मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य|
अध्याय १२ वा

श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय १२ वा

श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य


श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥
गुरु म्हणे दीपकाप्रती । अर्जुनाची परिसोनी विनंती ।
श्रीदत्त तयाप्रती । विस्तरें सांगती उत्तर ॥१॥
संसारी हे मूढ जीव । शास्त्रावरी न ठेविती भाव ।
त्यावरी अवकृपा करी देव । तेणें भवभ्रमण हो ॥२॥
स्वयें चिद्धन साक्षी असून । तीनी अवस्थेहूनि भिन्न ।
स्वयें अनुभव येत असून । जाती विसरून स्वरूपा ॥३॥
मी कर्ता मी दाता । म्हणती मी सुखदु:खभोक्ता ।
असी घेवूनी मूढता । जगीं भिन्नता पाहती ॥४॥
ही केवळ होय भ्रांती । ही जातां दूर नाहीं मुक्ती ।
हाही आत्म्यावर उपचार म्हणती । जे वेदांती निष्णात ॥५॥
मुळीं बंध नाहीं जाण । मग मुक्ती खरी म्हणे कोण ।
अज्ञबोधार्थ हें निरूपण । शास्त्रपुराण करीतसे ॥६॥
जें सत्य ज्ञान अनंत । ब्रम्ह एक सदोदित ।
भ्रमें नामरूपें निश्चित । असती कल्पीत ब्रम्हावरी ॥७॥
दिसे जो हा सर्व लोक । तें पूर्वीं ब्रम्ह होतें एक ।
भेदरहित देख । सच्चित्सुखस्वरूप ॥८॥
न दुजें तत्समान । त्याला सजातीय भेद कोठून ।
दुसरें नाहींच म्हणोन । विजातीय भेद नसे तया ॥९॥
सच्चिदानंद ब्रम्ह खास । तें असे अखंडैकरस ।
स्वगतभेद तयास । नाहींत खास वृक्षापरी ॥१०॥
वृक्षा पत्र एकदेशीं । फळ पुष्प एकदेशीं ।
ब्रम्ह सच्चिदानंद सर्वांशीं । दृष्टांत तयासी रक्तोष्ण प्रकाशदीप ॥११॥
निर्विकारा नये विकार । म्हणोनी करितां मायेचा अंगिकार ।
ती आत्मशक्ती निराकार । तिणें नये द्वैतपणा ॥१२॥
शक्ती शक्ताहूनी भिन्न नसे । लोकीं ठावें असे ।
तिणें द्वितीयत्व येतसे । असें कसें म्हणावें ॥१३॥
कोणी म्हणती पहातां माती । ईचे पुढें घडे होती ।
तेव्हां नाम आकृती । पूर्वीं चित्तीं येतसे ॥१४॥
तसें येथें मानितां । पूर्वीं कांहीं नव्हतां ।
जिव्हा मन नसतां । नामआकारता कोण करी ॥१५॥
तें अद्वितीय ब्रम्ह एक । संकल्पानें झालें स्वयें अनेक ।
म्हणोनी एकाच्या ज्ञानें सकळीक । कळे विवेक होतांची ॥१६॥
घेवूनियां माती । कुंभार घडा करी हातीं ।
हा आरंभवाद म्हणती । उपादान माती निमित्त कुलाल ॥१७॥
ईश्वर निमित्त उपादान । उभयरूप होवून ।
करी जग निर्माण । निर्विकारपण न जातां ॥१८॥
ईश्वर कोळ्याचे परी । विश्वोत्पत्ती संहार करी ।
याला कुंभारापरी । आरंभवाद न घडे ॥१९॥
आम्लानें होतें दुधाचें दहीं । हा परिणामवाद तोही ।
ह्या निर्विकार आत्म्याला नाहीं । म्हणूनी विवर्तवाद बोलती ॥२०॥
