मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य|
अध्याय ३८ वा

श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ३८ वा

श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य


श्रीगुरुदत्तात्रेयाय नम:
गुरु म्हणे शिष्यासी । श्रीदत्तें अलर्कासी ।
भेटावया बंधूसी । आज्ञा दिधली ॥१॥
ती शिरसा मानून । तो मदालसानंदन ।
नगरांत येऊन । बंधूसी भेटला ॥२॥
ज्या सर्वथा अहंता । गळाली ती ममता ।
मिळाली ज्याला स्वस्थता । निश्चलता सहजची ॥३॥
ज्याचें प्रसन्न मन । असे सुहास्यवदन ।
तो बंधूतें वंदून । स्पष्ट वचन बोलतो ॥४॥
काशिराजा तूं ऐक । राज्य घे हें निष्कंटक ।
किंवा यथासुख । दे सुबाहूला ॥५॥
किंवा दोघे मिळून । राज्य घ्या भागून ।
किंवा द्या लुटून । हें निश्चित सांगतों ॥६॥
काशिराजा म्हणे त्यासी । तूं क्षत्रिय अससी ।
व्यर्थ कां असा भीसी । करीं आम्हांसी युद्ध तूं ॥७॥
हा धर्म क्षत्रियांचा । तूं नृप सोमवंशीचा ।
अससी शूर साचा । डर मनाचा सोडीं हा ॥८॥
मरण येतां प्रधाना । मरूनी जातां सेना ।
क्षत्रियांनीं रणा । न सोडिजे सर्वथा ॥९॥
छाती पुढें करून । धर्यें समोर राहून ।
क्षत्रियांनीं करावें कदन । पलायन न करावें ॥१०॥
जय मिळे तरी । सुखें राज्य करी ।
समोर मरे जरी । तरी स्वर्गवास होय ॥११॥
उभयतां नसे तोटा । असें असूनी जो करंटा ।
पाहूनियां भटा । पळे तो मोठा अभागी ॥१२॥
शत्रू जिंकूनियां । भोग भोगूनियां ।
यज्ञ यागा करूनियां । त्रिदशालयां जोडावें ॥१३॥
( श्लोक ) ॥ अग्निदो गरदश्चैव शस्त्रपाणिर्घनापह: ।
क्षेत्रदारहरश्चैव षडेते आततायिन: ॥१४॥
आततायिनमायांतं हन्यादेवाविचारयन् ।
नाततायिवधे दोषो हंतुर्भवति कश्चन ॥१५॥
आतताई पाहून । जो करी पलायन ।
तो येथें कीर्तीं बुडवून । नरकीं गमन करील तो ॥१६॥
यज्ञयागासमान । अपूर्व असे रण ।
क्षत्रियां यांहून । सुलभ साधन नसेची ॥१७॥
अलर्क बोले तयासी । पूर्वीं असें मानसीं ।
होतें तें या समयासी । गेलें अस्तासी निश्चयें ॥१८॥
आतां मी देह म्हणून । नसे सर्वथा भान ।
मग क्षत्रियत्व कुठून । असेल आतां सांग बा ॥१९॥
मातीचा घडा जसा । भौतिक हा देह तसा ।
प्राणेंद्रियमानसां । न सहासा शिवें मी ॥२०॥
जीं माझ्या योगें करून । दिसती सचेतन ।
तरी तीं जड म्हणून । जाणें पूर्ण साक्षी मी ॥२१॥
मी एक चेतन । द्वितीयत्व कोठून ।
शत्रु मित्र स्वजन । हें अज्ञान आतां नाहीं ॥२२॥
तुम्ही उपकार करितां । म्यां पाहिलें दत्ता ।
त्याची कृपा होतां । द्वैतवार्ता पळाली ॥२३॥
इंद्रिय शत्रू जिंकून । सर्वत्र विजयी होऊन ।
आतां धरितों रान । समाधान होऊनी ॥२४॥
मला नसे अरी । सुबाहू उपकारी ।
तूंही तयापरी । नसे अंतरीं भेद आतां ॥२५॥
मी असें सर्वांठायीं । सर्व असे माझे ठायीं ।
म्हणूनी सुबाहूचे पाई । मिठी घाली अलर्क ॥२६॥
मग तया उठवून । आलिंगन देऊन ।
सुबाहू बोले हंसून । झालों समान भागी आतां ॥२७॥
हे मित्रा काशिराजा । मी संग केला तुझा ।
तो मनोरथ माझा । पूर्ण झाला ॥२८॥
तुझें होवो कल्याण । मी पुन: जाऊन ।
सेवितों आतां वन । समाधान होऊनी ॥२९॥
तया म्हणे काशिराज । ह्मणसी भाग देववी मज ।
तों तूं कसा हें आज । बोलसी मज गुज वाटे ॥३०॥
कशासाठीं वनांतून । त्वां येथें येऊन ।
केला हा एवढा यत्न । माझें मन भ्रांत झालें ॥३१॥
राज्य माझ्या पित्याचें । भोगी अलर्क त्याचें ।
पारिपत्य करूनी साचें । तें मला द्यावें ॥३२॥
असें मला सांगून । तूं आलासी शरण ।
आतां सेविसी वन । ह्याचें कारण काय सांग ॥३३॥
जो अलर्क मदें । पूर्वीं तुला भाग न दे ।
तोही आतां वनांमध्यें । किमर्थ जातो कळे ना ॥३४॥
सुबाहु म्हणे तयासी । राज्य कायसें आम्हांसी ।
ज्या करितां ह्या प्रयत्नासी । झटलों ऐक तूं ॥३५॥
तेणें झालों ज्ञानी । म्हणूनी राज्य सोडूनी ।
आनंदें राहिलों वनीं । कृतार्थ होऊनी डुलत ॥३६॥
तो बोध याचे कानीं । दैवें न पडे म्हणूनी ।
हा कामुक होऊनी । विषयीं गढून राहिला ॥३७॥
पशुप्राय हीनमती । देह दे स्त्रियां हातीं ।
स्त्रैणाची करी संगती । हा दुर्मती होऊनी ॥३८॥
किडा जसा व्रणांत । तसा औपस्थ्यसुखांत ।
हा जाहला निरत । तेणें चित्त खिन्न झालें ॥३९॥
हा गृहस्थ होऊन । अनेक स्त्रिया भोगून ।
सुखी आपण मानून । राहे दुर्जनसंगानें ॥४०॥
ही सुखाची भ्रांती । अंतीं जी दे दुर्गती ।
मग कैची सद्गती । मूढ नेणती गती हे ॥४१॥
एका उदरापासून । चौघे झालों उत्पन्न ।
एका येत अध:पतन । तें सहन कसें व्हावें ॥४२॥
हें मन आणून । ह्याला दु:ख देऊन ।
विरागी करावा म्हणून । हा यत्न म्यां केला ॥४३॥
तुझ्या सहायेंकरून । जो म्यां केला यत्न ।
तो सफल होऊन । समाधान जाहलों ॥४४॥
दु:ख होतां याला । हा वनीं गेला ।
दैवें श्रीदत्त भेटला । त्याणें केला उपदेश ॥४५॥
तो दैवानें ठसला । हा तकाळ उमजला ।
म्हणोनी ह्या दशेला । हा आला निश्चयें ॥४६॥
हें माझें कार्य झालें । म्हणोनी वनीं चालें ।
आतां तो राज्य आपुलें । करो अथवा न करो ॥४७॥
मदालसा योगीमान्या । आमुची माता वदान्या ।
तत्समाना नसे अन्या । जी धन्या शिववरें ॥४८॥
तिचें दुग्ध पिऊन । ह्याचें न व्हावें पतन ।
असें मनीं आणून । हा प्रयत्न केला म्यां ॥४९॥
तो यत्न सफल झाला । राज्य मला कशाला ।
मी पांघरूनी दिशांला । पडें भला जनीं वनीं ॥५०॥
मोहरीचें समान । सार्वभौम सुख जाण ।
मेरुपर्वतासमान । सुख जाण आमुचें ॥५१॥
आपण समर्थ असून । बुडतां अपुला जन ।
तया न काढी त्याला कोण । हा विद्वान म्हणेल ॥५२॥
जो समर्थ असून । सक्षम बुडतां स्वजन ।
हात न दे तो दुर्जन । हें जान तूं नृपा ॥५३॥
असें त्याचें वचन । काशिराजा ऐकून ।
तत्काल विरक्त होऊन । बोले दीन वचन तो ॥५४॥
सुबाहो तूं धन्य । खास होसी वदान्य ।
बंधू केला मान्य । मी अन्य झालों कीं ॥५५॥
( श्लोकार्थ ) ॥ सतां साप्तपदी मैत्री पुनात्युरुतरादधात् ॥५६॥
चालतां पाउलें सात । मैत्री करिती संत ।
वारूनियां दुरित । करिती पुनीत निश्चयें ॥५७॥
संत दयाधन । म्हणतां वाटे शीण ।
वर्षांकालीं वर्षे घन । संत अनुक्षण कृपा वर्षती ॥५८॥
संतकृपेची साउली । ही केवळ माउली ।
न घटे न वाढे जी भली । जी भली ईश्वराची ती कीं ॥५९॥
नमस्कारें संत । होती सुफलित ।
मी तरी संतत । सन्निहित मासमात्र ॥६०॥
तूं दयाळू अससी । केवीं मातें उपेक्षिसी ।
आपपर न तुम्हांसी । सर्वांसी समान ॥६१॥
तरी तारतम्य असे । हा तुमचा दोष नसे ।
जे सेविती जसे । ते तसे फलभागी ॥६२॥
अग्निजवळ राहतां । अग्नि वारी तमा शीता ।
किंचित्किंचिद् दूर होतां । तारतम्यता जाणावी ॥६३॥
तेवीं तुम्ही संत । तारतभ्यें होतां फलित ।
मी तरी सन्निहित । असतां च्युत होईन कीं ॥६४॥
फलदो हि सतां संग । ह्या वचनाचा न हो भंग ।
तुला वाटेल तें सांग । मी नि:संग होईन ॥६५॥
असें त्याचें वचन । सुबाहु तें ऐकून ।
म्हणे तुझें सत्य वचन । अन्यथा कोण म्हणेल ॥६६॥
तूं धार्मिक अससी । साधिलें त्वां त्रिवर्गासी ।
अजूनी मोक्षासी । साधावया यत्न पडेल ॥६७॥
धर्म अर्थ काम । ह्याचें त्रिवर्ग नाम ।
जयाचें मोक्ष नाम । ब्रह्मधाम चवथा तो ॥६८॥
तो साधनांवाचून । नये सहसा घडून ।
यास्तव करी प्रयत्न । संक्षेपानें सांगतों ॥६९॥
मी माझा हा प्रत्यय । होण्यासी हेतू काय ।
याचा करी निश्चय । शास्त्रीय उपायानें ॥७०॥
अव्यक्तादि विशेषान्त । नामरूपात्मक समस्त ।
हें अनित्य निश्चित । याव्यतिरिक्त सत्य तें ॥७१॥
हा नित्यानित्यविचार । घेई चित्तावर ।
सर्व मानी नश्वर । तया दूर टाकी तूं ॥७२॥
मग इहामुत्रार्थभोग । सोडूनी घेसी विराग ।
शमादिक मग । साधिती सवेग निश्चयें ॥७३॥
जसा भुका पुरुष । अन्नावांचुनी इतरांस ।
न इच्छी तसा खास । तूं मुमुक्षेस आदरसी ॥७४॥
मग महावाक्येंकरून । तोमी मी तो हें विवेचन ।
लक्षणा वृत्ती करून । ये ठसून सत्वर ॥७५॥
त्याचें करितां मनन । त्याचें निदिध्यासन ।
होतां अपरोक्षज्ञान । येईल कळून निजांगें ॥७६॥
यद्यपि हा अलर्क । होतां बरा कामुक ।
तरी त्याचा दैवयोग एक । एक प्रश्न उमजला ॥७७॥
हा मातृकृपेचा लेश । म्हणोनी भेटला योगाधीश ।
क्षणें झाला निराश । सर्व पाश तोडोनी ॥७८॥
दैवें तुला हा संग । घडूनी झाला विराग ।
तरी प्रतिबंधभंग । झाल्याविना न तरसी ॥७९॥
यासी उपाय एक । तूंसोडीं राज्यादिक ।
धरीं सत्संग एक । मग विवेक ठसेल ॥८०॥
असें तया सांगून । अलर्का आलिंगून ।
सुबाहू बोले वचन । बंधो समान झालों आम्ही ॥८१॥
वाटे तरी राज्य करीं । अथवा जा वनांतरीं ।
आतां कोठेंही क्षणभरी । लिप्त न होसी सर्वथा ॥८२॥
अलर्क बोले वचन । मी जडमूढ होऊन ।
विषयगर्तीं रुतून । होतों गढून बहुकाळ ॥८३॥
तूं दयाळू होऊन । मला हात देऊन ।
माझें केलें उद्धरण । असा कोण कृपाळ ॥८४॥
एकोदरसमुत्पन्न । मान्यनारीनंदन ।
आतां झालों समान । हें पुण्य मातेचें ॥८५॥
असें अलर्क बोलून । धरी सुबाहूचे चरण ।
सुबाहू तया आश्वासोन । चालिला वन लक्षूनी ॥८६॥
काशिराजा विरक्त होऊनी । स्वनगरीं येऊनी ।
