मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|निरंजन स्वामीकृत मराठी पदें.|
पदे २६१ ते २६५

मराठी पदें - पदे २६१ ते २६५

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


पद २६१
व्यंकटरमणा । ये सत्वरिं संकटहरणा ॥धृ॥
शरणागत मी तुझिया चरणा । चुकवि चुकवि जन्ममरणा ।
लागो मानस तुझिया चरणा । दया करि वो अंबुजनयना ॥१॥
उपाय न दिसे मज भवतरणा । धाव सत्वरि दीनोद्धरणा ।
येऊंदे हरि माझी करुणा । स्वच्छ करी वो अंत:करणा ॥२॥
वारुनिया अविद्यावरणा । बोधि आपुल्या स्वरुपज्ञाना ।
देई शांति क्षमेच्या भरणा । शरणागत तापत्रयहरणा ॥३॥
उदार तूं तव भक्तरक्षणा । देई देवा हेचि दक्षणा ।
अगाध तवगुण येवो वदना । कृपादृष्टि करि निरंजना ॥४॥

पद २६२
जाला शिव मल्लासि याला मागुनि घ्या वारी ।
तुह्मासि येणें नाहीं फिरुनि दुस्तर संसारीं ॥धृ॥
भक्तजनां रक्षावें शासन करणें दैत्याला ।
यासाठीं या मृत्यूलोकीं शंभु अवतरला ।
मणिमल्लाचें मर्दन करितां घाम बहुत आला ।
त्या योगें भस्माचा रंग पीतवर्ण जाला ॥१॥
कैलासाहुनि कडे पठारीं प्रस्ताना आले ।
सवेंचि मारुनि दैत्यठानें जेजुरि घातलें ।
ह्माळसा हें नाम येणें पार्वतीस दिलें ।
बाणाई या नामें गंगेलागीं बाहिलें ॥२॥
वेगवान नंदीचें वाहन अश्वरूप जालें ।
सामवेदि द्विज शापास्तव श्वानत्वा पावले ।
बाणाईच्या पदस्पर्शानें निजपदा गेले ।
भरित रोडगे वाहुनि पूजन नीरंजनें केलें ॥३॥

पद २६३
रे मना राहि त्या पाई साजणा । रे मना ॥धृ॥
जो कां वैकुंठिचा राणा । जाला यशोदेचा तान्हा । वन चारितो गोधना ॥१॥
सावळा सुंदर हरी । करी यशोदेची चोरी । गोपिकांतें दावितो खुणा ॥२॥
भक्तासीं जो साहकारी । अल्पा विघ्नांतें नीवारी । ह्मणवि अर्जुनाच्या मेहुणा ॥३॥
नये योगियाचे ध्यानीं । ऐक्य भावें नीरंजनीं । एसी हे उपासना ॥४॥

पद २६४
नमो देवि जगदंबिका श्रीभवानि । श्रीभवानि महापापसंहारिणी ।
दु:खनिर्दाळिणी सौख्यखाणीं ॥धृ॥
अखिल जगकारिणी त्रिगुणवाहिनी नारदादिकमुनि मधुरवाणी ।
वर्णिती निशिदिनीं विषम भवतारिणी । वंदिलि सुरगणीं दैत्यहानी ॥१॥
अष्ट विविधा करि अष्ट अयुधा धरि । दुष्टमति संहरी ह्मैसअसुरा ।
तुष्ट भक्तावरि कष्टताप परिहरि । इष्ट दे बहुपरि चरणभ्रमरा ॥२॥
ब्रह्मयाच्या रूपें विश्व हें अवतरि विष्णुरूपें करि पालनातें ।
रुद्ररूपा धरि विश्व हें संहरि । सकळ भूता हरि प्रळयवातें ॥३॥
ब्रह्मविद्या स्वयें योगियाच्या मनिं । होय जे उन्मनि मोक्षदानी ।
द्वैतभय निरसुनि मोहतम ग्रासुनि । राहे नीरंजनि ऐक्यज्ञानी ॥४॥

पद २६५
निजस्वरूपा भ्रमला रे मानवा ॥धृ॥
देह अहंता सेविली दृढतर म्हणवुनिया श्रमला रे मानव ॥१॥
लक्ष चौर्‍यांशीं फिरतां फेरे काळ बहु क्रमला रे ॥२॥
स्वर्गनरक गति पावुनि बहुधा अज्ञपणें दमला ॥३॥
निरंजनपद पावुनि सहसा नाहीं विश्रमला रे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP