सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन २४१ ते २६०
लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला.
२४१
कालेनाभ्याहता: सर्वे कालो हि बलवत्तर: ॥१२।२२७।५६॥
काळानें सर्वांना मारुन टाकले आहे. काळ सर्वांना पुरुन उरला आहे.
२४२
काले मृदुर्यो भवति काले भवति दारुण: ।
प्रसाधयति कृत्यानि शत्रुं चाप्यधितिष्ठति ॥१२।१४०।६७॥
योग्य वेळीं जो सौम्य होतो आणि योग्य वेळीं जो क्रूर होतो त्याचीं सर्व कार्ये सिध्दीस जातात आणि तोच शत्रूला आपल्या ताब्यांत ठेवितो.
२४३
काले हि समनुप्राप्ते त्यक्तव्यमपि जीवनम् ॥५।९०।७७॥
तसाच प्रसंग पडला असतां जीविताचासुध्दां त्याग केला पाहिजे.
२४४
कालो न परिहार्यश्च न चास्यास्ति व्यतिक्रम: ॥१२।२२७।९७॥
काळाला चुकवितां येणें शक्य नाहीं. तसेंच त्याचा प्रतिकारही करितां यावयाचा नाहीं.
२४५
कालोपहतचित्ता हि सर्वे मुह्यन्ति भारत ॥९।६३।४७॥
(श्रीकृष्ण सांगतात) हे धृतराष्ट्रा, खरोखर काळानें बुध्दि ग्रासून टाकली असतां सर्वांना मोह पडत असतो.
२४६
कालो वा कारणं राज्ञो राजा वा कालकारणम् ।
इति ते संशयो माभूत् राजा कालस्य कारणम् ॥१२।६९।७९॥
(भीष्म युधिष्ठिराला म्हणतात) काळ राजाला कारण होतो का राजा काळाला कारण होतो, ह्याविषयीं तूं संशयांत पडूं नकोस. राजा हाच काळाला कारण आहे.
२४७
कालो हि परमेश्वर: ॥१३।१४८।३९॥
काळ हा खरोखर परमेश्वरच आहे !
२४८
किंचिदेव ममत्वेन यदा भवति कल्पितम् ।
तदेव परितापार्थं नाशे संपध्यते पुन: ॥१२।२७६।८॥
एकाद्या वस्तूविषयीं ‘ही माझी’ अशी भावना धरिली म्हणजे त्या वस्तूचा नाश झाला असतां तीच दु:खाला कारण होते.
२४९
किं तस्य तपसा राज्ञ: किंच तस्याध्वरैरपि ।
सुपालितप्रजो य: स्यात् सर्वधर्मविदेव स: ॥१२।६९।७३॥
जो राजा प्रजेचें उत्तम प्रकारें पालन करितो तो सर्व धर्म जाणणाराच होय. अशा राजाला तप काय करावयाचें ? यज्ञांची तरी त्याला काय गरज ?
२५०
किं तु रोषान्वितो जन्तुर् हन्यादात्मानमप्युत ॥७।१५६।९५॥
(संतप्त अश्वत्थामा म्हणतो) खरोखर क्रोधाविष्ट झालेला मनुष्य स्वत:चा देखील घात करील.
२५१
किं तैर् येऽनडुहो नोह्या: किं धेन्वा वाप्यदुग्धया ।
वन्ध्यया भार्यया कोऽर्थ: कोऽर्थो राज्ञाप्यरक्षता ॥१२।७८।४१॥
वाहून नेण्याच्या कामीं जे येत नाहींत त्या बैलांचा काय उपयोग ? किंवा दूध न देणारी गाय कामाची ? वांझ स्त्री काय करावयाची ? तसेंच, रक्षण न करणारा राजा पाहिजे कशाला ?
२५२
किं नु मे स्यादिदं कृत्वा किं नु मे स्यादकुर्वत: ।
इति कर्माणि संचिन्त्य कुर्याव्दा पुरुषो न वा ॥५।३४॥१९॥
हें केल्यानें माझा काय फायदा होईल, न केल्यानें काय तोटा होईल, असा विचार करुन मग कोणतेंही कार्य मनुष्यानें करावें अथवा करुं नये.
२५३
कीर्तिरक्षणमातिष्ठ कीर्तिर्हि परमं बलम् ।
नष्टकीर्तेर्मनुष्यस्य जीवितं ह्यफलं स्मृतम् ॥१।२०३।१०॥
(भीष्म म्हणतात हे दुर्योधना,) कीर्ति राखण्याकरितां झटून प्रयत्न कर. कारण, कीर्ति हे श्रेष्ठ प्रकारचें बळ आहे. ज्याची कीर्ति नष्ट झाली त्या मनुष्याचें जिणें व्यर्थ गेलें.
२५४
कीर्तिर्हि पुरुषं लोके संजीवयति मातृवत् ।
अकीर्तिर्जिवितं हन्ति जीवतोऽपि शरीरिण: ॥३।३००।३२॥
कीर्ति ही मातेप्रमाणें मनुष्याला जगांत खरेंखुरें जीवन प्राप्त करुन देते. अपकीर्ति जिवंत असलेल्या प्राण्याच्याही जीविताचा नाश करिते.
२५५
कुत: कृतघ्नस्य यश: कुत: स्थानं कुत: सुखम् ।
अश्रध्देय: कृतघ्नो हि कृतघ्ने नास्ति निष्कृति: ॥१२।१७३।२०॥
कृतघ्न मनुष्याला यश कोठून येणार ? अधिकार कोठचा ? आणि सुख तरी कोठचें ? (अर्थात् त्याला ह्यांपैकी कांहींच मिळत नाहीं.) कारण, कृतघ्न हा अविश्वसनीय बनलेला असतो. कृतघ्नाला प्रायश्चित्त नाहीं.
२५६
कुर्यात् कृष्णगति: शेषं ज्वलितोऽनिलसारथि: ।
न तु राजाभिपन्नस्य शेषं क्वचन विद्यते ॥१२।६८।५०॥
वारा ज्याचा सहकारी आहे अशा प्रज्वलित अग्नीच्या तडाक्यांतून (कदाचित्) एखादी वस्तु दग्ध होण्याची राहून जाईल, परंतु राजानें ज्याच्यावर हल्ला केला त्याचें कांहींएक शिल्लक राहणार नाहीं.
२५७
कुर्यात् तृणमयं चापं शयीत मृगशायिकाम् ।
अन्ध: स्यादन्धवेलायां बाधिर्यमप संश्रयेत् ॥१२।१४०।२७॥
(राजानें प्रसंगविशेषीं) आपलें धनुष्य तृणमय करावें. (गवताप्रमाणें निरुपयोगी आहे असें भासवावें) श्वापदांचा विश्वास बसण्यासाठीं झोपेचें सोंग घेणार्या पारध्याप्रमाणें झोपेचा बहाणा करावा. अंध होण्याचा प्रसंग आल्यास अंधाप्रमाणें वागावें आणि (बधिर होण्याचा प्रसंग आल्यास) बहिरेपणाचाही आश्रय करावा.
२५८
कुलानि समुपेतानि गोभि: पुरुषतोऽर्थत: ।
कुलसंख्यां न गच्छन्ति यानि हीनानि वृत्तत: ॥५।३६।२८॥
गोधन, कर्तबगार पुरुष आणि द्रव्य ह्यांच्या योगानें कुळांना मोठेपणा प्राप्त होत असतो. पण तीं आचारभ्रष्ट असलीं तर त्यांची गणना चांगल्या कुळांत होत नाहीं.
२५९
कुलीनस्य च या निन्दा वधो वाऽमित्रकर्शन ।
महागुणो वधो राजन् न तु निन्दा कुजीविका ॥५।७३।२४॥
(श्रीकृष्ण म्हणतात) हे शत्रुनाशका धर्मराजा, कुलीन पुरुषाची निंदा अथवा वध होण्याचा प्रसंग आला असतां त्याचा वध होणें फार बरें, जीवितच दु:खदायक करुन टाकणारी निंदा बरी नव्हे.
२६०
कृतज्ञेन सदा भाव्यं मित्रकामेन चैव ह ॥१२।१७३।२२॥
मित्र जोडण्याची इच्छा करणारानें सदैव कृतज्ञ असावें.
N/A
References : N/A
Last Updated : March 21, 2022
TOP