सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन ५२१ ते ५४०
लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला.
५२१
नासम्यक् कृतकारी स्यात् अप्रमत्त: सदा भवेत् ।
कष्टको ह्यपि दुश्छिन्नो विकारे कुरुते चिरम् ॥१२।१४०।६०॥
निष्काळजीपणानें कांहीं करुं नये. नेहमी सावध असावें. कारण, एकदा कांटासुध्दां जर अयोग्य रीतीनें तुटला तर तो पुष्कळ काळपर्यंत विकार उत्पन्न करतो.
५२२
नास्ति जात्या रिपुर्नाम मित्रं वापि न विद्यते ।
सामर्थ्ययोगाज्जायन्ते मित्राणि रुपवस्तथा ॥१२।१४०।५१॥
खरोखर जन्मत:च कोणी शत्रु नसतो किंवा मित्रही नसतो. सामर्थ्याच्या योगानें मित्र आणि शत्रु हे होत असतात.
५२३
नास्ति भार्यासमो बन्धुर् नास्ति भार्यासमा गति: ।
नास्ति भार्यासमो लोके सहायो धर्मसंग्रहे ॥१२।१४४।१६॥
भार्येसारखा मित्र नाहीं, भार्येसारखा आसरा नाहीं. ह्या लोकीं भार्येसारखा धर्मसंग्रहाच्या कामीं साहाय्य करणारा कोणी नाहीं.
५२४
नास्ति मातृसमाच्छाया नास्ति मातृसमा गति: ।
नास्ति मातृसमं त्राणं नास्ति मातृसमा प्रिया ॥१२।२६६।३१॥
मातेसारखी सांवली नाहीं, मातेसारखी गति नाहीं, मातेसारखें छत्र नाहीं, मातेसारखी प्रिय कोणी नाहीं.
५२५
नास्ति विद्यासमं चक्षुर् नास्ति सत्यसमं तप: ।
नास्ति रागसमं दु:खं नास्ति त्यागसमं सुखम् ॥१२।३२९।६॥
विद्येसारखा अन्य नेत्र नाहीं. सत्यासारखें तप नाहीं. विषयवासनेसारखें दु:ख नाहीं आणि त्यागासारखें सुख नाहीं.
५२६
नास्ति वै जातित: शत्रु: पुरुषस्य विशांपते ।
येन साधारणी वृत्ति: स शत्रुर्नेतरो जन: ॥२।५५।१५॥
(दुर्योधन धृतराष्ट्राला म्हणतो) राजा, जन्मत:च कोणी मनुष्य दुसर्या मनुष्याचा शत्रु नसतो. आपल्यासारखीच ज्याची उपजीविका असेल तोच आपला शत्रु, दुसरा कोणी नाहीं.
५२७
नास्ति सत्यसमो धर्मो न सत्याद्विध्यते परम् ।
न हि तीव्रतरं किंचित् अनृतादिह विध्यते ॥१।७४।१०५॥
सत्यापरता धर्म नाहीं, सत्यापेक्षां श्रेष्ठ कांहीं नाहीं, असत्यापेक्षां अधिक भयंकर असें जगांत कांहींच नाहीं.
५२८
नास्थाने प्रक्रिया क्षमा ॥१२।११९।३॥
अस्थानीं बहुमान करणें योग्य नव्हे.
५२९
नाहं राज्यं भवद्द्तं भोक्तुमिच्छामि पार्थिव ।
बाहुवीर्यार्जितं राज्यम् अश्नीयामिति कामये ॥१२।७४।१८॥
(मुचकुंद कुबेराला म्हणतो) हे राजा, तुझ्याकडून दान मिळालेलें राज्य भोगण्याची माझी इच्छा नाहीं. राज्य स्वत:च्या बाहुबलानें मिळवून त्याचा उपभोग घ्यावा असें मी इच्छितों.
५३०
नाह्या पूरयितुं शक्या न मासैर्भरतर्षभ ।
अपूर्यां पूरयन्निच्छाम् आयुषापि न शक्नुयात् ॥१२।१७।४॥
(युधिष्ठिर भीमाला म्हणतो) हे भरतश्रेष्ठा, वासनेची तृप्ति एका दिवसानें किंवा कांहीं महिन्यांनींही होणें शक्य नाहीं. वासना ही ‘अपूर्य’ असून तिची पूर्ति करणें सर्व आयुष्य खर्चूनसुध्दां शक्य नाहीं.
५३१
निकृत्या निकृतिप्रज्ञा हन्तव्या इति निश्चय: ।
न हि नैकृतिकं हत्वा निकृत्या पापमुच्यते ॥३।५३।२२॥
कपटबुध्दि शत्रूंचा कपटानेंच वध केला पाहिजे असा सिध्दान्त आहे. कपटी शत्रूचा कपटानें वध केला असतां त्याला पाप म्हणत नाहींत.
५३२
नित्यं यस्तु सतो रक्षेत् असतश्च निवर्तयेत् ।
स एव राजा कर्तव्यम् तेन सर्वमिदं धृतम् ॥१२।७८।४४॥
जो नेहमीं सज्जनांचें पालन करील आणि दुर्जनांना घालवून देईल त्यालाच राजा करावें. त्याच्याच आश्रयानें सर्व विश्व असतें.
५३३
नित्यं रक्षितमन्त्र:स्यात् यथा मूक:शरच्छिखी ॥१२।१२०।७॥
ज्याप्रमाणें मोर हा शरद ऋतूंत मौन धारण करतो, त्याप्रमाणें राजानें आपली मसलत नेहमीं गुप्त राखावी.
५३४
नित्यं विश्वासयेदन्यान्
परेषां तु न विश्वसेत् ॥१२।१३८।१९५॥
आपल्याविषयीं दुसर्याच्या मनांत नेहमीं विश्वास उत्पन्न करावा. आपण मात्र दुसर्यावर विश्वास ठेवूं नये.
५३५
नित्यमुद्यतदण्डस्य भृशमुद्विजते नर: ।
तस्मात्सर्वणि भूतानि दण्डेनैव प्रसाधयेत् ॥१२।१४०।८॥
दंडशक्ति नेहमीं सज्ज असली म्हणजे लोक फार वचकून असतात. ह्यास्तव राजानें सर्व प्राण्यांना दंडशक्तीच्या योगानेंच आपल्या ताब्यांत ठेवावें.
५३६
नित्यं बुध्दिमतोऽप्यर्थ: स्वल्पकोऽपि विवर्धते ।
दाक्ष्येण कुर्वत: कर्म संयमात्प्रतितिष्ठति ॥१२।१३९।८८॥
बुध्दिमान् पुरुषाजवळ आरंभीं अगदीं थोडें द्रव्य असलें तरी तें नेहमीं वाढत जातें. दक्षतेनें उद्योग करणार्याचें कार्य निग्रहामुळें पक्के होतें.
५३७
नित्योद्विग्ना: प्रजा यस्य कारभारप्रपीडिता: ।
अनथैर्विप्रलुप्यन्ते स गच्छति पराभवम् ॥१२।१३९।१०९॥
ज्या राजाच्या प्रजा नेहमीं भयभीत आहेत, करांच्या ओझ्यामुळें चिरडून गेल्या आहेत, अनेक संकटांनीं लुटल्या जात आहेत (संकटें येऊन त्यांचे द्रव्य लुबाडलें जात आहे) त्या राजाचा पराभव होतो.
५३८
निमेषमात्रमपि हि वयो गच्छन्न तिष्ठति ।
स्वशरीरेष्वनित्येषु नित्यं किमनुचिन्तयेत् ॥१२।३३०।२२॥
आयुष्य एकसारखें चाललें असून एक पळभरसुध्दां थांबत नाहीं. स्वत:चें शरीरच जेथें अशाश्वत, तेथें कोणती वस्तु शाश्वत म्हणून समजावयाची ?
५३९
नियन्ता चेन्न विद्येत न कश्चिध्दर्ममाचरेत् ॥४।६८।४५॥
नियमन करणारा कोणी नसेल तर कोणीही धर्माप्रमाणें वागणार नाहीं.
५४०
निरीहो नाश्नुते महत् ॥५।१३३।३४॥
महत्त्वाकांक्षा नसणार्या पुरुषाला मोठेपणा प्राप्त होत नाहीं.
N/A
References : N/A
Last Updated : March 27, 2022
TOP