मराठी पदें - पदे २४६ ते २५०
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
पद २४६
तारिन दुस्तर हा संसार ॥धृ॥
भक्तासी तरि तारितसे परि दुष्टां करुनी मार ॥१॥
पाहा पाहा माझ्या नामें एक्या केला बहु उद्धार ॥२॥
दीन मि बंधु ऐसा लौकिक झाला माझा फार ॥३॥
भक्तअभक्ता साठि युगायुगीं धरितों मी अवतार ॥४॥
सत्यप्रतिज्ञा माझी ऐका मजसि करा अपकार ॥५॥
पूसना मजसी स्तन पाजूं अलि काय तिचा उपकार ॥६॥
भक्ताच्या तरि अंकित घरचा जालों पाडीवार ॥७॥
नीरंजन मी असतां या जगिं जालों कीं साकार ॥८॥
पद २४७
काय या संसारि सुख वाटतसे या लोकां रे ॥
शोधुनि पाहतां दु:खचि सारें वरि काळाचा धोका रे ॥धृ०॥
गर्भवास सोसुनिया ठोके घेउनि शहाणा झाला रे ॥
बाइल केली सवेंचि मेली पैका खर्चुन गेला रे ॥१॥
खायालागीं अन्न मिळेना मिळतां रोगें पिडिला रे ।
विषयभोग स्वच्छंदें करितां दंडुनि कैदी पडला रे ॥२॥
पाउस नाहीं पाणी नाहीं राज्यक्रांत बहु जाले रे ।
ऐसी चिंता वाहतां वाहतां अयुष्य निघून गेलें रे ॥३॥
दु:खरूप संसार समजुनि सत्संगाप्रति केलें रे ।
निरंजन रघुनाथप्रसादें ते नर सुखरूप जाले रे ॥४॥
पद २४८
तो हरी मज दीसतो सर्वत्र । त्या योगें सम जाले अरिमित्र ॥धृ॥
सर्वदा समसाम्य ज्याची स्थिती । गुणसाम्या मूळ प्रकृतीचा पति ।
समान वसे जो का सर्वाभूतीं । ज्याचिये ठायीं नसे भेदमती ॥१॥
पूतना विष पाजायासि आली । तिजला गति वैकुंठीं दिधली ।
सनकादिकां जे कां प्राप्ति झाली । ते प्राप्ति जेणें शिशुपाळा दिली ॥२॥
प्रकृतिपुरुषात्मक सर्व जग । मुळींच दोघालागिं एक अंग ।
अंगेविण असे जो अव्यंग । सच्चिदानंद अद्वय श्रीरंग ॥३॥
जें जें हें आहे तें तें अवघा हरि । मीपण आताम उरली नाहीं उरी ।
रघुविर कृपा निरंजनीं बरी । ह्मणोनि वाटे हरि चराचरीं ॥४॥
पद २४९
त्याचें मज पावलें सर्व कांहीं । ज्यासि मजसी अंतर उरलें नाहीं ॥धृ॥
एकरूप सर्व मी सर्वाधार । ऐसा ज्याचा अनुभव झाला स्थीर
द्वैतबुद्धि उरला नाहीं थार । अद्वयबोधें नांदतो निरंतर रे ॥१॥
तो जे चाली ती माझी प्रदक्षिणा । तो जें बोले ती माझी स्तुति जाणा ।
तो जें पाहे तें माझें दर्शन माना । त्याचें मन तें माझी स्थानरचना रे ॥२॥
तो जे सेवि ते मज उपभोग । तो जे करि ती माझी पूजा सांग ।
त्याचे देह ते जाणा माझें आंग । त्या नज दुजा उरला नाहीं भाग रे ॥३॥
त्याला माझें जें कांहीं एकपण । ठावें झालें द्वैतासि ग्रासुन ।
पूर्णब्रह्म जो कां मी सनातन । तो मी जाण सदेह निरंजन रे ॥४॥
पद २५०
ऐसा गे माय कैसा हा ज्ञानी । मायेचे केलेलें खरें न मानी ॥धृ॥
बुद्धि बाईलच्या स्वाधिन झाला । अहंकारभाऊ वेगळा केला ॥१॥
बाप ईश्वर तो आज्ञा जे करि । तयाचे मानसीं भय न धरि ॥२॥
जातिकुळाची ते सांडिली लाज । प्रवृत्तीचे तरि न करि काज ॥३॥
निरंजन तरि यालागि वाणीं । पाहूं जातां नव्हे ज्ञानि अज्ञानी ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2016
TOP