मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य|
अध्याय ३६ वा

श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ३६ वा

श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य


श्रीदत्तात्रेयाय नम: ॥॥
गुरु म्हणे दीपका । असा उपदेश अलर्का ।
केला उद्धारावया लोकां । गुरुनाथानें दयेनें ॥१॥
असें ऐकूनी अलर्क । मनीं मानी बहु तोख ।
होऊनी गुरुसन्मुख । प्रश्न करी भावार्थें ॥२॥
जय जय दीनबंधो । जय जय कृपासिंधो ।
चित्तचातकविधो । परम साधो तुज नमो ॥३॥
जय जया दयाघना । बोधानें माझ्या मना ।
पाववीलें समाधाना । आतां वासना नुठेची ॥४॥
मृत्युकाळ जाणूनी । प्रणवा उच्चारूनी ।
ह्या शरीरा सोडूनी । जाण्याचें उपदेशिलें ॥५॥
लोकां म्रुत्यु येतो सहसा । तो जाणावा कसा ।
तो कळतां तसा । करिजेल उपाय ॥६॥
ऐकोनी अलर्काचें वचन । बोले अत्रिनंदन ।
म्हणे ऐक सावधान । मृत्युलक्षण सांगतों ॥७॥
आपुल्या लग्नापासून । द्वितीय तृतीय स्थान ।
सप्तम अष्टम स्थान । मारक स्थान बोलती ॥८॥
यांचे जे अधिपती । ते त्या स्थानीं असती ।
त्यांत जो बलिष्ठ अती । त्याच्या दशांतीं ये मृत्यु ॥९॥
किंवा मारकाबरोबर । असे अरिष्टकर्ता क्रूर ।
तो होई प्राणहर । ज्योति:शास्त्रमत हें ॥१०॥
किंवा धारणा करून । होतसे कालज्ञान ।
येतसे मृत्यू कळून । हें योगज्ञ जाणतसे ॥११॥
ज्योति:शास्त्र नेणें । योगाभ्यासही न जाणे ।
वक्ष्यमाण मृत्यूलक्षणें । जाणावीं त्याणें सादर ॥१२॥
एक वर्षाचे आंत । मृत्युचिन्हें येथ ।
सांगतों समस्त । अनुभूत असती जीं ॥१३॥
नासिकेच्या समोर । शिरी धरावा कर ।
तो सूक्ष्म न दिसे तर । एक संवत्सर आयुष्य ॥१४॥
स्वनासिकाग्र न दिसे । जिव्हाग्रही तसें ।
म्रूमध्यही न दिसे । वर्ष आयुष्य असे त्याचें ॥१५॥
गंगाप्रवाहवत । आकाशीं जें दिसत ।
तो देवमार्ग म्हणती संत । तो जरी न दिसे ॥१६॥
अथवा न दिसे शुक्रतारा । किंवा ध्रुवाची तारा ।
किंवा अरुंधती तारा । ज्या नरा न दिसती ॥१७॥
त्याच्या आयुष्याची मिती । एक वर्ष बोलती ।
वर्षाचे उपरांतीं । त्याची स्थिती न होईल ॥१८॥
सूर्य दिसे रश्मिरहीत । अग्नीं भासे रश्मिसहित ।
अकरा मास निश्चित । त्याचें जीवित जाणावें ॥१९॥
स्वर्ण रौप्य मळ मूत्र । स्वप्नीं ओकिलें पाहे नर ।
तो दशमासोत्तर । न वांचे निर्धार जाणावा ॥२०॥
ज्याचे जागेपणीं । भूत प्रेत ये दिसूनी ।
गंधर्वनगरें देखें नयनीं । नवमासांनीं मरेल तो ॥२१॥
किंवा वृक्षजाती । सुवर्णवर्ण दिसती ।
त्यालाही नवमासांतीं । ये मृती निश्चित ॥२२॥
त्याचा स्वभाव पालटे । कृश स्थूळ स्थूळ कृश वाटे ।
तया आठ मासांनीं नेटें । मृत्यु भेटे निश्चित ॥२३॥
भस्म धूळ किंवा चिखल । यांत चलतां पाऊल ।
ज्याचें न उमटे सकळ । दिसे केवळ खंडसें ॥२४॥
बोटें अथवा खोंट । ज्याचें न उमटे नीट ।
काळ धरी त्याची पाठ । सात मास वांचेल तो ॥२५॥
मस्तकीं स्पर्शे गीधडा । कावळा किंवा कवडा ।
किंवा काळा पक्षी चवडा । मारी मुंडावरी ज्याच्या ॥२६॥
किंवा मांसभक्षक । पक्षी मस्तकीं स्पर्शी एक ।
सहा मास अवधिक । आयुष्यलेख तयाचा ॥२७॥
वस्त्र नसोनी जरी । कावळा मस्तकावरी ।
चोंच किंवा पाद मारी । पांच मासांतरीं मरेल नर ॥२८॥
विरूप दिसे स्वच्छाया । उगीच घेई भया ।
चार मासांनीं तया । ये मृत्यु या लक्षणें ॥२९॥
दक्षिन दिशेस नयनीं । आभाळ नसोनी ।
बिजली ये देखूनी । तीन मासांनीं मरेल तो ॥३०॥
इंद्रधनुष्याचेपरी । जरी दिसे जळांतरीं ।
तरी तीन मासांवरी । न वांचे निर्धारीं हे नृपा ॥३१॥
ज्याचा देह आरशांत । किंवा दिसे जळांत ।
मस्तकानें विरहित । दो मासांत मरेल तो ॥३२॥
शवासारखा ज्याचे अंगीं । दुर्गंध ये सर्वांगीं ।
उदक पितां वेगीं । टाळू वाळे जयाची ॥३३॥
जाण तया मनवास । जातां पंध्रा दिवस ।
काळ गांठील खास । येथें विश्वास ठेवावा ॥३४॥
स्नान करितां हृदय । तात्काळ शुष्क होय ।
तयाचें आयुष्य । दहा दिवस राहिलें ॥३५॥
वायू भेदी मर्मस्थान । घेतां चंद्रकिरण ।
जया वाटती उष्ण । दश दिन वांचेल तो ॥३६॥
काळें किंवा रक्त । वस्त्र नेसूनी हंसत ।
अथवा नारी गात । नेई हात धरोनी ॥३७॥
जाई दक्षिण दिशेस । नग्न क्षपणक जयास ।
स्वप्नीं दिसे तयास । दहा दिवस आयुष्य ॥३८॥
तेलानें माखून । स्वप्नीं नर येऊन ।
जया देई दर्शन । तया मरण जवळी ॥३९॥
स्वप्नीं आपण चिखलांत । मग्न होई कीं गोमयांत ।
त्याच्या देहाचा अंत । होई त्वरित निश्चयें ॥४०॥
स्वप्नीं अस्थि अंगार केश । अथवा पाहे भस्मास ।
किंवा क्रुद्ध सर्पास । मृत्यू तयास त्वरित ये ॥४१॥
स्वप्नी पाहे जमीन । वाळून गेली फुटोन ।
तयाचे सन्निधान । मृत्यू बसून राहिला ॥४२॥
स्वप्नीं कराल विकट । पुरुष दिसे निकट ।
दांत खाई कटकट । मारी उद्धट होऊनी ॥४३॥
हातीं शस्त्र घेऊनी । अथवा मारी पाषाणांनीं ।
तयाचे संनिधानीं । मृत्यू येऊनी राहिला ॥४४॥
सूर्योदयीं ज्याचे पुढें । भालू ओरडे गाढें ।
किंवा देई डावे वेढे । तया मृत्यू पातला ॥४५॥
जेवतांही जयास । क्षुधा अत्यंत वाटे तयास ।
मृत्यू पातला खास । व्रणदंत होतां तसाची ॥४६॥
गंध नेणें अग्नीचा । किंवा धूम अग्नीचा ।
हुंगून न कळे तयाचा । अंतकाळ पातला ॥४७॥
दुसर्‍याचिया नेत्रीं । पाहतां न दिसे जरी ।
आपुली बाहुली तरी । मृत्यू दूरी नाहींच ॥४८॥
इंद्रधनू रात्रीस । दिवा देखे भगणास ।
मृत्यू सत्वर तयास । गांठी खास जाणावें ॥४९॥
रोगपीडा नसूनी । हीं चिन्हें येती दिसूनी ।
तरी त्याला काळ येऊनी । ग्रासी हें मनीं ठेवावें ॥५०॥
जरी रोगी झाल्यावर । चिन्हें दिसती जर ।
तरी मृत्यू नाहीं दूर । हा निर्धार जाणावा ॥५१॥
रोग होऊनी जरी । हीं चिन्हें दिसती तरी ।
मृत्यू ये लवकरी । निवारी जरी ईश्वरही ॥५२॥
स्रवे डावा नेत्र । वक्र होई नासिकाग्र ।
कर्णांत होतां थंडगार । मृत्यू सत्वर येईल ॥५३॥
जिव्हाग्र काळें होतां । मुख आरक्त होतां ।