रूपें भासे शिंपीवर । किंवा सर्प दोरीवर ।
तसा हा जगदुत्पत्तिप्रकार । निर्विकार अधिष्ठान तें ॥२१॥
जीव आणि ईश्वर । यांचा भेद परस्पर ।
चितीं अविद्या तद्भेद परस्पर । हे सहा प्रकार अनादी मानिले ॥२२॥
कल्पित जाण भेद हाही । मुळीं अविद्याच नाहीं ।
मग कैंची भेदवार्ता ही । कांहींच नाहीं स्वरूपीं भेद ॥२३॥
तूं ह्मणशी कीं मिथ्या भ्रम । मग किमर्थ हा श्रवणादि श्रम ।
जरी होय मिथ्या भ्रम । महा अनर्थ घडवी हा ॥२४॥
ह्मणूनी योगादिकें करून । करावें याचें निरसन ।
जसा अग्नी मलिन सुवर्ण । मळ जाळून स्वच्छ करी ॥२५॥
तसा भ्रम मळ योगें जातां । स्वयें प्रकाशे स्वयंप्रकाशता ।
तेथें कैंची द्वैतवार्ता । आभासमात्रता जयाची ॥२६॥
गारुड्यानें दाविलें जळ । त्याणें न भिजे भूमंडळ ।
परि भुलती लोक सकळ । हें जळ म्हणोनी ॥२७॥
तेवीं जाण हें जगद्वैत । भ्रमची असे समस्त ।
संसारही भ्रमभूत । भ्रमजात सुख दु:ख ॥२८॥
हा भ्रम नष्ट होतां । मग कैंची द्वैतवार्ता ।
प्रारब्धाची काय कथा । भ्रम नासतां अर्जुना ॥२९॥
कर्मादिकें व्यर्थ श्रम । त्याणें न निरसे भ्रम ।
वस्तुज्ञानाचा क्रम । धरितां भ्रम दुरावे ॥३०॥
जो ज्ञानयोग पर । तो करी भ्रम दूर ।
तोचि आनंद निर्भर । तोचि नर कृतकृत्य ॥३१॥
असें ऐकुनी वचन । वंदूनी बोले अर्जुन ।
कसें साधावें योगज्ञान । कृपा करोन सांगावें ॥३२॥
ब्रह्म असोनी एक । कसें झालें अनेक ।
केवी आलें हें दु:ख । हा विवेक मज व्हावा ॥३३॥
श्रीदत्त म्हणे अर्जुना । स्वरूपीं नाहीं कल्पना ।
नित्यमुक्त निर्विकारपणा । तो कोणा न मोडवे ॥३४॥
शुद्धसत्व प्रकृतींत । तेंची ब्रम्ह प्रतिबिंबित ।
तोची जगाचा तात । श्रुतिसंमत ईश्वर ॥३५॥
ब्रम्हाविष्णुरुद्ररूपें धरी । तोचि सृष्टी स्थिती संहार करी ।
तोची राहे सर्वांतरीं । तोचि तारी भक्तजनां ॥३६॥
शुद्धसत्वगुणी त्याची शक्ती । तिला विद्यामाया म्हणती ।
ही उपाधिभूत प्रकृती । सर्वज्ञता येती इच्या योगें ॥३७॥
मलिनसत्व जी प्रकृती । त्यांत ब्रम्हप्रतिबिंबें पडती ।
त्यांना जीव असें म्हणती । ते असती पराधीन ॥३८॥
ते व्यष्टीभूत किंचिज्ज्ञ । समष्ट्यभिमानी जो सर्वज्ञ ।
तो स्वतंत्र ईश्वर प्राज्ञ । वागवी अज्ञ जीववर्गा ॥३९॥
मायेच्या शक्ती दोन । आवरण विक्षेप म्हणोन ।
स्वरूपा ठेवी आच्छादून । म्हणूनी आवरण ह्मणती तया ॥४०॥
ईश्वर आणि मुक्त यांसी । सोडून इतर जीवांसी ।
आवरण पडे निश्चयेंसी । मग मी अज्ञ असी प्रतीत ये ॥४१॥
असें होतां अज्ञान । कर्तृत्व भोक्तृत्व ये लागून ।
हें विक्षेपाचें कार्य जाण । नामायोनी भ्रमणरूप ॥४२॥
