मराठी पदें - पदे १३१ ते १३५
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
पद १३१
कांहीं नाहीं रे चित्स्वरुपा वांचुनि ।धृ।
भूमिरापनल वायू खं आणि भुवनत्रय गुण दिशा दाही ॥१॥
इंद्रचंद्र भोगेंद्र वरुण यम अर्कादिक सुर सर्वहि पाही ॥२॥
स्थिरचर जगनग ब्रह्माचि ह्मणवुनि श्रुतिवचनाची ग्वाही ॥३॥
रघुविरपद सद निरंजन हृत्कमळी संतत वाही ॥४॥
पद १३२
हे मति परतावी परतावी । रघुविर चरणीं रतावी ॥धृ॥
विषयावरि नव जावी । निज मूळठायालागि वसावी ॥१॥
सन्मार्गासि असावी । आत्मा टाकुनि किमपि नसावी ॥२॥
सुखदु:खातित व्हावी । नांदो सत्संगतिचे गांवीं ॥३॥
निरंजन हें मागे । रघुविर गुरुचरणाप्रति लागे ॥४॥
पद १३३
रामकृष्ण हरिराम जयजय रामकृष्ण हरिराम ॥धृ॥
निशिदिनि वाचेलागि स्मरावा । रामकृष्ण हरि० ।
जाउनिया सत्संग धरावा । रामकृष्ण हरि० ॥
विषयभोग हा त्याग करावा । रामकृष्ण हरि० ।
आत्मस्वरुप निजलाभ वरावा । रामकृष्ण हरि० ॥१॥
वर्णाश्रम धर्मिं अचरावे । रामकृष्ण हरि० ।
क्षमा दया शांतिसि धरावें । रामकृष्ण हरि० ॥
कामक्रोध मार्गीं नवजावें । रामकृष्ण हरि०।
दैवें मिळेल तेंचि खावें । रामकृष्ण हरि० ॥२॥
आपन तरुनि लोकां तरवावें । रामकृष्ण हरि० ।
रामकृष्ण वाचे स्मरवावे । रामकृष्ण हरि० ।
भक्तिमार्ग बळकट धरवावे । रामकृष्ण हरि० ।
पापकर्म मागें सरवावें । रामकृष्ण हरि० ॥३॥
धनदारासुत दूर करावे । रामकृष्ण हरि० ।
सर्व त्यजुनि निरंजन व्हावें । रामकृष्ण हरि० ।
रघुविरगुरुपद दृढ धरावें । रामकृष्ण हरि०।
दुस्तर भवसिंधूसि तरावें । रामकृष्ण हरि० ॥४॥
पद १३४
ऐका हा भवसिंधू कैसा मोठा थोडासा ।
संताचे संगें जाला जैसा सिंधू बिंदूसा ॥धृ॥
निजमनाचे योगें दुस्तर मोहें कल्पिलें पाहे ।
मानवादि पशु आणिक नाना देहे दारासुत गेहे ॥१॥
जन्ममरणाची येतां फेरी आलि मज घेरी ।
संतांनिं कृपा केली बरि नेलें परतीरीं ॥२॥
मनाचे पैलिकडे गेलों सिंधू उतरलों ।
चिन्मयस्वरूप स्वयें जालों पूर्वत्वें धालों ॥३॥
निरंजन ह्मणें संतसंग जाला भवभंग ।
सर्वाठायीं मीच येतां सांग जाहलों चांग ॥४॥
पद १३५
धन्य आजि सुदिन उगवला । संतसंग अह्मांसी प्राप्त जाला ॥धृ॥
सहजीं होतां संताची पदभेटीं । पापें गेली पळोनि उठाउठी ॥१॥
करुं जाता संतासी संभाषण । ताप गेला अंगीचा सर्व शीण ॥२॥
होतां संतजनाचा समागम । दैन्य गेले संसार सर्वभ्रम ॥३॥
निरंजन ह्मणे मी धन्य जालों । संतजनप्रसादें पूर्ण धालों ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2016
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP