मराठी पदें - पदे ७१ ते ७५
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
पद ७१
तैसी ब्रह्मपदासी माया । भासत नित्यपरी भ्रम वायां ॥धृ॥
रजताचा भ्रम शुक्तीठायीं । भासतसे परि मिथ्या पाही ॥१॥
ग्रीष्म ऋतूच्या उष्ण सळाया । मृगजळ भासत जैसें वायां ॥२॥
रज्जूचा दृढ सर्वचि भासे । स्वप्नींचा गज भ्यासुर दीसे ॥३॥
बोलत चालत हालत आहे । मिथ्या देह निरंजन वाहे ॥४॥
पद ७२
भरलासे गुरु सर्वाठायीं । गुरुवांचुनि मज दीसत नाहीं ॥धृ॥
अप गुरुस्थळ रूप गुरूचें । भासतसे मज निश्चइ साचे ॥१॥
वायु अग्नि आकाशहि सारें । दीसतसे गुरु अक्षइं बारे ॥२॥
स्थावर जंगम व्यापुनी गेला । अंतरबाह्य गुरू गुरु झाला ॥३॥
श्रीरघुनाथ गुरूचा केला । निरंजन गुरु होउनि ठेला ॥४॥
पद ७३
साधन त्यानें हेंचि करावें । जाउनिया गुरुपाय धरावें ॥धृ।
कंटाळा विषयाचा आला । संसारासि उदासिन झाला ॥१॥
नरदेह माझा व्यर्थचि गेला । ह्मणवुनिया अनुताप उदेला ॥२॥
निजस्वरुपाचा शोध करावा । दुस्तर हा भवसिंधु तरावा ॥३॥
रघुविर गुरुपद नयनिं दिसावें । वाटल ज्यासि निरंजन व्हावें ॥४॥
पद ७४
सिंधुजळाचें सैंधव झालें । शेवठिं सिंधूंत सर्व मिळालें ॥धृ॥
तैसी माया शोधुनि पाहे । आदीअंतीं ब्रह्मचि आहे ॥१॥
अळवूनिया घृत लाडू केले । तापवितां घृत ऐसें झाले ॥२॥
मेघमुखींच्या वर्तुळ गारा । अंतरिं बाहेरी आपचि थारा ॥३॥
श्रीरघुनाथमुखींची वाणी । ब्रह्मचि सर्व निरंजन स्वामी ॥४॥
पद ७५
ऐकेहो भिक्षुकवर्या निजभिक्षाधारण - चर्या ॥धृ॥
सर्वांतरि ब्रह्मचि पाहे । माधुकरी हेची लाहे ॥१॥
मनिं आत्मानात्म विचारी । हे प्राग प्रणित अवधारी ॥२॥
निजवस्तु संतत लक्षी । अयाचित हें व्रत रक्षी ॥३॥
सत्स्वरुपीं जागा झाला । तात्कालिक म्हणणें त्याला ॥४॥
अंतरिं सुस्थीर राहे । उपपन्न हें व्रत वाहे ॥५॥
निरंजन भिक्षुक जाला । परमामृत सेवन त्याला ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2016
TOP