विक्षेप हें सुख दु:ख । विक्षेपची भूतभौतिक ।
कार्य जें सकळीक । विक्षेप एक पसरला ॥४३॥
जैसी मंदाधकारीं । पडली असतां दोरी ।
तें नेणतां अंतरीं । वाटे खरोखरी हा सर्प ॥४४॥
जो हा विकल्प घे मन । हेंची होय आवरण ।
मग धडकी कंप होय दारुण । तो विक्षेप जाण अर्जुना ॥४५॥
दोरीचें होतां ज्ञान । होय सर्पभ्रमनिरसन ।
मग विक्षेस्प राहिला म्हणून । तया कोण गडबडे ॥४६॥
जें असे जीवा अज्ञान । त्याचें होतां निरसन ।
जीवा न होय भ्रमण । विक्षेपानें सर्वथा ॥४७॥
ब्रह्मापासुनी प्रकृती । ती पासूनी महत्तत्वोत्पत्ती ।
महत्तत्वापासूनी अहंकारोत्पत्ती । त्यापासुनी होती पंचभूतें ॥४८॥
आकाश हो शब्दगुण । वायु शब्दस्पर्शगुण ।
तेज शद्बस्पर्शरूपगुण । जलाचे गुण शब्दस्पर्शरूपरस ॥४९॥
शब्दस्पर्शरूपरसगंधांनीं । युक्त असे मेदिनीं ।
भूतांच्या सत्वगुणांशांनीं । ज्ञानेंद्रियें पांच होती ॥५०॥
श्रोत्र त्वचा आणि नयन । रसना आणि घ्राण ।
ही ज्ञानेंद्रियें जाण । आतां अंत:करण ऐक ॥५१॥
भूतसत्वांश एकत्र होवून । होतसे अंत:करण ।
वृत्तिभेदें पंचधा जाण । अंत:करण निर्विकल्प ॥५२॥
संकल्पात्मक तें मन । निश्चयात्मक बुद्धि जाण ।
चित्त करी अनुसंधान । करी मीपण अहंकार तो ॥५३॥
याचा अंतर्भाव करून । कोणी म्हणती हीं दोन ।
आतां रजोगुणें जाण । कर्मेंद्रिय प्राण झाले ॥५४॥
वाचा हस्तपाद । लिंग आणि गुद ।
हीं कर्मेंद्रियें निर्वाद । प्राणाचे भेद पांच हे ॥५५॥
प्राण अपान व्यान । उदान आणि समान ।
हें पांच वायू जाण । क्रियात्मक असती हे ॥५६॥
ज्ञानकर्मेंद्रिय प्राण । मिळोनी लिंगदेह जाण ।
हाचि ब्रह्मांडीं करी भ्रमण । जोंवरी ज्ञान न होय ॥५७॥
अज्ञान हें कारण शरीर । आनंदमय कोशाचें हें घर ।
लिंगाख्य सूक्ष्म शरीर । हेंही घर तीन कोशांचें ॥५८॥
कर्मेंद्रिय पांच । रजोगुणी प्राणही पांच ।
हा प्राणमय कोश साच । करवी हाच कर्मातें ॥५९॥
ज्ञानेंद्रिय मनासहित । मनोमय कोश ख्यात ।
बुद्धि ज्ञानेंद्रियांशीं सहिताकोश हा प्रथित विज्ञानमय ॥६०॥
आकाशादि भूतांचे । दोन दोन भाग करुनी साचे ।
पुन: चार चार अर्ध्याचे । भाग करोनी ते एक ॥६१॥
आपुल्या भागीं न मिळवितां । प्रत्येकाच्या अर्ध्यभागीं योजितां ।
पंचीकरण होई तत्वतां । त्यापासूनीच सर्व शरीरें ॥६२॥
रोम त्वचा मांस नाडी अस्थी । हे पृथ्वीचे अंशें होती ।
उदकाचे पांच असती । लाळ रक्त स्वेद शुक्र मूत्र ॥६३॥
क्षुधा तृषा आणि कांती । निद्रा आळस हे होती ।
तेजाचे अंश निगुती । ऐक आतां वायूचे ॥६४॥
गमन आणि धावन । लंघन आकुंचन प्रसारण ।
हे वायूचे अंश जाण । चपळपणा असे हा ॥६५॥
काम क्रोध लोभ मोह भय । हे आकाशांश यांहीं होय ।
चतुर्विध स्थूल काय । अन्नमय कोश हा ॥६६॥
जसे खालीं वर प्रासाद । करूनी राजा करी विनोद ।
तसे जीवात्म्याचे हे प्रासाद । तीन देह जाणावे ॥६७॥
स्थूल देहाचा करूनी संग । संद्रियांनीं घेई जागृद्विषयभोग ।
विश्वनायक होई मग । धे प्रविविक्त भोग सूक्ष देहीं ॥६८॥
जागृद्वासना घेऊनी । तैजस नामक होवूनी ।
स्वप्नावस्था कल्पूनी । एक असुनी अनेकत्व पाहे ॥६९॥
कारणदेहीं जाउनी । प्राज्ञ नामक होवूनी ।
निद्रावस्था अनुभवुनी । जागृत होउनी पुन: भ्रमे ॥७०॥
देह हें अधिष्ठान । अहंकार कर्ता जाण ।
इंद्रियसमूह हें कारण । चवथी जाण वायुचेष्टा ॥७१॥
इंद्रियादिकांच्या देवता । हें पांच एकत्र होतां ।
शुभाशुभ कर्मचेष्टा । कायावाचामनें घडे ॥७२॥
इष्ट पुण्य स्वर्गादि सुख दे । अनिष्ट पाप नरकादि दु:ख दे ।
मिश्र पापपुण्य मनुष्यजन्म दे । त्रिविधकर्म दे असी गती ॥७३॥
अंडज आणि स्वेदज । उद्भिज आणि जारज ।
पांचवी योनी दिविज । कर्मभोगार्थ ह्या योनी ॥७४॥
कर्मयोगें ह्या योनी फिरे । जरी कल्पकोटी होती फेरे ।
तरी भोगिल्याविना कर्म न सरे । जंववरी बरें ज्ञान न ठसे ॥७५॥
असा सृष्टिक्रम । दावीतसे वेदागम ।
हा सत्य म्हणोनी भ्रम । घेई अधम मानव जो ॥७६॥
अमानित्वादि गुण । अंगीं घ्यावे बाणून ।
गुरुला शरण जाऊन । आत्मज्ञान जोडावें ॥७७॥
फलाभिमान त्यागून । करितां स्वधर्मानुष्ठान ।
ईश्वरप्रीती होवून । सद्गुरुचें दर्शन होईल ॥७८॥
गुरु देवासमान । श्रद्धेनें मानून ।
त्याची सेवा करूनी श्रवण । करावें निर्वाणला भार्थ ॥७९॥
गुरुच्या अनुग्रहें करून । विचार ठसेल सत्य जाण।
अन्यथा व्यर्थ ये शीण । अंतरीं ज्ञान न ठसेल ॥८०॥
राजा त्वां आश्रमोक्त । कर्म केलें अनासक्त ।
म्हणूनी झालासी माझा भक्त । आतां व्यक्त सांगतों ॥८१॥
भ्रम मोह मलहर । वैराग्य झालें जें पर ।
आतां तुजवरी सत्वर । विद्या प्रसाद करील ॥८२॥
विद्या म्हणजे ज्ञान । तें दोन प्रकारचे जाण ।
परोक्ष अपरोक्ष म्हणून । श्रुतिप्रवीण बोलती ॥८३॥
गुरुमुखें श्रवण करणें । उपक्रमादि सहालिंगानें ।
वेदांताचें तात्पर्य घेणें । हें जाणणें परोक्ष ज्ञान ॥८४॥
ब्रह्म एक कीं अनेक असे । असा संशय जो होतसे ।
ती संशयभावना तीही नासे । श्रवण असें करितां हें ॥८५॥
ब्रह्म नाहीं हेही मती । असत्वावरण तें म्हणती ।
तेंही नष्ट होई निश्चिती । वस्तु आहे म्हणती मग तेची ॥८६॥
श्रवणानुसारें मनना । करितां हरे असंभावना ।
स्थिर करूनियां मना । सावधाना पावूनी ॥८७॥
मी किंचिज्ज्ञ अपरोक्ष असें । ईश सर्वज्ञ परोक्ष असे ।
मग ऐक्य व्हावें कसें । वाटे ती संशयभावना ॥८८॥
तीनी अवस्थेंत ज्ञान एक । तें सदा सच्चिदानंद रूपक ।
तें प्रत्यक् उपाधीनें अज्ञत्वादिक । त्याचा विवेक नसतां दिसे ॥८९॥
आत्मा एक सदोदित । जग हें मिथ्या स्वप्नवत ।
उपक्रमोपसंहारें पहात । उपाधीमुळें द्वैतता ॥९०॥
अध्यारोपा सोडूनी । अपवादा विचारूनी ।
पाहातां एकत्व ये मननीं । चिंतितां मनीं श्रवणानुसारें ॥९१॥
वस्तु न भासे ही मती । तें अभानावरण म्हणती ।
जे हें मनन करिती । जाई अभानावरण त्यांचे ॥९२॥
असें निदिध्यासन होतां । आवरण दूर जातां ।
ध्यानें अद्वितीयता । अभ्यास करितां स्थिरावें ॥९३॥
सर्व संकल्प सोडून । एकांतीं बैसून ।
ध्यान करितां अनुदिन । स्वयें आपण ब्रह्म होय ॥९४॥
भ्रमराचें ध्यान करितां । कीटां ये भ्रमरता  ।
हा ध्यानाचा प्रभाव तत्वतां । लोकीं प्रसिद्धता असे ही ॥९५॥
जीव तरी ब्रह्म असून । करितां स्वरूपाचें ध्यान ।
ब्रह्मस्वरूपा पावतां कोण । मानील निपुण आश्चर्य हें ॥९६॥
ध्यान तरी किमर्थ । म्हणसी तरी यथार्थ ।
ऐक राया कृतार्थ । होसील स्वार्थ जोडूनी ॥९७॥
जी अनिर्वचनीय ख्याती । तीणें स्वरूपीं ये भ्रांती ।
रज्जुसर्पापरी ती । मिथ्या असूनी अनर्थ करी ॥९८॥
अविद्या काम कर्मेंसी । युक्त होई दिननिशीं ।
होऊनी रागादिकां वशी । अविनाशित्व हरपवी ॥९९॥
रागद्वेषवशेंकरून । करितां त्रिविध कर्माचरण ।
त्याणें ये सदा भ्रमण । जन्ममरण पुन: पुन: ॥१००॥
राहुग्रस्त झाला रवी । म्हणती अज्ञ जेंवी ।
जिवावरी आवरण तेंवी । भास मात्र असे तें ॥१०१॥
ज्ञानावांचूनी तन्निवृत्ती । कोण करील कवण्या रितीं ।
श्रवणादिकर्में जे ज्ञानी होती । तेचि मिळती स्वरूपीं ॥१०२॥
शाब्दज्ञान परोक्ष । आत्मा तरी अप्रत्यक्ष ।
ध्यानें होई अपरोक्ष । म्हणोनी ध्यान करावें ॥१०३॥
राजा तूं सभाग्य । तुला झालें वैराग्य ।
तूं होसी उपदेशयोग्य । मोक्षभागी तूं खास ॥१०४॥
कर्म केलें मदर्पण । झालें शुद्ध अंत:करण ।
तुझी मजविषयीं जाण । दृढ भक्ती जाहली ॥१०५॥
आतां तुला निर्विघ्न । घडेल महावाक्यचिंतन ।
अपरोक्षानुभव घेऊन । समाधीमध्यें लीन हो ॥१०६॥
स्थिरऊनी तत्वज्ञान । मनाचा भंग करून ।
टाकी वासनावन । समूळ जाळून सर्वथा ॥१०७॥
मग होसी जीवन्मुक्त । प्रारब्ध भोगूनी पूर्ववत ।
विदेह कैवल्यें मद्रूपांत । मिळसील निश्चित हें मानीं ॥१०८॥
नृपा आतां तूं सादर । करी महावाक्यविचार ।
तेणें अपरोक्ष साक्षात्कार । होईल सत्वर निर्धारें ॥१०९॥
इति श्रीमत्परमहंसवासुदेवानंदसरस्वतीकृते श्रीदत्तमाहात्म्ये द्वादशोsध्याय: ॥॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 26, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP