मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|निरंजन स्वामीकृत मराठी पदें.|
पदे ९६ ते १००

मराठी पदें - पदे ९६ ते १००

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


पद ९६
योगालागि उदित आधीं होती । करितांना कुंठीत होति मती ॥धृ॥
आरंभासि करितां सर्व सूर । श्रम होतां पळोनी जाती दूर ॥१॥
बोलतांना योगाच्या स्वल्प गोष्टी । क्रिये लागीं करितां होती कष्टी ॥२॥
शरिरासि देऊनि कष्ट कांहीं । ह्मणे कलीमाझारीं योग नाहीं ॥३॥
निरंजन सांगतो सर्व जनां । श्रमसाध्य योग हा आहे जाणा ॥४॥

पद ९७
सद्गुरु गे मायबाई । तुज वांचुनि करु मि काई ॥धृ॥
वाटतें मजला रहावें अक्षयीं । तुझिये पायीं ।
संसार तापत्रया तापला माझा देह । विश्रांती नाहीं ॥१॥
कोठें सुखाची काहीं सोय । म्हणवुनिया त्यजिले सारे तनधन दारा गेहे ॥२॥
भवसिंधु दुस्तर मोठा याचिया तरणोपाई ।
शास्त्रें आणि साधुसंत शोधिले बहुता ठाई ।
निश्चय म्यां पुरता करुनि तवपायीं ठेविली डोई ॥३॥
निजस्वरुपीं जडली वृत्ति माघारी न फिरे काहीं ।
अविनाश ब्रम्हानंदे कोंदल्या दिशा दाही ॥४॥
विश्रांति घ्यावयासि आलें मी गुरुमाहेरा ।
आतां मज जाणें नलगे सासुरीया त्या संसारा ।
निरंजन सासुरवासी सांभाळावा रघुवीरा ॥५॥

पद ९८
सुखदु:ख नाहींत आम्हांपाशीं । प्रतिबिंब भोगितें प्रारव्धासी ॥धृ॥
कर्माकर्मी सर्वदा आम्ही साक्षी । शुद्धबुद्ध सर्वकाळ आलक्षीं ॥१॥
जैसें चंद्रबिंब हें उच्चस्थानीं । प्रतिबिंब डोलतें पाण्यावाणी ॥२॥
प्रतिबिंब सर्वथा सत्य नाहीं । सुखदु:ख भोग हे मिथ्या पाही ॥३॥
रघुवीरें दाविली ऐसी खूण । सर्वाठायीं आलिप्त निरंजन ॥४॥

पद ९९
देखिले नवल आम्ही कांहीं । पक्षी दोन एकिया वृक्षाठायीं ॥धृ॥
कर्माकर्म तयासी फळें आलीं । तयांमाजी एकानें ते भक्षीली ॥१॥
दुजा नाहीं कोठेंहि लिप्त जाला । निजरूपीं सर्वदा तृप्त ठेला ॥२॥
खादल्याचा उदरीं शूळ झाला । बहुकाळ जहाले कष्ट त्याला ॥३॥
दुरुनिया साक्षित्वें शीव पाही । क्लेशालागि सर्वदा जीव वाही ॥४॥
मात्रा दिल्हि तयाशि रघुनाथानें । जिव तोचि जाहाला निरंजन ॥५॥

पद १००
साधुसमागम सेवुनि बा रे । रहातसे खळ या चित्रकारे ॥धृ॥
चंहन हिंग एके ठायीं । बसले परि गुण लागत नाहीं ॥१॥
कोकिळ काकसमागम केला । सुखद नाहीं कदा काकाला ॥२॥
चंडाशिळा जरि पडली आपीं । राहिल अंतरीं शुष्क तथापी ॥३॥
संशयबद्ध निरंजन ठायीं । बसला तरि भव चुकत नाहीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP