मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|निरंजन स्वामीकृत मराठी पदें.|
पदे २२६ ते २३०

मराठी पदें - पदे २२६ ते २३०

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


पद २२६
तो हा नंदाघरीं कृष्ण सावळा । होउनि चिमणासा दाखवि लीळा ॥धृ॥
रविशशि ह्या ज्याचीया कळा । जो कां पूर्णब्रह्म पूतळा ।
जो कां आदि मायेचा पति । विधि हरिहर जया वंदिती ।
श्रुतिशास्त्रादि जया वर्णिती । जाली शेषाची कुंठित मति ॥१॥
जेणें शंखासुर जिवें मारिला । जळीं मंदराचळ पृष्ठीं तारिला ।
धरुनि दंतावरि सर्व पृथ्वीला । नखें आसुर वीदारिला ॥२॥
बळि पाताळीं घातला बळें । केलीं राजाचीं कुळें निर्मुळें ।
दशशीराचे छेदिले गळे । निजभक्ताचे पुरविले लळे ॥३॥
कलिमाजी बौध्य होउन । पुढें कलंकी रुप घेउन ।
सर्व विश्वाचें संहारण । करुनि आकर्ता निरंजन ॥४॥

पद २२७
भक्तिविण जिणें त्याचें पाहों नये तोंड । जाला भूमिभार वृथा प्रसवली रांड ॥धृ॥
विषयाचा ध्यास मनिं वाहे निरंतर । मुक्तीची वासना नाहीं एक पळभर ॥१॥
जीवापैलिकडे वाटे ज्यास संसार । जाति कुळ अभिमान उचलोनि भार ॥२॥
वैदिक शाहानामीच पंडित आगळा । चातुर्याचा अहंकार वाहे वेळोवेळा ॥३॥
वाचे नये राम त्याची शुद्ध नाहीं मती । निरंजनभेटि नाहीं त्याजला कल्पांतीं ॥४॥

पद २२८
राम मुखाप्रति आला रे । भवताप नीवाला ॥धृ॥
अनंतजन्मिचे फिरतां फेरे । अवचट नरदेह जाला रे ॥१॥
जाउनि सर्वहि विषयबुद्धि । अनुताप मनिं उदेला रे ॥२॥
दृश्य विलक्षण राम सनातन । दृढतर निश्चय केला रे ॥३॥
निरंजनपद पावुनि अक्षयिं । भेद भयासुर मेला रे ॥४॥

पद २२९
सद्गुरुराया नावाडी भेटला । ठायींचे ठायीं भवसिंधु आटला ॥धृ॥
निर्मळ ब्रह्म भास्कर माध्यान्ही । अनादि विद्या उखर भूमिस्थानीं ।
माया मृगजळ उसळलें साजणी । अक्षोभ मोठें भवाव्धिचें पाणी ॥१॥
जन्ममरणाचे आवर्त फिरती । हर्षशोकाचे खळाळ वाजती ।
कामक्रोधादि जळचरें तळपती । वाटे मी तेथें बुडालों निश्चिंती ॥२॥
देसीकरा येवी दानपैं केलें । भक्ति वैराग्य ह्मणोनि आवले ।
विज्ञान नोका तारुवें पेलिलं । युक्तीनें मज वरुतें घेतलें ॥३॥
पाहूं मी गेलें भवसिंधूजीवन । तंव नाहीं कांहीं वृथा झाला शीण ॥
बुडतां तरलों हेंहि मिथ्याभान । जैसा मी तैसा शुद्ध नीरंजन ॥४॥

पद २३० [ जाणे जोशी ].
ऐक पिंगळ्याचा संवाद । तुझें बरें होइल दादा ॥धृ०॥
ऐक सांगतों पिंगळा । आलि सृष्टीला अवकळा ॥
निळ्या घोड्याचा बा स्वार । करिल पृथ्वीचा संहार ॥१॥
आणि एक अवघड आहे । होइल ब्रह्मांडाला भय ॥
पृथ्वी पाण्यांत विरेल । पाणी अग्नी संहारील ॥२॥
अग्नि वारा झडपील । वायु आकाशीं दडेल ।
गुणांत मिळेल आकाश । माया करील गुणग्रास ॥३॥
महतत्व जाइल लया । मूळ प्रकृतीच्या ठाया ॥
प्रकृतिपुरुष अभिन्नपणीं । सुखें बसतिल निरंजनीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP