मराठी पदें - पदे ६ ते १०
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
पद ६
ब्रम्ह झालों आम्ही ब्रम्ह झालों । झालों ह्मणों तरि झालों ना गेलों ॥धृ॥
आपुला विसर पाडियला । ठाईंठाईंचिये ठाईम विसरलों ॥१॥
ब्रम्हासि पाहतां ब्रह्मरोप झालों । पाह्यासि न ठेलों कोण मी कैसा ॥२॥
सूक्ष्म पाहतां अणुरेणु आंत । ब्रम्हांडॆं पोटांत साठविसा ॥३॥
निरंजन म्हणे निरंजन आम्ही । रघुनाथस्वामीकृपें झालों ॥४॥
पद ७
नाहीं नाहीं नाहीं अवघें नाहीं नाहीं । नाहीं ह्मणों तरि आहे सर्वाठायीं जैसेंचि तैंसें ॥धृ॥
मी नाहीं तूं नाहीं विश्व सारें नाहीं । आहे सर्वाठायीं कोरेंचें कोरें ॥१॥
वेदशास्त्र सारे बोलताति नाहीं । नाहीं ह्मणतां तेंहि झालें नाहीं ॥२॥
पिंड ब्रह्मांडदि कांहीं झालें नाहीं । जीवशिव पाहीं मिथ्या सारे ॥३॥
निरंजन ब्रह्म ह्मणणें हेंहि नाहीं । आतां उगे राहीं बोलूं नये ॥४॥
पद ८
गेली गेली रे नरतनु हे वाया ॥धृ॥
धाकुट मनिं मनिं इष्ट असेल तें मिष्ट भरुनि तनु धष्टपुष्ट बहु केली ॥१॥
तरुणपणीं मदमस्त विषय बहु स्वस्थ करुनि घरिं सुस्त निजुनि निजवस्तु हारवीली ॥२॥
वृद्धपणीं ममपुत्र मित्रघर कलत्र ह्मणवुनि परतंत्रता अंतरीली ॥३॥
विषयभोग बहु रोग जडुनि तनु वियोगसमयीं रघुविर - पदीं मति नाहीं जडली ॥४॥
पद ( दक्षिनामूर्तीचें ) ९
सद्भावें नमितों मी सद्गुरु श्री दक्षिनमूर्ती । निराकार निजस्वरुप निरंतर चिदानंद - स्फूर्ती ॥धृ॥
दर्पणांत प्रतिबिंब जयापरि द्वैतभाव भासे ।
स्वप्नांतरिं भ्रम नाना जागृत झाल्यावरि नासे ।
तयारीति निज बोध झालिया आत्मा एक असे ॥१॥
पूर्वीं विश्व जयापरि अंकुर निज बीजा आंत ।
माया - कल्पित जग हें अवघें झालें विकसीत ।
इंद्रजाळ कर्त्यापरि शिव हा साधन - विरहीत ॥२॥
सत्य स्फुरणें मिथ्या जग हें सत्यत्वें दावी ।
वेदाचें वचनानें जिव निज ब्रह्मही मिळवी ।
अनुभव देउनि आश्रित जन हे भवसागर तरवी ॥३॥
छिद्र घटांतरि दीप असे परि बाहेरीं तेज दिसे ।
त्याजपरि विषयाला जाणत निजबोधा वमसे ।
रज्जूसर्पपरि जग नसतांहि ज्यायोगें भासे ॥४॥
देहाला मी ह्मणवुनि अवघें भुललें विश्व कसें ।
स्त्री बालांध जडापरि यातें कांहीं ज्ञान नसे ।
मायामोह - निवारणकर्ता सद्भक्तासी दिसे ॥५॥
माया अवर्णचि स्वरुपातें आच्छादुनि ठेलें ।
जैसे चंद्रदिवाकर अवघे राहूनें गिळिले ।
मूढ अवस्था सरल्या हो तो सुखिया जो बोले ॥६॥
जागृतस्वप्नसुषुप्त्यावस्था बाल्यादिक त्रयी ।
अहं ऐसा अनुभव स्फुरतो हा ज्याचे ठायीं ।
तो आत्मा निजहृदयीं ध्याती योगीजन पाही ॥७॥
नानापरिचे जग हें कारण कर्तृत्वें भासे ।
स्वामीसेवक शिष्यगुरू आनि पितापुत्र दिसे ।
त्रै अवस्था ज्यास्तव त्याला भुलले जग कैसें ॥८॥
आकाशादिक पंचभूतें आणि चंद्र अर्क पाहीं ।
चराचरादि निर्मित झालें अष्टमूर्ति ठायीं ।
जे जे उद्भव झाले ते ते या वांचुनि नाहीं ॥९॥
सर्वात्मक शिववर्णन केलें शंकरस्वामीनें ।
त्याचे श्रवणें मननें अक्षइं शिवपद पावणें ।
अणिमदिक सिद्धीतें लाहुनि सर्वसुखी होणें ॥१०॥
श्रीदक्षिणमूर्तींचें अष्टक निरंजन वदला ।
घेउनिया श्रीरघुविरसद्गुरु - स्वामी - आज्ञेला ।
कर्ता सद्गुरु ऐसा निश्चय ठेवुनिया वहिला ॥११॥
पद १०
मानवा शरण हरीला जाईं रे ।धृ।
या वितभरि पोटासाठीं किति करशिल रे खटपटी ।
पूर्वी लिहिलेसें ललाटी रे ॥१॥
काय भुललासी संसारा । पुत्रधनसंपति आणि दारा ।
अवघा मिथ्या मायेचा पसारा ॥२॥
नाहीं स्थिरता या देहाला । भ्रम कैचा पडला तुला ।
आतां येईल यमाचा घाला रे ॥३॥
पाहें निरंजनि रघुवीरा । तोडी भवबंधन वागुरा ।
लावी काळरिपुवरी तुरा रे ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2016
TOP