मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य|
अध्याय ४७ वा

श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ४७ वा

श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य


श्रीदत्तात्रेयाय नम: ॥
हा ऋषी असें मानून । यदु लीन होऊन ।
म्हणे चोवीस गुरूंपासून । मिळालें तें ज्ञान मला सांगा ॥१॥
असें परिसोनि त्याचें वचन । अवधूत हर्षून ।
सांगतसे ज्ञान । म्हणे चित्त देऊनि ऐक शिष्या ॥२॥
उपरि जावया शिडी जशी । सहनशीलता तशी ।
पाहिजे मुमुक्षूसी । हें भूमीपाशीं शिकलों मी ॥३॥
जेंवी भूमीवरी नर । टाकिती मळमूत्र ।
थुंकिती तरी त्यांवर । न होतां क्रूर क्षमा करी ॥४॥
म्हणे स्वदैवानुसार । घडे सर्व संस्कार ।
हा बोल कोणावर । कवणेपरी कसा ठेवावा ॥५॥
जो स्वयंभू ईश्वर । त्याणें हे दैवानुसार ।
प्राणी ठेविले मजवर । तयां आधार दुसरा नसे ॥६॥
सर्वभूतांचें जीवन । योजिलें मजपासून ।
म्हणोनी मला खोदून । फाळून जाळून पीक घेती ॥७॥
स्वकार्याकरितां चालतां । जीव मजवरी देती लाता ।
म्हणों तरी त्यांणीं जातां । पाय कोठें ठेवावे ॥८॥
सर्वथा मी मातेपरी । हे जीव पोरापरी ।
यांहीं कांहीं केलें तरी । म्यां अंतरीं तें न धरावें ॥९॥
पोरा तनूवरी धरूनी । दूध पाजितां लातांनी ।
मारितां तया जननी । न हाणी सर्वथा ॥१०॥
जरी थान देतां बाळ । अंगावरी मूत्रमळ ।
टाकी तरी माता तत्काळ । तया न देगाळ न मारी ॥११॥
मींही तो भाव धरीं । असें पृथ्वी माने बरी ।
मींही तसी क्षमा धरीं । सहन करीं सर्वथा ॥१२॥
मोक्षार्थाकडे दृष्टि देवून । करावें सर्व सहन ।
जरी पीडिती जन । त्यांवरी कोप न करावा ॥१३॥
महान्व्यवसाय हाची । धैर्य धरून साची ।
पदवी न सोडावी धर्माची । हाचि उपदेश धर्माचा ॥१४॥
नेत्रें दटाविती कोणी । अपमान करिती कोणी ।
अपशब्द बोलती कोणी । हाणिती कोणी जरी तरी ॥१५॥
कोणी धाड घालिती । कोणी अपहार करिती ।
कोणी बडीमार देती । कोणी थुंकती अंगावरी ॥१६॥
परेच्छाप्रारब्ध एक । दुजें स्वेच्छापूर्वक ।
अनिच्छाप्रारब्ध देख । तीन प्रकारचें प्रारब्ध ॥१७॥
हा नश्वर देह जाणून । त्याला प्रारब्धाधीन करून ।
साक्षिभूत होऊन । राहतां आपण दु:ख कोणा ॥१८॥
टोंचितीं जरी काट्यानें । त्यांवरी कोप न करणें ।
जरी लिंपती चंदनें । न करणें हर्ष त्यांवरी ॥१९॥
असभ्य कोणी म्हणो । कोणी सभ्य म्हणो ।
कोणी मूर्ख म्हणो । आपण क्षमा धरावी ॥२०॥
जें दुस्सह मानवांसी । तें क्षमा धरी तयांसी ।
सुसह होई तत्क्षणेंसी । निश्चयेंसी जाण ॥२१॥
ही क्षमा ज्याचें पदरीं । त्याला ब्रह्मांडोदरीं ।
कोणी न दिसती वैरी । दैवावरी दृष्टी ज्याची ॥२२॥
असभ्य: सभ्यतां याति क्षमा यस्य वशे स्थिता ।
सभ्योप्यसभ्यतां याति क्रोधनो य: क्षमोज्झित: ॥२३॥
क्रोध अंधकार घोर । क्षमा ही देवलोक थोर ।
असा जाणे जो नर । तोचि पार जाईल ॥२४॥
कीजे धंदा परोपकारार्थ । हें जन्मही तदर्थ ।
हाची आपुली स्वार्थ । कृतार्थ हो जेणें नर ॥२५॥
केला तरु गुरु त्यासाठीं । तरु पृथ्वीचे पोटीं ।
भेद केला ज्ञानासाठीं । उत्तम गुण घ्यावया ॥२६॥
जे तम:प्रभव असून । ते वृक्ष नित्य उभे राहून ।
परोपकार करून । सर्व जन्म घालविती ॥२७॥
नित्य प्रसन्न असती । जरी पराधीन असती ।
तरी परोपकार करिती । वृक्षजाती आमरणांत ॥२८॥
पक्षी विविध येऊन । वरी राहती बसून ।
कित्येक घरें करून । राहती तयां न निवारती ॥२९॥
भयशंका न धरिती । शीत उष्ण सोशिती ।
जरी पशु पाला खाती । तरी न होती वृक्ष दु:खी ॥३०॥
तोडिती कोणी कोणी उपटती । कोणी मुळ्या काढिती ।
कोणी साल काढिती । कोणी तोडिती फुलें ॥३१॥
कितीयेक पाला नेती । कित्येक फळें तोडिती ।
कित्येक चीक नेती । ढाळ्या तोडिती किती एक ॥३२॥
असें विविध दु:ख होतां । ते मनीं न आणतां ।
परोपकार करितां । सर्व जीविता घालविती ॥३३॥
सुख द्यावें परासी । हें जितेपणीं त्यांसी ।
घडे तसें मेलियासी । देती लोकांसी वृक्ष सुख ॥३४॥
वृक्ष मुळासह तोडिती । त्याचीं काष्ठें काढिती ।
घरें दारें बांधिती । काष्ठें जाळिती यथेच्छ ॥३५॥
स्वयंपाक करणें । तरी काष्ठाविना न होणें ।
राख झाली तरी तिणें । पिकें उत्तम संपादिती ॥३६॥
असा सर्व प्रकारें वृक्षांचा । उपयोग होतो साचा ।
तसा मनुष्यानें देहाचा । उपयोग करावा ॥३७॥
जसे ते श्रमलियासी । विसांवा देती पांथांसी ।
तसा गृहस्थें पांथांसी । विसांवा द्यावा ॥३८॥
ते शीत उष्ण साहून । मार्गीं उभे राहून ।
आल्या देती आश्वासन । वांकडी मान न करिती ॥३९॥
नरें तोचि उपदेश घेऊन । सुख दु:ख साहून ।
घरीं आल्याचें आश्वासन । करावें खिन्न न होतां ॥४०॥
नरें भूक तहान दुसर्‍याची । जाणूनि तयाची ।
पुरवावी इच्छा त्याची । करूनि शक्तीची मर्यादा ॥४१॥
दैवें यदा कदाचित । संपत्ती येतां न व्हावें उन्मत्त ।
जेवीं फलसंपत्ति येतां वृक्ष । ताठा न धरिती ॥४२॥
नरा इतर मदांहून । संपत्तीचा मद गहन ।
पुढें जयापासून । अनर्थ घडून येतसे ॥४३॥
यास्तव नरांनीं । संपत्ति येतां नमूनी ।
असावें हें वृक्षांपासूनी । घ्यावें शिकूनी उत्तमें ॥४४॥
वृक्षाते फलसंपत्ति येतां । खालीं करिती माथा ।
कोणी फळें तोडितां । चित्तीं खिन्नता न करिती ॥४५॥
पर्वतपृथ्वीपासून । घेतलें मी शिक्षण ।
पोटीं सर्व संग्रह करून । परोपकारार्थ ठेवावा ॥४६॥
मोठ्या मोठ्या खाणी रत्नांच्या । पोटीं असती पर्वताच्या ।
त्यापासुनी लोकांचा । उपयोग बरा होतसे ॥४७॥
नरें यत्नेंकरून । उत्तम विद्या सांठवून ।
द्यावा लोकां लाऊन । तरीच भूषण तयांचें होय ॥४८॥
जसे उदकाचे झरे । पर्वत सोडीतसे तसे नरें ।
थंड गोड शब्द बरे । सोडावे खरे शांतिकर ॥४९॥
जेंवी विविध गुहा राखून । पर्वत राही म्हणून ।
संतसज्जन येवून । आश्रम करून राहती ॥५०॥
तसा द्यावा नरें नरा आश्रय । सत्संगती होतां श्रेय ।
होईल हा निश्चय । पर्वतांपासून हें शिकलों ॥५१॥
हा वायांचा संसार । ह्यामध्यें हेंची सार ।
सत्संगतीच घडे तर । चुकेल येरझार आपुली ॥५२॥
चतुरपणें असा म्यां । पृथ्वी गुरु करूनियां ।
असा उपदेश घेऊनियां । शांत होवूनियां राहिलो ॥५३॥
विरता: परिमुच्यंते । असीं असती मतें ।
जरी क्षमा अंगी ठरे ते । विरक्ततेवांचूनि व्यर्थ ॥५४॥
क्शमा असोनी अंगीं । बहिर्मुख विषय भोगी ।
न होय तो विरागी । मग योगी कसा होईल ॥५५॥
जो अन्य गोडी न पाहतां । आहारमात्रें घे तृप्तता ।
त्याला ये योग्यता । वायु गुरु करितां हें कळे ॥५६॥
प्राण देहस्थ वायु जाण । त्यापासून जें शिक्षण ।
घेतलें तें सांगेन । चित्त देऊन ऐक राया ॥५७॥
प्राणवायु अन्न न मिळतां । शिथिल होय तत्वतां ।
आहारमात्र मिळतां । रसाची अपेक्षा न ठेवी ॥५८॥
हें बहु मिष्ट असे । हें अन्न गोड नसे ।
हें अन्न विरस असे । कदापि प्राण असें न विचारी ॥५९॥
जें चर्वित अन्न । मिळे तें सेवून ।
आपुला व्यापार चालवून । राहे प्रसन्न प्राणवायू ॥६०॥
जें खाद्य असे आपुलें । दैवयोगें मिळालें ।
म्हणजे मन आपुलें । समाधान केलें पाहिजे ॥६१॥
या भयानें जरी नर । सोडीन म्हणेल आहार ।
तरी मनाला ग्लानी थोर । येईल विकार वाचेला ॥६२॥
हीं शून्य होतां दोनीं । ज्ञान जाईल नासूनी ।
मग मुक्ति तरी कोठूनी । येईल शयनीं लोळतां ॥६३॥
आनंदाचाही मग । सर्वथा होईल भंग ।
मिताहार नसतां योग । सर्वथा व्यंग होईल ॥६४॥
जो बहु स्वादिष्ट अन्न । खाई पोटभरून ।
त्याचेंही चित्त विक्षेपून । न होय ध्यान सर्वथा ॥६५॥
सर्व रस रसना जाणे । तिच्या नादा लागतां क्षणें ।
परमार्थापासूनी मुकणें । जन्म घेणें घडे पुन: ॥६६॥
जो हें विरस हें सरस । असें पारखी अन्नास ।
थोडे मीठ पडतां त्यास । एकहि ग्रास न गिळवे ॥६७॥
सुविद्य अथवा अविद्य नर । सर्व रस जिंकी तर ।
तोचि जाणावा ईश्वर । हो कां नर देहानें ॥६८॥
विषया सर्वथैव टाकावें । असेंही स्वयें न करावें ।
आपोआप ते सुटावे । तरीच बरवें वैराग्य ॥६९॥
नरें इच्छा असतां किंवा नसतां । दैवें विषयभोग मिळता ।
न ठेवावी आसक्तता । वायु गुरु करितां कळे हें ॥७०॥
जो गति करिता वात । शीत उष्ण मार्गांत ।
भेटतां न हो आसक्त । न शिवे तो गुणदोषां ॥७१॥
नरें शुद्ध स्वभावें रहावें । गुणदोषादि न मानावें ।
शीतोष्णांत फिरावें । न रमावें कोठेंही ॥७२॥
नित्य श्रुतिमार्ग लंघून । यथेच्छ करावें गमन ।
विटाळ न घ्यावा लावून । जसा पवन निर्दोष ॥७३॥
देहामध्येंही राहून । अहंकार द्यावा सोडून ।
जसा गंधाश्रय होवून । जसा पवन वेगळा ॥७४॥
जो सुधी देहधारी । दैवें विषय घे जरी ।
आपणावेगळा पाहे तरी । न धरी विषयसंबंधासी ॥७५॥
त्या नरासी विषय घेतां । कसी येईल अलिप्तता ।
तरी सांगतों आतां । ययातीसुता ऐक तूं ॥७६॥
कारणांवांचून । कार्य न घडे म्हणून ।
विकल्पासी कारण । प्रमाद जाण सर्वथा ॥७७॥
हरयेक प्रकारेंकरून । इतर व्यासंग सोडून ।
ठेवितां स्वरूपानुसंधान । अलिप्त होऊन राहिला ॥७८॥
हें दोन प्रकारेंकरून । अंतर्बाह्य वायु जाणून ।
म्यां घेतलें हें शिक्षण । दिली सोडून रसासक्ती ॥७९॥
समस्त साधनांहून । प्राणवृत्तीनें संतोषून ।
राहणें हें उत्तम साधन । नित्य सोडून रसासक्ती ॥८०॥
हेंची द्वितीय गुरुपासून । असे घेतलें मी ज्ञान ।
आतां तिसर्‍या गुरुपासून । मिळालें ज्ञान तें ऐक ॥८१॥
आत्मा चराचर व्यापून । निर्विकारपणें एक असून ।
राहे अचळ असें ज्ञान । आकाशापासून शिकलों ॥८२॥
चराचर देहांतरीं । आत्मा एकची अवधारीं ।
जेवीं नाना घटांतरीं । असे आकाश तरी एक ॥८३॥
जो साक्षिभूत आत्मा । तो जरी भासला गुणात्मा ।
तरी तो नोहे जडात्मा । सच्चिदानंदात्मा एक तो ॥८४॥
हें खरेपण असून । आवरण आहे म्हणून ।
मना न ये ठसून । म्हणून विचार करावा हा ॥८५॥
ह्या विविध देहासी जाण तूं । काल कर्म गुण हेतू ।
जोवरी असे हेतू । तंव वरी जाण तूं भेद हा ॥८६॥
हे नद्यांच्या पुरापरी । चालती एकसरी ।
जो ह्यांचा विचार न करी । तो ह्या पुरीं वाहूनि जाई ॥८७॥
गुणांचा जो क्षोभक । त्याला काळ म्हणती लोक ।
जें जन्माला निमित्त एक । नृपा ऐक कर्म तें ॥८८॥
जे त्रिविध गुण । सत्व रज तम म्हणून ।
तेंची उपादान कारण । घड्याला कारन माती जसी ॥८९॥
जे आद्यांतीं नसती । ते देह मध्यें भासती ।
त्याला हे कारण असती । काल कर्म गुण जाण ॥९०॥
चराचर देह जाण । कालकर्मगुणाधीन ।
हें सिद्ध असे म्हणून । नश्वर जाण ते सर्व ॥९१॥
भूपा यदाकदाचित । काल कर्म गुणांचे विभाग होत ॥
तेधवां अकस्मात । देह नासत असे हा ॥९२॥
समस्त देह मेले तरी । आत्मा न मरे न मारी ।
तो आकाशाचे परी । निर्विकारी व्यापक एक ॥९३॥
मग द्वेष्टा कोण प्रिय कोण । आत्मा एकचि परिपूर्ण ।
म्हणसी प्रसिद्ध जन्म मरण । हें कोण दूर करी ॥९४॥
जंव दोषदृष्टी असे । तंव हें भासतसे ।
आकाशा तळ मलिनता नसे । परी भासे ती मूढां ॥९५॥
हो कां भलीं दिसोंत शरीरें । तीं तेजोन्नजलविकारें ।
येती जाती जसीं अभ्रें । वायूच्या जोरें आकाशीं ॥९६॥
जो नियंता आत्मा एक । तो सर्वदेहव्यापक ।
जरी देह अनेक । तरी एक प्रत्यगात्मा हा ॥९७॥
देहासह तो हाले चाले । असें जरी भासलें ।
तरी तो न हाले न चाले । असें जाणिलें म्यां राजा ॥९८॥
जो देहयोगें आत्म्यास । दिसे आकाराचा भास ।
तो जेवीं आकाशास । घड्यानें कारभारास दिसे तसा ॥९९॥
जरी अचळ आकाश असे । तरी घड्याबरोबर जसें ।
चालतसे असें भासे । परी नसे तसें तें ॥१००॥
तो जेवि अचळ । आत्मा तसा निश्चळ ।
देह चालेल तरी अढळ । जो केवळ अकंद ॥१०१॥
महद्यशा म्हणून । वेद बोले ज्यालागून ।
तो अप्रतिम जाण । तया कोण हलवील ॥१०२॥
आत्मा यापरी निराभास । त्याचा कोण करील नाश ।
जसा घडा फुटतां आकाश । अविनाश न फुटे ॥१०३॥
फुटे मृत्तिकेचा पिंड । तेवीं मरतां देहपिंड ।
आत्मा न मरे जो सुदृध । तो अखंड अज सदैव ॥१०४॥
हो मृत्युंजय तच्चिंतक । यापुधें बापुडा अंतक ।
जो प्रत्यगात्मा तेंच एक । ब्रह्मविवेक असा केला ॥१०५॥
तया तीनीं देहांचा । संग नसे तयाचा ।
भेद नोहे हा साचा । आकाशाचा शिष्य जाणे हें ॥१०६॥
ये तीर्त्वाsपारमज्ञानसागरं ज्ञाननौकया ।
आकाशकल्पमात्मानं प्रत्यंचं यांत्यभेदत: ॥१०७॥
असें विज्ञान म्यां राया । आकाश गुरु करूनियां ।
मिळविलें म्हणूनियां । सोडिलें भया एकत्वें ॥१०८॥
इति श्रीदत्तमाहात्म्ये सप्तचत्वारिशोsध्याय: ॥४७॥
॥ श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : May 04, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP