श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय २९ वा
श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य
श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥
गुरु म्हणे शिष्यासी । असी माता सुतासी ।
बोध करी तों पितयासी । दासी सांगती पुत्र झाला ॥१॥
तें ऐकोन राव । करी पुत्रजन्मोत्सव ।
मिळवोनी द्विजपुंगव । ते म्हणती भाव बरे असती ॥२॥
राजा करी जातकर्म । बरवा करी दानधर्म ।
तया विक्रांतवर्म । असें नाम ठेवी राव ॥३॥
नाम ठेवितां असें । सर्वां आनंद होतसे ।
मदालसा हांसतसे । तसेंनाम परिसूनी ॥४॥
राजा झाला खिन्न मनीं । म्हणे पूर्वीं इजला न पुसोनी ।
नाम ठेविलें म्हणूने । हास्य करी वाटतें ॥५॥
जरी विचारावें कारण । हसतील हे जन ।
असें मनीं आणून । राजा मौन धरीतसे ॥६॥
पुत्र जसजसा वाढतसे । त्याला बोध तसतसा ठसे ।
पुत्र जरी ज्ञानी असे । तरी दिसे मूढसा ॥७॥
अंतरीं बोध असे । परि जडमूढसा भासे ।
पिता चिंता करीतसे । म्हणे असें कसें झालें ॥८॥
माझी प्रिया पतिव्रता । सुशीला धमरता ।
मीही धार्मिक असतां । सुता मूढता केवीं ये ॥९॥
असा पिता करी शोक । परी हा ज्ञानी लेक ।
असा नोहे विवेक । म्हणूनी दु:ख करीतसे ॥१०॥
पुत्र झाला आत्मनिष्ठ । साक्षात् ब्रह्मविद्वरिष्ठ ।
त्याला प्रवृत्तिनिष्ठ । कोण कसा करील ॥११॥
आजन्म बोध करूनी । मातेनें पुत्र केला ज्ञानी ।
दे प्रवृत्ति सोडूनी । हें आश्चर्य मनीं न वाटे ॥१२॥
कृपावलोकनेंकरून । साधु वारिती अज्ञान ।
मग सहवास करून । देतां ज्ञान काय चित्र ॥१३॥
पुन: दैवेंकरून । मदालसा गर्भिणी होऊन ।
प्रसवली पुत्ररत्न । राजाचें मन हृष्ट झालें ॥१४॥
तया नाम सुबाहु असें । पिता प्रेमें ठेवितसे ।
नाम ऐकतां तें तसें । हंसतसे मदालसा ॥१५॥
मनीं खिन्न होवूनी । राजा गेला उठोनी ।
तया पुत्रा उचलुनी । माता कानीं सांगतसे ॥१६॥
जें हाडांनीं उभारिलें । ठाईं ठाईं नाड्यांनीं बांधिलें ।
मांसानें जें लेपिलें । जें माखिलें रत्कानें ॥१७॥
कावळे कुत्रे येऊनी । मांस नेतील पळवोनी ।
म्हणूनी त्वचा वरी घालूनी । ईश्वरें झांकून ठेविलें जें ॥१८॥
ज्याचे आंत मळमूत्र । तें कसें होई पवित्र ।
तरी सर्वथा अपवित्र । न धरी मीपण तयाचा ॥१९॥
व्यर्थ घेऊं नको मोह । तूं न होसी देह ।
तुझा नोहे हा देह । फसूं नको सहवासें तूं ॥२०॥
देहेंद्रिय मन: प्राण । बुद्धि अहंकार हे जाण ।
ह्यांला आत्मा म्हणेल कोण । हें विचारून पाहे तूं ॥२१॥
जो ज्याला पाहतो । तो त्याहूनि वेगळा असतो ।
तेव्हां ह्यांचा द्रष्टा जो तूं तो । अससी आत्मा परंज्योती ॥२२॥
तूं जन्मा न आलासी । मग तूं कसा मरसी ।
तूं विकारा न घेसी । मग कसी ये वर्णाश्रमता ॥२३॥
तुला नसती माता पिता । तूं आनंदरूप असतां ।
कासया पाहिजे कांता । हें आतां निर्धारी ॥२४॥
तूं सर्वदेवपूज्य । तुला सुख असे प्राज्य ।
कासया पाहिजे राज्य । सर्वां ईज्य अससी तूं ॥२५॥
तूं अससी एक । आत्मा हा तुझा लोक ।
कासया पाहिजे लेंक । काय सुख देतील ते ॥२६॥
तूं हा घेतां सुविचार । नको तुला आचार ।
तूं अससी परात्पर । हें वारंवार चिंती तूं ॥२७॥
असा उल्लाप करूनी । पुत्रा केलें ज्ञानी ।
तोही जडसा होऊनी । राहे पडून भूमीवरी ॥२८॥
तया पुत्रा पाहूनी । जड झाला असे जाणुनी ।
राजा खिन्न होउनी । झुरे मनीं अहोरात्र ॥२९॥
मदालसा गर्भिणी झाली । पुन: पुत्रा प्रसवली ।
भूपा ती मात कळली । आला तेथें सत्वर ॥३०॥
म्हणे ज्योतिषियांसी । आतां तरी या समयासी ।
ग्रह असती कसे यासी । होईल राज्यासी योग्य कीं ॥३१॥
ज्योतिषी म्हणती हा चतुर । होईल बुद्धिमत्तर ।
याच्या विद्येचा पार । न लावी नर सामान्य ॥३२॥
याच्या आयुष्या नसे मिती । परी उच्चग्रह नसती ।
मग म्हणे भूपती । पुरे येवढा योग तरी ॥३३॥
भूपकुळीं उपजतां । बुद्धिमात्ता आणि आयुष्यता ।
हीं उत्तम असतां । साम्राज्यता सहज ये ॥३४॥
भूप असें म्हणून । जातकर्म करून ।
तया शत्रुमर्दन । हें अभिधान योजिलें ॥३५॥
प्रियेसी पुसोन । ठेवावें पुत्रा अभिधान ।
असा निश्चय करून । असतां भुलोन गेला नृप ॥३६॥
तेव्हां मदालसा हंसे । राव मनीं लाजतसे ।
म्हणे दरखेपेस असें । करितसे हास्य ही ॥३७॥
आतां पुढें पुत्र झालिया । मी नाम न ठेवीन तया ।
असा निश्चय करूनियां । नृप स्वकार्या चालिला ॥३८॥
तया पुत्रा घेऊनी । माता सांगे क्षणोक्षणीं ।
त्या बाळाचे कर्णीं । म्हणे कोठूनी आलासी ॥३९॥
तूं कोणाचा कोण । कां करिसी रोदन ।
कोणीं तुला घातलें मोहन । करी विवेचन बा आतां ॥४०॥
जरी पूर्वीं तूं नव्हतासी । आतांचि नवीन झालासी ।
तरी उपजतांच थानासी । चोखूनि पीसी दूध कसें ॥४१॥
हें शिक्षण कोणी । तुला दिलें दे सांगूनी ।
तूंचि पूर्वसंस्कारेंकरूनी । चेष्टा करूनी राहसी ॥४२॥
पूर्वार्जितकर्में हा । देह लाधला न हा ।
ऐहिक कर्में रचिला पहा । तुझ्याहूनि हा वेगळा ॥४३॥
जरी अहंता ममता धरिसी । त्रिविध कर्में करिसी ।
तरी पुन: फेरी घेसी । चौर्यायशी लक्षवार ॥४४॥
जो साक्षी निर्विकार । तो मी आत्मा परात्पर ।
असे अज अविकार । असा निर्धार नित्य करी ॥४५॥
सर्व भूतें माझे ठायीं । मी सर्व भूतांचे ठायीं ।
असें ध्यानीं नित्य घेई । द्वैता देई सोडूनी ॥४६॥
स्वस्वरूपा भुलोन । कामक्रोधलोभां आदरून ।
विषयासक्त होऊन । राहे तो जाण आत्महा ॥४७॥
काम क्रोध लोभ हे चोर । हेचि नरकाचें द्वार ।
येथें पडतां घोर । पावसी दुर्धर यातना ॥४८॥
विषयमृगतृष्णेपरी । त्यांची वार्ता न करी ।
जे चिंतितां विषापरी । भेदूनी शरीरीं फैलतील ॥४९॥
तूं हेंचि व्रत करी । स्वरूपीं दृष्टी धरी ।
व्रतभंग करिसी तरी । यातना बरी भोगसील ॥५०॥
पाहें या लोकीं एक । नारी नांवाचा नरक ।
त्याला पाहतां ये दु:ख । तिकडे पराड्मुख होत जा ॥५१॥
काष्ठाची असे बाहुली । किंवा चित्रीं लिहिली ।
तिलाही पाहतां ये भुली । म्हणूनी न पाहिली पाहिजे ॥५२॥
काष्ठाची बाहुली पाहतां । गजालाही ये बद्धता ।
मग मांसमयी पाहतां । अध:पाता जाशील ॥५३॥
लाल शुभ पिंवळी माती । तिला तांबें रुपें सोनें म्हणती ।
ती जरी धरिशी हातीं । तुला दुर्गती चिकटेल ॥५४॥
तेव्हां तूं धरी तुझें व्रत । मिळालिया खाई अयाचित ।
भूशय्येवरी पडे अनिद्रित । दिगंबर पांघरून ॥५५॥
जी निशा सर्व भूतांची । तीचे ठायीं जागृती ठेवी साची ।
जेथें जागृती भूतांची । तेथें निद्रेची वेळ तुझी ॥५६॥
असा वागे निरंतर । ना तरी ये कष्ट घोर ।
अशी माता वारंवार । करी हुशार पोरास ॥५७॥
तोही ज्ञानी होऊनी । सर्व संग सोडोनी ।
जड मूढ होवूनी । राहे पडूनी भूमीवरी ॥५८॥
मृगतृष्णोपम जग । मानूनि झाला तो नि:संग ।
ज्याच्या ज्ञाना नये भंग । अंतरंग दृष्टी ज्याची ॥५९॥
राज्ञी पुन: गर्भिणी झाली । चवथ्या पुत्रा प्रसवली ।
पांच ग्रह त्या कालीं । उच्च स्थलीं राहिले ॥६०॥
जोशी सांगती राजासी । आतां चिंता नको मानसीं ।
पांच ग्रह हा समयासी । उच्च स्थानासी पातले ॥६१॥
जे आजपावत । तुला जाहले सुत ।
तयां असे उच्चास्थ । ग्रह नव्हते आलेले ॥६२॥
भाग्यशाली हा सुत । होईल राजा विख्यात ।
उद्धरील निश्चित । हें जाण तं ॥६३॥
जाहले शुभ शकुन । राजा हर्ष पावून ।
जातकर्म करून । वांटी धन आनंदें ॥६४॥
राजा म्हणे प्रियेसी । नाम ठेवितां पुत्रासी ।
बोल तूं कां हंससी । पुत्रासी नाम काय द्यावें ॥६५॥
मदालसा तें ऐकून । बोले मंद हंसून ।
म्हणे हेतू सांगेन । चित्त देऊन ऐकावें ॥६६॥
कांती म्हणजे गती । परिच्छिन्ना घडे ती ।
आत्म्याची सर्वत्र व्याप्ती । कोठें गती करील तो ॥६७॥
तेव्हां ह्या आत्मया । गती नाहीं म्हणूनियां ।
विक्रांत नाम वायां । म्हणूनियां हंसे मी ॥६८॥
आत्मा निरंश असे । त्याला आकार नसे ।
मग भुज असती कसे । सुबाहु असे नाम का मग ॥६९॥
मुळीं आत्मा एकला । स्वगत भेद नाहीं त्याला ।
अतएव सुबाहु नामाला । निरर्थता जाणावी ॥७०॥
जरी आत्मा एक असे । तरी सजातीय विजातीय भेद नसे ।
मग शत्रु कोटुनी कसे । येती तया आत्मया ॥७१॥
तुम्ही म्हणाल जरी । कामादि आंतरवैरी ।
असती आत्म्या निर्धारीं । तरी ऐका सांगेन ॥७२॥
कामादि बुद्धिविकार । आत्मा असे बुद्धीपर ।
बुद्धिसाक्षी परात्पर । त्याला शत्रु तर नाहींत ॥७३॥
शत्रु नसतां शत्रुजित । म्हणतां लज्जा वाटत ।
तेव्हां हें शत्रुजित । नाम असत् मला वाटे ॥७४॥
असें प्रियेचें वचन । तो राजा ऐकून ।
क्रुद्ध झाला तें पाहून । प्रिया वचन काय बोले ॥७५॥
जो आसनावरून । न जाइ उठोन ।
तो दिगंतरीं जाऊन । विक्रांताभिधान मिरवील कीं ॥७६॥
बाहुबळें जिंकी जरी । सुबाहु नाम तरी ।
शोभतें याला निर्धारीं । हा तरी तसा नसे ॥७७॥
माशा आंगावरी । बसतां जो न वारी ।
तया शत्रुजित नाम काय करी । हें अंतरीं येतां हंसे ॥७८॥
यांचें भविश्य जाणून । हंसों आलें तत्क्षण ।
असें हें प्रियावचन । राजा ऐकून बोलतसे ॥७९॥
तूं भविष्य जाणशी । म्हणूनी जरी हंससी ।
तरी आतां या सुतासी । अन्वर्थक नाम ठेवी तूं ॥८०॥
मदालसा म्हणे भूपासी । व्यवहारार्थ देह्यासी ।
नामें देणें तरी ह्यासी । अलर्क नाम योजी तूं ॥८१॥
दैवेम पिसळे जो श्वान । अलर्क हें त्याचें अभिधान ।
तत्तुल्य हा विषयीं पिसळेल म्हणून । अलर्काभिधान ह्या द्यावें ॥८२॥
अल भूषणीं आहे हें जाणून । पुढें वैराग्य होऊन ।
हा ज्ञानभूषित होईल म्हणोन । अलर्काभिधान ह्या द्यावें ॥८३॥
असें राजा ऐकून । अलर्क नाम ठेवून ।
नामकरण करून । विप्रां धन वांटितसे ॥८४॥
पाहूनी तीनी लेंक । राजा करी बहु दु:ख ।
उपाय केले अनेक । परी लेंक न सुधारले ॥८५॥
म्हणे तो पुत्र होती वेडे । कसें कर्म हें कुडें ।
आतां पुढें वंश खंडे । असा रडे अज्ञानें ॥८६॥
कुळीं ब्रह्मनिष्ठ लें । दैवयोगें होतां एक ।
सर्वां देतो ब्रह्मलोक । हें व्यावहारिक लोक नेणती ॥८७॥
ओळखावया साधुपणा । स्वयें घ्यावा साधुबाणा ।
साधूंच्या ज्या गुह्य खुणा । त्या भोंदू जाणती कीं ॥८८॥
नेणोनी राजा दु:खी होतसे । एकदां पाहतसे ।
विक्रांत विष्ठेंत लोळतसे । म्हणे कसें दैव याचें ॥८९॥
राजकुळीं उपजून । राहावें भोग भोगून ।
तरी सफळ जीवन । नातरी जनन व्यर्थ तें ॥९०॥
असें पित्याचें वचन । ऐकतां हंसे नंदन ।
राजा तें पाहून । म्हणे जाणून हंसतो हा ॥९१॥
मग तया उचलून । म्हणे वेडा होऊन ।
कां रहासी लोळून । जाणून हें कां वेड घ्यावें ॥९२॥
विद्या पढूनी राज्य करी । नारी वरी स्वयंवरीं ।
भोग भोगी नानापरी । यज्ञ करी मोक्षार्थ ॥९३॥
तरी होसी लोकमान्य । तुला म्हणतील धन्य ।
होवोनियां वदान्य । रक्षावे अन्यलोक तुवां ॥९४॥
ऐकून पित्याचें वचन । विक्रांत बोले हंसून ।
म्हणे म्यां केलें अध्ययन । मातेपासूनी सर्वही ॥९५॥
निवृत्तिस्त्रियेसी विवाह केला । स्वात्मराज्यीं अभिषेक झाला ।
आतां कांहीं मला । नावडे हें निश्चित ॥९६॥
करावयाचें तें केलें । मिळायाचें मिळालें ।
तिघे बंधू भले झाले । चौथा चाले याच पंथें ॥९७॥
असें वाक्य तयाचें । भूपाळाला तें न रुचे ।
जेंवी आचार साध्वीचे । नावडती कुलटेला ॥९८॥
मग कोपून बोले राज्ञीला । त्वां हा वंशनाश आरंभिला ।
खोटा उपदेश हा मुलांला । कां केला मूढपणें ॥९९॥
खरा प्रवृत्तिमार्ग हा । देवपितृनरा हा ।
दे उपभोग तसा पहा । दुजा न हा जा क्लेशकर ॥१००॥
राज्य गजाश्व स्त्री धन । भोगशक्ती हे देव दे दान ।
ज्या भाग्यवंता जाण । त्याणें सर्व तें भोगावें ॥१०१॥
अन्यथा तो होई देवद्रोही । ही सामग्री ज्यापासी नाहीं ।
त्या दुर्भाग्याकरितां पाही । निवृत्ती ही निर्मिली ॥१०२॥
जरी निवृत्ती घे नर । त्यास आमुचेंच द्वार ।
मग काम हें घरदार । सोडूनी दूर जावें गे ॥१०३॥
ह्या उपदेशेंकरून । कसें होईल कल्याण ।
धर्म जातां लोपून । अध:पतन होईल ॥१०४॥
जे पितर पितृलोकांत । किंवा तिर्यक्योनींत ।
किंवा झाले भूत प्रेत । क्षुधाभिभूत होतील ॥१०५॥
पापी किंवा पुण्यवंत । ते श्राद्धान्नानें होती तृप्त ।
ही वृत्ती ब्रह्मा देत । ती तुला ज्ञात नसे कीं ॥१०६॥
नर पितर देव । भूतप्रेत कीटादि जीव ।
गृहस्थाच्या योगें जीव । वांचवीती हें निश्चित ॥१०७॥
हा धर्म सनातन । याला स्वयें नारायण ।
सत्य असे प्रमाण । मग कोण दोष देईल ॥१०८॥
पुत्राविणें परलोक । न साधे हा श्रुतिलेख ।
मूडे न ऐकिलासी तरी ऐक । हा एक लेंक तरी तरो ॥१०९॥
भ्रष्ट केलेस तीन लेंक । ते हे पावती दु:ख ।
अजूनी तरी ऐक । हा अलर्क भ्रष्ट न होवो ॥११०॥
इति श्रीदत्तमाहात्म्ये एकोनत्रिशोsध्याय: ॥२९॥
॥ श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : May 02, 2016
TOP