मराठी पदें - पदे ७६ ते ८०
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
पद ७६
गुरुनें मजला देवाचे देव केलें हो । अनुभव घेतां प्रत्यया माझ्या आलें हो ॥धृ॥
जागृत काळीं विष्णुचें रुप दिल्हें हो ।
स्वप्नामाजी विरंची मज केलें हो ।
सुषुप्तीसी महेशपण आलें हो ॥१॥
रजतसत्व जहालों त्रिगुणाकार हो ॥
जागृत स्वप्न सुषुप्तिचा व्यवहार हो ।
तुर्यावस्था साक्षीत्वें ब्रह्माकार हो ॥२॥
वेदशास्त्र आमुचे बंदीजन हो ।
वर्णिताती निजमुखें कीर्तीगूण हो ।
इंद्रादिक स्थापित अमुचे जाण हो ॥३॥
रघुनाथानें मजला ऐसें केलें हो ।
एकाएकीं अढळपद दीलें हो ।
निरंजन अनभुवनिया बोले हो ॥४॥
पद ७७
श्रीहरि लागुनि धे धे धे प्राण्या ॥धृ॥
नरतनु हे तुजला प्राप्त जहाली । तंववरि साधुनि घे घे घे ॥१॥
धन - दारा - सुत - मित्र नव्हे तीं । सर्वहि चोरचि हे हे हे ॥२॥
यमदूतासि पहासी तेव्हां । करसिल मग तूं फे फे फे ॥३॥
निरंजन तुज सांगतसे खुण । ऐकुनिया मनिं घे घे घे ॥४॥
पद ७८
तो नर नागवला नागवला । अभिमानें मेला ॥धृ॥
रजत ह्मणूनि शुक्तिला । घेउनि संग्रह पुष्कळ केला ॥१॥
भावुनिया उदकाला । धावत मृगजळ पिउ गेला ॥२॥
अमृत घट सांपडला । ह्मणवुनि कांजी पुष्कळ प्याला ॥३॥
निरंजन प्रभु कळला । नसतां ह्मणतो भवभ्रम टळला ॥४॥
पद ७९
गाइ मुखिं रघुनाथ कथा रे । जाइल हा नरदेह वृथा रे ॥धृ॥
दारा - धन - सुत सर्वहि बा रे । रहातिल जेथिल तेथचि सारे ।
देशभूमि गड मंडळ वाडे । रहातिल ठाइच गाडे गाडे ॥२॥
ठाकर उंची शाक दुशाला । संगि न येतिल कांहि मशाला ॥३॥
निरंजन रघुनाथ यजी रे । दुर्धर हा संसार त्यजी रे ॥४॥
पद ८०
नरदेहासी येउनि तो नर झाला आत्मघाती रे
प्रपंच आणि परमार्थी दोन्हींत मेळविली धुळमाती रे ॥धृ॥
संसारीं राहुनिया केली बहुतासी कुंची दारे ।
वैराग्यासी सेवुनि करितो सत्पुरुषाची निंदा रे ।
सर्व जगातें सांगे येउनि मजला निशिदिनिं वंदा रे ॥१॥
प्रपंचीं परदारेठायीं बहूत होती आस्था रे ।
परमार्थी स्त्रीवर्नन करितो सेवुनि मूढ अवस्था रे ।
भोगीं त्यागीं दोही भागीं नरक जोडिला नसता रे ॥२॥
कीर्ति असावी ऐसी आस्था पूर्वीपासुनि होती रे
पंडित शास्त्री मागे राहुनि माझिच व्हावी ख्याती रे
लोकांचे सद्गुण ऐकुनिया येतो दांतीकांती रे ॥३॥
निरंजन गुरुचरणीं येया त्या पुरुषाला चोरी रे ।
श्रमवुनिया जननीला शेवटिं आपण पडला घोरीं रे ।
चौर्यांशी लक्षाची त्याला न चुके फिरणें फेरी रे ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2016
TOP