इंद्रियें आंत जातां । तत्काळ मृत्यू ॥५४॥
आपण रोगी असून । खरोष्ट्रयानीं बसून ।
स्वप्नीं करी दक्षिणदिग्गमन । तो तत्काळ मरेल ॥५५॥
किंवा स्वप्नीं येऊन । दुसरे करिती बंधन ।
अथवा नेती ओढून । तो मरे तत्काळ ॥५६॥
घट्ट धरितां कान । ऐकू ये जो स्वन ।
तो बंद होतां जाण । आसन्न मरण तयाचें ॥५७॥
डोळ्याचे पात्यावरी । बोट दाबितां तेजापरी ।
जी ज्योती दिसे भारी । ती जरी न दिसेल ॥५८॥
किंवा भ्रांत होऊनी दृष्टी । होई उफराटी ।
बेंबी सच्छिद्र जाय पोटीं । त्याची भेटी पुन: नोहे ॥५९॥
रोगग्रस्त असूनी । जो पाहे स्वप्नीं ।
बळें भूतांनीं येवूनी । मारिला आपणातें ॥६०॥
अथवा स्वप्नीं चिखलांत । अथवा आपण उदकांत ।
किंवा प्रदीप्त अग्नींत । पडलों असें जो पाहे ॥६१॥
असा अडचणींत पडून । बाहेर न येतां तेथून ।
जागा होई त्याचें जीवन । संपलें जाण नि:शेष ॥६२॥
असीं मृत्यूचीं लक्षणें । जाणावीं विचक्षणें ।
सोडोनियां भेणें । ध्यान त्यानें करावें ॥६३॥
अमर असे कोण । सर्वां ये मरण ।
त्याचें भय न धरून । करावें ध्यान निश्चयें ॥६४॥
जो शरीर राखीतसे । त्याला मृत्यू हंसतसे ।
मी सर्वत्र वसें । मग कसें राखील म्हणे ॥६५॥
( श्लोक ) ॥ ( गारुडे ) प्राप्तं मृत्युं न जयति बालो वृद्धो युवापि वा ।
मृत्यु: शरीरगोप्तारं वसुरक्षं वसुंधरा । दुश्चारिणीव हसति स्वपतिं पुत्रवत्सला ॥६६॥
म्रुत्यु अढळ जाणून । सर्व भय सोडून ।
करून एकाग्र मन । निश्चयें ध्यान करावें ॥६७॥
असें मरेपर्यंत । ध्यान करावें सतत ।
सूत्रकार आप्रायणात् । असें निश्चित बोलतसे ॥६८॥
जरी प्रतिबंध नसे । तरी तेथें मुक्त होतसे ।
जरी कां प्रतिबंध असे । तया मुक्ती जन्मांतरीं ॥६९॥
व्यर्थ न जाई अभ्यास । वेदसिद्धांत हा खास ।
म्हणोनी रात्रंदिवस । योगाभ्यास करावा ॥७०॥
दैवें न होतां ज्ञान । आलें जरी मरण ।
तो योगभ्रष्ट जाण । घे निर्वाण जन्मांतरीं ॥७१॥
जे अभ्यास करिती । ते दैवें मध्येंच मरती ।
तरी तया न होई दुर्गती । ये सद्गती याज्ञिकांपरी ॥७२॥
अश्वमेधादि करून । जें मिळें याज्ञिकां स्थान ।
योगभ्रष्ट तेथें जाऊन । भोग भोगून ये येथें ॥७३॥
तो पूर्वसंस्कारानें । पुन: अभ्यासानें ।
तो मुक्त होई ज्ञानें । हें निश्चयानें सांगें मी ॥७४॥
येतां अंतकाल । आसन घालावें निश्चल ।
देह धरावा अचल । मन चपल न करावें ॥७५॥
डावी खोंट गुदावरी । उजवा पाय मांडीवरी ।
ठेवून अपान वरीवरी । पुन: पुन: खेचावा ॥७६॥
हनू ठेवून उरीं । बोटें सप्तरंध्रांवरी ।
धरूनियां अंतरीं । मन वश्य ठेवावें ॥७७॥
इंद्रियें मनांत । लीन करावीं समस्त ।
तें मन प्राणांत । अस्तंगत करावें ॥७८॥
पंचप्राण एकवट । करूनी मधली वाट ।
धरूनी जावें नीट । धीट होऊनी ॥७९॥
ओंकार उच्चारूनी । परमात्म्या चिंतूनी ।
मूर्धस्थान भेदूनी । घ्यावी मुक्ती ॥८०॥
रात्रौ दिवा असतां । अकस्मात उठतां ।
द्वारभ्रम नोहे चित्ता । त्यापरी येथें जाणवें ॥८१॥
योगाभ्यासें प्रकाशित । द्वारें असतां समस्त ।
योगी घरी सुषुम्णापंथ । जो परमार्थ देतसे ॥८२॥
म्हणोनी सोडावा आळस । करावा नित्य अभ्यास ।
मोक्ष मिळे तयास । हें खास सांगतों ॥८३॥
जंवर उभें घर । मुंग्या घुशी उंदीर ।
राहती करूनी बिढार । मोडतां घर पळती ते ॥८४॥
तसे संसारीं जन । स्त्री पुत्रादिक जाण ।
आशेनें होतां तदाधीन । मरतां क्षण न ठरती ॥८५॥
अशांची कासया संगती । जे पुण्य धन लुटती ।
अंतीं सोडूनी जे जाती । साथी न होती अंतकाळीं ॥८६॥
आणूनी देतां अभीष्ट । म्हणती आमुचा हा इष्ट ।
आपण ठकतां स्पष्ट । ना ऐकती गोष्ट एकही ॥८७॥
रोगें पराधीन होतां । म्हणती मग हा आतां ।
सत्वर जरी मरतां । तरी बरें होतें ॥८८॥
त्याचा मानिती त्रास । कुत्र्याप्रमाणें देती ग्रास ।
म्हणती थुंकोनी घरास । याणें दूषित केलें हो ॥८९॥
जयां नये काकुळती । अंतीं वैरीसे होती ।
तयांची कासया संगती । आपुली गती पाहावी ॥९०॥
जरी न घडे विशेष । तरी थोडा थोडा अभ्यास ।
घडे तरी सावकास । करावा खास उत्साहें ॥९१॥
वाळवी तोंडानें जसी । करी मृत्तिका राशी ।
ती उपमा योगासी । योजी तयासी सिद्धि ये ॥९२॥
मुंगी तांदुळ घेऊनी । जाई पुन: पुन: पडूनी ।
ती उपमा घेऊनी । ध्यानीं उमेद ठेवावी ॥९३॥
किड्यानेंही तोडितां । जसा वृक्ष ये वरतां ।
तसी विघ्नेंही येतां । धेर्यें करितां योग साधे ॥९४॥
वत्सांचीं शिंगें जसी । क्रमें वाढती तसी ।
योगसिद्धि योगियासी । अनुक्रमेंसी येतसे ॥९५॥
जाग्रत्स्वप्नीं जो भासक । इंद्रियांचा चालक ।
तोचि आत्मा एक । सच्चित्सुख चिंतावा ॥९६॥
जसा कीट भ्रमरा । चिंतितां पावे तदाकारा ।
न सोडितां त्या शरीरा । योगीश्वरा ती उपमा ॥९७॥
जीव ब्रह्म असून । करितां ब्रह्मध्यान ।
स्वयें ब्रह्म होऊन । घे निर्वाण निश्चयें ॥९८॥
त्रिकाल साधूनी । अभ्यास करूनी ।
राहे जो सदा मुनी । भवा जिंकून जाई तो ॥९९॥
वाढावया अभ्यास । भजावें ईश्वरास ।
न होतां सायास । सिद्धी खास मिळेल ॥१००॥
कार्या करितां धनी । बेगरी मिळवूनी ।
घे कार्य करूनी । साक्षी होऊनी स्वयें जेवी ॥१०१॥
तेवी इंद्रियें घेऊन । होऊनी सावधान । त्याकरवीं स्वसाधन ।
घ्यावें  नित्य साधून । अनुमान न करावें ॥
जेवीं बेगार्‍यांवरी जसा । मुकादम ठेविती तसां ।
इंद्रियांवरी मानसा । योजितां इंद्रियें वावरती ॥१०२॥
जेवीं बेगार्‍यांहून । मुकादमां विशेष धन ।
देती त्या न्यायानें । प्रसन्न मन ठेवावें ॥१०३॥
मना पाहिजे सुंदर । त्रिभुवनीं रुचिर ।
माझ्या रूपाहुनी इतर । नसे निर्धार जाण तूं ॥१०४॥
म्हणूनी माझें स्वरूप सगुण । असे परम शोभन ।
इकडे लावितां मन । योग साधून येतसे ॥१०५॥
इति श्रीदत्तमाहात्म्ये षट्त्रिंशोsध्याय: ॥३६॥
॥ श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : May 04, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP