मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य|
अध्याय ५० वा

श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ५० वा

श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य


श्रीगुरुदत्तात्रेयाय नम:
म्हणे अवधोत यदूसी । सत्रावा गुरु केला पिंगलेसी ।
म्हणोनी झालों निराशी । असे ऐशी शिक्षा हे ॥१॥
ज्या लग्ने न करिती । प्रतिवारी पती वरिती ।
तयां वारस्त्रिया म्हणती । काळजें तीं लांडग्यांचीं ॥२॥
जयां नसे सोंवळेपणा । नेणती सतीच्या आचरणा ।
त्यांच्या मद्ययुक्त चुंबना । घेती त्यांना अधोगती ॥३॥
असो एव्हढाचि हा बोल । एक विदेहनगर विमळ ।
जेथें वसती पुण्यशील । तेथें पिंगळा वेश्या होती ॥४॥
जीची सुवर्णापरी दीप्ती । नवयौवन चंद्रकांती ।
जिला पाह्तां वस्त्रें गळती । नरांची मती भ्रष्ट होई ॥५॥
थट्टा परिहास कौटिल्य । ती जाणे चटक कापट्य ।
गीत वादित्र नाट्य । वारस्त्री ती जाणतसे ॥६॥
सर्वथा जेथें दुर्गण । कापट्याची पूर्ण खाण ।
असी ती वेश्या जाण । आशा दारुण जिला असे ॥७॥
धनराशी मिळावी म्हणून । जो ये त्यापशीं मागे धन ।
तो जें दे त्याहून । अधीक इच्छून फिरवी तया ॥८॥
हा तियेचा ल्हाव जाणून । कामी पुरुष तिचें सदन ।
मग देती सोडून । तरी ती नटून राहे द्वारीं ॥९॥
वेश्या असी बसे दारांत । पुन: जाई घरांत ।
दोल्याप्रमाणें फिरत । निद्रा न ये तियेसी ॥१०॥
अकस्मात् दैवयोगेंकरून । वैराग्य तिला होऊन ।
म्हणे हाय मी हीन । दुराचरण इच्छीं हें ॥११॥
महान्विचार माझ्या चित्ता । झाला द्रव्यतृष्णा करितां ।
विवेक तृप्ती ये आतां । मूर्खता जातां ती ॥१२॥
जो विश्वाधार अंतर्यामी रमण । तो रती अर्थ देऊन ।
रमवी तया सोडून । भयशोकमोहदा कां इच्छी ॥१३॥
मी अनित्य मर्त्यां इच्छीं मला । धिक्कार असो ये वेळा ।
हा देह विकून विमळा । आत्मारामा भजेन ॥१४॥
मी त्या देवाशीं रमेन । असा निश्चय करून ।
सांकेतवृत्ती सोडून । निराश होऊन सुखें निजे ॥१५॥
आशा वसे जयापाशीं । सुखें निद्रा नये त्यासी ।
हें शिक्षण घेतलें वेश्येपाशीं । आतां अठराव्या गुरूचें ऐक ॥१६॥
जंववरी निराश न झाला । तंववरी सुख नये त्याला ।
तसाही होतां परिग्रहाला । सोडी त्या स्वस्थता ये ॥१७॥
म्यां हे युक्ती घेतली कुररापाशीं । एकदां कुरर मांसासी ।
विभागूनी खाती त्या वेळेसी । मांससंग्रह करी एक ॥१८॥
जें ज्यांना वाटलें । तें त्यांणीं भक्षिलें ।
ज्यानें शिल्लक राखिलें । त्याला टोंचूं लागले सर्व तो ॥१९॥
सर्वांनि आम्हीं संपविलें । त्वां विशेष घेऊन हें ठेविलें ।
असें ऐकतां तें त्याणें सोडिलें । त्यांहीं सोडिलें तया मग ॥२०॥
म्यां हें विलोकन करून । नृपा घेतलें हें शिक्षण ।
परिग्रह दु:खाला कारण । टिटावूपासून कळलें ॥२१॥
जो विद्वान् परिग्रहरहित । मिळे तें खाई अग्निवत् ।
तो जरी धनरहित । तरी तो सतत सुखी होई ॥२२॥
मांसयुक्त होतां जंव कुरर । त्याला तंव मिळाला मारा ।
मांस टाकून होता दूर । दु:खही त्याबरोबर दुरावलें ॥२३॥
जरी योगी परिग्रह करी । त्याचें चित्त जाई तयावरी ।
त्याचें चित्त नये अंतरी । म्हणूनी परिग्रह नसावा ॥२४॥
स्वसाध्य साधावें म्हणून । कुरराचें घेतलें शिक्षण ।
मानापमानचिंता सोडून । द्यावया बाळ गुरु झाला ॥२५॥
जो भस्म किंवा चिखल । नेणे सुगंधी परिमळ ।
सत्कार तिरस्कार सकळ । नेणे बाळ निजानंदें ॥२६॥
हा रज्जु किंवा सर्प । नेणे तो न करी अनुताप ।
जो नेणे पुण्य पाप । न घे लेप आपणावरी ॥२७॥
हो बहु सवंगायी । अथवा होवो महागायी ।
त्याची चिंता न घेई । न होई जो कदापि खिन्न ॥२८॥
ह्या घरांत काय न्यून । कसें करावें संपादन ।
आतां होईल कीं अपमान । हेंही घरीं राहून न चिंती ॥२९॥
मरण आतां हें येईल । किंवा आपत्ती होईल ।
किंवा अपकीर्ती होईल । हेंही बाल न चिंती ॥३०॥
धन मेळवावें कसें । तें रक्षावें कसें ।
परिवारा पाळावें कसें । बाळ असें कधींही न चिंती ॥३१॥
जो मनोरथ न करी । आपण आपुल्यासें क्रीडा करी ।
आपणावरी प्रीती करी । यापरी बाळ सुखी ॥३२॥
ज्याची भूक तहान भागतां । खेळे असो का एकुलता ।
ह्या बाळा गुरू करितां । अंतर्निष्ठता । सहज ये ॥३३॥
हा मायिक संसार । कोण कोणाचा परिवार ।
कोणाचें कोठें घर । चिंतेचा बाजार हा सर्वही ॥३४॥
तें मिष्टान्न कसें मिळेल । ह्या लोकांशीं स्नेह कसा जुळेल ।
दु:ख कसें टळेल । सवंगाई होईल कधीं आतां ॥३५॥
ह्या चिंतेनें निरंतर । व्याप्त असती जे नर ।
न व्हावा तिरस्कार । व्हावा सत्कार म्हणती जे ॥३६॥
त्यांची न होई अंतर्वृत्ती । जरी ते श्रवन करिती ।
तरी आंत नये वृत्ती । म्हणोनी बाळरीती घेतों ॥३७॥
तो कामचार तें वय । मननीं उपयोग काय ।
म्हणूनी रागद्वेषादिराहित्य । घेतलें एकुणिसाव्या गुरूपासून ॥३८॥
असा उक्त बालवत । व्हावया आनंदभरित ।
अभ्यास कीजे पाहूनी एकांत । हें कुमारीकंकणशिक्षित सांगेन ॥३९॥
विविक्तिं हित होईल । हें ह्याच शिक्षणें कळेल ।
एक कन्या सुशील । विवाहयोग्य जाहली होती ॥४०॥
आले विद्वान ब्राह्मण । तिला वरावी म्हणूनी ।
तत्पूर्वीं निघून । तिचें स्वजन गांवीं गेले ॥४१॥
घरीं धेनू होती म्हणून । गेले घरीं तिला ठेवून ।
तिणें त्यांला देखून । आसन देऊन सत्कार केला ॥४२॥
त्यांच्या मध्यान्हाकरितां । तिणें साळी कांडतां ।
कांकणें खळखळतां । तिच्या चित्ता वाईट वाटे ॥४३॥
हें ये पूर्वजांस कीं दूषण । म्हणून दोन दोन कंकणें राखून ।
कांडी तींही आपटून । खणखण होती ॥४४॥
संपूर्ण काढितां ये दोष । म्हणून एक एक राखून शेष ।
त्यांचा न झाला घोष । तिला संतोष झाला मग ॥४५॥
तेंच मज मिळालें शिक्षण । बहुत जमतां होई भांडण ।
दोहोंचेंही होई भाषण । एक असतां ध्यान घडे ॥४६॥
प्रमाद: खलु संगेन । असा निश्चय करून ।
राहिलों एकला पडून । तेणें समाधान विसावा ये ॥४७॥
जरी पूर्णानंदभरित । राहावें म्हणेल सतत ।
तरी त्याणें एक नियमित । स्थान कदापी न धरावें ॥४८॥
संपूर्ण लोक जाणती । असी करितां वसती ।
लोक उपद्रव देती । सर्पापासूनी ती शिक्षा घेईं ॥४९॥
सर्प मिळोनी न फिरती । शब्द न करितां सावधान जाती ।
गुहेमध्यें वास करिती । नित्य न राहती एके ठाई ॥५०॥
विशदपणें न फिरे सर्प । निर्धोकानें न घे झोंप ।
निष्कारण आपोआप । न करी कोप कोणावरी ॥५१॥
हे सम्पूर्ण गुण घ्यावे । सर्पापरी वागावें ।
सिद्धस्थान लक्षावें । आइत्या घरांत नागोबा जसा ॥५२॥
कां पर्णांचेंही घर । करी त्या दु:ख ये घोर ।
हें नश्वर शरीर । नकळे पूर्वींच पडेल कीं ॥५३॥
सरित्पूर जसा पळे । तसें आयुष्यही पळे ।
तें माघारां न वळे । नकळे केव्हां संपेल तें ॥५४॥
संपूर्ण आयुष्य जयासी । कर्म एकत्र न ठेवी तयासी ।
म्हणोन न बांधावें घरासी । सर्पापाशीं शिकलों हें ॥५५॥
ध्यानीं मुख्य आसन श्वासजय । होतां न कळे बाह्य ।
शरकार गुरु दे हें ऐकाग्र्य । बाविसावा हा गुरू ॥५६॥
बाणदत्तचित्त शरकार । पुढ्यांतून राजा सपरिवार ।
चाले सवें गजर । होई तरी नेणें तो ॥५७॥
अवाच्य बोले कोणी । हो कां जवळ मोठा ध्वनी ।
राहे जो एकाग्र होवूनी । त्याचे मनीं हें न भरे ॥५८॥
योगी तेवीं आसनश्वास जिंकून । वैराग्याभासें लक्ष्य धरून ।
राहे तरी द्वैतभान । सोडून होई समाधिस्थ ॥५९॥
जरी पूर्वीं आसन श्वसजय । न करी तरी ये अंतराय ।
होतांच श्वासजय । मनोजय होतसे ॥६०॥
संपूर्णपणें अंतरीं । चित्त न ठरे जरी ।
तरी सगुण ईश्वररूप अंतरीं । धरितां चित्त रमेल ॥६१॥
रहस्य हेंची योगाचें । अभ्यासें बंधन होय मनाचें ।
मग लक्ष्यावरी त्याचें । स्थैर्य होतसे ॥६२॥
तें अपूर्व देखावा दिसतां । विषया न स्मरतां ।
झोंपेंतही न जातां । स्वरूपींच लीन होई ॥६३॥
संपूर्णपणें सत्वगुण । वाढतां रजस्तमगुण ।
लीन होई मन । काष्ठ जळतां अग्नी जसा ॥६४॥
असें मानस लीन होतां । नेणवे बाह्याभ्यंतरता ।
शरकार गुरू करितां । हें तत्वता कळलें ॥६५॥
जो सदा ज्याचें करी ध्यान । तो जाई तदाकार होऊन ।
हें पेशस्कारापासून । म्यां शिक्षण घेतलें ॥६६॥
जेवीं यत्नें कीटा आणून । भिंतीवरी घरांत ठेवून ।
पेशस्कार पुन: पुन: येवून । कूस मारी त्यावरी ॥६७॥
तेव्हां पूर्व रूप विसरून । भयानें पेशस्कार चिंतून ।
कीटरूप टाकून । पेशस्कार होऊन राहे कीट ॥६८॥
जो वर्ण आश्रम जाती । सोडूनी सर्वदा चित्तीं ।
चिंती ईश्वराची मूर्ती । त्याला गती तीच ये ॥६९॥
स्वयमेव ब्रह्म असून । ब्रह्माचेंच करितां चिंतन ।
जीव जाई ब्रह्म होऊन । हें आश्चर्य कोण मानील ॥७०॥
ह्या जीवा कीटापरी । स्नेहें द्वेषें भयें जरी ।
ईश्वराचें ध्यान घडे तरी । ईश्वरापरी होईल तो ॥७१॥
जो जीव स्नेहें करून । करी ईश्वराचें चिंतन ।
तो ऐहिक सुख भोगून । घे निर्वाण परत्र ॥७२॥
ऐक शिष्या जो ईश्वरा । भयें द्वेषें भजे त्याही नरा ।
परत्र मोक्ष मिळे बरा । हा तेविसाव्या गुरूचा उपदेश ॥७३॥
म्यां शिष्य होऊन कोळियाचा । उपदेश घेतला अद्वैताचा ।
हा चोविसाव्या गुरूचा । ऐक साचा उपदेश ॥७४॥
भूप तेहें नोहे चित्र । कोळी नाभीपासून काढी सूत्र ।
त्याचें घर करोनी अहोरात्र । करी विचित्र क्रीडा तेथें ॥७५॥
मग अन्तीं तें सूत्र खावून । राही एकला होवून ।
असा ईश्वर जाण । सृष्टिसंरक्षण करीतसे ॥७६॥
पूर्वीं तो ईश्वर एक असून । कांहीं सामग्री नसून ।
ईक्षणलेशेंकरून । स्वयें उत्पन्न करी लोकां ॥७७॥
तोचि देव विश्वाधार । येथें करी विहार ।
मग त्याचा करी संहार । काळशक्तीनें आपुल्या ठाईं ॥७८॥
तेधवा सत्वरजस्तम:शक्ती । प्रधान पुरुषासह लीन होती ।
उपाधी नष्ट होती । मग होतो एकला ॥७९॥
पूर्वीं अखिल ब्रह्मादि जीव । त्याचे ठाईं जे घेती ठाव ।
त्यांचा पुन: करावा उद्भव । असें तो देव इच्छी मग ॥८०॥
जे जिवंतपणीं नर मुक्त न होती । मेल्यावरी कर्म भोगिती ।
ते प्रळयींही न मिळती । ईश्वरस्वरूपीं सर्वंथा ॥८१॥
त्या हेतुभूत वासना त्यांच्या । फळोन्मुख होतां ईश्वराच्या ।
चित्तीं येई आतां त्यांचा । उद्भव करावा असें भूपा ॥८२॥
त्या मनोरथेंकरून । गुणात्मक माया प्रकटून ।
अनुक्रमेंकरून । पुन: उत्पन्न करी तो विश्व ॥८३॥
हा प्रयत्न त्याला न पडे । संकल्पमात्रें सर्व घडे ।
क्रीडा करूनी तो पुन: पुढें । पूर्ववत संहारी ॥८४॥
तेव्हां तो आत्मा आहे एक । दिसतें हें सर्व मायिक ।
सर्वही नामरूपात्मक । असा विवेक केला म्यां ॥८५॥
हा जेवि कोळी एकला । इच्छीना सामग्रीला ।
तसा हा आत्मा मला । गमला अभिन्ननिमित्तोपादान ॥८६॥
तो विष्णु व्यापक । मीच असें एक ।
असा घेतला विवेक । असे चोवीस गुरू करून म्यां ॥८७॥
हें निर्विशेष ब्रह्मज्ञान । न ठसे वैराग्यावांचून ।
त्यासाठीं देहास गुरू करून । घेतलें हें शिक्षण ऐक तूं ॥८८॥
माझाच हा देह म्हणून । व्यर्थ करिती पालन ।
अंतीं ज्याला कोल्हे श्वान । जाती खावून तो कोणाचा ॥८९॥
जो शुक्रशोणितापासून । मातेच्या विटाळांत झाला उत्पन्न ।
त्याचें नित्य धारण । करितां शीण वाटला ॥९०॥
या अमेध्य देहावांचून । वैराग्य कारन आणावें कोठून ।
येथें ज्याचे विटे मन । त्याला कोण बोध करी ॥९१॥
देह पृथिव्यादिभूतांचा गोळा । जो आपुल्यासह परिवाराला ।
रक्षूनी मागे बीजाला । ठेवून मरे वृक्षापरी ॥९२॥
ह्या पृथिवीवरी वृक्षजाती । मागें बीज राखून मरती ।
बीजाचे वृक्ष पुन: होती । तीच रीती देहाची ॥९३॥
नाना व्यासंग करून । त्रिविध कर्म करी उत्पन्न ।
तेंच पुढें देह करी उत्पन्न । असें ज्ञान होई तंव ॥९४॥
मनस्सङ्कल्प उठती । इंद्रियें इकडे तिकडे ओढती ।
जेवी एका पुरुषा सवतीं । ये ती गती देहास ॥९५॥
विक्षिप्तसा होई व्याकुळ । सर्व तापांचें हें मूळ ।
असा हा देह अमंगळ । तरी दुर्मिळ असे हा ॥९६॥
विविधाकार शरीरें । निर्मिलीं जरी ईश्वरें ।
तरी शेवटीं ही मनुष्याशरीरें । पाहतां नुरे ठाव हर्षा ॥९७॥
याच मनुष्यशरीरें करून । मिळे असें हें मोक्षसाधन ।
तें म्यं घेतलें साधून । म्हणून नि:शंक पडे येथें ॥९८॥
युक्तिभि: सततं भूप पूर्वोक्ताभिर्यया धिया ।
स्वात्मरूपं विविच्येह ब्रह्मभूतोsस्म्यसंशय: ॥९९॥
असें इतुकें हें ज्ञान । ऐकतां यदू झाला सावधान ।
हाच आहे अत्रिनंदन । असें जाणून वंदन करी ॥१००॥
म्हणे दंभदर्पादि टाकून । म्यां घेतलें हें ज्ञान ।
तुम्ही मला केलें पावन । आतां किमपि न इच्छीं मी ॥१०१॥
हेंची विश्वरूप तुमचें । मी अर्चन करीन याचें ।
आतां येथें द्वैत कैचें । वाक्य तुमचें ऐकतां ॥१०२॥
विष्णु विधि हर । असें म्हणोनी करी नमस्कार ।
आज्ञा घेवून भूमीवर । ययातीकुमार स्वच्छंद फिरे ॥१०३॥
श्रीदत्तमाहात्म्ये पंचाशत्तमोध्याय: ॥५०॥                                                                                                                                                                                                                                          ॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : May 04, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP