मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|महाभारतसुभाषितानि|
वचन ९४१ ते ९६०

सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन ९४१ ते ९६०

लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला.


९४१
सर्वथानार्यकर्मैतत् प्रशंसा स्वयमात्मन: ॥५।७६।६॥
आपली आपण प्रशंसा करणें हें सर्वस्वीं अनार्य माणसाचें काम होय.

९४२
सर्वथा संहतैरेव दुर्बलैर्बलवानपि ।
अमित्र: शक्यते हन्तुं मधुहा भ्रमरैरिव ॥३।३३।७०॥
पोळ्यांतील मध काढणार्‍याचा मधमाशा एकजुटीनें (तुटून पडून) प्राण घेतात. त्याप्रमाणें सर्वांची पूर्ण एकी असेल तर दुर्बळ लोक देखील बलिष्ठ अशाही शत्रूला ठार करुं शकतात.

९४३
सर्वभूतहित: साधुरसाधुर्निर्दय: स्मृत: ॥३।३१३।९२॥
सर्व भूतांच्या हितासाठीं झटतो तो साधु आणि निर्दयतेनें वागतो तो असाधु (दुष्ट) होय.

९४४
सर्वभूतेषु सस्नेहो यथात्मनि तथाऽपरे ।
ईदृश: पुरुषोत्कर्षो देवि देवत्वमश्नुते ॥१३।१४४।५८॥
(महेश्वर पार्वतीला म्हणतात) हे देवि, जो सर्व प्राण्यांविषयीं वत्सलता धारण करतो आणि आपल्यासारखेंच सर्व भूतांना मानतो, तो श्रेष्ठ पुरुष देवत्वाला पोचतो.

९४५
सर्वं प्रियाभ्युपगतं धर्ममाहुर्मनीषिण: ॥१२।२५९।२५॥
जिच्या योगानें दुसर्‍याचें प्रिय होईल, ती प्रत्येक गोष्ट धर्मच होय, असें ज्ञाते लोक सांगतात.

९४६
सर्वं बलवतां पथ्यं सर्वं बलवतां शुचि ।
सर्वं बलवतां धर्म: सर्वं बलवतां स्वकम् ॥१५।३०।२४॥
बलसंपन्न असलेल्यांना सर्व कांहीं हितकर आणि सर्व कांहीं पवित्र आहे. पाहिजे तो त्यांचा धर्म आणि सर्व कांहीं त्यांच्या सत्तेचें !

९४७
सर्वं बलवतो वशे ॥१२।१३४।३॥
सर्व कांहीं बलवानाच्या हातें असतें.

९४८
सर्वस्य जीवलोकस्य राजधर्म: परायणम् ॥१२।५६।३॥
सर्व जीवसृष्टीला राजधर्म हाच मोठा आधार आहे.

९४९
सर्वस्य हि स्वका प्रज्ञा साधुवादे प्रतिष्ठिता ।
परबुध्दिं च निन्दन्ति स्वां प्रशंसन्ति चासकृत् ॥१०।३।५॥
ज्याला त्याला स्वत:ची बुध्दि सांगते, तें योग्य, असें ठाम वाटतें. सर्वजण दुसर्‍याच्या बुध्दीची निंदा करितात, आणि स्वत:च्या बुध्दीची वारंवार प्रशंसा करितात.

९५०
सर्वस्वमप संत्यज्य कार्यमात्महितं नरै: ॥१२।१३९।८४॥
सर्वस्वाचा त्याग करुनसुध्दां मनुष्यांनीं आत्मकल्याण साधावें.

९५१
सर्व: सर्वं न जानाति सर्वज्ञो नास्ति कश्चन ।
नैकत्र परिनिष्ठास्ति ज्ञानस्य पुरुषे क्वचित् ॥३।७२।८॥
सर्वांनाच सर्व गोष्टींचें ज्ञान नसतें. सर्वज्ञ असा कोणीच नाहीं. कोणाही एकाच मनुष्याच्या ठिकाणीं सर्व ज्ञान एकवटलेलें नाहीं.

९५२
सर्वा विद्या राजधर्मेषु युक्ता: ।
सर्वे लोका राजधर्मे प्रविष्टा: ॥१२।६३।२९॥
सर्व विद्यांचा राजधर्माशीं संबंध आहे आणि सर्व प्रकारचे लोकव्यवहार राजधर्माशीं निगडित झालेले आहेत.

९५३
सर्वे क्षयान्ता निचया: पतनान्ता: समुच्छ्रया: ।
संयोगा विप्रयोगान्ता मरणान्तं हि जीवितम् ॥१२।२७।३१॥
सर्व प्रकारच्या संचयांचा शेवट क्षयांत होत असतो, चढण्याची अखेर पडण्यांत होते, संयोगांचें पर्यवसान वियोगांत आणि जीविताचा अंत मरणांत होत असतो.

९५४
सर्वेण खलु मर्तव्यं मर्त्यलोके प्रसूयता ।
कृतान्तविहिते मार्गे मृतं को जीवयिष्यति ॥१२।१५३।१३॥
मृत्युलोकांत जन्मास येणार्‍या प्रत्येकाला खचित मरावयाचें आहे. हा मार्ग कृतान्तानें (यमानें) ठरविला असल्यामुळें मेलेल्याला जिवंत कोण करणार ?

९५५
सर्वे धर्मा राजधर्मप्रधाना: ॥१२।६३।२७॥
सर्व धर्मांमध्ये राजधर्म हा अग्रगण्य आहे.

९५६
सर्वेषां कृतवैराणाम् अविश्वास: सुखोदय: ॥१२।१३९।२८॥
आपणांशीं वैर करणार्‍या कोणाचाही विश्वास न धरल्यानें सुख होतें.

९५७
सर्वो दण्डजितो लोको दुर्लभो हि शुचिर्जन: ।
दण्डस्य हि भयाभ्दीतो भोगायैव प्रवर्तते ॥१२।१५।३४॥
सर्व लोक दंडाच्या योगानें वठणीवर येतात. स्वभावत:च शुचिर्भूत असलेला मनुष्य विरळा. खरोखर, दंडाच्या भयानेंच कोणी झाला तरी, आपलें ठरविलेलें काम करीत असतो.

९५८
सर्वोपायैरुपायज्ञो दीनमात्मानमुध्दरेत् ॥१२।१४१।१००॥
चतुर पुरुषानें हरप्रयत्न करुन हीन स्थितींतून आपला उध्दार करावा.

९५९
सर्वो विमृशते जन्तु: कृच्छ्रस्थो धर्मदर्शनम् ।
पदस्थ: पिहितं द्वारं परलोकस्य पश्यति ॥९।३२॥५९॥
कोणीही मनुष्य संकटांत सांपडला, म्हणजे मग धर्मशास्त्राचा विचार करुं लागतो. उच्चस्थितींत असतांना त्याला स्वर्गाचें द्वार बंद असलेलेंच दिसतें. (स्वर्गादिक सर्व थोतांड आहे असें तो मानितो.

९६०
सर्वो हि मन्यते लोक आत्मानं बुध्दिमत्तरम् ॥१०।३।४॥
प्रत्येक मनुष्य स्वत:ला अधिक शहाणा समजतो.

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP