मराठी पदें - पदे ६६ ते ७०
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
पद ६६
याचि परि जगदीश्वर पाहे । व्यापुनिया जगदांतरिं आहे ॥धृ०॥
तैल जसें तिळ - अंतरधानी । राहतसे दधि अंतरिं लोणी ॥१॥
काष्ठांतरिं वसताहे अग्नी । गारा शुभ्र तयांतरि पाणी ॥२॥
स्थावरजंगम अंतरबाह्य । ब्रह्माचि ओतप्रोत सदा हे ॥३॥
निरंजनिं खुण ठाउक झाली । श्ररिघुनाथ गुरूची किल्ली ॥४॥
पद ६७
निजस्वरुपीं रत जे नर झाले । ते नर ब्रह्माचि होउनि ठेले ॥धृ०॥
मेघमुखींचा बिंदु गळाला । सिंधुत जाउनि सिंधुचि झाला ॥१॥
लवणाचा गज अपीं मिळाला । परतुनिया मग नाहिंच आला ॥२॥
लागुनिया कर्पूर दिपाला । तद्रुप होउनि ठाइं निमाला ॥३॥
निरंजन रघुनाथ - पदाला । वंदुनिया रघुनाथचि झाला ॥४॥
पद ६८
येई येई वो रघुराया । करुणाकर गुरु सखया ॥धृ०॥
तुझिया पायासी अंतरलों । दूर विदेशा गेलों ।
मार्गीं चालुनिया बहु श्रमलों । कष्टी फारचि झालों ॥१॥
वाटे दैवहिन मी मोठा । प्रारब्धाचा खोटा ।
बुद्धीहीन बहू करंटा । चुकलों निजहित वाटा ॥२॥
पाडस टाकूनिया हरणीला । जाउनि फार सापडला ।
गाईवीण जसा वत्साला । व्याघ्र अडवा आला ॥३॥
तैसें तुजविण हो ये समयीं । बुडतों सिंधू डोहीं ।
धावे पावे हो गुरु आई वायूरुपें येई ॥४॥
कंठ होउनिया सद्गदित । अरडूनि हाका देत ।
स्वामी अंतरलों चरणांत । उदकें केला घात ॥५॥
करुणा ऐकुनिया निजकानीं । गुरु झाले जिवदानी ।
जहाजा लावुनिया निजपाणी । ऐलतिरातें आणी ॥६॥
निरंजन दास तारियला । शोकाविरहित केला ।
येउनि चरणातें लागला । बहुतचि आनंदला ॥७॥
पद ६९
काय केले रे नरदेहा येउनी ॥धृ॥
निजस्वरुपासी ध्यावें । तेथें विषयभोगे चिंतावे ॥१॥
जें मन उन्मन व्हावें । तें मन धनकामिनीवरि धावे ॥२॥
सन्मार्गीं लावावी । ते मति दुष्ट भावना भावी ॥३॥
अहंब्रह्म हें ध्यावें । सांडुनि पापी बळेंचि व्हावें ॥४॥
निरंजन ह्मणे चोरा । गाढवा जालासि ह्मातारा ॥५॥
पद ७०
याचिपरी हे माया पाही । निजस्वरुपीं मुळि झालेचि नाहीं ॥धृ॥
सागरिची जळलाट उडाली । जळपण सांडुनि नाहींच गेली ॥१॥
हेमाचे नग सुंदर केले । अंतरिं बाहेरि हेमचि ठेले ॥२॥
तंतू जोडुनिया पट झाले । तंतूपण हें नाहिंच गेलें ॥३॥
निरंजन रघुनाथा ठायी । द्वैतपणाचा लेशचि नाहीं ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2016
TOP