पुत्रा राज्य देऊनी । चाले वनीं सुबाहू जेथें ॥८७॥
तेथें अभ्यास करूनी । तो होऊनी ज्ञानी ।
सर्व संग सोडूनी । मुक्त झाला ॥८८॥
अलर्कानें स्वतनया । राज्यीं बसवूनियां ।
वनीं येऊनियां । अत्रितनया उपासिलें ॥८९॥
सोडूनी सर्व संग । झाला वीतराग ।
नेणेंप्रारब्ध भोग । द्वंद्वसंग सुटतांची ॥९०॥
गुरुकृपेकरून । शीघ्र विदेह होऊन ।
ह्या जगा पाहून । करी गायन उच्च स्वरें ॥९१॥
पद ॥ ( उद्धवा शांतव० ) ॥ अहहा हे जन अविवेकी । उफराटे पाहति लोकीं ॥ध्रु०॥९२॥
असुरासुर किन्नर नर हे, स्त्रीपुरुष स्वजन स्नेहें,
ह्या गुणमय पाशें मोहें, बांधिलें त्यां रिपुनिवहें ॥चा०॥
मकरापरी धरिलें जोरें, ओधिलें फरफर सारें,
जाहलें भ्रांतिविकारें, अविकारें ह्यासी विलोकी ॥९३॥
मीतूंपण शिणवी ज्यांना, वेदना वेढिती नाना,
आतां मी पाहुनि यांना, हळहळतों परि हे कुजना ॥चा०॥
नाठवे अहहा दु:ख, लोक हे कैसे मूर्ख,
त्यांपरि मी पूर्वीं रंक, तो कसा लोळे नरकीं ॥९४॥
पूर्वीं मी केवळ कुमती, राज्यावरी ठेवुनी प्रीती,
भोगितां विषय न चित्ती, कंटाळा आला निगुती ॥चा०॥
विट वाटे आतां त्यांचा, खेळ पाहुनी जेवी शिशूचा,
येतां अनुभव हा योगाचा, चित्ताचा भ्रम उतरे कीं ॥९५॥
तृष्णेनें एकदा वरिता, ब्रह्मांडीं पशुधन वनिता,
एकाला सर्वही मिळतां, तृप्तता नच ये चित्ता ॥चा०॥
तृष्णा ती परती सरतां, भाकरिचा कुटका मिळतां,
जनिं वनीं उबडा पडतां, तृप्तता ये निजचित्ता ॥९६॥
निज रूपीं सुख जे त्यातें, नेणुनिया बाह्य सुखातें,
धुंडितां हें मन शिणतें, तें कळलें अजि गुज मातें ॥चा०॥
वात्सल्यें निज बंधूच्या, उपदेशें श्रीसद्गुरुच्या,
पदवीला गेलों वरच्या, कोण आमच्या भाग्या जोखी ॥९७॥
असें गाउनी अलर्क । अभ्यास करी सम्यक ।
चरम दशेचें सुख । निर्विकल्पक होऊनी घे ॥९८॥
संपतां प्रारब्धभोग । सोडूनियां जडांग ।
फोडूनी उत्तमांग । लपे असंग ब्रह्मरूपीं ॥९९॥
प्रसन्न होतां दत्त । असा मदालसासुत ।
झाला नामरूपातीत । ज्याचें गीत संत गाती ॥१००॥
वेदधर्मा म्हणे दीपकासी । अशा कथा पितयासी ।
सांगूनी तो गुणराशी । स्वयें वनासी चालिला ॥१०१॥
मग त्याचा पिता भार्गव । विरक्त होऊनी सेवी देव ।
दत्तपदीं ठेवुनी भाव । मोक्षवैभव घे त्वरें ॥१०२॥
अलर्क आयु अर्जुन । यदु कयाधूनंदन ।
पिंगल नाग साध्यजन । दत्तभजनप्रिय हे ॥१०३॥
खंडुनी हे कालदंड । भजनें गाजवून ब्रह्मांड ।
शेवट करूनियां गोड । मिळाले अखंडरूपीं ते ॥१०४॥
नर जे असे भजती । ते संसार तरती ।
तेही स्वरूपीं मिळती । न ढळती पुन: ते ॥१०५॥
असें श्रुतीचें वचन । ह्यावरी विश्वास ठेवून ।
जों दत्ता भजे अनुदिन । तो घे निर्वाण निश्चयें ॥१०६॥
आतां आयुचें आख्यान । पुढें होईल निरूपण ।
श्रोते होउनी सावधान । अवधान देवोत येथें ॥१०७॥
इति श्रीदत्तमाहात्म्ये अष्टत्रिशोsध्याय: ॥३८॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : May 04, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP