मराठी पदें - पदे १९६ ते २००
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
पद १९६
ते साधु वेगळेचि ज्याचा पूर्ण अनुभाव ।
आत्म सुखें सुखाउनि जाले स्वयें ची देव ॥धृ॥
जानामाजी असुनिया दिसति जना ऐसे ।
नकळेचि कोणालागीं त्याचें रूप कैसें ।
स्वधर्म संपादोनि करिति कर्म सायासें ।
अंतरिचे मार्ग शुद्ध चालताति अनारिसे ॥१॥
पहाती जग सारें आपुलीया माझारीं ।
स्थावरजंगमादि विलोकिति चिदाकारी ।
दु:खाचा लेश नाहीं जयालागि घरिदारीं ।
सर्वकाळ सुखि जाले निवोनिया अंतरीं ॥२॥
सोडोनि थोरपण नादीं न लाविती जन ।
न करिति घप्पाघोळ घरोघरीं कीर्तन ॥
घरदार सांडोनिया न सेविति कदा वन ।
ब्रह्मज्ञान सांगुनिया लोकां न मागुती धन ॥३॥
प्रारब्धसुखदु:ख देहावरि टाकुन ।
सहजासहजीं अचारती हेचि त्याची मुख्य खूण ॥
अद्वैतबोध जाला गेलें ज्याचें मीतूंपण ।
रघुविर गुरुकृपें जाले खयें निरंजन ॥४॥
पद १९७
रघुवीरा तूंतें आलों मी शरण । विनवीतो प्रेमें भक्त बिभीषण ।
द्विजकूळीं मूनि पौलस्तीतनुज । पातकी दुष्टयोनि मी दितिज ।
द्वेषीया दशशीराचा अनुज । सांडूनि कुळ हो अभिमान लाज ॥१॥
देऊनी सीता घेइ रामभेटी । वदलों बंधूलागीं ऐशी गोष्टी ।
कोपला दुष्ट होउनीया कष्टी । ह्मणवूनि रामा हो घालि ममपृष्ठीं ।
तूं तंव दीनबंधु दयानीधी । रक्षिसि शरणागतालागिं आधीं ॥२॥
न धरी माझा त्याग मनामधीं । आपूलें ब्रीद हो न्यावें आतां सिद्धी ।
ऐकूनि नीजदासाचें उत्तर । तोषला निरंजन प्रभुवर ।
देउनि त्यातें अखंडित वर । स्थापीला लंके हो मारुनि दशशीर ॥३॥
पद १९८
हरि पाहुं चला जाउनि कुंजवनीं । सजल जलदवपु शोभति सुंदर कंठीं गुंजमणी ॥१॥
सारुनि चिंता व्रजललनाची करितो रंजवनी ॥२॥
मुरली अधरि ठेवुनिया करिं नान उंच ध्वनी ॥३॥
निरंजनि वनिं व्यपाक पाहुनि अक्षइ चिंतु मनीं ॥४॥
पद १९९
गुरुपाय तुझे चिंतू निचिंतपणीं ॥धृ०॥
घरदारादिक संसाराची सांडुनि गुंतवणी ॥१॥
इंद्रिय दाही जिंकूं पराक्रमें सेवुनि अंगवणी ॥२॥
निर्भयपद हें चिन्मय ध्याउनि पावूं आनंद मनीं ॥३॥
निरंजन मम होउनि अक्षयिं राहुं निवांत जनीं ॥४॥
पद २००
सावळा विठ्ठल आजि देखियला डोळा ॥
तोचि अठवतो मजलागि वेळोवेळा ॥धृ०॥
विटेवरी उभा नीट कटावरि कर ।
मुगुट शोभतो बरा रत्न अळंकार ॥१॥
मकर कुंडलें कर्णिं शोभति सुंदर ।
साजिरा घातला कंठिं तुळशीचा हार ॥२॥
कस्तुरी टिळक भाळिं चर्चिला केशर ।
कासिलासे बरा कासेलागि पीतांबर ॥३॥
निरंजनि मनि ऐसें ध्यान निरंतर ।
उच्चारित सदा वाचे रुक्मिणीचा वर ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2016
TOP