मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|निरंजन स्वामीकृत मराठी पदें.|
पदे २०१ ते २०५

मराठी पदें - पदे २०१ ते २०५

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


पद २०१
येई येई श्रीहरि बंधुराया । विनविती द्रौपदि पांडव जाया हो ॥धृ०॥
दीनबंधु ऐसें नाम तुझें । धाउनिया करिसि भक्तकाज ॥
बहूवेळा रक्षिली माझी लाज । म्हणुनिया चिंतिजे देवा तुजहो ॥१॥
निशि गेली पाहुनि दोन प्रहर । घरा आले दुर्वास मुनिवर ॥
होउनिया बोलती क्षुधातुर । ह्मणती आह्मा भोजना दे सत्वर ॥२॥
तुजवरि ठेवुनि विश्वास । स्नानालागिं धाडिलें सर्वत्रास ॥
घरीं नाही अन्नाचा एक लेश । ह्मणोनिया मांडिला तुझा ध्यास हो ॥३॥
राहूनिया तुळशीवृंदावनीं । हाका मारी पांचाळी दीनवाणी ॥
निरंजन विलासी चक्रपाणी । संकष्टासी पावला तत्क्षणीं हो ॥४॥

पद २०२
बहूत साजिरी डोळां देखिली पंढरी ।
लक्ष्मीसहित जेथें नांदतो श्रीहरी ॥धृ०॥
नामाचा गजर अखंडित महाद्वारीं ॥
करिती कीर्तन संत उभे गरुडपारी ॥१॥
तुळशीमाळा - बुका दोन्हीं घेउनीया हातीं ।
उल्हासुनि मुनिजन दर्शनासि येती ॥२॥
नाना वाद्यध्वनि आणि पताकांचे भार ।
दुमदुमित सदा दिसे सर्वही नगर ॥३॥
निरंजन ह्मणे प्रति दुसरें वैकुंठ ।
फार वर्णूं काय मूर्तिमंत ब्रह्मपीठ ॥४॥

पद २०३
धन्य आजि भाग्य माझें उदयासी आलें ।
सद्गुरुचे पाय निजनयनीं पाहिले ॥धृ०॥
सद्गुरुचे पदीं ऐसें अनंत ब्रह्मांड ।
होती जाती परि गुरुपाउलें अखंड ॥१॥
सर्वांचें तें सार नाहीं जयालागि पार ।
तयाच्या दर्शनें जाला नाहीं संसार ॥२॥
पाहतांचि क्षणीं नाहीं आपणा ठीकाण ।
सर्वहि दाटला चिदानंद पूर्णघन ॥३॥
निरंजन म्हणे मुख्य सद्गुरुचे पाय ॥
पाहिल्या वांचुनि नाहिं आणि तरणोपाय ॥४॥

पद २०४
सत्वरि धाउनि आतां येई दयावंता ।
मजवरि कृपा करी लक्ष्मीच्या कांता ॥धृ०॥
गोविंदा गोपाळा कृष्णा माधवा अनंता ।
तुजविण मनीं माझ्या वाटतसे चिंता ॥१॥
संसार - सागरिं बहु जहालों मी श्रमी ।
तुझिया चरणीं देवा राहिन विश्रामीं ॥२॥
अनाथा लागुन आह्मां कोण तुजवीण ।
निर्वाणी रक्षिता आहे पाहे विचारून ॥३॥
निरंजन ह्मणे शेषशाई नारायणा ।
अनाथा जीवाची स्वामी येऊं दे करुणा ॥४॥

पद २०५
धन्य ते पंढरी धन्य पंढरीचे जन ।
हरि नामाचा घोष्ग नित्य होतसे भजन ॥धृ॥
तीर्थाचें माहेर ते हे वाहे चंद्रभागा ।
जीच्या दर्शनमात्रें मिळे वैकुंठीं जागा ॥१॥
आषाढी कार्तिकी यात्रा मिळतसे फार ।
येताती सज्जनजन विश्वहि अपार ॥२॥
लक्ष्मी रधिका भामा आणि रखुमाई ।
इतुक्यासहित नांदे स्वामी शेषशाई ॥३॥
निरंजन ह्मणे धन्य पंढरी महिमा ।
पाहती जाउनि त्याचे सुकृताची सीमा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP