मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|महाभारतसुभाषितानि|
वचन ७६१ ते ७८०

सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन ७६१ ते ७८०

लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला.


७६१
यस्य नास्ति निजा प्रज्ञा केवलं तु बहुश्रुत: ।
न स जानाति शास्त्रार्थं दर्वी सूपरसानिव ॥२।५५।१॥
ज्याला स्वत:ची बुध्दि नाहीं पण ज्यानें केवळ पुष्कळसें ऐकलेलें आहे, त्याला आमटींतल्या पळीला आमटीची चव कळत नाहीं त्याप्रमाणें शास्त्राचें रहस्य कळत नाहीं.

७६२
यस्य भार्या गृहे नास्ति साध्वी च प्रियवादिनी ।
अरण्यं तेन गन्तव्यं यथारण्यं तथा गृहम् ॥१२।१४४।१७॥
ज्याच्या घरांत सत्त्वशील व प्रिय भाषण करणारी स्त्री नाहीं, त्यानेम अरण्यांत निघून जावें. कां कीं, जसें अरण्य तसेंच त्याचें घर.

७६३
यस्य वृत्तं न जल्पन्ति मानवा महदद्भुतम् ।
राशिवर्धनमात्रं स नैव स्त्री न पुन: पुमान् ॥५।१३३।२३॥
ज्याच्या हातून एकादी मोठी अद्भुत गोष्ट घडल्याचें लोक बोलत नाहींत तो मनुष्य केवळ (मनुष्यजातीची) संख्या वाढविणारा होय. वस्तुत: त्याला स्त्रीही म्हणतां येत नाहीं, मग पुरुष तर तो नव्हेच नव्हे.

७६४
यस्यार्थास्तस्य मित्राणि यस्यार्थास्तस्य बान्धवा: ।
यस्यार्था: स पुमाँल्लोके यस्यार्था: स च पण्डित: ॥१२।८।१९॥
ज्याच्याजवळ द्रव्य असेल त्याच्यासाठीं मित्र असतात. ज्याच्याजवळ द्रव्य आहे त्याच्याकरितां आप्तेष्ट आहेत. जगांत ज्याच्याजवळ द्रव्य असेल तोच खरा पुरुष आणि तोच पंडित.

७६५
यस्यैव बलमोजश्च स धर्मस्य प्रभुर्नर: ॥१२।१५२।१८॥
ज्याच्या आंगीं सामर्थ्य आणि तेज हीं असतात तोच मनुष्य धर्माचरणास समर्थ होतो.

७६६
य: सदार: स विश्वास्य: ॥१।७४।४४॥
(शकुंतला दुष्यंताला भार्येचें महत्त्व सांगते) जो सपत्नीक असेल तो विश्वास ठेवण्यास योग्य होय.

७६७
य: सपत्नश्रियं दीप्तां हीनश्री: पर्युपासते ।
मरणं शोभनं तस्य इति विद्वज्जना विदु: ॥१।७९।१३॥
जो स्वत:चें ऐश्वर्य नष्ट झालें असतां प्रतिपक्षाच्या डोळे दिपविणार्‍या वैभवाची आराधना करितो, त्याला मृत्यु आलेला फार उत्तम असें ज्ञाते लोक म्हणतात.

७६८
य: समुत्पतितं क्रोधं क्षयमेह निरस्यति ।
यथोरगस्त्वचं जीर्णां स वै पुरुष उच्यते ॥१।७९।४॥
सर्प जसा जीर्ण झालेली कात टाकून देतो त्याप्रमाणें अंत:करणात उत्पन्न झालेल्या क्रोधाचें क्षमेच्या योगानें जो निवारण करितो तोच पुरुष म्हणावयाचा.

७६९
य: सौहृदे पुरुषं स्थापयित्वा ।
पश्चादेनं दूषयते स बाल: ॥२।६४।१३॥
जो पहिल्यानें आपणच एकाद्याला आपला स्नेही समजतो व मागून त्याला दूषण देतो तो पोरकट होय.

७७०
या उस्त्यजा दुर्मतिभि: या न जीर्यति जीर्यत: ।
योऽसौ प्राणान्तिको रोग: तां तृष्णां त्यजत: सुखम् ॥१३।७।२१॥
दुष्ट मनुष्यांना जिचा त्याग करितां येत नाहीं, शरीर जीर्ण होत असतां जी कमी होत नाहीं, जी केवळ प्राणान्तींच संपणार्‍या रोगासारखी आहे त्या तृष्णेचा (लोभाचा) त्याग करणार्‍यास सुख प्राप्त होतें.

