सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन ५०१ ते ५२०
लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला.
५०१
नाधनो धर्मकृत्यानि यथावदनुतिष्ठति ।
धनाध्दि धर्म: स्त्रवति शैलादभि नदी यथा ॥१२।८।२३॥
द्रव्य नसतां धर्मकृत्यें यथासांग करितां येत नाहींत. पर्वतापासून जशी नदी, तसा द्रव्यांपासून धर्म उत्पन्न होतो.
५०२
नाधर्मश्चरितो राजन् सध्य: फलति गौरिव ।
शनैरावर्त्यमानो हि कर्तुर्मूलानि कृन्तति ॥१।८०।२॥
(शुकाचार्य वृषपर्व्याला म्हणतात) हे राजा, केलेलें पाप गायीप्रमाणें (गायीला खाणें घालतांच ती दूध देते त्याप्रमाणें) ताबडतोब फळ देत नाहीं. परंतु तें पुन: पुन: केलें जाऊन हळूहळू कर्त्याचीं पाळें मुळें खणून काढतें.
५०३
नाधर्मो विध्यते कश्चित् शत्रून्हत्वाततायिन: ।
अधर्म्यमयशस्यं च शात्रवाणां प्रयाचनम् ॥५।३।२१॥
आततायी अशा शत्रूंना ठार मारल्यानें कसलाही अधर्म होत नाहीं. परंतु शत्रूजवळ याचना करणें हें मात्र धर्माच्या विरुध्द असून कीर्तीला काळीमा लावणारें आहे.
५०४
नान्यत्र विध्यापसोर् नान्यत्रेन्द्रियनिग्रहात् ।
नान्यत्र लोभसंत्यागात् शान्तिं पश्यामि तेऽनघ ॥५।३६।५१॥
(विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) हे निष्पाप राजा, विद्या व तप ह्यांच्यावांचून, इंद्रियनिग्रहावांचून आणि लोभाचा सर्वथा त्याग केल्यावांचून तुला शांति प्राप्त होण्याचा अन्य मार्ग दिसत नाहीं.
५०५
नान्यद्दु:खतरं किंचित् लोकेषु प्रतिभाति मे ।
अर्थैर्विहीन: पुरुष: परै: संपरिभूयते ॥३।१९३।२०॥
(बकमुनि इंद्राला म्हणतात) लोक द्रव्यहीन पुरुषाचा सर्व प्रकारें अपमान करितात, ह्यापेक्षां अधिक दु:खदायक गोष्ट जगांत दुसरी कोणतीही असेल, असें मला वाटत नाहीं.
५०६
नापराधोऽस्ति नारीणां नर एवापराध्यति ।
सर्वकार्यापराध्यत्वात् नापराध्यन्ति चाड्गना: ॥१२।२६६।४०॥
(स्त्रियांचें पाऊल कुमार्गाकडे वळण्याच्या कामीं) स्त्रियांचा कांहींएक अपराध नाहीं. ह्या कामीं पुरुषा हाच सर्वस्वी दोषी असतो. अशा प्रकारच्या सर्व बाबतींत पहिली आगळीक पुरुषाकडून होत असल्यामुळें स्त्रीवर्गाकडे दोष येत नाहीं.
५०७
नापृष्ट: कस्यचिद् ब्रूयात् नाप्यन्यायेन पृच्छत: ।
ज्ञानवानपि मेधावी जडवत्समुपाविशेत् ॥१२।२८७।३५॥
कोणी प्रश्न न करितां किंवा अन्यायानें प्रश्न केला असतांही शहाण्या मनुष्यानें उत्तर देऊं नये. तर त्यास त्या गोष्टीचें ज्ञान असूनही त्यानें अजाणत्याप्रमाणें गप्प बसावें
५०८
नाप्राप्यं तपस: किंचित् ॥१२।२९५।२३॥
तपाला अप्राप्य असें कांहींच नाहीं.
५०९
नाप्राप्यभिवाञ्छन्ति नष्टं नेच्छन्ति शोचितुम् ।
आपत्सु च न मुह्यन्ति नरा: पण्डितबुध्दय: ॥५।३३।२८॥
विचारी लोक अप्राप्य वस्तूचा अभिलाष धरीत नाहींत, गेलेल्याचा शोक करीत नाहींत आणि अडचणीच्या प्रसंगीं भांबावून जात नाहींत.
५१०
नाभीतो यजते राजन् नाभीतो दातुमिच्छति ।
नाभीत: पुरुष: कश्चित् समये स्थातुमिच्छति ॥१२।१५।१३॥
(अर्जुन युधिष्ठिराला म्हणतो) राजा, (दंडाची) भीति असल्याशिवाय कोणी यज्ञ करीत नाहीं, भीति वाटल्याशिवाय कोणाला दान करण्याची इच्छा होत नाहीं आणि भीति वाटल्याशिवाय कोणी मनुष्य केलेला करार पाळूं इच्छीत नाहीं.
५११
नामर्षं कुरुते यस्तु पुरुष: सोऽधम: स्मृत: ॥२।५०।१७॥
ज्या पुरुषाला (दुसर्यानें) अपमान केला असतां) क्रोध येत नाहीं, तो अधम समजावा.
५१२
नाऽमृतस्य हि पापीयान् भार्यामालभ्य जीवति ॥४।१७।१५॥
(कीचकानें अपमान केला असतां द्रौपदी संतप्त होऊन पांडवांस म्हणते) जिवंत पुरुषाच्या भार्येचा अपमान करणारा पापी कदापि जिवंत राहूं शकणार नाहीं !
५१३
नायमत्यन्तसंवासो लभ्यते जातु केनचित् ।
अपि स्वेन शरीरेण किमुतान्येन केनचित् ॥१२।२८।५२॥
कोणासही खुद्द आपल्या शरीराचासुध्दां सहवास चिरकाल लाभत नाहीं. मग इतर वस्तूंची काय कथा ?
५१४
नायं परस्य सुकृतं दुष्कृतं चापि सेवते ।
करोति यादृशं कर्म तादृशं प्रतिपद्यते ॥१२।२९०।२२॥
हा जीवात्मा दुसर्याचें सुकृत किंवा दुष्कृत भोगीत नाहीं. तर स्वत: ज्या प्रकारचें कर्म करतो त्या प्रकारचें फळ भोगतो.
५१५
नारभेतान्यसामर्थ्यात् पुरुष: कार्यमात्मन: ।
मतिसाम्यं द्वयोर्नास्ति कार्येषु कुरुनन्दन ॥२।५६।८॥
(दुर्योधन धृतराष्ट्राला म्हणतो) हे कुरुनंदना, मनुष्यानें दुसर्याच्या सामर्थ्यावर अवलंबून राहून आपलें कार्य हातीं घेऊं नये; कारण, एकाच कार्याविषयीं दोघांचें मत सारखें नसतें.
५१६
नालं सुखाय सुहृदो नालं दु:खाय शत्रव: ।
न च प्रज्ञालमर्थानां न सुखानामलं धनम् ॥१२।१७४।२९॥
मित्र असले म्हणून ते सुख देऊं शकतात असें नाहीं आणि शत्रु असले म्हणून ते दु:ख देऊं शकतात असेंहीं नाहीं. बुध्दीच्या योगानें द्रव्यप्राप्ति होतेच असें नाहीं आणि द्रव्याच्या योगानें सुख होतेंच असेंही नाहीं.
५१७
नालसा: प्राप्तुवन्त्यर्थान् न क्लीबा नाभिमानिन: ।
न च लोकरवाभ्दीता न वै शश्वत्प्रतीक्षिण: ॥१२।१४०।२३॥
आळशी, दुर्बळ, गर्विष्ठ, लोकापवादाला भिणारे आणि नेहमीं वाट पाहत राहणारे दीर्घसूत्री अशांना इष्टप्राप्ति होत नाहीं.
५१८
नावं न शक्यमारुह्य स्थले विपरिवर्तितुम् ।
तथैव रथमारुह्य नाप्सु चर्या विधीयते ॥१४।५०।३०॥
नावेंत बसून जमिनीवर इकडे तिकडे हिंडतां येणें शक्य नाहीं आणि रथांत बसून पाण्यावर चालतां येणार नाहीं. (कर्मधिकार्याकडून योगाचें व योगधिकार्याकडून कर्माचें अनुष्ठान होणें शक्य नाहीं ह्याविषयीं दृष्टान्त)
५१९
नाश्रोत्रिय: श्रोत्रियस्य नारथी रथिन: सखा ।
नाराजा पार्थिवस्यापि सखिपूर्वं किमिष्यते ॥१।१३१।११॥
वेदवेत्त्या ब्राह्मणाचा मित्र वेद न जाणणारा नसतो. रथांतून लढणार्या योध्याचा मित्र त्याच्यासारखा असतो. राजाचा मित्र राजाच असतो. पूर्वींची मैत्री पुढें करुन काय इच्छितोस ? (द्रुपद राजाशीं असलेली पूर्वींची गुरुगृहींची मैत्री लक्षांत आणून द्रोणाचार्य त्याजकडे गाय मागण्यासाठीं गेले असतां पूर्वीची मैत्री आतां कशी टिकेल असें द्रुपदराजानें दिलेलें उत्तर.)
५२०
नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: ।
उभयोरपि दृष्टोऽन्तस् त्वनयोस्तत्त्वदर्शिभि: ॥६।२६।१६॥
जें मुळांतच नाहीं तें अस्तित्वांत येणें शक्य नाहीं आणि जें आहे तें नाहींसें होणें शक्य नाहीं. ह्या दोहोंच्या खर्या स्वरुपाचा निर्णय तत्त्ववेत्त्या पुरुषांनीं जाणिलेला असतो.
N/A
References : N/A
Last Updated : March 27, 2022
TOP