सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन १६१ ते १८०
लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला.
१६१
इत्यर्थमिष्यतेऽपत्यं तारयिष्यति मामिति ॥१।१५९।४५॥
मनुष्याला अपत्य एवढयाकरितां हवें असतें कीं, त्यानें आपल्याला (नरकापासून) तारावें.
१६२
इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ ।
तयोर्न वशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपन्थिनौ ॥६।२७।३४॥
इंद्रियें आणि त्यांचे विषय ह्यांच्यामधील प्रीति व द्वेष हीं ठरलेलीं आहेत. त्यांच्या ताब्यांत मनुष्यानें जाऊं नये. कारण ते त्याचे शत्रु होत.
१६३
इन्द्रियाणामनुत्सर्गो मृत्युनापि विशिष्यते ।
अत्यर्थं पुनरुत्सर्गो सादयेद्दैवतानपि ॥५।३९।५३॥
इंद्रियांचा आत्यंतिक निरोध मरणापेक्षांही दु:सह होय, उलट तींच पूर्णपणें मोकळीं सोडलीं असतां देवतांचा देखील नाश करतील.
१६४
इन्द्रियाणां प्रसड्गेन दोषमर्च्छत्यसंशयम् ।
संनियम्य तु तान्येव सिध्दिमाप्नोति मानव: ॥१२।३२३।८॥
मनुष्य इंद्रियांच्या नादीं लागला म्हणजे त्याच्या हातून नि:संशय पापचरण घडतें. परंतु तींच ताब्यांत ठेवल्यानें तो सिध्दि (मोक्ष) प्राप्त करुन घेतो.
१६५
इन्द्रियाण्येव तत्सर्वं यत्स्वर्गनरकावुभौ ।
निगृहीतविसृष्तानि स्वर्गाय नरकाय च ॥३।२११।१९॥
स्वर्ग व नरक म्हणून जें कांहीं आहे तें सर्व इंद्रियेंच होत. कारण इंद्रियें, आवरुन धरल्यानें स्वर्गाला, आणि मोकळीं सोडल्यानें नरकाला, कारण होत असतात.
१६६
इन्द्रियाण्येव संयम्य तपो भवति नान्यथा ॥३।२११।१८॥
इंद्रियांचें संयमन केल्यानेंच तपश्चर्या घडते. नाहीं तर घडत नाहीं.
१६७
इष्टं च मे स्यादितरच्च न स्यात् ।
एतत्कृते कर्मविधि: प्रवृत्त: ।
इष्टं त्वनिष्टं च न मा भजेते-
त्येतत्कृते ज्ञानविधि: प्रवृत्त: ॥१२।२०१।११॥
मला इष्ट गोष्टी तेवढया घडाव्या व अनिष्ट टळाव्या ह्यासाठीं कर्मकांडाची प्रवृत्ति आहे. इष्ट व अनिष्ट ह्या दोहोंचाही लेप मला न लागावा ह्यासाठीं ज्ञानकांड आहे.
१६८
इष्टान्भोगान् हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविता: ।
तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुड्क्ते स्तेन एव स: ॥६।२७।१२॥
(श्रीकृष्ण म्हणतात) यज्ञानें तृप्त झालेले देव तुम्हांला (यज्ञ करण्यार्यांना) इच्छित भोग देतील. त्यांनीं दिलेल्या त्या भोगांचा त्यांना दिल्याशिवाय जो उपभोग घेतो तो चोरच म्हटला पाहिजे.
१६९
ईश्वर: सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति ।
भ्रामयन्सर्वभूतानि यन्त्रारुढानि मायया ॥६।४२।६१॥
(श्रीकृष्ण म्हणतात) अर्जुना, परमेश्वर सर्व भूतांच्या अंतर्यामीं वास करतो व आपल्या मायेच्या योगनें यंत्रावर चढविलेल्या (कळसूत्री बाहुल्याप्रमाणें) सर्व भूतांना नाचवीत असतो.