७७१
यादृशं वपते बीजं क्षेत्रमासाध्य कर्षक: ।
सुकृते दुष्कृते वापि तादृशं लभते फलम् ॥१३।६।६॥
शेतकरीं शेतांत ज्या प्रकारचें बीज टाकतो त्या प्रकारचें त्यास फळ मिळतें. जर त्यानें चांगलें बीं पेरलें तर त्यास चांगलें येतें; आणि वाईट पेरलें तर वाईट फळ येतें.

७७२
यादृश: पुरुषस्यात्मा तादृशं संप्राभाषते ॥५।३।१॥
पुरुषाचें अंत:करण जशा प्रकारचें असतें तशा प्रकारचें तो भाषण करीत असतो.

७७३
यादृशै: संनिविशते यादृशांश्चोपसेवते ।
यादृगिच्छेच्च भवितुं तादृग्भवति पूरुष: ॥५।३६।१३॥
कोणी मनुष्य ज्या प्रकारच्या लोकांशी सहवास ठेवितो, ज्या प्रकारच्या मनुष्यांची सेवा करतो आणि ज्या प्रकारचा होण्याची इच्छा धरतो त्या प्रकारचा होण्याची इच्छा धरतो त्या प्रकारचा तो होतो.

७७४
यादृशो जायते राजा ।
तादृशोऽस्य जनो भवेत् ॥११।८।३२॥
जसा राजा असेल तशी त्याची प्रजा होतें.

७७५
यावच्च मार्दवेनैतान् राजन्नुपचरिष्यसि ।
तावदेते हरिष्यन्ति तव राज्यमरिंदम् ॥५।७३।८॥
(श्रीकृष्ण युधिष्ठिरास म्हणतात) हें शत्रूंचें दमन करणार्‍या धर्मराजा, जोपर्यंत तूं सामोपचारानें ह्यांच्याशी (कौरवांशीं) वागत राहशील तोंपर्यंत हे तुझें राज्य बळकावून बसतील.

७७६
यावत्कीर्तिर्मनुष्यस्य न प्रणश्यति कौरव ।
तावज्जेवति गान्धारे नष्टकीर्तिस्तु नश्यति ॥१।२०३।११॥
(भीष्म म्हणतात) गांधारीपुत्रा दुर्योधना, जोंपर्यंत मनुष्याची कीर्ति नष्ट झालेली नाहीं तोंपर्यंत तो जिवंत असतो. कीर्ति नाहींशी झाली म्हणजे त्याचा नाश होतो.

७७७
यावध्दि तीक्ष्णया सूच्या विध्येदग्रेण केशव ।
तावदप्यपरित्याज्यं भूमेर्न: पाण्डवान्प्रति ॥५।१२७।२५॥
(दुर्योधन म्हणतो) हे कृष्णा, भूमीमध्यें तीक्ष्ण सुई टोचिली असतां तिच्या टोकावर जेवढी भूमि येईल तेवढी देखील आम्हां पांडावांना देणार नाहीं.

७७८
युक्ता यदा जानपदा भिक्षन्ते ब्राह्मणा इव ।
अभीक्ष्णं भिक्षुरुपेण राजानं घ्नन्ति तादृशा: ॥१२।९१।२३॥
राष्ट्रांतील प्रजा उद्योगशील असूनही जर (उद्योगाच्या अभावामुळें) भिक्षुरुपी बनून ब्राह्मणांप्रमाणें वारंवार भिक्षा मागूं लागली तर तिच्या योगानें राजाचा वध होतो.

७७९
ये च मूढतमा लोके ये च बुध्दे: परं गता: ।
त एव सुखमेधन्ते मध्यम: क्लिश्यते जन: ॥१२।२५।२८॥
जगांत जे अत्यंत मूढ असतात, अथवा जे ज्ञानाच्या पैलतीराला पोचलेले असतात तेच सुखानें नांदत असतात. मध्यम स्थितींतल्या लोकांना क्लेशच होतात.

७८०
ये तु बुध्द्या हि बलिन: ते भवन्ति बलीयस: ।
प्राणमात्रबला ये वै नैव ते बलिनो मता: ॥१२।१५६।१३॥
जे बुध्दीनें बलिष्ठ असतील, तेच खरे प्रबळ होत. जे केवळ शारीरिक बळानें संपन्न ते खरोखर बलवान् नव्हेत.

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP