सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन २१ ते ४०
लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला.
२१
अधर्मरुपो धर्मो हि कश्चिदस्ति नराधिप ।
धर्मश्चाधर्मरुपोऽस्ति तच्च ज्ञेयं विपश्चिता ॥१२।३३।३२॥
(व्यास महर्षि युधिष्ठिराला सांगतात) हे राजा, केव्हां केव्हां धर्माला अधर्माचें रुप येतें व अधर्माला धर्माचें स्वरुप येत असतें हें समजून घेणें शहाण्या पुरुषाचें काम आहे.
२२
अधर्मो धर्मतां याति स्वामी चेध्दार्मिको भवेत् ।
स्वामिनो गुणदोषाभ्यां भृत्या: स्युर्नात्र संशय: ॥११।८।३३॥
मालक जर धर्मनिष्ठ असला तर, सेवक अधार्मिक असला तरीसुध्दां धार्मिक बनतो. धन्याच्या आंगच्या गुणदोषांप्रमाणें चाकरांच्या ठिकाणीं गुणदोष उत्पन्न होतात ह्यांत संशय नाहीं.
२३
अध्रुवा सर्वमर्त्येषु श्रीरुपालक्ष्यते भृशम् ॥९।६५।२०॥
सर्व मनुष्यांचें ऐश्वर्य पूर्ण अशाश्वत आहे असें दिसून येतें.
२४
अनन्तं बत मे वित्तं यस्य मे नास्ति किंचन ।
मिथिलायां प्रदीप्तायां न मे दह्यति किंचन ॥१२।१७।१९॥
(जनक राजा म्हणतो) खरोखर माझें ऐश्वर्य अनंत (अविनाशी) आहे; कारण माझी कशावरही ममता नाहीं. सार्या मिथिला नगरीला आग लागली तरी त्यांत माझें असें कांहींही दग्ध व्हावयाचें नाहीं.
२५
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥६।३३।२२॥
(भगवान श्रीकृष्ण सांगतात) जे लोक अनन्यनिष्ठेनें माझे चिंतन करुन मला भजतात, अशा नित्य माझी भक्ति करणार्या लोकांचा योगक्षेम मी चालवीत असतों.
२६
अनर्हते यद्ददाति न ददाति यदर्हते ।
अर्हानर्हापरिज्ञादानात् दानधर्मोऽपि दुष्कर: ॥१२।२०।९॥
दानाला दान करतो आणि सत्पात्रीं करीत नाहीं. तस्मात् दानरुप धर्मसुध्दां मोठा कठीण आहे.
२७
अनागतविधाता च प्रत्युत्पन्नमतिश्च य: ।
द्वावेव सुखमेधेते दीर्घसूत्री विनश्यति ॥१२।१३७।१॥
पुढें येणार्या संकटाची आधीं तरतूद करुन ठेवणारा व प्रसंग पडतांच ताबडतोब ज्याला युक्ति सुचते तो, अशा दोन प्रकारच्या मनुष्यांनाच सुखाचा लाभ होत असतो. दीर्घसूत्री सर्वथा नाश पावतो.
२८
अनायुष्यं दिवा स्वप्नं तथाभ्युदितशायिता ॥१३।१०४।१३९॥
दिवसा झोप घेणें आणि सूर्योदयानंतर निजून राहणें हीं आयुष्याची हानी करणारीं आहेत.
२९
अनारम्भातु कार्याणां नार्थ: संपध्यते क्वचित् ॥१०।२।३४॥
केव्हांही कार्याला आरंभ केल्याशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नसते.
३०
अनार्याचरितं तात परस्वस्पृहणं भृशम् ॥२।५४।६॥
(धृतराष्ट्र दुर्योधनाला म्हणतो) बाबा, परद्रव्याचा अभिलाष धरणें हें केव्हांही आर्य मनुष्याचें ब्रीद नव्हें.
३१
अनाहूत: प्रविशति अपृष्टो बहु भाषते ।
अविश्वस्ते विश्वसिति मूढचेता नराधम: ॥५।३३।४१
मूर्ख मनुष्य कोणी न बोलावितांच प्रवेश करतो, विचारल्यावांचून बडबडत सुटतो आणि विश्वासास पात्र नसलेल्यावर विश्वास ठेवतो.
३२
अनित्य यौवनं रुपं जीवितं द्रव्यसंचय: ।
आरोग्यं प्रियसंवासो गृध्येत्तत्र न पण्डित: ॥१२।३३०।१४
तारुण्य, रुप, जीवित, द्रव्यसंचय, आरोग्य व प्रियजनांचा सहवास हीं सर्व अशाश्वत आहेत. शहाण्या त्यांचा लोभ धरु नये.
३३
अनित्यचित्त: पुरुषस् तस्मिन्को जातु विश्वसेत् ।
तस्मात्प्रधानं यत्कार्यं प्रत्यक्षं तत्समाचरेत् ॥१२।८०।९
मनुष्याचें मन फार चंचल आहे. त्याच्यावर कोण विश्वास ठेवील ? (कोणाची बुध्दि केव्हां कशी पालटेल ह्याचा काय नेम ?) हयासाठीं जें काम महत्त्वाचें असेल तें स्वत:च करावें.
३४
अनर्वेद: श्रियो मूलं लाभस्य च शुभस्य च ॥५।३९।५९
लक्ष्मीचें, लाभाचें आणि कल्याणाचें सतत उद्योग करणें हें आहे.
३५
अनिर्वेदेन दीर्घेण निश्चयेन ध्रुवेण च ।
देवदेवप्रसादाच्च क्षिप्रं फलमाप्यते ॥१२।१५३।११७
दीर्घोध्योगानें, दृढनिश्चयानें व ईश्वरीं कृपेनें सत्वर कार्यसिध्दि होते.
३६
अनिष्टं सर्वभूतानां मरणं नाम भारत ।
मृत्युकाले हि भूतानां सध्यो जायति वेपथु: ॥१३।११६।२७
(भीष्म धर्मराजाला सांगतात) खरोखर कोणत्याही प्राण्याला मरण नकोसें वाटतें. मृत्युकाल जवळ आला कीं, सर्वांना कांपरें भरतें !
३७
अनीशश्चावमानी च स शीघ्रं भ्रश्यते श्रिय: ॥१०।२।२५॥
हातांत सत्ता नसतांना जो दुसर्याचा उपमर्द करतो तो ऐश्वर्यापासून लवकरच भ्रष्ट होतो.
३८
अनुकम्प्यो नर: पत्न्या पुष्टो रक्षित एव च ।
प्रपतेध्यशसो दीप्तात् स च लोकान्न चाप्नुयात् ॥१४।९०।४७॥
बायकोच्या जिवावर पोसलेल्या व रक्षिलेल्या पुरुषाची कीवच केली पाहिजे. असा पुरुष उज्ज्वल कीर्तीपासून च्युत होतो व त्याला उत्तम लोकही प्राप्त होत नाहींत.
३९
अनुक्त्वा विक्रमेध्यस्तु तद्वै सत्पुरुषव्रतम् ॥७।१५८।१९॥
न बोलता पराक्रम करुन दाखविणें हेंच सत्पुरुषाचें व्रत होय.
४०
अनुग्रहं च मित्राणाम् अमित्राणां च निग्रहम् ।
संग्रहं च त्रिवर्गस्य श्रेय आहुर्मनीषिण: ॥१२।२८७।१६॥
मित्रांवर उपकार करणें, शत्रूंचा पाडाव करणें आणि (धर्म, अर्थ व काम ह्या) तीनही पुरुषार्थांची प्राप्ति करुन घेणें हें श्रेयस्कर आहे असें ज्ञाते लोक सांगतात.
N/A
References : N/A
Last Updated : February 15, 2022
TOP