सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन ८८१ ते ९००
लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला.
८८१
शीलं प्रधानं पुरुषे तद्यस्येह प्रणश्यति ।
न तस्य जीवितेनार्थो न धनेन न बन्धुभि: ॥५।३४।४८॥
मनुष्याच्या ठिकाणीं शील हेंच मुख्य आहे. तेंच ज्याचें नष्ट झालें त्याला ह्या जगांत जीविताचा, धनाचा अथवा बांधवांचा कांहींएक उपयोग नाहीं.
८८२
शीलवृत्तफलं श्रुतम् ॥५।३९।६७॥
विद्येचें फळ म्हणजे उत्तम शील आणि सदाचार.
८८३
शीलेन हि त्रयो लोका: शक्या जेतुं न संशय: ।
न हि किंचिदसाध्यं वै लोके शीलवतां भवेत् ॥१२।१२४।१५॥
शीलाच्या जोरावर त्रैलोक्य जिंकणें शक्य आहे ह्यांत शंका नाहीं. खरोखर, शीलसंपन्न मनुष्यांना असाध्य असें कांहींच नाहीं.
८८४
शुचेरपि हि युक्तस्य दोष एव निपात्यते ।
मुनेरपि वनस्थस्य स्वानि कर्माणि कुर्वत: ॥१२।१११।६०॥
शुचिर्भूत व आपलें कर्तव्य करण्यांत तत्पर अशाही पुरुषावर दोषारोप केला जातो आणि अरण्यामध्यें राहून केवळ आपलीं कर्में करीत असणार्या ऋशीवरही दोषारोप केला जातो.
८८५
शुभं वा यादि वा पापं द्वेष्यं वा यदि वा प्रियम् ।
अपृष्टस्तस्य तद्ब्रूयात् यस्य नेच्छेत्पराभवम् ॥५।३४।४॥
ज्याची हानि होऊं नये अशी आपल्याला इच्छा असते त्याला त्यानें जरी विचारिलें नसलें तरी, त्याच्यासंबंधानें जें आपणाला दिसत असेल तें सांगावें; मग तें शुभ असो अथवा अशुभ असो आणि त्याचप्रमाणें त्याला प्रिय होवो अथवा अप्रिय होवो.
८८६
शुभानामशुभानां च द्वौ राशी पुरुषर्षभ ।
य: पूर्वं सुकृतं भुड्क्ते पश्चान्निरयमेव स: ॥१८।३।१३॥
(इंद्र युधिष्ठिराला म्हणतो) हे पुरुषश्रेष्ठा, पुण्य आणि पाप ह्यांच्या दोन निरनिराळ्या राशी आहेत. ह्यांपैकीं पुण्य जो प्रथम भोगतो, त्याच्या वांटयाला मागाहून नरकच येतो.
८८७
शुभेन कर्मणा सौख्यं दु:खं पापेन कर्मणा ।
कृतं भवति सर्वत्र नाकृतं विद्यते क्वचित् ॥११।२।३६॥
सत्कर्मानें सुख आणि दुष्कर्मानें दु:ख प्राप्त होतें. जें पूर्वीं केलें असेल तेंच केव्हां झालें तरी फळाला येणार. जें केलें नाहीं त्याचें फळही नाहीं.
८८८
शुश्रूषुरपि दुर्मेधा: पुरुषोऽनियतेन्द्रिय: ।
नालं वेदयितुं कृत्स्नौ धर्मार्थाविति मे मति: ॥१०।५।१॥
तथैव तावन्मेधावी विनयं यो न शिक्षते ।
न च किंचन जानाति सोऽपि धर्मार्थनिश्चयम् ॥१०।५।२॥
(कृपाचार्य अश्वत्थाम्याला म्हणतात) मंद बुध्दीचा मनुष्य जिज्ञासु असला तरी इंद्रियांवर ताबा मिळविल्यावांचून तो धर्मार्थ पूर्णपणें जाणण्यास समर्थ होणार नाहीं, असें माझें मत आहे. तीच गोष्ट ज्याच्या मनाला चांगलें वळण लागलेलें नाहीं अशा बुध्दिमान् मनुष्याची, त्यालासुध्दां धर्मार्थाचें निश्चित ज्ञान कधींच होत नाहीं.
८८९
शूर: सर्वं पालयति सर्वं शूरे प्रतिष्ठितम् ॥१२।९९।१८॥
शूर पुरुष सर्वांचें रक्षण करितो. शूराच्या आधारानें सर्व राहतात.
८९०
शूरा वीराश्च शतश: सन्ति लोके युधिष्ठिर ।
येषां संख्यायमानानां दानशूरो विशिष्यते ॥१३।८।११॥
(भीष्म म्हणतात) हे युधिष्ठिरा, शूर वीर जगांत शेंकड्यांनीं आहेत. पण त्यांची (प्रतवारीनें) गणना करुं लागल्यास दानशूर हाच विशेष श्रेष्ठ ठरेल.
८९१
शृगालोऽपि वने कर्ण शशै: परिवृतो वसन् ।
मन्यते सिंहमात्मानं यावत्सिंहं न पश्यति ॥८।३९।२८॥
(शल्य म्हणतो) हे कर्णा, वनांत सशांच्या जमावांत कोल्हा बसला असतां त्यालासुध्दां आपण सिंह आहों असें वाटतें. (पण कोठवर ?) सिंह दृष्टीस पडला नाहीं तोंवर.
८९२
शृणु यक्ष कुलं तात न स्वाध्यायो न च श्रुतम् ।
कारणं हि द्विजत्वे च वृत्तमेव न संशय: ॥३।३१३।१०८॥
(युधिष्ठिर म्हणतो) बा यक्षा, ऐक. द्विजत्वाला कारण कुल नव्हे, वेदपठण नव्हे, किंवा शास्त्राभ्यासही नव्हे, तर शील हेंच द्विजत्वाला कारण होय ह्यांत संशय नाहीं.
८९३
शोक: कार्यविनाशन: ॥७।८०।७॥
शोकानें कार्यनाश होतो.
८९४
शोककाले शुचो मा त्वं हर्षकाले च मा हृष: ।
अतीतानागतं हित्वा प्रत्युत्पन्नेन वर्तय ॥१२।२२७।६६॥
(बली इंद्राला म्हणतो) दु:खाच्या वेळीं तूं दु:ख करुं नकोस आणि आनंदाच्या वेळीं हर्ष मानूं नकोस. पूर्वीं होऊन गेलेलें आणि पुढें होणारें ह्यांचा विचार करीत न बसतां वर्तमानकालाकडे दृष्टि देऊन वाग.
८९५
शोकस्थानसहस्त्राणि भयस्थानशतानि च ।
दिवसे दिवसे मूढम् आविशन्ति न पण्डितम् ॥११।२।२२॥
रोजच्या रोज हजारों शोक करण्याजोग्या गोष्टी आणि शेंकडों भय वाटण्याजोग्या गोष्टी मूढाला प्राप्त होत असतात, शहाण्याला नाहींत.
८९६
श्रध्दधान: शुभां विद्यां हीनादपि समाप्नुयात् ।
सुवर्णमपि चामेध्यात् आददीताविचारयन् ॥१२।१६५।३१॥
चांगली विद्या हीन मनुष्यापासूनदेखील श्रध्देनें ग्रहण करावी. सोनें अपवित्र पदार्थांशीं मिसळलें असल्यास त्यांतूनही खुशाल काढून घ्यावें.
८९७
श्रध्दामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रध्द: स एव स: ॥६।४१।३॥
मनुष्य हा श्रध्दामय आहे ज्याची जशी श्रध्दा असेल तसा तो होतो.
८९८
श्रध्दावाँल्लभते ज्ञानं तत्पर: संयतेन्द्रिय: ।
ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिम् अचिरेनाधिगच्छति ॥६।२८।३९॥
इंद्रियें ताब्यांत ठेवून दक्षतेनें प्रयत्न करणार्या श्रध्दावान् मनुष्याला ज्ञान प्राप्त होतें. ज्ञान प्राप्त झाल्यावर लवकरच त्याला परमशांतीचा लाभ होतो.
८९९
श्रिय एता: स्त्रियो नाम सत्कार्या भूतिमिच्छता ।
पालिता निगृहीता च श्री: स्त्री: भवति भारत ॥१३।४६।१५॥
(भीष्म युधिष्ठिराला म्हणतात) हे भारता, स्त्रिया म्हणजे खरोखर मूर्तिमंत लक्ष्मीच होत; कल्याणेच्छु पुरुषानें त्यांचा गौरव करावा. उत्तम प्रकारें पालनपोषण करुन योग्य दाबांत ठेविल्यानें स्त्री ही लक्ष्मी (गृहलक्ष्मी) होते.
९००
श्रियं ह्यविनयो हन्ति जरा रुपमिवोत्तमम् ॥५।३४।१२॥
वार्धक्यानें जसा सुंदर रुपाचा, तसा अहंकारानें ऐश्वर्याचा नाश होतो.
N/A
References : N/A
Last Updated : April 01, 2022
TOP