मराठी पदें - पदे १११ ते ११५
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
पद १११
चला रे सखयांनो रघुविर पाहूं । त्यासन्निध राहूं ॥धृ॥
हरि हा प्रगटुनिया रविकुळवासी अयोध्यावासी ।
भावें सेवुनिया वैराग्यासी त्यजिले राज्यासी ।
दशरथनंदन मुनिकुळमंडन शोभति ज्याते आजानुबाहू ॥१॥
वसले गंगेचे येउनि तटीं । स्थळ पंचवटी ।
बंधू लक्षुमन प्रिय धूर्जटी । सिता गोरटी ।
वेष्टुनिया मृगचर्म चरितऋषि कर्म निशिदिनिं फळ भक्षुनि करिती निर्वाहु ॥२॥
आला धावुनिया भक्तकाजा । तो रामराजा ।
सवें वानरदळ घेतो फौजा बहु गाजावाजा ।
कृपासिंधु जळसिंधु तरुनिया लंकेवरुते म्हणतो जाऊं ॥३॥
ऐसें कपिमंडळ बोलुनि सारें । आलें परिवारें ।
दिधले निरंजन प्रभुसी घेरे । करिती भुपकारें ।
राम राम हें नाम वदुनि मुखिं संतत घेती हरिगुण लाहू ॥४॥
पद ११२
अस्ति भाति हे प्रियरूप हा आत्मा ॥धृ॥
अस्तिपणें सद्वस्तु निरंतर स्वस्त करुनि भ्रमग्रस्त अखंडित राहे अदिअंतीं ॥१॥
भातिरूप स्वप्रकाश निर्मळ अकाशवत् चित्प्रकाश रविशशि विकास पावति ज्या तेजाचे दीप्ती ॥२॥
प्रीय सतत अप्रीय नसुनि अक्रियपणें जग म्रियमान त्या अनंत स्वरुपें अनंद पावति प्रियतम चित्ती ॥३॥
अंनज रहित निरंजन रघुविर कंजनयन मनरंजन स्वरुनि झाला चीत्सुख व्यक्ती ॥४॥
पद ११३
संसारस्वप्न ऐके वो साजणी । विस्मयो मोठा जाला माझे मनी ॥धृ॥
भ्रमनिद्रा मोठी ज्या कळले । जागी असतां डोळे म्या झाकिले ।
भयंकर स्वप्नातें देखिलें । पाहूनिया मनामधिं भ्याले ॥१॥
काय हो सांगू आश्चर्याची गोष्टी । स्वप्नामधिं देखिलि म्यां सृष्टी ।
वेगळाली वेष्टी ते समष्टी । सांगू जातां जिव होतो कष्टी ॥२॥
शुद्धतत्व निर्मळ असतां । प्रकटली तेथें एक कांता ।
पतिविना जाहाली प्रसुत । तोची पुत्र केला तिनें भर्ता ॥३॥
तियेचे पोटीं तिघे पुत्र जाले । एकांतुनि एक ते काढिले ।
पांचा वाशांचें घरकुलें केलें । आधाराविण अंतराळीं ठेलें ॥४॥
तिघे मुल खेळाया लागले । बाहुलें त्यांनीं नानापरि केले ।
चौर्यांसी लक्ष योनीसी निर्मिलें । तयामधि मजलागीं केलें ॥५॥
पहिल्यानें केले मज गाय । दुसर्या तिसर्यानें घोडा माये ।
चवथ्यानें मानवाचा देह । अष्टादशवर्न समुदाय ॥६॥
वृक्ष पक्षी किडा मुंगी जाले । स्त्रिया पुरुषत्वें मिरवले ।
सांगातिसि बहु मेळविले । बहुता ठायीं संसारासि केलें ॥७॥
ऐसी मी फिरतां फिरतां साजणी । कितिदा आली मानवाची योनी ।
तेथें म्यां पापपुण्य आचरोनी । भोगियल्या दु:खाच्या श्रेणी ॥८॥
कुल्लाळचक्रा सारिखी फिरतां । खेद झाला मोठा माझे चित्ता ।
कोठोनि आले कोण मातापिता । कोहं कोहं कोण माझा कर्ता ॥९॥
दचकोनि मोठ्यानें बरळले । रघुविर गुरु यांनीं थापटिले ॥
सोहं भावें मज जागें केलें । उठुनिया तेव्हां मी बैसलें ॥१०॥
संसारस्वप्न मिथ्या जालें बाई । जन्ममरण मजलागीं नाहीं ।
गेलें न आले ठाईंचिये ठाईम । निरंजन मी कदा नोहे देही ॥११॥
पद ११४
भालचंद्रा रे ये संकटहरणा ॥धृ॥ वक्रतुंड गजशुंडदंड द्विजखंडसहित पाशांकुशधरणा ॥१॥
शूर्पकर्ण कटि व्याळभरण । करि झटित चरण गणनायक विगुणा ॥२॥
लंबोदर पीतांबर परिकर गलित अधरधर अद्वयरदना ॥३॥
गौरीनंदन भवभयकंदन वंदन करित निरंजन मूषकवहना ॥४॥
पद ११५
देखिला गे माय नंदाचा नंदन । तेणें माझें मन धालें गे माय ।
यमुनेचे तटीं तो हा जगजेठीं धावें धेनूचिया पाठीं धावे गे माय ।
हातीं घेऊनिया काठी गे माय । माथा कुरळ केश दाटी गे माय ।
वरुते मयूरपिच्छ वेठीं गे माय ।
सावळा सुंदर रूप मनोहर पिवळा पीतांबर कटि गे माय ॥१॥
मेघश्यामवर्णं राजीवनयन केशरीचंदन उटी गे माय ।
मृगमद लावी लल्लाटी गे माय । शोभे वाघनखपेटी गे माय ।
घाली गुंजाहार कंठीं गे माय दिव्य मकराकार कुंडलें तळपति बाजुबंद बाहुवटि गे माय ॥२॥
बळिचा जो बळी कळिकाळा आकळी तो हा आला नंदकुळी गे माय ।
धावुनि गोधनें वळि गे माय । ढवळी आणि पोवळी गे माय ॥
खाजवि त्या वेळावेळीं गे माय । गोपाळांचे मेळीं चाले वनमाळीं पांघरे कांबळी काळी गे माय ॥३॥
मुरलीचा रव श्रुतीचा गौरव बोलुनिया भाव दावी गे माय ।
व्रजनारी नादासी लावी गे माय । नाना पुष्पतुरा खोवी गे माय ।
देहुडा चरण ठेवी गे माय । जो कां रघुविर तो हा मुरलीधर । निरंजन मनिं भावी गे माय ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2016
TOP