श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ४६ वा
श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य
श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥
प्रणति करून दीपक वदे । म्हणे गुरुजी मी आनंदे ।
श्रीदत्तचरित संवादें । परी तृप्ती न दे ढेंकर ॥१॥
मी हो केवळ तृषित । मज पाजा दत्तकथामृत ।
तुम्ही संत कीर्तनभक्त । श्रवणभक्त भाविक मी ॥२॥
दत्त तरी ब्रम्हानंदमूर्ती । जो पूर्वी घेवूनी भक्ती ।
मग स्वभक्तां दे मुक्ती । ज्याचे चित्तीं असा लोभ ॥३॥
जो सदंतरीं करी विहार । जें भक्तांचें शरीर ।
तें त्या देवाचें दुकान थोर । तेथें व्यापार होत याचा ॥४॥
भक्त तया परी सादर । करिती उधार व्यापार ।
मुद्दलासी न लावितां कर । वरचेवर वाढविती ॥५॥
घेणार जसे जसे जाती । तशा तशा तयांप्रती ।
आळस सोडुनी दाविती । करिती साचा व्यापार ॥६॥
आलस्य तयां नसे । दुकान बंध होत नसे ।
जें एकदां खरेदी केलें असे । तें जसें तसें जयांचें ॥७॥
तयांस न ठावा दुकाळ । तयांचा सदां सुकाळ ।
त्यांवरी कधीं नये खोटसाळ । ज्यांचा सांभाळ करी हरी ॥८॥
जे सर्व जनांसी रसाळ । मग कोण त्यांवरी घे आळ ।
त्यांच्या पदीं सकळ । शिरकमळ ठेविती ॥९॥
रहस्य सर्वांचें जाणती । तयां संतांची गती ।
मूढ लोक नेणती । देवही नेणती गती त्यांची ॥१०॥
ही हो तयांच्या व्यापाराची रीती । तेच करूं जाणती ।
जरी सर्वस्व गमविती । तरी भले म्हणविती आपपरी ॥११॥
अशा दुकानावर । हा मी पातलों लाचार ।
मला द्यावया उधार । तुम्ही धीर समर्थ आहा ॥१२॥
आयूस जसा मुक्त केला । तसा यदूस तारिला ।
असें ऐकिलें ती मला । दत्तलीला ऐकवा ॥१३॥
अपूर्व वाटे हरिलीला । नित्य नूतन वाटे कालाला ।
ती नको होईल कोणाला । पशुघ्नाला भली होवो ॥१४॥
तपस्या हेचि आमुची । चाड नाहीं यज्ञदानकर्मांची ।
असी वाणी दीपकाची । ऐकताम मुनीची मती द्रवे ॥१५॥
रहस्य जे उपनिषत्सार । ती अवधूतगीता मनोहर ।
यदूप्रती योगेश्वर । ती सादर ऐक म्हणे ॥१६॥
शुक्रबाला देवयानी । वृषपर्वकन्येशीं नग्नपनी ।
जळीं खेळतां नरा देखूनी । लाजून ये बाहेर ॥१७॥
ती बाह्यप्रदेशीं येतां । तत्पूर्वीं त्वरें वृषपर्वसुता ।
जीचें नाम शर्मिष्ठा । ती देवयानीचें वस्त्र नेसे ॥१८॥
तें स्वत:चें वस्त्र जाणूनी । तीवर कोपे देवयानी ।
शर्मिष्ठा तिला निंदूनी । दे ढकलून कूपांत ॥१९॥
दैवें ययाती तेथें आला । शर्मिष्ठा गेली गृहाला ।
रोदन ऐकूनि राजा द्रवला । म्हणे तिला कोण तूं ॥२०॥
तिणें स्तुती करून । सर्व दिलें सांगून ।
कर धरूनी तिला काढून । स्वार्ध वसन दे तिला तो ॥२१॥
नृपास म्हणे देवयानी । कचें शापिलें म्हणूनी ।
त्वां धरिला माझा पाणी । झालें त्वत्पत्नी ब्राह्मणजा मी ॥२२॥
तो पूर्वापर जाणूनी । तिला घे वरूनी ।
शुक्रा हृष्ट करावा म्हणूनी । दासी शर्मिष्ठा करूनी दिली दैत्यें ॥२३॥
ते क्षणि शुक्र म्हणे । शर्मिष्ठेचा संग न करणें ।
ययाती तथास्तु म्हणे । चाले पुरा स्त्रियांसह ॥२४॥
रमे भूप देवयानीशीं । शर्मिष्ठा झाली तिची दासी ।
दोन पुत्र झाले देवयानीसी । यदु तुर्वसू नामक ॥२५॥
जी सुता वृषपर्व्याची । ती सेवा करितां राजाची ।
म्हणे एकांती रतिसुखाची । गोडी थोडी तरी द्या ॥२६॥
अनन्या ती जाणून । तिशीं रमला नृप द्रवून ।
ती गर्भिणी होवून । प्रसवली तीन आत्मज ॥२७॥
ते आत्मज तिचे पाहून । देवयानी कोपून ।
पितयाचें दे सांगून । शुक्र कोपून शापी भूपा ॥२८॥
या कन्येच्या दासीसी । राजा तूं रत झालासी ।
माझ्या वाक्या टाळलेंसी । वृद्ध होसी आतांच तूं ॥२९॥
असें वाक्य परिसतां । तत्काळ भूपा ये वृद्धता ।
कांप वळ्या पलितां पाहतां । भूप खिन्न झाला ॥३०॥
त्राण नुरे शरीरांत । खोकला ये अकस्मात ।
विषयभोगानें ज्याचें चित्त । तृप्त नाहीं जाहलें ॥३१॥
असा पती क्षीण होतां । देवयानी करी चिंता ।
म्हणे पापीण मी ह्या अनर्था । करवीं आतां काय करूं ॥३२॥
अवश्य जें होणार । पूर्वीच तसा विकार ।
बुद्धीस होतो अनिवार । तेव्हां अविचार सहज ये ॥३३॥
हा पति असा होतां । माझे भोग अंतरले सर्वथा ।
अजूनी माझ्या चिता । असें चिंता विषयांची ॥३४॥
भूपासह ती देवयानी । असा पश्चाताप करूनी ।
शुक्रापाशीं जावूनी । प्रार्थूनि मागे ती तारुण्य ॥३५॥
तें सर्व समजून । बोले शुक्र दयाघन ।
भूपा तुझें वृद्धत्व देऊन । पुत्राचें तारुण्य घे तूं ॥३६॥
मग भूप म्हणे पुत्रांसी । कोणी ह्या वृद्धात्वासी ।
घेऊनी द्या तारुण्यासे । तें चौघांसी नावडे ॥३७॥
राजा तेव्हां तयांसी । शापी तुम्ही सह संततीसीं ।
छत्र सिंहासनासी । योग्य न व्हाल निश्चयें ॥३८॥
शप्तेषु तेष्वग्रजेषु कनिष्ठ: पूरुरात्मज: ।
शर्मिष्ठाया वयो दत्वा पित्रे स्वं तस्य चाददे ॥३९॥
पित्याचा तोष व्हावा म्हणूनी । स्वतारुण्य देऊनी ।
राजाची अवस्था घेऊनी । वृद्ध होऊनी राहे पुरु ॥४०॥
जो आत्मनात्मविवेक । न करी म्हणूनी मूर्ख ।
गोड मानी विषयसुख । केवळ दु:खरूप जें ॥४१॥
तो आनंदित होऊनी । शतवर्षें विषय भोगूनी ।
दैवें विरक्त होऊनी । देवयानीप्रती वोधी ॥४२॥
संतत प्रबल इंद्रियगण । ज्ञात्यालाही वळवी म्हणून ।
हो कां माता पुत्री बहीण । एकासन वर्जावें ॥४३॥
हो कां तो स्वयें जीर्ण । निकट न घ्यावी स्त्री हो कां जीर्ण ।
जेवी वस्त्र अतिजीर्ण । जडे जीर्ण गोदडीस ॥४४॥
जें मन विषयासक्त । तें विषयभोगानें न हो तृप्त ।
जेवीं ओतितां घृत । अग्नि प्रदिप्त होतसे ॥४५॥
आतां विरक्तता येतां । मना ये शांतता ।
असें बोलूनी कनिष्ठसुता । देता झाला तारुण्य ॥४६॥
तो त्यजुनी विषयवासना । घेई आपुल्या वृद्धपणा ।
पुरूला राज्य देऊनी वना । चालिला मना शमऊनी ॥४७॥
जे भागुन दिले देश । तयांवरी पुरु अधीश ।
हें पाहून त्रास । यदूच्या मनास वाटला तो ॥४८॥
तो अप्सरातुल्य भोगी नारी । जगाश्वर्धनपुत्राढ्य जरे ।
तरी शिणे अंतरीं । पुरु राज्य करी म्हणूनी ॥४९॥
वदे तेव्हां यदु त्रस्त । हा मातृदासीचा कनिष्ठ सुत ।
सिंहासनीं बसे मुदित । तेणें दु:खित चित्त माझें ॥५०॥
हा मी यदु विनीत । ज्येष्ठ राणीचा ज्येष्ठसुत ।
हें पाहूनी आतां येथ । कसें जीवित घालवूं हें ॥५१॥
हें विस्मित झालें माझे मन । कीं हें पूर्व कर्म दारुण ।
आतां सर्व सोडून । वनसेवन करावें कीं ॥५२॥
महान्समर्थ दैवयोग । तोच भोगवी भोग ।
तो येतां सवेग । त्याचा कोण भंग करी कसा ॥५३॥
म्यां पूर्वापर विचारितां । निश्चित केलें स्थिरऊनी चित्ता ।
संसारीं सुखवार्ता । नसे सर्वथा कदापी ॥५४॥
हें प्राणिमात्र जाणूनी । व्यर्थ पडती मोहूनी ।
त्या सुखा धिक्कारूनी । जातों वनीं मीं आतां ॥५५॥
असा भूप विचार करूनी । दृढ वैराग्य धरूनी ।
सुखदु:खादि साहूनी । फिरे वनीं मोक्षार्थी ॥५६॥
तो होता दत्तार्थक । त्याला होतां विवेक ।
दत्त ह्मणे हा सम्यक । ज्ञानाधिकारी जाहला ॥५७॥
जो संन्यासाचा अधिकार । तो याला ये साचार ।
आतां श्रवणीं सादर । होईल राजकुमार हा ॥५८॥
जें स्वात्मैकरहस्य । तें याला सांगावें अवश्य ।
असें म्हणूनी तया दृश्य । जाहला अदृश्य असतांही ॥५९॥
पार्थिवाचे दृष्टीसमोर । एकाएकीं दिसे दिगंबर ।
पहुडला धरणीवर । अंतरीं दर न धरितां ॥६०॥
हर्षे भूप तया पाहूनी । त्याच्या समीप जाऊनी ।
भावें वंदन करूनी । ह्मणे या घोर वनीं कोण तूं ॥६१॥
येथें द्वितीय कोणी नसे । हें घोर वनीं असे ।
येथें योगक्षेम कसें । होतसे हें कळेना ॥६२॥
मनुजाची स्थिती पाहतां । कोणी आयुष्याकरितां ।
कोणी संपत्तीकरितां । झटती यशा करितां कित्येक ॥६३॥
कोणी न राहती सडे । कोणी वळती धर्माकडे ।
कोणी अर्थकामभोगाकडे । मोक्षाकडे विरळ ॥६४॥
हें अंत:करण । कांहीं कर्मणुकीवांचून ।
कसें निश्चळ होऊन । राहे समाधान चिरकाल ॥६५॥
जगांत पाहतां जागोजाग । कामक्रोधलोभ आग ।
पेटतां हें तुझें आंग । सांग कसें न भाजलें ॥६६॥
सर्वत्र तूं उदासीन । संपत्तीकडे न देसी मन ।
जिविताची पर्वा सोडून । कीर्तीची गरज न ठेविसी ॥६७॥
जगीं कोणी ज्ञानहीन । कोणी शक्ती नसोन ।
कोणी निपुणता नसून । राहती बसून अकर्तृत्वें ॥६८॥
मला मोह पडतो आतां । तुला शक्ति निपुणता ।
अंगी उत्तम ज्ञान असतां । अकर्तृता कशी ये ॥६९॥
हें रह:स्थान गहन । कसा निर्वाह करून ।
येथें राहसी हें मजलागून । दे सांगून आवडे तरी ॥७०॥
हा मी क:पदार्थ । आपुल्यापुढें असमर्थ ।
तथापि प्रश्नोत्तर यथार्थ । सांगे समर्थ तूं दयाळू ॥७१॥
मोहशोकाग्नि सोडून । निराशपणें राहून ।
स्त्रीपुत्रादि नसून । आनंदघन कसा होसी ॥७२॥
हे लोक आम्ही कुटुंबांत । धनस्त्रीपुत्रांसहित ।
असतांही होतों दु:खित । आपुलें विपरीत वर्तन कसें ॥७३॥
असे एवढें प्रश्न । यदू करी ते परिसून ।
अवधूत तो हंसून । बोले वचन तयाप्रति ॥७४॥
मन करून समाधान । राजा ऐक माझें वचन ।
मला लाधलें तत्त्वज्ञान । तेणें असा होवून राहिलों ॥७५॥
हें तत्त्वज्ञान जाण । म्यां चौवीस गुरुंपासून ।
यत्नें केलें संपादन । तें सांगेन तुज आतां ॥७६॥
ज्याचें मनन करितां । ब्रह्म उमजे तत्वतां ।
निदिध्यासन करितां । साक्षात्कारता होईल ॥७७॥
हा मनुष्यासच विचार । घडतसे साचार ।
शरीरें जीं इतर । आहार विहार घेण्याचीं ॥७८॥
येथें परमात्मा उघड । अन्यत्र अवघड ।
येथें प्रज्ञानाचें बिर्हाड । असे दृढ जाण तूं ॥७९॥
अवश्य नरदेहीं जाण । मिळविजे विज्ञान ।
शास्त्रानुमानें करून । ये कळून सर्वही ॥८०॥
जें अंत:करणबिंबित । तें ब्रह्म निश्चित ।
वृत्तिज्ञानें होई विदित । जेणें मुक्त होई नर ॥८१॥
चौवीस गुरूंपासून । हेयोपादेय लक्षण ।
घेतलें मी तत्वज्ञान । तेणें मन शांत झालें ॥८२॥
घेणें परि त्याग करणें । असें जगीं शोधणें ।
हेय तें टाकणें । आदरें घेणें उपादेय तें ॥८३॥
अनार्य हें नेणती । त्यांची पशूबरोबर गणती ।
ते तृण न भक्षिती । पशू जातीचें हें भाग्य ॥८४॥
श्रुति गाजती मोठ्यानें । महती विनष्टि म्हणून ।
तरी नरजन्मा येऊन । हेंच साधन करावें ॥८५॥
ज्या इछु नये म्हणे वेद । त्या विषयांचा नाद ।
न सोडिती मतिमंद । करिती विशेष छंद ते ॥८६॥
अनुक्रमें करून । सांगतों तत्वज्ञान ।
पहिला गुरु पृथ्वी जाण । दुसरा पवन तो गुरु ॥८७॥
हें व्योम तिसरा गुरु । चौथा उदक गुरु ।
पांचवा जाण अग्नि गुरु । सहावा गुरु चंद्रमा ॥८८॥
सूर्य कालात्मा सातवा गुरु । कपोत आठवा गुरु ।
नववा अजगर गुरु । दहावा गुरु समुद्र ॥८९॥
तो होय अक्रावा गुरु पतंग । बारावा गुरु भृंग ।
तेरावा गुरु मातंग । मधुहा गुरु चौदावा ॥९०॥
मृग मम गुरु पंध्रावा । मत्स्य गुरु सोळावा ।
पिंगळा वेश्या गुरु सत्रावा । गुरु अठरावा कुरर ॥९१॥
जे तीव्र मानापमान चिंता । तत्परिहाराकरितां ।
बालक गुरु तत्वतां । हा आतां एकुणिसावा ॥९२॥
कंकण कुमारीचें विसावा गुरु । एकविसावा सर्प गुरु ।
बाविसावा गुरु । शरकार जाण तूं ॥९३॥
गुरु मम तेविसावा । पेशस्कार जाणावा ।
कोळी गुरु चोविसावा । ज्ञानार्णवा घे यापासुनी ॥९४॥
त्यात स्नान करून । सर्व पाप धुवून ।
ज्ञानसंपन्न होवून । मी भय सोडून पडें येथें ॥९५॥
मी ह्या विवेकें संपन्न । झालों असें म्हणून ।
सर्व तळमळ जाऊन । आनंदें भरून राहिलों येथें ॥९६॥
निजरंगें रंगून । मी सर्वदा असें म्हणून ।
सुखदु:खाचें स्फुरण । नसे जाण सर्वथा मला ॥९७॥
नित्य शुद्धबुद्धमुक्त । मी असें योगयुक्त ।
केलें सर्व परित्यक्त । असें असक्त सर्वत्र ॥९८॥
विशुद्ध ज्ञानाकरितां । एका गुरुचे पाद धरितां ।
येतसे कृतार्थता । तरी इतुके गुरु किमर्थ ॥९९॥
जेंवी मना आवडती । तितके करितां पती ।
त्या स्त्रीला व्यभिचारिणी म्हणती । निंदिती जगांत ॥१००॥
तेवी पाहिजे तितुकें जरी । नर तसे गुरु करी ।
तरी तो व्यभिचारी । होय म्हणसी तरी ऐक तूं ॥१०१॥
गुरु परमार्थे ऐक । श्वेतकेतु भृगुप्रमुख ।
करूनी गुरु एक । घेऊन विवेक मुक्त झाले ॥१०२॥
गुरु विद्योपदेश करी । मग असंभावनादि ये तरी ।
मग वेदांतानुसारी । अंगीकारी जे तर्क ॥१०३॥
विशुद्धं ब्रह्मविज्ञानं बुद्धिं नारोहतीति चेत् ।
वेदानुकूलतर्केण तर्क्यतां मा कुतर्क्यतां ॥१०४॥
असा करणें तर्क तर । कीजे ह्या द्वैतावर ।
अद्वैत ब्रह्मावर । नसे अवसर तर्काला ॥१०५॥
तर्के विवेक घ्यावया । म्यां हें गुरु केले राया ।
येणें असंभावनादिक लया । गेले निश्चय ठेवितां ॥१०६॥
हें वर्म जाणून । सूक्ष्म वस्तू कळावी म्हणून ।
असे गुरु केले म्हणून । मग कोण दोष देईल ॥१०७॥
ऐकुनी असें वचन । त्या अवधूता वंदून ।
परमानंद पावून । राजा वचन पुन: बोले ॥१०८॥
इति श्रीदत्तमाहात्म्ये षट्चत्वारिंशोsध्याय: ॥४६॥
॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : May 04, 2016
TOP