५४१
निर्मन्युश्वाप्यसंख्येय: पुरुष: क्लीबसाधन: ॥५।१३३।६॥
ज्याला कधीं राग येत नाहीं असा नामर्द पुरुष कोणाच्या खिसगणींत नसतो.
५४२
निर्वनो वध्यते व्याघ्रो निर्व्याघ्रं छिध्यते वनम् ।
तस्माद्वयाघ्रो वनं रक्षेत् वनं व्याघ्रं च पालयेत् ॥५।२९।५५॥
वन नसेल तर वाघांचा वध होत असतो आणि ज्यांत वाघ नाहीं तें वनही लोकांकडून तोडलें जातें. ह्यास्तव वाघानें वनाचें रक्षण करावें आणि वनानेंही वाघाचें पालन करावें.
५४३
निश्चय: स्वार्थशास्त्रेषु विश्वासश्चासुखोदय: ॥१२।१३९।७०॥
नीतिशास्त्राचा असा सिध्दान्त आहे कीं, (अस्थानीं) विश्वास हा सर्व दु:खांचें उत्पत्तिस्थान आहे.
५४४
निश्चित्य य: प्रक्रमते नान्तर्वसति कर्मण: ।
अवन्धकालो वश्यात्मा स वै पण्डित उच्यते ॥५।३३।३९॥
प्रथम निश्चय केल्यावरच जो कार्य हातीं घेतो, कार्य मध्येंच सोडून जो स्वस्थ बसत नाहीं, जो आपला वेळ फुकट घालवीत नाहीं आणि ज्याचें मन स्वाधीन आहे त्याला पंडित असें म्हणतात.
५४५
निषेवते प्रशस्तानि निन्दितानि न सेवते ।
अनास्तिक: श्रध्दधान एतत्पण्डितलक्षणम् ॥५।३३।२१॥
जो प्रशस्त कर्माचें आचरण करतो, निंद्य कर्मांपासून दूर राहतो, (पुनर्जन्म, परलोक इत्यादिकांविषयीं) आस्तिक्यबुध्दि धारण करतो आणि (गुरु, वेदवाक्य इत्यादींवर) विश्वास ठेवतो तो पंडित होय.
५४६
नैकमिच्छेद् गणं हित्वा स्याच्चेदन्यग्रह: ।
यस्वेको बहुभि: श्रेयान् कामं तेन गणं त्यजेत् ॥
श्रेयसो लक्षणं चैतत् विक्रमो यस्य दृश्यते ॥१२।८२।१२-१३॥
समुदायाला सोडून (राजानें) एकाच मनुष्याची इच्छा करुं नये व एकाचाच अंगीकार करणें अवश्य असल्यास, जो एकटा इतर पुष्कळांपेक्षां श्रेष्ठ असेल, त्याचा स्वीकार करुन समुदायाचा खुशाल त्याग करावा. कारण, ज्या पक्षांत जास्त पराक्रम असेल तो स्वीकारणें हें कल्याणाचें लक्षण आहे.
५४७
नैवास्य कश्चिभ्दविता नायं भवति कस्यचित् ।
पथि सड्गतमेवेदं दारबन्धुसुहृज्जनै: ॥१२।२८।३९॥
ह्या जीवात्म्याचा कोणी नाहीं आणि हा कोणाचा नाहीं. स्त्री, इतर नातलग व इष्ट मित्र ह्यांचा सहवास हा केवळ रस्त्यांतील भेटीसारखा आहे.
५४८
नैवाहितानां सततं विपश्चित:
क्षणं प्रतीक्षन्त्यपि दुर्बलीयसाम् ।
विशेषतोऽरीन्व्यसनेषु पण्डितो
निहत्य धर्मं च यशश्च विन्दते ॥८।९०।७१॥
शत्रु दुर्बळ झाले म्हणजे शहाणे लोक केव्हांही त्यांचा नाश करण्याला क्षणभरदेखील विलंब लावीत नाहींत. शहाण्या मनुष्यानेम विशेषत: शत्रु संकटांत असतांनाच त्याचा वध केला असतां त्याजकडून धर्माचरण घडून शिवाय त्यास कीर्तिही प्राप्त होते.
५४९
नोदकक्लिन्नगात्रस्तु स्नात इत्यभिधीयते ।
न स्नातो यो दमस्नात: स बाह्याभ्यन्तर: शुचि: ॥१३।१०८।९॥
पाण्यानें आंग भिजलें म्हणजे स्नान झालें असें म्हणत नाहींत. ज्यानें इंद्रियदमनरुप उदकांत स्नान केलें तोच खरोखर ‘स्नात’ झाला. तो अंतर्बाह्य शुचिर्भूत झाला.
५५०
पक्वानां हि वधे सूत वज्रायन्ते तृणान्युत ॥७।११।४८॥
(धृतराष्ट्र संजयाला म्हणतो) हे सूता, पक्व झालेल्यांचा वध करण्याच्या कामीं तृणाचासुध्दां वज्रासारखा उपयोग होतो.
५५१
पञ्चमेऽहनि षष्ठे वा शाकं पचति स्वे गृहे ।
अनृणी चाप्रवासी च स वारिचर मोदते ॥३।३१३।११५॥
(युधिष्ठिर म्हणतो) हे यक्षा, पांचव्या अथवा सहाव्या दिवशीं कां होईना, जो स्वत:च्या घरीं असेल तोच भाजीपाला उकडून खातो, ज्याला कोणाचें देणें नाहीं आणि ज्याला प्रवास करावा लागत नाहीं, तो आनंदानें राहतो.
५५२
पञ्चेन्द्रियस्य मर्त्यस्य छिद्रं चेदेकमिन्द्रियम् ।
ततोऽस्य स्त्रवति प्रज्ञा दृते: पात्रादिवोदकम् ॥५।३३।८२॥
मनुष्याच्या पांच इंद्रियांपैकीं एकादें जरी ताब्यांत नसेल तरी त्याच्या द्वारें, चर्मपात्रांतील पाणी भोकांतून गळून जावें त्याप्रमाणें त्याची बुध्दि नष्ट होते.
५५३
पठका: पाठकाश्चैव ये चान्ये शास्त्रचिन्तका: ।
सर्वे व्यसनिनो मूर्खा य: क्रियावान्स पण्डित: ॥३।३१३।११०॥
शिकणारे व शिकविणारे तसेच इतर जे कोणी शास्त्राविषयीं विचार करितात ते सर्व नादिष्ट, मूर्ख आहेत. जो कांहीं विशेष करुन दाखवितो तोच शहाणा.
५५४
पण्डितेन विरुध्द: सन् दूरस्थोऽस्मीति नाश्वसेत् ।
दीर्घौ बुध्दिमतो बाहू याभ्यां हिंसति हिंसित: ॥१२।१४०।६८॥
पंडिताशीं विरोध आला असतां, आपण त्याच्यापासून दूर आहों असें समजून निर्भयपणें राहूं नये. कारण बुध्दिमान् पुरुषाचे बाहु (दिसण्यांत जेवढे दिसतात तेवढे नसून ते) फार लांब असतात व त्याला पीडा दिल्यास त्यांच्या योगानें तो पीडा देणार्यांचा वध करतो.
५५५
पतित: शोच्यते राजन् निर्धनश्चापि शोच्यते ।
विशेषं नाधिगच्छामि पतितस्याधनस्य च ॥१२।८।१५॥
(अर्जुन युधिष्ठिराला म्हणतो) राजा, लोक पातकी मनुष्याच्या संबंधानें हळहळतात आणि निर्धनाच्या संबंधानेंही हळहळतात. मला तर पातकी आणि दरिद्री ह्यांच्यामध्यें कांहीं भेद दिसत नाहीं.
५५६
पतिर्हि देवो नारीणां पतिर्बन्धु: पतिर्गति: ।
पत्या समा गतिर्नास्ति दैवतं वा यथा पति: ॥१३।१४६।५५॥
पति हाच स्त्रियांचा देव, पति हाच बांधव आणि पति हेंच आश्रयस्थान. स्त्रियांना पतीसारखी गति नाहीं, पति हा खरोखर देवासमान होय.
५५७
पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति ।
तदहं भक्त्युपहृतम् अश्नामि प्रततात्मन: ॥६।३३।२६॥
(भगवान् श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात) पान, फूल, फळ किंवा (नुसतें) पाणीसुध्दां जो मला भक्तिपूर्वक अर्पण करितो, त्या शुध्द अंत:करणाच्या मनुष्याचें भक्तीनें अर्पण केलेलें तें मी स्वीकारीत असतों.
५५८
परं विषहते यस्मात् तस्मात्पुरुष उच्यते ॥५।१३३।३५॥
शत्रूचा प्रतिकार करतो म्हणूनच (त्याला) पुरुष म्हणतात.
५५९
परं क्षिपति दोषेण वर्तमान: स्वयं तथा ।
यश्च क्रुध्यत्यनीशान: स च मूढतमो नर: ॥५।३३।४२॥
जो दोष स्वत:च्या ठिकाणीं आहे त्याच दोषाबद्दल जो दुसर्याला नांवें ठेवितो, तसेंच आंगीं सामर्थ्य नसतां जो रागावतो तो मनुष्य पराकाष्ठेचा मूर्ख होय.
५६०
परनेयोऽग्रणीर्यस्य स मार्गान्प्रतिमुह्यति ।
पन्थानमनुगच्छेयु: कथं तस्य पदानुगा: ॥२।५५।४॥
ज्याचा पुढारी दुसर्याच्या तंत्रानें चालणारा असतो, त्याचा स्वत:चाच मार्ग चुकतो. तेव्हां त्याच्या पावलावर पाऊल टाकून जाणारांना योग्य मार्ग कसा सांपडावा ?