श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय १३ वा
श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य
श्रीगुरु ॥
दत्त ह्मणे दीपकासी । आनंद झाला अर्जुनासी ।
वंदूनी प्रार्थी दत्तासी । विनयेंसी भावार्थें ॥१॥
महावाक्य कोणतें । कसें चिंतावें तयातें ।
जेणें अपरोक्षता येते । तें मातें निरोपावें ॥२॥
ऐकूनी अर्जुनाची विनंती । श्रीदत्त ह्मणती तयाप्रती ।
सोमवेदी श्वेतकेतूप्रती । अरूण सांगे तत्वबोध ॥३॥
नऊ वेळ अभ्यासे । तें तूं अससी वाक्य असें ।
युक्तीनें उपदेशिलें असें । महावाक्य तें अवधारी ॥४॥
येथें चित्त दे सादर । येणें होय साक्षात्कार ।
उतरसील भवपार । हा निर्धार धरीं मनीं ॥५॥
नित्यानित्यविचार । हें पहिलें साधन साचार ।
विषयभोग जो इहपर । त्याचा अनादर सर्वथा ॥६॥
याचे नांव इहामुत्रार्थविराग । हें दुसरें साधन चांग ।
नसतां विषयविराग । ध्यानयोग मग कसा घडे ॥७॥
करणें मनाचें शमन । इंद्रियांचें करणें दमन ।
व्यवहाराचें वर्जन । शीतोष्णादिक सहन करावें ॥८॥
गुरुवचनीं श्रद्धा धरावी । समाधानता चित्तीं असावी ।
हे सहा मिळोनी जाणावी । तिसरी साधनसंपत्ती ॥९॥
माझी मुक्ती व्हावी ऐसें । मन उतावेळ होतसे ।
हें चौथें साधन मुमुक्षत्व असें । सांगतसे मोक्षशास्त्र ॥१०॥
हीं चार साधनें जोडून । गुरुला शरण जाऊन ।
भावें नमस्कार करून । वाक्यविचारण करावें ॥११॥
जो शब्दज्ञाननिपुण । स्वरूपानुभवप्रवीण ।
तोचि सद्गुरु जाणून । त्याचे चरण धरावे ॥१२॥
उद्धतपणा सोडून । भावें करितां सेवन ।
गुरु करवील श्रवण । भ्रमनिरसन करि जें ॥१३॥
साहा लिंगें तात्पर्यग्रहण । याचें नाम श्रवण ।
उपक्रमोपसंहार जाण । पहिलें लिंग असें हें ॥१४॥
अभ्यास अपूर्वता फल । अर्थवाद उपपत्ती विमल ।
हीं सहा लिंगें सबल । करवितील श्रवण तें ॥१५॥
हें जग पूर्वीं सद्रूप । होतें ब्रह्म अरूप ।
अद्वितीय एकविसाय । असा उपक्रम करोनी ॥१६॥
हें सर्व जग ब्रह्मात्मक । हेंचि आपुलें रूप एक ।
आत्मा सत्य आहे हा विवेक । उपसंहार जाणावा ॥१७॥
उपक्रमोपसंहार मिळोन । अर्जुना हे एक लिंग जाण ।
आतां अभ्यासाचें लक्षण जाण । ऐक सांगेन निश्चयें ॥१८॥
शरीर हें अन्नमय । त्याचें कारण तोय ।
त्याचें कारण तेज होय । त्याचें सद्ब्रह्म होय कारण ॥१९॥
सन्मूल ह्या प्रजा जाण । सत्प्रतिष्ठा सदायतन ।
हा एक अभ्यास जाण । दुसरा अपधारण करी ॥२०॥
ह्या सर्व नद्यांची खूण । नामरूपें केवळ जाण ।
कृष्णा गोदा नर्मदा गंगा म्हणून । करिती जन व्यवहार ॥२१॥
त्या समुद्रीं मिळतां जाण । त्यांचीं नामरूपें ओळखील कोण ।
तसें ज्ञानानें ब्रम्ही होतां लीन । केंवी भिन्न जीव होय ॥२२॥
हा दुसरा अभ्यास । आतां तिसरा परिस ।
मधुकर आणिती पुष्परस । नाना वृक्षांचे यत्नानें ॥२३॥
ते सर्व एक होतां । त्याला येई मधुरता ।
मग एकरस होतां । ते ओळखतां न येती ॥२४॥
तेंवीं जीव सद्ब्रम्हीं मिळतां जाण । कसा ओळखील कोण ।
हा तिसरा अभ्यास पूर्ण । करी अवधारण चौथ्याचें ॥२५॥
फळांतील बीज वडाचें । अति सूक्ष्म असे साचे ।
ऋतु क्षेत्र जळानें तयाचें । मोठें झाड होतसे ॥२६॥
तसें सद्ब्रह्म जाण । सूक्ष्म असे तें जगत्कारण ।
काल दैवादियोगें तें वाढून । जगद्रूप होवूनी टवटवे ॥२७॥
तें ब्रम्ह तूं अससी । हा चौथा अभ्यास घे मानसीं ।
आतां सावधानेंसी । लवणाचा दृष्टांत ऐक ॥२८॥
समुद्रापासोनी झालें लवण । तें नामरूप पोंचून ।
पुन्हां समुद्रीं जातां मिळोन । नामरूप सोडूनी एक होय ॥२९॥
तसा जीव ब्रम्हीं मिळतां । सोडी नामरूपता ।
ब्रम्ह होय तत्वतां । हा पांचवा अभ्यास ॥३०॥
वृक्षाची खांदी तोडितां । तिलाच ये निर्जीवता ।
तेवीं जीवें शरीर सोडितां । शरीरा ये पंचता न जीवा ॥३१॥
जीव ब्रह्म आहे म्हणून । त्याला नाहीं जन्ममरण ।
तो शरीराहून । सर्वथा भिन्न जाणावा ॥३२॥
हा सहावा अभ्यास । आतां सातवा परिस ।
चोरानें बांधूनी नेत्रांस । एका नरास पळविला ॥३३॥
देशांतरीं त्या टाकून । चोर जाती अलंकार घेऊन ।
तो रडतां ऐकून । एक सज्जन तेथें आला ॥३४॥
त्याणें सर्व जाणून । तोडूनी त्याचें नेत्रबंधन ।
त्याच्या देशाची खूण । दिग्दर्शन करूनी दाविली ॥३५॥
दावितां मग तो मेधावी । दिग्दर्शनें धरी पदवी ।
पोंचे आपुल्या गांवीं । समजावें तेंवी येथेंही ॥३६॥
नरा येतां मुमुक्षता । तापत्रयें कळवळतां ।
दया येई गुरुनाथा । जवळी येई कळवळे ॥३७॥
मायापटल तोडून । म्हणे हा स्वदेशमार्ग धरून ।
सावधान करी गमन । असें म्हणून मार्गी लागी ॥३८॥
मग तो त्या मार्गीं चाले । गुरुकृपेनें न भुले ।
स्थान घे आपुलें पहिलें । वेद बोले असें हें ॥३९॥
हा सातवा अभ्यास । गुरुविणें न मिळे मोक्ष खास ।
आतां आठवा अभ्यास । भावें परिस अर्जुना ॥४०॥
येतां नरा अंतकाळ । त्रिदोष वाढे तत्काळ ।
तेणें होई व्याकुळ । प्रतिकूळ झाल्यानें ॥४१॥
मग इंद्रियें ओढ घेती । मनामध्यें लपती ।
मनाचीही होई गती । प्राणामध्यें तत्काळ ॥४२॥
प्राण तेजामध्यें होय लीन । तेजही जाई मिळोन ।
परदेवता रूपीं जाण । मग कोण कोणा जाणेल ॥४३॥
स्त्रीपुत्र जवळी रडती । मला पहा पहा म्हणती ।
तरी न फिरे मागुती । दृष्टी ती लीन झालेली ॥४४॥
तेवीं अभ्यास करितां । देहभानही उडतां ।
इंद्रियांची लीनता । होई चित्तामध्यें ती ॥४५॥
चित्त प्राणामध्यें लपे । प्राण तेजामध्यें लपे ।
तेज परदेवतेमध्यें लपे । अनुकूलरूपें अभ्यासें ॥४६॥
मग एक रस बाणे । तेव्हां कोणा कोण जाणे ।
जरी विस्मृती होय मरणें । पुन: शिणे जन्ममरणीं ॥४७॥
अभ्यासें रूपीं होय लीन । नराचें हरपे देहभान ।
त्याला नये मरण । आणि जनन पुनरपि ॥४८॥
हा अभ्यास आठवा । आतां ऐक नववा ।
चोरे केली म्हणूनी मानवा । धरून नेती राजदूत ॥४९॥
तो न होतां कबूल । हातीं धरवीती तप्त शूल ।
तेणें हात जळे तात्काळ । पापफळ हें असे ॥५०॥
मग त्यासी दंडिती । जरी धरितां शूल हातीं ।
चोरी न होतां सत्यता येती । जाळूं न दे त्याच्या हाता ॥५१॥
न जळतां त्याचा हात । सोडूनी देती राजदूत ।
तेंवी निरभिमानी जो निर्लिप्त । तया मुक्त करी यम ॥५२॥
तो या उभय लोकांतूनी । जायी मग सुटोनी ।
हा नववा अभ्यास मनीं । निश्चयेंकरूनी धरावा ॥५३॥
प्रत्येक अभ्यासें । तें तूं ब्रह्म आहेस असें ।
छांदोग्यामध्यें सांगितलें असे । तें हें असे दुसरें लिंग ॥५४॥
ब्रह्म असे अतींद्रिय । प्रत्यक्ष प्रमाणा अविषय ।
ब्रह्म तें निरंश होय । अनुमानागम्य आहे तें ॥५५॥
ब्रह्म अद्वितीय म्हणूनी । उपमा नसे त्रिभुवनीं ।
केवळ वेदांत वाक्येंकरूनी । धरिती ध्यानीं मिळतसे ॥५६॥
त्याला म्हणती शब्द प्रमाण । अखंडैकार्थरसज्ञान ।
शाब्दें होय नरा जाण । ही खूण तिसर्या लिंगाची ॥५७॥
एवं विज्ञान होतां । प्रारब्ध भोगूनीं सरता ।
ये विदेहकैवल्यता । चौथें लिंग हें म्हणती ॥५८॥
सृष्टी स्थिती प्रलय जाण । प्रवेश पदार्थशोधन ।
नियमन फल जाण । सात हे अर्थवाद ॥५९॥
हे सात मिळोन । अर्थवाद एक जाण ।
सर्वाची उत्पत्ती ब्रह्मापासून । ब्रह्मरूपी स्थिती होय ॥६०॥
ब्रह्मरूपी प्रळय जाण । जीवरूपें करी प्रवेशन ।
एक व्यापक असून । प्रवेश करी सर्वदेहीं ॥६१॥
बिंबप्रतिबिंबन्यायें जरी । हा प्रवेश मानावा तरी ।
ब्रह्म अरूप निर्विकारी । कवण्यापरी प्रतिबिंबलें ॥६२॥
ब्रह्म असे अपरिच्छिन्न । त्याचा शरीरामध्यें जाण ।
प्रवेश होतो त्याची खूण । वेदांतनुपुण वदती ही ॥६३॥
जें पाहणें ऐकणें । हुंगणें चाखणें बोलणें ।
घेणें देणें जाणें येणें । मल सोडणें रति घेणें ॥६४॥
व्हावया हे व्यवहार । जें कारण अगोचर ।
त्याच रूपें साचार । ब्रह्म शरीरप्रविष्ट म्हणती ॥६५॥
ब्रह्मची स्वयें आपण । सर्वांचें करी नियमन ।
तत्त्वंपदार्थ शोधितां जाण । ब्रह्म एक लक्ष होय ॥६६॥
होतां पूर्ण विज्ञान । सर्व कामना होती पूर्ण ।
ब्रह्मज्ञानाचें हें फळ जाण । अंतीं निर्वाण निश्चळ ॥६७॥
हे सात अर्थवाद मिळोन । एक पांचवें लिंग जाण ।
सहाव्याचें करीं श्रवण । उपपत्ती म्हणून जें असे ॥६८॥
घडा होण्यापूर्वीं माती । मध्येंही व्यापून असे ती ।
घडा फुटतां अंतीं । हो ती माती पूर्ववत ॥६९॥
एक घडा पारखतां । सर्वमृद्विकार ओळखी ज्ञाता ।
जेथें ये आकारता । नाम तेथें येतसें ॥७०॥
तसें हें ब्रह्म जाण । याचें होतां ज्ञान ।
सर्व ये कळोन । हें सहावें लिंग जाण ॥७१॥
यांही श्रवण करावें । तात्पर्य तें चितीं घ्यावें ।
मग संशय नाश पावे । करितां भावें श्रवण हें ॥७२॥
आतां ऐक वाक्यविवरण । तत्पदें परब्रह्म जाण ।
त्वंपदें प्रत्यक् ब्रह्म म्हणून । श्रुती वचन प्रसिद्ध असे ॥७३॥
अंत:करण आणि त्याच्या वृत्ती । साक्षीपणें ज्याला कळती ।
ज्याची चैतन्यमूर्ती । त्वंपदार्थ तो जाण ॥७४॥
घटद्रष्टा घटाहून । वेगळा जसा तसा जाण ।
देहद्रष्टा देहाहून । असे भिन्न तो त्वंपदार्थ ॥७५॥
स्वप्रीत्यर्थ ज्याला पुत्रादिक । तत्प्रीत्यर्थ आपण न हो ऐक ।
स्वात्मा प्रियतम ज्याला एक । सुखरूप तो त्वंपदार्थ ॥७६॥
मीं असावें हें वाटे । ज्याचें स्वप्रेम न तुटे ।
जरे देहही सुटे । तरी न तुटे स्वप्रेमबंध ॥७७॥
मनाचें जाणें येणें । बुद्धीचे भाव अनुक्षणें ।
जाग्रत्स्वमनिद्रालक्षणें । जो जाणें तो त्वंपदार्थ ॥७८॥
स्वयें विकारी न होतां । बुद्ध्यादिकां खेळवितां ।
लोहचुंबकापरी जो चेता । तो त्वंपदार्थ जाणावा ॥७९॥
देहेंद्रियादि संघात । हे सर्व जड होत ।
ह्याला जो वागवी सतत । त्वंपदार्थ तो जाणा ॥८०॥
जो बोध साक्षीलक्षण । त्वंपदार्थ तो जाण ।
बोत्धृत्व आनि साक्षिपण । निर्विकारपणें जयाला ॥८१॥
देहेंद्रिय मन:प्राण । आणि अहंकार यांहून ।
जो सर्वथा असे भिन्न । निर्विकारपणें जयाला ॥८२॥
हा होय त्वंपदार्थ । आतां सांगतो तत्पदार्थ ।
हा जानता यथार्थ । सर्वानर्थ नष्ट होती ॥८३॥
तत् म्हणजे ब्रह्म एक । अतत् म्हणजे द्वैत अनेक ।
तें दूर करणें देख । अतत् व्यावृत्ती तिला म्हणती ॥८४॥
अतत् व्यावृत्तीरूपानें । आणि साक्षात् विधिमुखानें ।
तत्पदार्थ जाणणें । ब्रह्म होणें निजांगें ॥८५॥
तो विष्णु संसारधर्मरहित । स्थूलसूक्ष्मादिचिन्हवर्जित ।
अदृश्यत्वादि गुणयुक्त । तत्पदार्थ तो जाण ॥८६॥
ज्याच्या आनंदा नाहीं सीमा । जो सच्चिदानंदात्मा ।
ज्याला म्हणती परमात्मा । तो भूमा तत्पदार्थ ॥८७॥
जयाला सर्वज्ञत्व । जया असे सर्वेश्वरत्व ।
जया सर्वशक्तिमत्व । जया समत्व तत्पदार्थ तो ॥८८॥
ज्याच्या ज्ञानें सर्व कळे । ज्याचें अनंतत्व न चळे ।
प्रपंचकार्य शक्तिबळें । करी तोचि तत्पदार्थ ॥८९॥
जीवरूपीं सर्व शरीरीं । अविकारी जो प्रवेश करी ।
सर्वांचें नियमन करी । तो अवधारी तत्पदार्थ ॥९०॥
जीवां कर्मफळें देई । स्वयें अलिप्त आपण होई ।
जो परोक्ष अमृताची पोयी । तो होई तत्पदार्थ ॥९१॥
सर्वज्ञ परोक्ष तत्पदें । किंचिज्ज्ञ अपरोक्ष त्वंपदें ।
वर्णिलें असें वेदें । या भेदें ऐक्य कसें ॥९२॥
असें म्हणशी तरी ऐक । तो हा देवदत्तनामक ।
येथें तो हा ह्या पदां एक । देवदत्त देख आधार ॥९३॥
तत्पदें तो देश गतकाल । हा ह्या पदें हा देश वर्तमानकाल ।
दोनी विरुद्ध टाकुनी केवळ । घेती आधार निश्चळ देवदत्त ॥९४॥
जो पूर्वी देखिला काशींत । राज्य करी तारुण्यांत ।
तो हा भ्रष्टराज्य वृद्ध येथ । देवदत्त लक्ष्यार्थ एक ॥९५॥
दोनी अवस्था दोनी काळ । दोनी देश टाकितां केवळ ।
देवदत्त एक निश्चळ । लक्षणावृत्या जसा कळे ॥९६॥
तेंवी किंचिज्ज्ञत्व सर्वज्ञत्व । अपरोक्षत्व आणि परोक्षत्व ।
जीवेश्वराचें टाकूनी एकतत्व । लक्ष्यार्थ रूप तें घ्यावें ॥९७॥
सुखी दु:खी कर्ता भोक्ता । किंचिज्ज्ञ अपरोक्षादि हे तत्वता ।
त्वंपदाचे वाच्यार्थ आतां । लक्ष्यार्थ तुज सांगेन ॥९८॥
असज्जडदु:खरूप देहादिक । तत्प्रतिकूल सच्चिदानंद रूपक ।
प्रत्यगात्मा स्वयंप्रकाशक । लक्ष्यार्थ तो एक त्वंपदाचा ॥९९॥
ज्याचे सर्वज्ञत्वादि गुण । तो तत्पदवाच्यार्थ जाण ।
जें सत्यज्ञानानंदादिलक्षण । तें लक्ष्यार्थ जाण तत्पदाचें ॥१००॥
लक्ष्यार्थें ये अविरोध । वाच्यार्थें असे विरोध ।
म्हणूनी लक्षणावृत्ती निर्वाध । अखंडैकरसबोध करीतसे ॥१०१॥
जी स्वार्थत्याग करी । ती जहल्लक्षणा निर्धारी ।
गंगेवर गोठा येथें ज्यापरी । स्वार्थ सोडूनी तीरलक्षणा ॥१०२॥
लक्षार्थ एक असल्यामुळें । जहल्लक्षणा एथें न जुळे ।
स्वार्थ न सोडितां अन्य घेई बळें । अजहल्लक्षणा ती होय ॥१०३॥
कावळ्यापासूनी दही राख म्हणतां । त्याला कुत्र्यानें खावूं येतां ।
त्यांचेंही निवारण करिजेल तत्वता । ती अजहल्लक्षणा होय ॥१०४॥
जे विरुद्ध लक्ष्यार्थ । ते न सोडितां ये अनर्थ ।
ह्मणूनी जी करी स्वार्थ । जहदजहल्लक्षणा ती घ्यावी ॥१०५॥
विरुद्धांश तत्वंपदाचे । सोडूनी अविरुद्धांश त्यांचे ।
घ्यावा हें तत्व वाक्याचें । जाणती साचे ते तरती ॥१०६॥
तें ब्रह्म मी असें । मी तें ब्रह्म असें ।
शिष्यें जाणावें असें । सांगतसे हें महावाक्य ॥१०७॥
योगाभ्यासें मन । स्थिरवूनी हें करितां ध्यान ।
तत्काळ तुटोनी बंधन । मिळें स्थान अढळ जें ॥१०८॥
इति श्रीमत्परमहंसवासुदेवानंदसरस्वतीकृते श्रीदत्तमाहात्म्ये त्रयोदशोsध्याय: ॥१३॥
N/A
References : N/A
Last Updated : April 26, 2016
TOP