१७०
उच्चैर्वृत्ते: श्रियो हानिर् यथैव मरणं तथा ॥१२।१३३।५॥
उच्च वृत्तीनें राहणार्या मनुष्याला संपत्तीचा नाश मरणासारखाच होय.
१७१
उत्थानवीर: पुरुषो वाग्वीरानधितिष्ठति ॥१२।५८।१५॥
कर्तृत्ववान् पुरुष वाचाळ पुरुषांवर छाप ठेवतो.
१७२
उत्थानहीनो राजा हि बुध्दिमानपि नित्यश: ।
प्रधर्षणीय: शत्रूणां भुजड्ग इव निर्विष: ॥१२।५८।१६॥
राजा बुध्दिमान् असला तरी दुसर्यांवर चढाई न करील तर, विषहीन सर्पाप्रमाणें, नेहमीं शत्रूंच्या हल्ल्यांना पात्र होतो.
१७३
उत्थानेनामृतं लब्धम् उत्थानेनासुरा हता: ।
उत्थानेन महेन्द्रेण श्रैष्ठयं प्राप्तं दिवीह च ॥१२।५८।१४॥
(देवांनासुध्दां) प्रयत्नानेंच अमृताची प्राप्ति झाली व प्रयत्नानेंच दैत्यांचा संहार करितां आला. इंद्रदेखील प्रयत्नानेंच इहपरलोकीं श्रेष्ठपणा मिळविता झाला.
१७४
उत्थायोत्थाय गच्छेत नित्ययुक्तो रिपोर् गृहान् ।
कुशलं चास्य पृच्छेत यद्यप्यकुशलं भवेत् ॥१२।१४०।२२॥
नेहमीं सावध राहून दररोज उठून शत्रूच्या घरीं जावें आणि तो जरी खुशाल नसला तरी त्याला कुशलप्रश्न विचारावे.
१७५
उत्पन्नस्य रुरो: शृड्गं वर्धमानस्य वर्धते ।
प्रार्थना पुरुषस्येव तस्य मात्रा न विध्यते ॥१३।९३।४५॥
उपजलेलें हरिणाचें पोर वाढूं लागलें कीं त्याच्याबरोबर त्याचीं शिंगेंही वाढत जातात. तद्वत् मनुष्याची हाव तो वाढूं लागला कीं वाढूं लागते. मल तिला कांहीं मर्यादा राहत नाहीं.
१७६
उत्साहश्चापि यत्नेन कर्तव्योअ भूतिमिच्छता ॥१।१४०।८५॥
वैभवाची इच्छा करणार्यानें उत्साहानें उद्योग केला पाहिजे.
१७७
उदाराणां तु सत्कर्म दैवं क्लीबा उपासते ॥१२।१३९।८२॥
श्रेष्ठ प्रकारचे लोक सत्कर्माची कास धरतात. दुबळे लोक दैवावर हवाला ठेवतात.
१७८
उध्दरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् ।
आत्मैव ह्यात्मनो बन्धु: आत्मैव रिपुरात्मन: ॥६।३०।५॥
मनुष्यानें आपण होऊन आपला उध्दार करावा. आपण आपला नाश करुं नये. कारण, प्रत्येक मनुष्य आपणच आपला बंधु (हितकर्ता) किंवा आपणच आपला शत्रु होतो.
१७९
उद्यच्छेदेव न नमेत् उद्यमो ह्येव पौरुषम् ॥५।१३४।३९॥
(पुरुषानें) नेहमीं ताठ (बाणेदारपणानें) असावें, कधीं कोणापुढें वाकूं नये. न वाकणें हाच खरा मानीपणा.
१८०
उद्यम्य शस्त्रमायान्तम् अपि वेदान्तगं रणे ।
निगृह्णीयात्स्वधर्मेण धर्मापेक्षी नराधिप: ॥१२।५६।२९॥
रणांगणांत शस्त्र उपसून धावून येणारा शत्रु वेदान्तविद्यापारंगत असला तरी त्याचा धर्माची आस्था बाळगणार्या राजानें धर्मयुध्द करुन मोड करावा.
N/A
References : N/A
Last Updated : March 16, 2022
TOP