मराठी पदें - पदे १७६ ते १८०
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
पद १७६
बहुता दिवसां घरा आली संतमंडळी ।
वाटतसे मला आजि जाली शुभदिवाळी ॥धृ॥
जाहली सुखघनवृष्टि कोंदली सृष्टी ।
आनंदलें मन हर्षदाटी न माये पोटीं ॥१॥
करोनिया देहनिंबलोण ओवाळू प्राण ।
प्रेमामृतें करोनिया घालूं संतांसी स्नान ॥२॥
आत्मानात्म विवेक विचार पूजाउपचार ।
अद्वय चिद्रस निजसार जेववूं फार ॥३॥
नि:संदेह पणाचा तांबुल अनंद फूल ।
मोद आणि प्रमोदाचीं वस्त्रें देऊं अमोल ॥४॥
सद्भावेंसि ह्मणे निरंजन मी अकिंचन ।
कांहींच आदर माझियानें न जाला जाण ॥५॥
पद १७७
हरि हा भक्ताचा सहाकारी ॥धृ॥
द्रौपदि छळिता दुष्टजनानी जाला वस्त्र जरी ॥१॥
पार्थरथाहुनि टाकुनिया उडि समरीं चक्र धरीं ॥२॥
गजेंद्राची ऐकुनिया हाक सत्वर धाव करी ॥३॥
रघुविर सद्गुरु होउनि आपण निरंजन तारी ॥४॥
पद १७८
आतां सत्वर धांव हरी ॥धृ॥
कौरव दुर्जन दुष्ट छळात्मे धरिति मज पदरीं ॥१॥
तुझिया वांचुनि काय करावी भरली हे नगरी ॥२॥
भक्तजनाच्या पाळणकर्त्या संकट घोर हरी ॥३॥
नीरंजनप्रभु द्रौपदिसाठिं अंबररूप धरी ॥४॥
पद १७९
वेड्यावाणि वाटतसे मजला बाई वो ।
हरिवाचुनिया न सुचे अन करु मी काई वो ॥धृ॥
कारण याचें तुजला मी सांगुनि देतें वो ।
संतापाशीं जाउनिया बसलें होतें वो ।
त्यांनीं केलें चेटुक हे माझ्या भोवते वो ॥१॥
वृक्ष आणि पाषान भूमी पाणी वो ।
पशुपक्षी आकाश वायू अग्नी वो ।
सर्वांठायीं दिसतो चक्रपाणी वो ॥२॥
हारीरूप दिसती नरनारी वो ।
पाठ माझी पुरविलि घरींदारीं वो ।
काय सांगूं जाहालों मीच हारी वो ॥३॥
जनिंवनिं दाटला निरंजनीं वो ।
पूर्णब्रह्म रघुवीर चिन्मयखाणी वो ।
संसाराची झाली धूळधाणी वो ॥४॥
पद १८०
माधवराया ये मुनिजनमानसहंसा रे ।
दानवदलना हे वृष्णीकुलवत्तंसा रे ॥धृ॥
कमलानयना कमलावर कमलाधरणा रे ।
कमलाभरणा कमलासन संकटहरणा रे ।
मज दासाची येऊं दे कांहीं करुणा रे ॥१॥
निजभक्ताच्या साठीं तूं अवतरलासी रे ।
द्रौपदिकाजा धाउनिया वेगीं जासी रे ।
गजेंद्राच्या गेलासी हाके सरसी रे ॥२॥
माझ्या वेळे कां जाले तुजला ऐसें रे ।
न कळे माझें संचित हें आहे कैसे रे ।
तारी मातें तुजलागीं कळेल तैसे रे ॥३॥
निरंजन हा येउनिया लोटांगणीं रे ।
हाका देतो मोठ्यानें केविलवाणी रे ।
देई भेटी येउनिया चक्रपाणी रे ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2016
TOP