मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|महाभारतसुभाषितानि|
वचन ८०१ ते ८२०

सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन ८०१ ते ८२०

लोकांचे अज्ञान नाहींसे होऊन, त्यांना ज्ञान प्राप्त व्हावें, ह्या हेतूनें श्रीभगवान् व्यास महर्षींनी महाभारत ग्रंथ निर्माण केला.


८०१
रथ: शरीरं भूतानां सत्त्वमाहुस्तु सारथिम् ।
इन्द्रियाणि हयानाहु: कर्मबुध्दिस्तु रश्मय: ॥११।७।१३॥
जीवाचें शरीर हा रथ व बुध्दि हा सारथि होय. इंद्रियें हे (ह्या रथाला जोडलेले) घोडे होत आणि मन हा लगाम होय.

८०२
राजन् सर्षमात्राणि परिच्छिद्राणि पश्यसि ।
आत्मनो बिल्वमात्राणि पश्यन्नपि न पश्यसि ॥१।७४।८२॥
(शकुंतला दुष्यंताला म्हणते) हे राजा, दुसर्‍यांचे मोहरीएवढे बारीक दोष तुला दिसतात, पण स्वत:चे बेलफळाएवढे मोठे दोष तूं पाहत असूनही तिकडे डोळेझाक करतोस.

८०३
राजमूला महाबाहो योगक्षेमसुवृष्टय: ।
प्रजासु व्याधयश्चैव मरणं च भयानि च ॥१२।१४१।९॥
(भीष्म युधिष्ठिराला म्हणतात) प्रजेचा योगक्षेम नीट चालणें, पर्जन्य चांगला पडणें, तसेंच प्रजेला रोग, मरण अथवा भय प्राप्त होणें ह्या सर्वांचें मुख्य कारण राजाच आहे.

८०४
राजमूलो महाप्राज्ञ धर्मो लोकस्य लक्ष्यते ।
प्रजा राजभयादेव न खादन्ति परस्परम् ॥१२।६८।८॥
(बृहस्पति वसुमना राजाला सांगतात) लोक धर्मानें वागतात, हयाचें कारण राजाच होय असें दिसून येतें. राजाच्या भीतीमुळेंच लोक एकमेकांना खाऊन टाकीत नाहींत.

८०५
राजा कृतयुगस्त्रष्टा त्रेताया द्वापरस्य च ।
युगस्य च चतुर्थस्य राजा भवति कारणम् ॥१२।६९।९८॥
जगांत कृतयुग उत्पन्न करणारा राजाच होय. तीच गोष्ट त्रेतायुगाची व द्वापार युगाची. चौथ्या म्हणजे कलियुगालाही राजाच कारण होतो.

८०६
राजा चेन्न भवेल्लोके पृथिव्यां दण्डधारक: ।
जले मत्स्यानिवाभक्ष्यन् दुर्बलं बलवत्तरा: ॥१२।६७।१६॥
पृथ्वीवर दंड धारण करणारा राजा जर नसता, तर पाण्यांतील माशांप्रमाणें बलवत्तर लोकांनीं दुर्बळांना खाऊन टाकिलें असतें.

८०७
राजानं प्रथमं विन्देत् ततो भार्यां ततो धनम् ।
राजन्यसति लोकस्य कुतो भार्या धनम् ॥१२।५७।४१॥
प्रथमत: (संरक्षण करणारा) राजा प्राप्त करुन घ्यावा, त्यानंतर भार्या मिळवावी व द्रव्य मिळवावें. कारण राजाच जर अयोग्य असेल तर स्त्री तरी कशी राहणार व धन तरी कसें मिळणार ?

८०८
राजा लोकस्य रक्षिता ॥१२।९०।३॥
राजा हाच लोकांचा पालनकर्ता होय.

८०९
राजैव कर्ता भूतानां राजैव च विनाशक: ।
धर्मात्मा य: स कर्ता स्यात् अधर्मात्मा विनाशक: ॥१२।९१।९॥
प्राण्यांचें कल्याण करणारा राजाच आणि त्यांचा नाश करणाराही राजाच. कारण तो धर्मानें वागेल तर कल्याणकर्ता आणि अधर्मानें वागेल तर नाश करणारा ठरतो.

८१०
राजैव युगमुच्यते ॥१२।९१।६॥
राजालाच युग म्हणतात (जसा राजा असेल तसें बरें वाईट युग उत्पन्न होतें).

८११
राज्ञ: प्रमाददोषेण दस्युभि: परिमुष्यताम् ।
अशरण्य: प्रजानां य: स राजा कलिरुच्यते ॥१२।१२।२९॥
राजाच्या हलगर्जीपणामुळें चोरांकडून लुबाडल्या जाणार्‍या प्रजेला जो राजा अभय देऊं शकत नाहीं तो (मूर्तिमंत) कलिच होय.

८१२
राज्ञां हि चित्तानि परिप्लुतानि ।
सान्त्वं दत्त्वा मुसलैर्घातयन्ति ॥२।६४।१२॥
राजाचें चित्त नेहमीं कलुषित असल्यामुळें ते प्रथमत: गोड बोलताच आणि मागाहून डोक्यांत मुसळ घालूण प्राण घेतात.

८१३
राज्ञा हि पूजितो धर्म: तत: सर्वत्र पूज्यते ॥१२।७५।४॥
राजानें अगोदर धर्माचा मान ठेविला म्हणजें सर्व लोक धर्माचा मान ठेवितात.

८१४
राज्यं हि सुमहत् तन्त्रं धार्यते नाकृतात्मभि: ।
न शक्यं मृदुना वोढुम् आयासस्थानमुत्तमम् ॥१२।५८।२१॥
राज्य चालविणें हें अत्यंत अवघड काम आहे. ज्यानें मनोनिग्रह केला नाहीं त्याला तें झेंपणार नाहीं. राज्यधुरा वाहणें हें अत्यंत कष्टप्रद असून तें दुबळ्या मनुष्याला शक्य नाहीं.

८१५
राज्यं प्रणिधिमूलं हि मन्त्रसारं प्रचक्षते ॥१२।८३।५१॥
हेर हा राज्याचा आधार आणि सल्लामसलत ही शक्ति होय असें म्हणतात.

८१६
राष्ट्रस्यैतत् कृत्यतमं राज्ञ एवाभिषेचनम् ।
अनिन्द्रमबलं राष्ट्रं दस्यवोऽभिभवन्त्युत ॥१२।६७।२॥
कोणत्यातरी राजाला राज्याभिषेक करणें हें एक राष्ट्राचें प्रमुख कर्तव्य आहे. कारण राष्ट्राला कोणी नियंता नसला म्हणजे तें दुर्बळ झाल्यामुळें शत्रु त्याच्यावर हल्ला करितात.

८१७
रोहते सायकैर्विध्दं वनं परशुना हतम् ।
वाचा दुरुक्तं बीभत्सं न संरोहति वाक्षतम् ॥५।३४।७८॥
बाणांनीं वेधलेलें अथवा कुर्‍हाडीनें तोडलेलें वन पुन्हा वाढीस लागतें. परंतु दुष्ट व बीभत्स बोलण्यानें पडलेली जखम भरुन येत नाहीं.

८१८
लब्धानामपि वित्तानां बोध्दव्यौ द्वातिक्रमौ ।
अपात्रे प्रतिपत्तिश्च पात्रे चाप्रतिपादनम् ॥१२।२६।३१॥
मिळविलेल्या द्रव्याचे दोन दुरुपयोग जाणावे. एक अपात्रीं दान करणें व दुसरा सत्पात्रीं न करणें.

८१९
लोकयात्रार्थमेह धर्मस्य नियम: कृत: ॥१२।२५९।५॥
ह्या जगांत लोकव्यवहार सुरळीतपणें चालावा एवढ्यासाठींच धर्माचरणाचा नियम घालून दिला आहे.

८२०
लोकरञ्जनमेवात्र राज्ञां धर्म: सनातन: ॥१२।५७।११॥
ह्या लोकीं प्रजेला सुखी ठेवणें हाच राजांचा सनातन धर्म आहे.

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP