित्रतां याति मित्रं चापि प्रदुष्यति ।
सामर्थ्ययोगात्कार्याणाम् अनित्या वै सदा गति: ॥१२।१३८।१३॥
कार्याच्या महत्त्वाच्या मानानें शत्रुही मित्र होतात व मित्रही शत्रु होतात. कारण कोणतीही स्थिति ही कायमची अशी नसतेच.
७०
अमृतस्येव संतृप्येत् अवमानस्य तत्त्ववित् ।
विपस्येवोद्विजेन्नित्यं संमानस्य विचक्षण: ॥१२।२२९।२१॥
तत्त्ववेत्या पुरुषाला अपमान झाला तर अमृतप्राप्ति झाल्याप्रमाणें संतोष वाटला पाहिजे व शहाण्यानें विषाप्रमाणें सन्मानाचा तिटकारा मानला पाहिजे.
७१
अयुध्यमानो म्रियते युध्यमानश्च जीवति ।
कालं प्राप्य महाराज न कश्चिदतिवर्तते ॥११।२।५॥
(भारतीय युध्दानंतर विदुर धृतराष्ट्राचें सांत्वन करतो) हे राजा, रणांत पाऊल न टाकणाराही मरुन जातो आणि घनघोर रणकंदन करुनही मनुष्य जिवंत राहूं शकतो. सारांश, काळ आल्यावर त्याचा प्रतिकार कोणालाही करितां यावयाचा नाहीं.
७२
अरक्षितारं हर्तारं विलोप्तारमनायकम् ।
तं वै राजकलिं हन्यु: प्रजा: संनह्य निर्घृणम् ॥१३।६१।३२॥
प्रजेचें रक्षण न करितां तिजपासून जो कर घेतो व प्रजेला सन्मार्गाला न लावितां जो लुबाडतो तो राजरुपी कली प्रजेनें सज्ज होऊन निष्ठुरपणें ठार मारावा.
७३
अरण्ये विजने हिंसन्ति ये नरा: स्वर्गगामिन: ॥१३।१४४।३१॥
अरण्यांत एकीकडे पडलेलें दुसर्याचें द्रव्य दृष्टीस पडलें असतांही जे लोक मनानेंसुध्दां त्याचा अभिलाष धरीत नाहींत ते स्वर्गाला जातात.
७४
अराजकेषु राष्ट्रेषु धर्मो न व्यवतिष्ठते ।
परस्परं च खादन्ति सर्वथा धिगराजकम् ॥१२।६७।३॥
राजा नसलेल्या राष्ट्रांमध्यें धर्म राहत नाहीं, तसेंच लोक एकमेकांना फाडून खातात. अराजकतेला सर्वथा धिक्कार असो !
७५
अरिणापि समर्थेन संधिं कुर्वीत पण्डित: ॥१२।१३८।२०३॥
सुज्ञ मनुष्यानें शत्रु सामर्थ्यसंपन्न असल्यास त्याच्याशींही संधि करावा.
७६
अर्थं महान्तमासाध्य विध्यामैश्वर्यमेव वा ।
विचरत्यसमुन्न्ध्दो य: स पण्डित उच्यते ॥५।३३।४५॥
विपुल संपत्ति, विद्या किंवा अधिकार प्राप्त झाला असतां जो निरभिमान वृत्तीनें वागतो त्याला पंडित म्हणावें.
७७
अर्थयुक्त्या हि जायन्ते पिता माता सुतस्तथा ।
मातुला भागिनेयाश्च तथा संबन्धिबान्धवा: ॥१२।१३८।१४५॥
आई, बाप, मुलगा, मामा, भाचे तसेंच इतर संबंधी आणि बांधव हे सर्व द्रव्याच्याच संबंधानें परस्पर (प्रीतियुक्त) होत असतात.
७८
अर्थसिध्दिं परामिच्छन् धर्ममेवादितश्चरेत् ।
न हि धर्मादपैत्यर्थ: स्वर्गलोकादिवामृतम् ॥५।३७।४८॥
पुष्कळ द्रव्य मिळावें अशी इच्छा करणार्यानें प्रथम धर्माचेंच आचरण करावें. कारण, स्वर्गलोकाला सोडून जसें अमृत जात नाहीं तसा अर्थ (द्रव्य) धर्माला सोडून राहत नाहीं.
७९
अर्थस्य पुरुषो दासो दासस्त्वर्थो न कस्यचित् ।
इति सत्यं महाराज बध्दोऽस्म्यर्थेन कौरवै: ॥६।४३।४१॥
(तुम्ही कौरवांचा पक्ष कां सोडीत नाहीं ? ह्या युधिष्ठिराच्या प्रश्नाला भीष्मद्रोणादिकांनीं उत्तर दिलें आहे) पुरुष हा अर्थाचा (द्रव्याचा) दास आहे, अर्थ कोणाचाही दास नाहीं. ह्यास्तव, खरोखर, हे राजा, मी अर्थामुळें कौरवांशीं बांधला गेलों आहें.
८०
अर्थागमो नित्यमरोगिता च
प्रिया च भार्या प्रियवादिनी च ।
वश्यश्च पुत्रोऽर्थकरी च विद्या
षड् जीवलोकस्य सुखानि राजन् ॥५॥३३॥८७॥
(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) हे राजा, सदोदित द्रव्यप्राप्ति, निकोप प्रकृति, मधुर भाषण करणारी प्रेमळ स्त्री, आज्ञाधारक पुत्र व धनोत्पादक विद्या हीं सहा मृत्युलोकांतील सुखें होत.