मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|महाभारतसुभाषितानि|
वचन ६०१ ते ६२०

सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन ६०१ ते ६२०

लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला.


६०१
प्रसृतैरिन्द्रियैर्दु:खी तैरेव नियतै: सुखी ।
तस्मादिन्द्रियरुपेभ्यो यच्छेदात्मानमात्मना ॥१२।२०४।९॥
इंद्रियें मोकळीं सोडल्यानें मनुष्य दु:खी होतो व तींच आवरुन धरल्यानें सुखी होतो; हयासाठीं, इंद्रियांच्या निरनिराळ्या विषयांपासून आपलें मन आवरुन धरावें.

६०२
प्रस्थं वाहसहस्त्रेषु यात्रार्थं चैव कोटिषु ।
प्रासादे मञ्चकं स्थानं य: पश्यति समुच्यते ॥१२।२८८।३०॥
हजारों नव्हे कोट्यवधी गाडे धान्य पुढें पडलें असतांहीं, जो केवळ निर्वाहाला लागणार्‍या मापटेंभर धान्याचीच अपेक्षा करतो व ज्याला मोठा राजवाडा राहावयास दिला असतां, एक खाट ठेवण्याइतकीच जागा जो पुरेशी समजतो तो मुक्त होतो.

६०३
प्रहरिष्यन्प्रियं ब्रूयात् प्रहरन्नपि भारत ।
प्रहृत्य च कृपायीत शोचेत च रुदेत च ॥१।१४०।५६॥
(कणिक मंत्री धृतराष्ट्राला सांगतो) (शत्रूवर) प्रहार करण्याचें मनांत असतां वरकरणी त्याच्याशीं गोड बोलावें, तसेंच प्रहार करीत असतांही गोडच बोलावें आणि प्रहार केल्यावर त्याच्याविषयीं सहानुभूति दाखवावी, खेद प्रदर्शित करावा व रडावेंही.

६०४
प्राकृतो हि प्रशंसन्वा निन्दन्वा किं करिष्यति ।
वने काक: इवाबुध्दिर् वाशमानो निरर्थकम् ॥१२।११४।८॥
हलका मनुष्य, प्रशंसा करुन अथवा निंदा करुन, करणार काय आहे ? अरण्यांत निरर्थक ओरडणार्‍या कावळ्याप्रमाणें मंदबुध्दि मनुष्याची स्थिति आहे.

६०५
प्राज्ञस्तु जल्पतां पुंसां श्रुत्वा वाच: शुभाशुभा: ।
गुणवद्वाक्यमादत्ते हंस: क्षीरमिवाम्भस: ॥१।७४।९१॥
बडबड करणार्‍या लोकांचें बरें वाईट बोलणे ऐकून, पाणी टाकून देऊन दूध ग्रहण करणार्‍या हंसाप्रमाणें, त्यांतून चांगलें बोलणें तेवढें शहाणा घेत असतो.

६०६
प्राज्ञो वा यदि वा मूर्ख: सधनो निर्धनोऽपि वा ।
सर्व: कालवशं याति शुभाशुभसमन्वित: ॥१२।१५३।४३॥
शहाणा असो, मूर्ख असो, श्रीमंत असो, दरिद्री असो सर्वांना आपआपलें पापपुण्य बरोबर घेऊन काळाच्या स्वाधीन व्हावें लागतें.

६०७
प्राप्ते च प्रहरेत्काले न च संवर्तते पुन: ।
हन्तुकामस्य देवेन्द्र पुरुषस्य रिपून्प्रति ॥१२।१०३।२०॥
यो हि कालो व्यतिक्रामेत् पुरुषं कालकाड्क्षिणम् ।
दुर्लभ: स पुनस्तेन काल: कर्म चिकीर्षुणा ॥१२।१०३।२१॥
(बृहस्पति इंद्राला म्हणतात) देवेंद्रा, शत्रूला मारण्याची इच्छा करणार्‍या पुरुषानें योग्य संधि आली असतां प्रहार केला पाहिजे. गेलेली वेळ फिरुन येत नसते; कार्य साधण्याच्या इच्छेनें योग्य काळाची वाट पाहणार्‍या पुरुषानें आलेली संधि गमावली तर ती त्याला फिरुन मिळणें कठीण.

६०८
प्रायेण नीचा व्यसनेषु मग्ना
निन्दन्ति देवं कुकृतं न तु स्वम् ॥८।९१।१॥
नीच लोक संकटांत सांपडले म्हणजे बहुतकरुन देवाला दोष लावतात; ते आपल्या दुष्कर्माला बोल लावीत नाहींत !

६१०
प्रीयते हि हरन्पाप: परवित्तमराजके ।
यदास्य उध्दरन्त्यन्ये तदा राजानमिच्छति ॥१२।६७।१३॥
दुसर्‍याचें द्रव्य हरण करणार्‍या पापी मनुष्याला देशांत राजा नसलेला बरा वाटतो; पण जेव्हां त्याचें द्रव्य दुसरे लोक नेऊं लागतात, तेव्हां त्याला राजा असावा, असें वाटूं लागतें.

६११
फलशाकमपि श्रेयो भोक्तुं हृकृपणं गृहे ।
परस्य तु गृहे भोक्तु: परिभूतस्य नित्यश: ॥३।१९३।३०॥
नित्य अपमान सहन करुन दुसर्‍याच्या घरीं जेवण्यापेक्षां मिंधेपणा न पतकरतां स्वत:च्या घरीं फळ व शाकभाजी खाल्लेली बरी !

६१२
बकवच्चिन्तयेदर्थान् संहवच्च पराक्रमेत् ।
वृकवच्चावलुम्पेत शशवच्च विनिष्पतेत् ॥१२।१४०।२५॥
बगळ्याप्रमाणें आपल्या उद्दिष्टाकडे लक्ष ठेवावें आणि सिंहाप्रमाणें पराक्रम गाजवावा. लांडग्याप्रमाणें शत्रूवर अचानक हल्ला करावा आणि सशाप्रमाणें निसटून जावें.

६१३
बलं हि क्षत्रिये नित्यं बले दण्ड: समाहित: ॥१२।२३।१३॥
क्षत्रियाच्या ठिकाणीं बळ हें नियमानें वास्तव्य करणारें असून बळावरच दंड अवलंबून आहे.

६१४
बलज्येष्ठं स्मृतं क्षत्रं मन्त्रज्येष्ठा द्विजातय: ।
धनज्येष्ठा: स्मृता वैश्या: शूद्रास्तु वयसाधिका: ॥५।१६८।१७॥
क्षत्रिय बळानें श्रेष्ठ, ब्राह्मण मंत्रसामर्थ्यानें श्रेष्ठ आणि वैश्य धनानें श्रेष्ठ होत. शूद्र हे मात्र केवळ वयानें मोठे.

६१५
बलं तु वाचि द्विजसत्तमानां
क्षात्रं बुधा बाहुबलं वदन्ति ॥८।७०।१२॥
उत्तम ब्राह्मणांचें बळ वाणींत व क्षत्रियांचें बळ बाहूंत असतें असें शहाणे लोक सांगतात.

६१६
बलवत्संनिकर्षो हि
न कदाचित्प्रशस्यते ॥१२।१३८।१७५॥
बलवानाशीं सांनिध्य असणें केव्हांही प्रशस्त नव्हे.

६१७
बलवन्तो ह्यनियमा नियमा दुर्बलीयसाम् ॥१४।२२।२३॥
बलिष्ठांना नियम लागू नाहींत, दुर्बलांकरितां नियम आहेत.

६१८
बलवांश्च यथा धर्मं लोके पश्यति पूरुष: ।
स धर्मो धर्मवेलायां भवत्यभिहत: पर: ॥२।६९।१५॥
धर्मनिर्णय करण्याची वेळ आली म्हणजे, जगांत बलसंपन्न पुरुष ठरवील तो धर्म ठरतो; दुसर्‍यानें (दुर्बलानें) सांगितलेल्या धर्माची पायमल्ली होते.

६१९
बलवान्वा कृती वेति कृती राजन्विशिष्यते ॥९।३३।९॥
(श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणतात) हे राजा, बलवान् आणि कृती ह्यांच्यांत श्रेष्ठ कोण असा विचार करतां, कृती (म्हणजे डावपेच जाणणारा, युक्तिमान्) हाच श्रेष्ठ ठरतो.

६२०
बलिना संनिकृष्टस्य शत्रोरपि परिग्रह: ।
कार्य इत्याहुराचार्या विषमे जीवितार्थिना ॥१२।१३८।४५॥
संकटांत सांपडल्यास जीविताची इच्छा करणार्‍या बलाढयही प्राण्यानें आपल्या समीप असणार्‍या शत्रूचाही आश्रय करावा, असें नीतिशास्त्राच्या आचार्यांनी सांगितलेलें आहे.

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP