मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|निरंजन स्वामीकृत मराठी पदें.|
पदे २०६ ते २१०

मराठी पदें - पदे २०६ ते २१०

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


पद २०६
अहो म्यां गुरु केला गुरु केला । विचार नाहीं कळला ॥धृ॥
एक रुपया दिधला । अडखर्चास पावला पडला ॥१॥
मंत्र होता सांगितला । तोही बहुतकाळ म्यां जपला ॥२॥
नेणुनिया आपणाला । न कळे देव ह्मणूं कोणाला ॥३॥
निरंजन ह्मणे त्याला । ऐसा गुरु जुंपी औताला ॥४॥

पद २०७
अरे मज गुरु करा गुरु करा । किति सांगूं या पोरां ॥धृ॥
मजसारिखा ज्ञानी । पृथ्वीवरुता नाहीं कोणी ॥१॥
गुरु घरोघरीं असती । परि ते माझ्या समान नसती ॥२॥
बहुत शिष्य म्यां केले । मंत्रचि सांगुनिया उद्धरिले ॥३॥
निरंजन ह्मणे ऐसे । कलिंयुगिं मातले ह्मैसे ॥४॥

पद २०८
एकचि ब्रह्म जगीं विलसे । त्याविण आणिक कांहीं नसे ॥धृ॥
जारजश्वेदज अंडज उद्भिज भेद अनेक असे ।
नामरूपात्मक भासतसे जग चित्रविचित्र ठसे ।
कटककुंडल केयुर बेसर एकचि हेम जसे ।
त्यापरि चिद्रुप येकचि अनेक भासत भ्रांति वसे ॥१॥
भ्रामकसंधिपथांतरि पाहुनि खुंट उभा सगळा ।
मंदमती मनिं मानित तस्कर कापुं अला हे गळा ।
शुक्तिपणाप्रति नेणुनि रौप्यचि भासतसे विव्हळा ।
तद्वत ब्रह्मचि भासतते जग मूर्ख जना सकलां ॥२॥
धावतसे मृग रश्मिसि नेणुनि अंबु दिठीं सरिसा ।
रज्जुपणाप्रति नेणुनिया मूढ मानित सर्प जसा ।
पावतसे भय कंप मनिं अहि बुद्धिचिया सरिसा ।
ब्रह्मपदाप्रति नेणुनिया भव पाहत अज्ञ तसा ॥३॥
जन्म शतावधि वेंचुनि सद्गुरुपाय मनीं धरिले ।
ते नर अद्वय ब्रह्मसनातन लक्षुनिया तरले ।
भेद अभेदपणाप्रति सांडुनि मीपण विसरले ।
शुद्ध निरंजन होउनि आपण पूर्णपणें उरले ॥४॥

पद २०९
दत्तात्रय श्रीगुरुमूर्ती । वंदुनीया मागू स्फूर्ती ॥धृ॥
हृदयीं चिंतुनिया ध्यान । करूं पायांचें पूजन ।
गाऊं वाचेलागीं गुण । महिमा सत्कीर्ती ॥१॥
नाम गाऊं वारंवार । उतरूं दुस्तर हा संसार ।
करूं आपुला उद्धार । मोडूं आवर्ती ॥२॥
कीर्तन समारंभामधीं । वीसरूनी आधिव्याधी ।
साधु उघड समाधि । तृर्येचा पती ॥३॥
विसरूं देवभक्तपण । स्वयें होऊं निरंजन ।
जेथें सर्वहि मिथ्यापणें । माया प्रवर्ती ॥४॥

पद २१०
श्रीदत्तात्रया अवधूता दिनानाथा रे ।
दीनबंधू सत्वरि धाव आतां रे ॥धृ०॥
दृढतर गुंतलों मोहपाशीं रे ।
तेणें योगें पावलों दु:खराशी रे ॥
क्लेश होती बहुतचि मानसीं रे ।
पंचप्राण आले हे कंठापाशीं रे ॥१॥
स्मरतांचि धावसी लागवेगी रे ।
ऐसी कीर्ती जहाली असे जगीं रे ।
वर्णिताति पुराणें तुजलागीं रे ॥
योगीजन चिंतिति अंतरंगीं रे ॥२॥
मुनिवरा स्वामिया दिंगबरा रे ।
भक्तासाठीं धरिसी अवतारा रे ॥
निरंजना चरणीं देई थारा रे ।
छेदी छेदी या भवसंसारा रे ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP