मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|निरंजन स्वामीकृत मराठी पदें.|
पदे २३६ ते २४०

मराठी पदें - पदे २३६ ते २४०

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


पद २३६
संत घरा आले महंत घरा आले । पापताप दैन्य सये उठोनिया गेलें ॥धृ॥
ज्ञान अर्क उदय झाला संकटें पळालीं । पातकें जळालीं ॥
दु:ख लया गेलें विषयवासना गळाली ॥१॥
बोधवृष्टि झालि तेणें तिन्ही ताप गेलें । अंतर निवालें ॥
अष्टअंग सुखी होउनि ब्रह्मरूप जालें ॥२॥
संतकृपें चिद्रत्न हातालागिं आलें । दैन्य दूर झालें ॥
कृतकृत्य होउनि ठेलें । पूर्णपणें धाले ॥३॥
गुरु रघुराज संत भेटतांचि बाई । लागतांचि पाई ॥
निरंजन होउनि ठेलों द्वैत आतां नाहीं ॥४॥

पद २३७
हे मन माझी भागीरथी माउली ॥धृ०॥
श्रीहरि पदाचें नेटि । फोडोनि ब्रह्मांड पेटी ॥
सत्य लोकीं ब्रह्मयानें पूजिलि ॥१॥
करुनि तपाच्या कोटि । पूर्वज उद्धारासाठीं ॥
भगिरथें प्रार्थुनिया आणिली ॥२॥
भेदोनि भूतळवाटी । गेली पाताळाचे पोटीं ॥
सदाशिवें जटाजूटीं वाहिली ॥३॥
निरंजनें पाहतां दृष्टी । जालि बहु तुष्टि पुष्टि ॥
ते हे गंगा सिंधूभेटी चालिली ॥४॥

पद २३८
नमो काशी वाराणसी पुण्यराशी । सकळ सुरसहित शिव तेथींचा निवासी ॥धृ॥
विश्व निर्माइता विश्व परिपालिता विश्व संहारिता विश्व भर्ता ।
नागभूषन सदा भस्म लेपन करी अक्षमाला धरि मोक्षदाता ॥१॥
बिंदुमाधव हरि पंचगंगातिरिं वंदिला सुरनरीं सौख्यकारी ।
धुंडि हा गणपती भजकर्त्यांप्रति देत सुंदरमति पाशधारी ॥२॥
दंडपानि महा पाप भय संहारी कालभैरव करी दु:खभंगा ।
क्षेत्रीचीं देवता काशि नामें स्मृता वंदिली म्यां आतां गुहागंगा ॥३॥
अन्नपूर्णा बरि अन्नादाना करि त्रिपुरहरसुंदरी जगन्माता ।
तीर्थ मणिकर्णिका भवजलधितर्णिका देत निरंजना सौख्य गातां ॥४॥

पद २३९
हे गंगा भवतापत्रय भंगा । आवडति श्रीरंगा ।
बसलीसे शिवअंगा । दर्शनमात्रें पावन करि जग उद्धरीं कीटपंतगा ॥१॥
हे भागीरथी अंबा । अति सुखदायक सांबा ।
लालन करि हेदंबा । प्रियकर देवकदंबा ।
त्रैलोक्याप्रति पावन करिते भेदुनि हिमनग तुंबा ॥२॥
हे जान्हवी । मोहतम आपन्हवी ।
निजस्वरुपातें दावी । भवभय समुळ दुरावी ।
नीरंजनपद देउनि अक्षयीं नांदवि निजसुख गांवीं ॥३॥

पद २४०
हे काशी । चैतन्याची राशी ।
शंभूची मीराशी । दुर्लभ जे अमरासी ।
सर्वऋषीजन साधन करिति होउनि क्षेत्र निवासी ॥१॥
वाराणसी । दु:खभयातें नाशी ।
इच्छित हे सर्वासी । ह्मणुन काला हणसि ।
इंद्राची जे अमरपुरी ते जाणा ईची दासी ॥२॥
अविमुक्ति । दे सर्वासी मुक्ति ।
सांडुनि विषयासक्ति । करिताम ईची भक्ति ॥
नीरंजनपद अक्षयिं लाभे । अनृत नव्हे वचनोक्ति ॥३॥
राम आले । भरतासी क्षेम दिले ।

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP