मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|निरंजन स्वामीकृत मराठी पदें.|
पदे १ ते ५

मराठी पदें - पदे १ ते ५

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


पद १.
येई येई श्रीगुरुराया । मुनिदत्तात्रया ।
करुणा करी ममनिजसखया । दाखवि तवपाया ॥धृ॥
बुडतों मी भवसागरडोही वेष्टुनिया मोहें ।
वाचविता  यापासुनि मजला तुजविण कोण आहे ॥
कामादिक रिपु जळचर मोठे तोडिति लवलाहें ।
म्हणवुनिया तुज आठवितों मनिं पसरुनिया बाहे ॥१॥
घरदारासुतसंपत्ति पाहुनि भुललों मी वायां ।
करितां त्यांची नित्य भरोभरि क्षिण झाली काया ।
दु:ख असे परि मानुनिया सुख पडलों आपाया ।
चैन नसे क्षण एकहि एथें भाजति बहु लाह्या ॥२॥
पसरुनिया खदिराचे इंगळ वरि केली शय्या ।
सर्पफणातळिं बैसुनि दर्दुर मानितसे छाया ।
मूर्खपणें भ्रमलों मी देवा दुस्तर तवमाया ।
तैसें या संसाराठायीं सुख कैचें होया ॥३॥
धावुनिया पद दाखवि झडकारी निरंजनस्वामी ।
भक्तींचें बळ पुष्कळ प्रेमा देई तवनामीं ।
तारुनिया मज सत्वर नेई अपुले निजधामीं ।
या समयीं जरि सत्वर येसिल तरि हरि तरतों मी ॥४॥

पद २ ( गिरनाराचें )
लवकर देई भेटी । दिगंबर स्वामी या ॥धृ॥
सावळी सुंदर तनु । उगवले कोटी भानु ।
लावण्यता किती वानु । शक्ती नाहीं गावया ॥१॥
कासियला पितांबर । माथा मुकुट सुंदर ।
गळां मुक्तचामीकर । गुंफयिल्या जाळिया ॥२॥ दिगं.
षड्भुजा सकुमार । षडायुधें सुंदर ।
आंगीं कस्तुरी केशर । लावुनिया उटीया ॥३॥ दिगं.
स्वामि त्रैलोक्यविहारी । देखियला गिरनारीं ।
निरंजनें डोळेभरी । जीवन्मुक्त व्हावया ॥४॥ दिगं.

पद ३.
स्वामी रघुवीरा, मजला न्यावें हो निजमाहेरा ॥धृ॥
बरवी होते मी निजमाहेरीं । बापाचे घरीं । ज्ञप्ति अव्यक्ति घेऊनि पोरी ।
खेळले बोहोरी । नाहीं पाहिला दुसरा वारा ॥१॥
कोठुनि कल्पना रांड आली । विवसी घरघाली ।
तिनें इतुकी कळ लावुनि दिली । मध्यस्थी केली ।
अहंकार हा केला नवरा ॥२॥स्वामी रघु०॥२॥
कामाजीपंत वडिल भावाचा । लाविला दावा ।
आशा तृष्णा ह्या नंदाजावा । गाती उपरावा ।
मोठ्या गांजिति त्या सिरजोरा ।स्वामी॥३॥
चिंता सासू हे बहु ह्मातारी । घालिति घोरी ।
मन हा सासुरा कारभारी । गांजितो भारी ।
बहु श्रमले मी या संसारा ।स्वामी रघु०॥४॥
निरंजन झाला सासुरवासी । दु:खाच्या राशी ।
दाटुन जोडिल्या बहु सायासी । टाकुनी सुखासी ।
कंटाळुनि गेलों बहु संसारा ।स्वामी रघु०॥५॥

पद ४
संसार वायां गेला । परमार्थ नाहीं झाला ।धृ।
पाहुनि लोकांचें वैराग्य । त्यजिले दाराघरसुत - भाग्य ।
मानुनि वर्णाश्रम आयोग्य । झाला गोसावी ॥१॥
मागुनि घरोघरीं पिष्ट । भोजन सारावें यथेष्ट ।
सदासर्वदा भांगिष्ट । डोळे फिरवावे ॥२॥
केला मठीमध्यें वास । लोकां दाखवि संन्यास ।
चित्तीं विषयाचा ध्यास । नाहीं खंडला ॥३॥
प्रपंच ना निरंजन । झाली दोही भागीं हानि ।
रघुवीर दयाघन । नाहीं पाहिला ॥४॥

पद ५
( उत्खातं निधिशंकया इत्यादि वैराग्यशतकांतील श्लोकावर )
तृष्णे सोडि हो मजलागुनी । रांडे पापिणी ॥धृ॥
द्रव्यासाठीं म्यां पृथ्वी खणिली । पर्वतावरिली ।
झाडें होतीं ते नव्हतीं केलीं । प्राप्ती न झाली ॥१॥
उदिमासाठीं मी बहुत फिरलों । सिंधु उतरलों ।
सेवा नृपतीची करिता झालों । परि नाहीं धालों ॥२॥
बहुत केले म्यां मंत्रतंत्र । करणी विचित्र ।
पुजिले स्मशानीं पिशाचमात्र । वाईट अपवित्र ॥३॥
प्राप्त न झाला फुटकी कवडी । करितां घडमोडी ।
निरंजन तृष्णेसि कर जोडी । मज आतां सोडी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP