मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|महाभारतसुभाषितानि|
वचन ८२१ ते ८४०

सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन ८२१ ते ८४०

लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला.


८२१
लोभं हित्वा सुखी भवेत् ॥३।३१३।७८॥
लोभ टाकिल्यानें मनुष्य सुखी होतो.

८२२
लोभात्पापं प्रवर्तते ॥१२।१५८।२॥
लोभापासून पातकाची प्रवृत्ति होते.

८२३
लोहितोदां केशतृणां गजशैलां ध्वजद्रुमाम् ।
महीं करोति युध्देषु क्षत्रियो य: स धर्मवित् ॥१२।५५।१८॥
जो संग्रामामध्यें पृथ्वीला रक्तरुपी जलानें युक्त, केशरुपी तृणानें आच्छादित झालेली, गजरुपी पर्वत असलेली व ध्वजरुपी वृक्षांनीं युक्त अशी करितो, तोच क्षत्रिय खरा धर्मवेत्ता होय.

८२४
वधमेव प्रशंसन्ति शत्रूणामपकारिणाम् ॥१।१४०।१०॥
अपकार करणार्‍या शत्रूंचा वधच करणें प्रशस्त मानतात.

८२५
वध्यन्ते न ह्यविश्वस्ता: शत्रुभिर्दुर्बला अपि ।
विश्वस्तास्तेषु वध्यन्ते बलवन्तोऽपि दुर्बलै: ॥१२।१३८।१९८॥
जे सावध असतात ते दुर्बळ असले तरी शत्रूंकडून मारिले जात नाहींत. पण बलाढय असले तरी शत्रूंविषयीं बेसावध राहणारे असल्यास दुर्बळ शत्रूंकडूनही मारिले जातात.

८२६
वर्तमान: सुखे सर्वो मुह्यतीति मतिर्मम ॥३।१८१।३०॥
(अजगर झालेला नहुष राजा युधिष्ठिराला म्हणतो) सुखांत असतांना सर्वांना मोह उत्पन्न होतो असें माझें मत आहे.

८२७
वर्धमानमृणं तिष्ठेत् परिभूताश्च शत्रव: ।
जनयन्ति भयं तीव्रं व्याधयश्चाप्युपेक्षिता: ॥१२।१४०।५९॥
ऋण अवशिष्ट राहिलें तर तें वृध्दिंगतच होत जातें, शत्रु शिल्लक ठेविले तर त्यांचा अपमान झाल्यामुळें ते पुढें अत्यंत भीति उत्पन्न करितात आणि रोगांची उपेक्षा केली तर त्यांपासूनही अतिशय भीति उत्पन्न होते.

८२८
वशे बलवतां धर्म: सुखं भोगवतामिव ।
नास्त्यसाध्यं बलवतां सर्वम बलवतां शुचि ॥१२।१३४।८॥
सुख जसें भोगसाधनें अनुकूल असलेल्याच्या स्वाधीन, तसा धर्म हा बलसंपन्न असलेल्यांच्या अधीन. ज्यांच्यापाशीं बळ आहे त्यांना असाध्य असें कांहींच नाहीं. बलवान् असतील त्यांचें सर्वच पवित्र.

८२९
वसन्विषयमध्येऽपि न वसत्येव बुध्दिमान् ।
संवसत्येव दुर्बुध्दिरसत्सु विषयेष्वपि ॥१२।२९८।६॥
शहाणा मनुष्य विषयांच्या गराडयांत राहूनही न राहिल्यासारखा असतो. मूर्ख मनुष्य विषय जवळ नसतांही त्यांत गुरफटल्याप्रमाणें असतो.

८३०
वहेदमित्रं स्कन्धेन यावत्कालस्य पर्यय: ।
प्राप्तकालं तु विज्ञाय भिन्ध्याद्‍ घटमिवाश्मनि ॥१२।१४०।१८॥
आपला काळ उलट आहे तोंवर शत्रूला खांद्यावर देखील बसावावें परंतु योग्य काळ आला आहेसें दिसून येतांच, मडकें दगडावर आपटावें तसा त्याचा चुराडा करुन टाकावा.

८३१
वाक्शल्यं मनसो जरा ।५।३९।७९॥
वाग्बाणामुळें मनाला वार्धक्य येतें.

८३२
वाक्संयमो हि नृपते सुदुष्करतमो मत: ।
अर्थवच्च विचित्रं च न शक्यं बहु भाषितुम् ॥५।३४।७६॥
(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) हे राजा, वाणीचा संयम करणें अत्यंत दुर्घट म्हणून म्हटलें आहे. तसेंच यथार्थ असून चटकदार असें भाषण पुष्कळ करणें शक्य नाहीं.

८३३
वाक्सायका वदनान्निष्पतन्ति
यैराहत: शोचति रात्र्यहानि ।
परस्य नामर्मसु मे पतन्ति
तान्पण्डितो नावसृजेत्परेषु ॥१३।१०४।३२॥
वाग्बाण हे तोंडातून सुटत असतात. ते ज्याला लागले तो रात्रंदिवस तळमळत राहतो. ह्यास्तव जे मर्मस्थानांवाचून इतर ठिकाणीं पडतच नाहींत (मर्मींच लागतात) असे वाग्बाण सुज्ञ मनुष्यानें दुसर्‍यावर केव्हांही टाकूं नयेत.

८३४
वाग्वज्रा ब्राह्मणा: प्रोक्ता:
क्षत्रिया बाहुजीविन: ॥१२।१९९।४६॥
वाणी हें ब्राह्मणांचें शस्त्र असून क्षत्रिय हे बाहुबलावर जगणारे होत असें म्हटले आहे.

८३५
वाचा भृशं विनीत: स्यात् हृदयेन तथा क्षुर: ।
स्मितपूर्वाभिलाषी स्यात् सृष्टो रौद्रेण कर्मणा ॥१।१४०।६६॥
बोलण्यांत अगदीं विनयशील पण हृदयानें वस्तर्‍याच्या धारेप्रमाणें तीक्ष्ण असावें. स्मितपूर्वक बोलावें परंतु आपलें खरें स्वरुप भयंकर कृति करुन प्रगट करावें.

८३६
वासांसि जीर्णानि यथा विहाय
नवानि गृह्णाति नरोऽपराणि ।
तथा शरीराणि विहाय जीर्णा-
न्यन्यानि संयाति नवानि देही ॥६।२६।२२॥
ज्याप्रमाणें मनुष्य जुनीं वस्त्रें टाकून देऊन दुसरीं नवीं घेतो, त्याप्रमाणें आत्मा हा जीर्ण झालेलीं शरीरें टाकून देऊन दुसर्‍या नव्या शरीरांत प्रवेश करितो.

८३७
विक्रमाधिगता हार्था: क्षत्रधर्मेण जीवत: ।
मनो मनुष्यस्य सदा प्रीणन्ति पुरुषोत्तम ॥५।९०।७९॥
(कुंती श्रीकृष्णाला म्हणते) हे पुरुषोत्तमा, पराक्रम करुन मिळवलेलें द्रव्य क्षात्रधर्मानें चालणार्‍या मनुष्याच्या मनाला सदा संतोष देतें.

८३८
विगुणा ह्यपि संरक्ष्या ज्ञातयो भरतर्षभ ॥५।३९।२०॥
(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) हे भरतश्रेष्ठा, आपल्या कुळांतील गुणहीन पुरुषांचेंही संरक्षण करणें अवश्य आहे.

८३९
विजयो मन्त्रमूलो हि राज्ञो भवति भारत ॥२।५।२७॥
(नारद युधिष्ठिराला म्हणतात) हे भारता, राजाला विजय प्राप्त होण्याला मूळ कारण गुप्त सल्लामसलत हेंच होय.

८४०
विदिते चापि वक्तव्यं सुहृभ्दिरनुरागत: ॥४।४।९॥
एकाद्यास माहीत असलेली गोष्टही आप्तेष्टांनीं पुन: प्रेमानें सांगावी हें त्यांचें कर्तव्यच आहे.

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP