मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|निरंजन स्वामीकृत मराठी पदें.|
पदे १०६ ते ११०

मराठी पदें - पदे १०६ ते ११०

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


पद १०६
ऐके हो निजवस्तुनिधाना । रघुवरि गुरुराणा ॥धृ॥
दाखवितो मी उकलुनिया निज अंतरिच्या खूणा ।
अधिकारी मी नसतां कांहीं बोधियलें वचना ।
ते निज भावें सेवुनिया मी झालों तृप्तपणा ।
पूर्णपणाचे ढेकर ते हे ऐकावे श्रवणा ॥१॥
जहदाजहदपणें मनिं करुनि भागत्यागपणा ।
पंचभूतांचा मानुनिया लय शोधियले गगना ।
त्यागुनि माया भाग जडात्मक काढियलें विगुणा ॥२॥
सच्चिद्सुख आणि नाम रूपात्मक केलें दो ठाई ।
मिथ्या मानुनि नामरुपासी ब्रम्हचि जग पाही ।
उजळुनिया दिप निरखितां मग व्याळदोरेची जाईं ॥३॥
लहरीवरि जळ सागरि जैसी चालुनिया जाय ।
तैसी वृत्ती स्वरुपावरुते येति जाति आहे ।
लहरि न होउनि सागरसा मी अढळपणें राहे ॥४॥
आनंदाप्रति टाकुनि मागे पूर्णपदीं गेलों ।
आठव विसर सांडियले परि आहेसा जालों ।
निरंजन मी तद्रुप होउनि सद्गुरुसी वदलों ॥५॥

पद १०७
देखिलें रूपो डोळां ती खूण सांगुं काई ॥धृ॥
स्थावर जंगम अवघें जग । ब्रम्ह दिसताहे मज ।
जैसे सोनियाचे नग सर्वहि सोनेंची भासे ॥१॥
अग्नीला इंधन । स्वयें जालें अग्निपण ।
तैसे देह बुद्धि मन । सारे ब्रम्हचि झाले ॥२॥
जें जें तें तें ब्रम्हरूप । जैसें पातळ थिजे तूप ।
साचे घडले जरी अमूप नाहीं वेगळें ॥३॥
सर्वहि आत्मा निरंजन । नामरूप मिथ्या भान ।
रघुविरानें ऐसी खूण सांगितली मज ॥४॥

पद १०८
संसारभान गेलें वेडेपण अंगा आलें ॥धृ॥
नाहीं मनासी ठिकाण । नको वाटे दाराधन ।
सांडियला अभिमान । लाज लोकांची ॥१॥
पोटा मिळालें तें खावें । वस्त्र फाटकें नेसावें ।
वाटे एकांतीं बैसावें । जाऊनी एकलें ॥२॥
वाटे करूं नये पाप । आला पुण्याचा संताप ।
प्रारब्धानें आपोआप । होई तें होवो ॥३॥
अवघा मीच निरंजन । भासेची मीतूंपण ।
रघुवीर दयावन । त्यांनीं हें केलें ॥४॥

पद १०९
बापिया देह नव्हे तुज कांहिरे बापिया ॥धृ॥
अरे तूं निर्गुण निर्विकार । निरंतर अजरामर । पाहे नासकें शरीर रे ॥१॥
निजानंद तूं सत्चित् । तूं तो षड ऊर्मी विरहित । देह अजरामर कर्शि तरे ॥२॥
मी देही ह्मणतां बा रे । तुज घेणें पडले फेरे । मी ब्रह्म ह्मणतां सरे ॥३॥
गुरु रघुवीराची खूण । तुज सांगे निरंजन । घेई सखया हें ऐकुन । रे बापिया ॥४॥

पद ११०
ऐके हो अनुमान विचारी माया दूर करी । निजवृत्तीनें
आत्मा पाहुनि निश्चय पूर्ण धरी ॥धृ॥
पंचभुतें आणि इंद्रिय दाही करिसी मेळवणी ।
चाळक त्याचें मन हें समजुनि मानिसि नाहिपणीं ।
सूषुप्तीवत झालेसें परि न चुकती फीरणीं ॥१॥
जागृत स्वप्न सुषुप्त्यावस्था आणुनि ओळखणा ।
साक्षि मि याचा बोलुनि वचनें करिसी अनुमाना ।
कळलें ऐसें लौकिकि दावुनि मिरविसि थोरपणा ॥२॥
लटकी शांती मिरवुनि जगिं म्हणवीसी ज्ञानी ।
बगळा जैसा मत्स्यासाठीं बैसतसे ध्यानी ।
सर्वहि चिन्हें दाखविलीं परि झाली हितहानी ॥३॥
रघुविर सद्गुरु पाहुनि बरवा शरण तया जाई ।
आत्मा निजवृत्तिसि लक्षुनि ब्रह्माचि तूं होई ।
निरंजन मन तुझिये चरणीं टेकिल किं डोई ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP