मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य| अध्याय ७ वा श्रीदत्तमाहात्म्य अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ७ वा श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य Tags : dattagurudattavasudevanand saraswatiगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वती अध्याय ७ वा Translation - भाषांतर श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥असा प्रतापें दुर्धर । चौर्यायशीसहस्रवर्षें शूर ।राज्यकरी नृपवर । योगीश्वर प्रसादें ॥१॥धर्मबळें जो सुमती । सप्तद्वीप वसुमती ।पाळी एकला आपुले हातीं । नमूनी राहती मांडलिक जया ॥२॥श्रीदत्ताचें करी दर्शन । नमस्कार करूं येई प्रतिदिन । अधीं कधींही राहून । धर्मचिंतन करीतसे ॥३॥एवं चौर्यायशी सहस्त्र । वर्षें लोटतां नृपवर ।एके दिनीं शय्येवर । होवोनी एकाग्र विचारी ॥४॥म्यां काय केला पुरूषार्थ । हा श्रम केला व्यर्थ ।राज्यानें काय होईल स्वार्थ । पुढें अनर्थ ओढवेल ॥५॥जें जें दृश्य सकळ । तें तें नाशिवंत चपळ ।जें केवळ निश्चळ निर्मळ । तें विपुळ न जाणिलें ॥६॥रायें रंका वर देतां । कोंडा मागे रंक तत्वतां ।तैसे म्यां केलें वर घेतां । दुर्दैवता पुढें ये कीं ॥७॥श्रीदत्त प्रसन्न होऊण । संतोषें देतां वरदान ।म्यां काय घेतलें हें मागोन । केवळ भुलोन मूढपणें ॥८॥देवाचा काय अन्याय । म्यांच माझा केला अपाय ।सर्व सोडून ज्याचे पाय । योगिवर्य इच्छिती ॥९॥त्याचे धरूनी चरण । न चुकविलें जन्ममरण ।राज्य अंधकूप गहन । डोळस असूनी त्यांत पडलों ॥१०॥क्षणभंगुर विलास लक्ष्मीचा । काय भरवसा आयुष्याचा ।काय उपयोग परिवाराचा । अंतकाळाची वेळ येतां ॥११॥कोण कोणाचे पुत्र दार । कोण कोणाचे मित्र किंकर ।कोठें राहील राज्य भांडार । हा परिवार लटिकाच ॥१२॥जो निजकरें शत्रु बांधी । त्याला बांधूनी घेती स्कंधीं ।जो प्रतापें जाळी सुधी । स्मशानामधीं टाकिती तया ॥१३॥जया वंदिती भूपती । तया बांधूनीया स्वहस्तीं ।मृगसा फिरविती युवती । कृमि वितू भस्म अंतीं ज्याचें ॥१४॥त्या देहाचें उपलालन । कराया केलें दुराचरण ।असें माझें मूढपण । ज्याणें शीण मनीं नये ॥१५॥दयाळु परमेश्वर । तया असो नमस्कार ।तेणेंच हा सुविचार । आजी सारभूत दिधला ॥१६॥तो असे सकरुण । तया जावें शरण ।त्याचे धरावे चरण । तयाविण कोण तारी ॥१७॥असा विरक्त होवोन । सह्याद्रीवरी ये तो अर्जुन ।तत्पूर्वींच भगवान् । बसे ध्याननिश्चळसा ॥१८॥शिष्याचे परीक्षार्थ । गुरूला हें उचित ।जेणें शिष्याचें दृढचित्त । होई हित देई जें ॥१९॥कायावाचामनेंकरून । सर्वभावें करी भजन ।तरी देव न सोडी ध्यान । त्याचें मन ओळखी जो ॥२०॥उदकही न पितां । खिन्न होवोनी स्तवितां ।वारंवार नमनही करितां । न दे श्रीदत्त आश्वासन ॥२१॥मग होऊनी खिन्न । राजा करी स्तवन ।सद्गद होऊन । दृष्टी लावून श्रीचरणीं ॥२२॥ ( पद )जय करुणाकरा जगदुद्धारा । अजि कां रुससी परमोदारा ॥ध्रु०॥२३॥तूं मायबापा धरितां कोपा । कोण माझ्या तापा शमवी बापा ॥२४॥बालवाक्यापरी स्तव अवधारी । वारी मम चिंता तूंचि भवाअरी ॥२५॥तुज शरणागत तेचि कृतार्थ । व्यर्थ कीं हें मत वद वेदसंमत ॥२६॥जो मम भक्त मत्पदीं सक्त । दोषवियुक्त तो सुखी मुक्त ॥२७॥नाश न होई मम भक्ताचा । न करी मिथ्या हे तव वाचा ॥२८॥ ( गीत - जोगी )अजि सखया रुससि कांरे । भववैरे श्रीहरे ॥ध्रु०॥२९तव भक्त त्वत्परायण । होवुनि म्यां प्राण हे ।धरियेले रे दयाब्धे निष्टुरता बाण हे ।नाराजी अजि होऊनी । सोडिसि कां कोण हे ॥सोदि बरें बोल बारे काय चुकलों भवतरे ॥३०॥वांचुं कसा जेवि मासा जळ नसतां तळमळे ।मजविषयीं कां न तूंझें मन बापा कळवळे ।धेनु जसी धांवें वत्सालागिं तसा कळकळें ।आजि दयादुग्ध पाजी ना तरि रे मी मरें ॥३१॥( भोला नाथ दिगंबर ) ( पद चाल - इसतन धन० ॥ )मजवरि कां बरि दृष्टि नसे । जरी मी दोषि असे धृ० ॥३२॥माझ्या दोषा नाहीं गणित । अगणित भूकणसे ॥३३॥नाहीं दयाळू लोकीं तुजसम । मजसम दोषि नसे ॥३४॥रोगीच नसतां मग कोण पुसता । असतां वैद्य जसे ॥३५॥दयनीय नसतां दयाळू वार्ता । पुसतां कोण असे ॥३६॥गुरु माय बाप तूं हरी ताप । कोप तव चित्तीं नसे ॥३७॥( ओवी ) । यद्रूपीं जडजगभ्रांती । दिसे स्वप्नोपम असती ।अलातचक्रसी तच्छांती । करिती यती ज्ञानबळें ॥३८॥जगभ्द्रांती शमवून । जयाचे पदीं जावून ।भक्त होती अत्यंत लीन । पुनरावर्तन नसे त्यांचें ॥३९॥असें ज्याचें हें पद । जेथें निरतिशयानंद ।तो तूं त्र्यधीश गोविंद । अससी स्वच्छंद निश्चयें ॥४०॥देवा मी तुझा भक्त । बद्ध झालों निश्चित ।जन्ममरणभयत्रस्त । शोकमोहग्रस्त असें ॥४१॥दया कां नये तव मना । करी प्रसन्न वदना ।न सोसवे भवयातना । हें तव मना न ठावें कीं ॥४२॥आतां स्मरलें मज खास । प्रसूतीवेदना वंध्येस ।न ठावी तेवी तव मनास । भवत्रास कसा कळेल ॥४३॥सर्वज्ञ तूं नित्यमुक्त । जन्ममरणभयातीत ।शोकमोहादिवर्जित । सदोदित पूर्णानंद ॥४४॥जेवी गर्भश्रीमंत । दुष्काळ नेणे संतत ।तेवि तूं शिव अनंत । भववेदना नेणसी ॥४५॥नसो तुला भवानुभव । जें असे साक्षी वैभव ।तेणें पाहें हा जीव । कसा भवव्यथित हें ॥४६॥सूर्यनेत्रें विश्वा पाहसी । तो तूं नेत्र कसे झांकिसी ।अजुनि मला कीं नेणसी । उपेक्षिसी कीं दयाब्धे ॥४७॥वस्त्रीं भरलें जेवि सूत । तेवी जग हें त्वदुदरांत ।तो तूं काय माझा अंत । घेसी अनंत असूनी ॥४८॥तूं सच्चिदानंद नारायण । तूंचि भवभयहरण ।म्यां धरिले चरण । शरणागत होऊनी ॥४९॥कोण जाणे तुझा मनोगत । ब्रह्मादिक नेणती अंत ।मी पामर अत्यंत । तव हृद्गत काय जाणें ॥५०॥आतां होई प्रसन्न । करी अपराधक्षमापन ।उघडोनिया नयन । प्रसादवचन बोल बापा ॥५१॥विषयसुख कुत्सित । त्यासाठीं संसारबिळांत ।घुसतां डसला अकस्मात । काळसर्प मूषका जेवी ॥५२॥भवाटवींत पडलों । तापत्रयवणव्यानें पोळलों ।दीन आर्त मुमूर्षु झालों । दयाघना आलों शरण तुज ॥५३॥हा तुझा अवतार । दे भक्ती ज्ञान वैराग्य वरे ।करी मुमूक्षूंचा उद्धार । हा निर्धार मच्चित्तीं ॥५४॥भोगी संसारसुख । ह्मणसी तरी हें दु:ख ।याहुनी वाटे बरें विख । त्याला पराड्मुख मी झालों ॥५५॥स्त्री पुत्र मित्र द्रव्य । राज्यभोग मायामय ।स्वरूपावरक हें हेय । उद्वेग होय स्मरतांही ॥५६॥घेऊनी विंचवाचें प्रावरण । सर्पाचें उ सें करून ।खदिरांगारीं शयन । सुखें करूनी निजवेल कीं ॥५७॥एकाद्यास घडेल हेंही । भवसुख त्याहूनही ।प्रमादमृत्युमोहीं । घाली जें तापोद्वेगद ॥५८॥त्याहूनि बरा नरकवास । नको वार्ता त्याची आह्मांस ।हा निश्चय केला खास । तुझी कास धरिली म्यां ॥५९॥भवचक्राहूनी इतर । शत्रू वज्र दंडधर ।भूत भौतिक हिंस्त्र । त्यापासूनि दर न वाटे ॥६०॥भवचक्रभंगोपाय । केवळ हे तुझे पाय ।हाचि मनाचा निश्चय । भयाचें भय पाय हे ॥६१॥करितां पायांचा आश्रय । होय आनंदाश्रुसांद्रकाय ।भवचक्राचा होईल लय । यापुढें श्रेय काय तें ॥६२॥जे नर पराड्मुख । त्यां दे हे विषयसुख ।ते असती उन्मुख । विषयसुख भोगावया ॥६३॥मी सरज्ञ विरक्त । मुमुक्षु तुझा भक्त ।तव पदीं आसक्त । करी मुक्त मुकुंदा ॥६४॥नाहीं इहपर भोगेच्छा । कोण पाहे तया तुच्छा ।पादसेवेची धरी वांच्छा । ती पुरवी इच्छा कल्पवृक्ष ॥६५॥धन्य अत्री अनसूया । वंदूं तयांचिया पायां ।ज्याचा न ठावा आम्नाया । आणिलें तया नामरूपा ॥६६॥तो तूं साक्षात्परमेश्वर । निजभक्तांचें माहेर ।मला केवी करिसी दूर । काठीनें नीर दुरावें कीं ॥६७॥नमो भक्ताधिव्याधिनाशा । विश्वाध्यक्षा हृषीकेशा ।वासुदेवा परेशा । मायाधीशा तुज नमो ॥६८॥ऐसी स्तुति करून । मूर्च्छित झाला अर्जुन ।पुन: होवोनी सावधान । करी स्तवन भावार्थें ॥६९॥( भूपाळी ) ॥ उठि उठि मुनिनंदना । भक्त पातले दर्शना ।त्यांची पुरवी तूं कामना । पाही नयन उघडूनी ॥७०॥उघडुनियां करुणादृष्टी । दासा धरीं आपुले पोटीं ।नको येऊं देऊं हिंपुटी । घाली कंठीं मिठी हर्षें ॥७१॥हर्षें तुझे पदीं रंगले । दारागारा विसरले ।निजदेहा न भुलले । विनटले निजभावें ॥७२॥निजभावें येतां शरण । लपविसी कां बां चरण ।जेणें तरती दुष्टाचरण । मग मरणभय कैचें ॥७३॥नको करूं निष्ठुर मन । शीघ्र देईं आश्वासन ।तूं अससी करुणाघन । तापशमन करि शीघ्र ॥७४॥उठी उठी बा सद्गुरुराया । उठी उठी करुणालया ।उठी उठी बा चिन्मया । निज माया आवरी ॥७५॥( ओवी ) ॥ असें स्तवूनी अर्जुन । उभा राहे धरूनी मौन ।तव उदया आला अरुण । अरुण दिसे प्राचीमुख ॥७६॥सिद्ध मुनी ऋषी देव । दर्शना येती अप्सरा गंधर्व ।ते वंदोनी जाती सर्व । जयां गर्व न ठावा ॥७७॥सह्याद्रिवासी मुनी । तेही जाती वंदूनी ।मृत्तिका जल घेवूनी । आला मुनी शांततपा ॥७८॥मग श्रीदत्त उठोन । करीं मृज्जल घेऊन ।नैरृती दिशे जाऊन । मलोत्सर्ग करून पातला ॥७९॥मृज्जल समिधा घेऊनी । तंव आला दुसरा मुनी ।श्रीदत्तें शौच करूनी । दंतधावन पैं केलें ॥८०॥सरोवरीं केलें स्नान । केलें देवर्षिपितृतर्पण ।तंव एक मुनी येऊन । भस्म वल्कल देतसे ॥८१॥करूनि त्रिपुंड्र धारण । वल्कल तें पांघरून ।करूनी संध्यावंदन । पुन: ध्यान आरंभिलें ॥८२॥राजा मनीं झाला खिन्न । उभा राहे हात जोडून ।मग शांततपा बोले वचन । नमन करून गुरूतें ॥८३॥भगवन् हा तुमचा दास । उभा राहे करून उपवास ।यानें आपुली धरली कस । यास उदास न करावा ॥८४॥हा करी भक्ती बरवी । यसी उपेक्षा न करावी ।कृपादृष्टी यावरी करावी । हा भाविक ठावा असेल ॥८५॥हंसोनी बोले श्रीदत्त । काय इच्छितें याचें चित्त ।आणिक इच्छी जरी वित्त । तरी देतों सत्वर ॥८६॥माझ्या भक्ता काय दुर्लभ । सर्व सिद्धी केल्या सुलभ ।यावरी ठेविला लोभ । अजुनी सिद्धी किती देऊं ॥८७॥ऐकूनी श्रीदत्तवचन । राजा झाला साश्रुलोचन ।म्हणे देवा तूं प्राणजीवन । माझें मन जाणसी ॥८८॥पुरे पुरे परीक्षा । बरवी केली हे शिक्षा ।आतां करी कृपेक्षा । न करी उपेक्षा दीनाची ॥८९॥तृषिता द्यावें पान । क्षुधिता द्यावें अन्न ।दुर्गता द्यावें धन । करावें अवन आर्ताचें ॥९०॥योग्या योग्य द्यावें । हे सर्वज्ञा काय सांगावें ।आतां म्यां काय मागावें । त्वां जाणावें अंतरींचें ॥९१॥आतां कांहीं नाहीं कांक्षा । घेतां आपुली दीक्षा ।दैवें झाली मुमुक्षा । ज्ञानदीक्षा द्यावी आतां ॥९२॥स्वबुध्द्या करितां श्रम । शास्त्रीं झाला मला भ्रम ।न कळे ज्ञाननिष्ठाक्रम । इंद्रियग्राम नावरे ॥९३॥वाङ्मनसागोचर । ब्रह्म एक परात्पर ।जग मायिक क्षणभंगुर । तें खोटें म्हणे वेदांती ॥९४॥दुसरा म्हणे सत्य हे । म्हणोनी व्यवहार करी हे ।मीमांसक म्हणे सुखी होते हे । कर्मयोगें निश्चय ॥९५॥काणाद बोले हे असद्धेतुक । सांख्य बोले जीव अनेक ।योगी म्हणती योगें ये सुख । म्हणे क्षणिक शून्यवादी ॥९६॥कोणी म्हणती ईश्वर निमित्त । कर्मपरतंत्र कोणी म्हणत ।कोणी प्रधान कारण बोलत । कोणी म्हणत द्वंद्वज हें ॥९७॥स्वस्वपक्ष सिद्ध करिती । श्रुतिप्रमाण दाखविती ।भ्रम पावे माझी मती । म्हणोनी प्रणती म्यां केली ॥९८॥यांमध्यें सत्य काय । मुमुक्षूनें करावें काय ।म्हणोनी धरिले हे पाय । मोक्षोपाय दाखवा ॥९९॥माझी आज्ञा त्रिभुवनीं । कोणी न जाती उलंडुनी ।शत्रु ठेविल भृत्य करोनी । समृद्धी सदनीं अक्षय ॥१००॥सर्व भोग भोगिले । माझें मन कंटाळलें ।आतां ज्ञानावांचून भलें । न मानिलें कांहींच म्यां ॥१०१॥बोलतों वाहूनी आण । गुरुदेव माझे आपण ।दृढ धरिले हे चरण । करा उत्तीर्ण भवापासुनी ॥१०२॥कोणत्याही युक्तीनें आतां । काढा मज वरता ।भीतो ह्या भवगर्ता । दुसरा उद्धर्ता नाहीं मला ॥१०३॥ब्रह्मादिकांचे गुरु आपण । यालागीं वेद प्रमाण ।तुम्हांहूनी दयाळु कोण । मायावरण काढील हें ॥१०३॥कायावाचामनेंकरून । तुम्हांवरी निश्चय ठेऊन ।बैसलों धरणें घेऊन । सर्व आपण जाणतसां ॥१०४॥देवा पूर्वीं आपण । सुप्रसन्न होऊन ।माग ह्मणतां वरदान । ऐहिक धन मागितलें ॥१०५॥त्या वेळीं माझें दुर्दैव । तेथें आलें घेवोनी धांव ।तेणें ऐहिक वैभव । मागविलें क्षणलवविरस जें ॥१०६॥तुझी माया दुर्धर । कोण लावी तिचा पार ।आतां करितों नमस्कार । माझा उद्धार करावा ॥१०७॥इति श्रीवासुदेवानंदसरस्वतीविरचिते श्रीदत्तमाहात्म्ये सप्तमोsध्याय: ॥७॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : April 26, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP