मराठी पदें - पदे १६ ते २०
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
पद १६
दुस्तर हा भवसागरखोलीं तरलों कीं आम्ही ।
पैलतिरा जायासि कारन झालें गुरु स्वामी ॥धृ॥
वाईट हा भवसागर येणें बहु बुडविलें ।
आजवरी मजलागीं येणें बहु कष्टी केलें ।
दैवोदय झाला म्हणवुनियां सद्गुरु भेटले ॥१॥
गुरुनें किल्ली दाउनिया मनसूत्रा फिरवीलें ।
सिंधुतटाकीं असतां मजला मागें सरवीलें ।
भावसिंधू नातळतां गुरुनें पैलतिरा नेलें ॥२॥
अगाध गुरुचा महिमा त्यांनीं अघटित हें केलें ।
निरंजन पद देउनि भवभय विलयासी नेलें ।
मीच एकला नाहीं ऐसें पुष्कळ तारीले ॥३॥
पद १७
बोलतांचि नय तें मी बोलूं काय । प्रसाद गुरुरायें केला गे माय ॥धृ॥
साखरेचि गोडी नयेचि सागतां अनुभवाची कथा तैसी गे माय । तृप्ती ज्याची त्याजपाशीं गे माय । सांगूं जातां श्रमराशीं गे भाय । निर्गुण ते अविनाशी गे माय ।
श्रुतिसि सांकडें बोला मौन पडे अनिर्देश्य सर्व देसिं गे माय ॥१॥
परेचें जे पर तुर्येचें निजवर आनंद आपार असे गे माय । आसंग सर्वदा वसे गे माय । द्वैताचा लेशहि नसे गे माय । स्थूळ दृष्टिसि न दिसे गे माय मनाचें उन्मन इंद्रिया अज्ञान पाहतां मीपण ग्रासे गे माय ॥२॥
विश्वीं म्हणुं तरि आहे विश्वातीत साक्षित्वाची मात नसे गे माय ।
अपुलें आपण असे गे माय । अखंडत्वें अविनाश गे माय ।
निजतेजें प्रकाशे गे माय । ध्येय ध्याता ध्यान जाय ।
हारपुन नेणिव निवसे गे माय ॥३॥
अनुभवाची खूण अनुभवी जाणे दुसर्या कठिन मोठें गे माय ।
रघुविर सद्गुरु भेटे गे माय । तेव्हांचि बंधन तुटे गे माय । भवाचा हा भ्रम फिटे गे माय । निरंजनिं मनिं जनिं वनिं ध्यानिं ब्रम्हचि सर्व दाटे गे माय ॥४॥
पद १८
सुखि झालों ती खुण सांगू काई हो । चिन्मय वस्तु कोंदली सर्वाठायीं ॥धृ॥
जिकडे पाहूं तिकडे ब्रम्हसार हो । देहिं पाहतां भेदेलसें आंतर हो । जगद्गुरु व्यापला जगदाकार ॥१॥
सद्गुरुचें अवघें कृपादान हो । कानीं माझे घातलेंसे अंजन हो । नेत्राविण दाविलें गुप्तधन हो ॥२॥
काय होऊं तयासि उतराई । कोतिजन्म घेतलेल्या लवलाही हो । उपकार गुरूचा न फिटे कांहीं हो ॥३॥
रघुनाथपायासि निरंजन हो । वारंवार ओवाळी जीवप्रान हो । कांहीं केल्या न फिटे स्वामीऋण हो ॥४॥
पद १९
सति म्हणे सखयांनो घेऊं आला तुम्ही वाण । दुरवर शोधुनि पहावें वाइट आहे निर्वाण ॥धृ॥
वाणावरुतें द्रव्य म्हणुनिया आशेनें येतां । फुकटचि मिळतें म्हणवुनिया त्या लोभानें घेतां । बरवें नाहीं नाहीं पुरतें विचारा चित्ता ॥१॥
भ्रताराचे संगें सखये लागतें जाणें । स्तनपानाचें लेंकरूं घरांत द्यावें झोकून । असतां पदरीं आयुष्य त्वरितचि लागतसे मरणें ॥२॥
चांगलें गह्र असतां अग्नी द्यावा लावून । पुरता विचार करुनि माझें वानासि घेणें । तैंसा हा परमार्थ असे हें वदे निरंजन ॥३॥
पद २०
यारे सखयांनों हरीगुण गाऊं । धरुनि सत्संगा पैलतिरा जाऊं जाऊं ॥धृ॥
हरिभजनाविण काळ व्यर्थ गेला । वृथा संसारीम काय भुलुनि ठेला । पीयूष टाकुनिया कांजी काय प्याला । सर्व समजुनिया पीसे काय झालां झालां ॥१॥
पैल भवसिंधू । पूर आला भारी । यमदंडाचा मेघ शिळाधारी । मृत्युविजाचा कडकडाट भारी । त्यानें दंडियल्या बहु नर नारी नारी ॥२॥
गुरुचरणाची थडि आली नौका । वरि बैसुनिया जाऊं परलोका ॥ निरंजनि रघुनाथासखा तयाप्रसादें मारूं काळ बोका बोका ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2016
TOP