मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य| अध्याय १५ वा श्रीदत्तमाहात्म्य अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय १५ वा श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य Tags : dattagurudattavasudevanand saraswatiगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वती अध्याय १५ वा Translation - भाषांतर श्रीगणेशाय नम: ॥ऐकूनियां योगाभ्यास आनंद अर्जुनास ।पुन: वंदूनियां गुरूंस । साशंकमानस प्रश्न करी ॥१॥म्हणे गुरुजी कृपा करून । केलें योगाभ्यासनिरूपण ।हृष्ट झालें अंत:करण । परी एक पुसेन तुम्हांला ॥२॥योगें होतां साक्षात्कार । कासया वाक्यविचार ।हा संशय करा दूर । ठेविला निर्धार तुम्हांवरी ॥३॥ऐकूनी अर्जुनाचें वचन । हर्षें बोले अत्रिनंदन ।केवळ योगानें नोहे निर्वाण । नसतां ज्ञान योगियां ॥४॥प्राणायामें करून । स्थिर होतां आपुलें मन ।जें ऐकिलें वाक्यज्ञान । त्याचें मनन करावें ॥५॥त्या अर्था अनुसरून । परमात्म्याचें चिंतन ।अखंड मनोवृत्ती करून । करणें मनन तेंचि होय ॥६॥सविकल्प समाधी जाण । तेंचि निदिध्यासन ध्यान ।विजातीयप्रत्यय टाकोन । सजातीयप्रवाहीकरण जें ॥७॥जें नामरूप प्रत्यय । तें सर्व विजातीय ।नित्य शुद्धबुद्धादि प्रत्यय । ते सजातीय जाणावे ॥८॥निषेध्य आणि विधेय । आत्म्याचें दोन प्रकारचें ध्येय ।गुण असती श्रुतिगेय । हे अभय देती ध्यानानें ॥९॥अशब्द अस्पर्श अद्वय । अरूप अरस अव्यय ।अगंध अनादि नित्य । अनंत अभय अभेद ॥१०॥अगोत्र अवर्ण अदृश्य । अचक्षु:श्रोत्र अग्राह्य ।अपाणिपाद अवेद्य । हे निषेध्य गुण होत ॥११॥नित्य शुद्ध बुद्ध मुक्त । सत्य ज्ञान अनंत ।परब्रह्म आत्मा अच्युत । असंग सदोदित परावर ॥१२॥गुण हे विधेय । एवं हें गुणद्वय ध्येय ।हाचि सजातीय प्रत्यय । हे प्रवाहवत् चिंतावे ॥१३॥जो वाक्यार्थ निर्णीत । षड्लिंगांनीं अवधारित ।लक्षणावृतीनें लक्षित । तोचि मननांत स्थिर होई ॥१४॥तो मी आत्मा परब्रह्म । अखंडैकरसधाम ।परावर शिवपरम । पुरुषोत्तम मीच असें ॥१५॥असें होतां मनन । ध्यातृध्यानभाव हरून ।अंतीं ध्येयाकार होवून । राहे मन निश्चळ ॥१६॥निर्विकर्ल्पसमाधी हा । हा निवारी अज्ञानांधमोहा ।उपशमवी प्रारब्धा हा । वासनावना हा जाळी ॥१७॥चैतन्य जें व्यापक । तें स्वयंप्रकाशक ।तेंचि प्रगटे सम्यक । सच्चित्सुखमय तेव्हां ॥१८॥असा होतां साक्षात्कार । योगी न जाणे बाह्यभ्यंतरा ।स्वयें चिन्मय निरंतर । निश्चळ अजस्त्र सुखरूपी ॥१९॥ब्रह्माकार मनोवृती । अज्ञाना निवारूनी ती ।निष्कल ब्रह्मातें अंतीं । विषयीं विस्पष्ट करी ती ॥२०॥कार्यासहित अज्ञान । इणें जाई नष्ट होऊन ।सच्चिदानंदलक्षण । ब्रह्म निरंजन एक उरे ॥२१॥तूं म्हणसी ही वृत्ती असतां । मग कसी अद्वैतता ।वृत्तीही हें कार्य होतां । मुरून जाई स्वरूपीं ॥२२॥निवळीच्या बियेचा कल्प । गढूळ जळांत टाकतां सकळिक ।गाळ नासूनी स्वयें देख । होई त्यापरी हें ॥२३॥घट फुटतां घटाकाश । जेंवीं होई महाकाश ।तेंवी होतां अविद्यानाश । उपाधिनाश होतसे ॥२४॥उपाधी म्हणती अविद्येस । तीमुळें जीवा क्लेश ।ती नष्ट होतां स्वयंप्रकाश । होई जीव परब्रह्म ॥२५॥तूं म्हणशील जें अज्ञान । आणि बाहेर जें असत ।तें इंद्रियां मना होई विदित । प्रत्यग्ब्रह्म हें तसें नोहे ॥२६॥इंद्रियांत:करणाच्या गती । ब्रम्हस्वरूपीं न होती ।ते असे स्वयंज्योती । कोण जाणती तयातें ॥२७॥ब्रम्ह तेंची आत्मा होय । तो सर्वां अग्राह्य ।तो द्रष्टा दृश्य न होय । सत्य होय सिद्धांत हा ॥२८॥तरी ऐक वेदमत । आपुलें मुख आपणा न दिसत ।त्यातें आरसा दाखवित । लोकीं मात असी असे ॥२९॥तरी उपाधी आरसा । त्या जडा बोध होई कसा ।तेव्हां स्वयें स्वरूपा जसा । पाहे तसा हाही न्याय ॥३०॥आरसा असतां मळकट । मुखही दिसे मळकट ।आरशाला असतां फूट । भासे मुखावरती ॥३१॥स्वच्छ करितां आरशी । मुखीं स्वच्छता दिसे तसी ।स्वच्छ करितां बुद्धीसी । स्वरूपासी स्वच्छ पाहे ॥३२॥आरशावरी मळ आगंतुक । बुद्धीवरी रागद्वेषादिक ।शास्त्राधारें हें करितां पृथक । होय सम्यक् स्वच्छबुद्धी ॥३३॥जो बुद्धिप्रतिबिंबित । जो जीवनामें विख्यात ।त्याला व्हावया बाह्य ज्ञात । करिती मदत इंद्रियें ॥३४॥अंधकारीं घडा पाहणें । तरी दिवा नेत्र हे असणें ।जरी दिवा पाहणें । एका नेत्रानें कार्य होई ॥३५॥तेंवीं स्वात्मया पाहतां । बुद्धिवृत्ती पुरे तत्वता ।इचें नांव वृत्तिव्याप्यता । फलव्याप्यता इतरत्र ॥३६॥बुद्धिबिंबितस्वात्मदर्शन । आपणासच होई जाण ।म्हणोनी श्रुतीचें हें वचन । इंद्रियें मन न पाहती ॥३७॥दिव्या पाहतां दिवा नलगे । तसा स्वयंप्रकाश निजांगें ।आत्मा तया पाहतां नलगे । साधन वावुगें कासया ॥३८॥अज्ञान मात्र आड असे । तें बुद्धिवृत्तीनें नासतसे ।तदर्थ श्रवणादिक असे । उपाय नसे दुसरा येथें ॥३९॥जी ब्रह्माकार वृत्ती । तीही रूपीं मुरे अंतीं ।तया निर्विकल्प समाधी म्हणती । परमगती हीच जाण ॥४०॥जेथें अखंडैकब्रम्ह जाण । जेथें नसे दुजेपण ।तेथें करितां आरोहण । न पुन: पतन कल्पांतीं ही ॥४१॥निद्रेमाजी स्वरूपज्ञान । तेंच जागृत्स्वप्नीं जाण । होतसे वृत्तिज्ञान । अज्ञान त्यासी वैर न करी ॥४२॥जेंवी उन्हानें न जळे तृण । सूर्यकांत आड येतां तत्क्षण ।जळून जाईं सर्व तृण । वैरपण येतांची ॥४३॥तेंवी सामान्य ज्ञान । वैर न करी अज्ञान ।मी ब्रम्ह असें वृत्तिज्ञान । तें अज्ञानवन जाळी ॥४४॥जो योग करूं जाई । तया सिद्धी आड येई ।जो धैर्यें सिद्धी सोडून देई । तो घेई मोक्षसुख ॥४५॥अणिमादि आठ सिद्धी । यांकडे करितां बुद्धी ।जरी होई ऐहिक समृद्धी । मोक्षसिद्धी दुरावे ॥४६॥सिद्धिचें नश्वर फळ । मोक्ष असे निश्चळ ।म्हणोनी ज्ञान विमळ । साधावें केवळ प्रयत्नानें ॥४७॥झोंपेंत जातां चित । करावें तया जागृत ।विषयीं होतां विक्षिप्त । करावें शांत पुन: पुन: ॥४८॥असें अभ्यासानें चित्त । होतां निवांत दीपवत ।वृत्ती शांत होती समस्त । होई कृतकृत्य योगी ॥४९॥सर्व कर्में क्षीण होती । हृदयग्रंथी तुटती ।संशयघट फुटती । हटती मागें शोकमोह ॥५०॥ज्ञानें जळे संचित क्रियमाण । प्रारब्ध भोगी योगी आपण ।मनीं न मानी तो शीण । स्वयें जीवनमुक्त होतां ॥५१॥सर्प जसा अंगावरी । वेगळाली कात धरी ।तिचे विषयीं अभिमान न करी । त्यापरी शरींरी मुक्त जाण ॥५२॥अर्जुना अभ्यास जोंवरी । दृढ न झाला तोंवरी ।वागावें अंधबधिरापरी । तरी अंतरीं योग ठसेल ॥५३॥स्वयें समर्थ असूनी । विषयांजवळी वसूनी ।निद्रितापरी वागे मुनी । त्याला जगीं मुग्ध म्हणती ॥५४॥बसतां उठतां किंवा चालतां । ज्याची दृष्टी चार हातां ।सोडून दूर न जाई तत्वतां । तो आंधळा जाणावा ॥५५॥हितकर किंवा अहितकर । मनोहर किंवा शोककर ।वाक्य ऐकूनी न ऐके नर । योगी तो बधिर जाणावा ॥५६॥हितकारक सत्य भाषण । बोले परिमित भाषण ।जेवतां बरवें वाईट अन्न । नेणे तो जाण अजिव्ह ॥५७॥मळमूत्रोत्सर्गार्थ जाणें । भिक्षार्थ ज्याचें फिरणें ।यावांचुनी फिरूं नेणे । तोचि पंगू जाणावा ॥५८॥कुमारी आणि वृद्ध नारी । किंवा तरुणी सुंदरी ।ह्या समान पाहूनि अंतरीं । जो निर्विकारी तो नपुंसक ॥५९॥यापरी वागूनी । योगचर्या धरूनी ।जो अंतर्निष्ठ वागे मुनी । तो जनीं वनीं समान ॥६०॥अर्जुना हा जाण योग । तुज म्यां कथिला सांग ।जो श्रद्दधान विनीत असंग । तया सांग योग हा ॥६१॥जो माझा भक्त होऊनी । सम लोष्टाश्मकांचनीं ।हिंसा असल्यादि दे सोडुनी । तो आवडे मज योगी ॥६२॥राजा तूंही माझा भक्त । माझे ठायीं तुझें चित्त ।विषयीं अससी अनासक्त । मुक्तसंग सर्वथा ॥६३॥तूं केलेस याग । शुद्ध केलेंस अंतरंग ।म्हणोनी कथिला हा योग । करी सांग अभ्यास तयाचा ॥६४॥तें ऐकूनी भगवद्वचन । सगद्गद होउनी अर्जुन ।दोनी कर जोडून । करी स्तवन श्रीदत्ताचें ॥६५॥( अभंग ) तुज नमूं देवा ॥ ठेउनियां भावा ॥केला हा बरवा ॥ उपदेश ॥६६॥मोहतम गेले ॥ तापही निवाले ॥त्वद्रूपीं निवालें ॥ माझें मन ॥६७॥ज्ञानसूर्य मनीं । उदित होवूनी ॥टाकिलें जाळूनी ॥ अंतस्तमा ॥६८॥देवा तुझे पद । पाहुनी आनंद ॥झाला गेला खेद ॥ भेद सर्व ॥६९॥आज हें अपूर्व ॥ आलें मोठें पर्व ॥पाहिलें पद सर्व ॥ प्रेमास्पद ॥७०॥तूंचि मायबाप ॥ शमविले ताप ॥घालविले पाप ॥ कोपद्वेषां ॥७१॥केला उपशम । माझा सर्व भ्रम ॥करिशी निष्काम ॥ धाम दिल्हें ॥७२॥देवा परानंद ॥ सतत हें पद ॥दिसो हाची छंद ॥ पूरवी तूं ॥७३॥( ओवी ) तूंचि माता तूंचि पिता । तूंचि गुरु कुलदेवता ।तूंचि स्वजन बंधु भ्राता । तुजपरता न दुजा मज ॥७४॥तूं स्वयें देहेंद्रियातीत । सर्वेंद्रिया चालविसी सतत ।तूं दाविली ही मात । गुहाश्रित होवुनी ॥७५॥यापरता नाहीं स्वार्थ । दाविला जो हा परमार्थ ।तेणें झालों कृतार्थ । आतां व्यर्थ कां भडकावें ॥७६॥तूं भक्तिगम्य देव । तव पदीं घेतली धांव ।पुरविला माझा भाव । आनंदा वाव नाहीं आतां ॥७७॥त्वद्रूपीं हें जग भरलें । जेवीं पटीं तंतू ओंविलें ।तें रूप आज ठावें झालें । धालें मन माझें हें ॥७८॥या संसारवृक्षीं । जीव ईश हे दोन पक्षी ।जीव हा कर्मफळें भक्षी । ईश्वर निरीक्षी साक्षित्वें ॥७९॥यावत्फळाची रुची असे । तंव जीव घिरट्या घालितसे ।तंव हें तुझें रूप असें । अंतरीं न ठसे तयाच्या ॥८०॥जो तुझा भक्त केवळ । तो सोडी कर्मफळ ।त्याच्या अंतरींचा झडे मळ । सबळ वैराग्य येउनी ॥८१॥मग तो रिघे तुझे पाठीं । तूं करिसी त्यावरी दृष्टी ।हें म्यां माझे दृष्टीं । पाहिलें आतां स्वानुभवें ॥८२॥मन होतां निष्काम । तुझें गोड लागे नाम ।तूंवि सत्य परंधाम । आत्माराम परमार्थ ॥८३॥म्यां करायाचें केलें । मिळवायाचें मिळविलें ।पाहायाचें पाहिलें । मन निमालें त्वच्चरणीं ॥८४॥तूं अससी अगम्य । परी होसी गुरुगम्य ।कोणाशीं करूं तुझें साम्य । अनौपम्यस्वभाव तूं ॥८५॥असा अर्जुनें स्तविता दत्त । तत्काळ होवुनी प्रसन्नचित्त ।म्हणे होवुनी अप्रमत्त । ऐकिला योग सर्वही ॥८६॥ही येथें असे दरी । इचे आंत प्रवेश करी ।स्थिर बसूनी आसनावरी । करी अभ्यास प्रयत्नें ॥८७॥आसनीं सरळ बसूनी । स्वरूपीं दृष्टी लावूनी ।अभ्यास करी एकाग्रमनीं । शमवूनी लय विक्षेपा ॥८८॥जो म्यां उपदेशिला योग । त्याचा अभ्यास करी सांग ।जें अनुभविसील तें सांग । योगवियोग झाल्यावरी ॥८९॥जा तूं न भी अंतरीं । गुहेमध्यें प्रवेश करी ।असें म्हणोनियां भवारी । त्याचे शिरीं ठेवी कर ॥९०॥राजा रोमांचित होऊनी । श्रीगुरूसी वंदूनी ।आज्ञा शिरसा मानूनी । बैसे जाऊनी गुहेंत ॥९१॥घालूनियां दृढासन । अभ्यासानें प्राणापान ।करूनियां समान । श्वास जिंकून स्थिरावला ॥९२॥षट् चक्रें भेदिता । कुंडलिनी सरळ होतां ।सुषुम्णेचें द्वार खुलतां । समाहितता पावला ॥९३॥समाधी लागली तीन दिवस । पुन: लावी सोडूनी आळस ।पुन: तो बारा दिवस । समाहित होऊनी उठला ॥९४॥पुन: करितां अभ्यास । समाधी स्थिरावे तीन मास ।ती खुलतां तयास । वाटे गुरूस भेटावें ॥९५॥येऊनी वंदी श्रीदत्तातें । आलिंगूनी तयातें ।वदे दत्त काय तूतें । कळलें तें मातें सांगावें ॥९६॥त्वां इतुके दिवस । गुहेमध्यें केला वास ।काय आलें अनुभवास । तें खास सांग आतां ॥९७॥अर्जुन म्हणे अभिनव । काय सांगूं अनुभव ।जेथें त्रिपुटीला नाहीं वाव । तो अनुभव कसा वदूं ॥९८॥जरी तेथें नव्हत्या वृत्ती । तरी होतां आतां अनुवृत्ती ।तर्क येतसे चित्तीं । स्थिर होती मती जेथें ॥९९॥जाग्रत्स्वप्नसुषुप्ती । तीनी जेथें नसती ।इंद्रियांच्या चेष्टा न होती । उन्मनी स्थिती मना ये ॥१००॥जें पूर्वीं होतें उद्विग्न । तें मन स्वरूपीं संलग्न ।होतां परमानंद निमग्न । झालें भग्न संकल्प तें ॥१०१॥तो आनंद न बोलवे । गुरुजी काय सांगावें ।बोलतसें जीवें भावें । न वर्णवे आनंद तो ॥१०२॥तेंची तुमचें रूप । सत्यज्ञानानंदरूप ।तें अनुभवितां न पाप ताप । तें हें स्वरूप बाहेरही ॥१०३॥हें सुख टाकून । अन्यत्र न जाई माझें मन ।आतां नको राज्यधन । समाधान पावलों ॥१०४॥दु:ख न होईल राज्य टाकितां । सुख न होईल राज्य करितां ।झाली मनाची दृढता । खास आतां भवद्रूपीं ॥१०५॥जो सर्वत्र व्यापून । परमात्मा असे परिपूर्ण ।तेंचि तुमचें रूप निर्गुण । सगुणही तेंच झालें ॥१०६॥ज्ञानपात्र करुनी । मला हातीं धरुनीं ।कृपामृतानें भरुनी । अमर करुनी ठेविला ॥१०७॥असें म्हणोनी लोटांगण । घालूनियां तो अर्जुन ।भावें चरण वंदून । लीन होवून राहिला ॥१०८॥इति श्रीमत्परमहंसवासुदेवानंदसरस्वतीविरचित श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : April 26, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP