मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य|
अध्याय २४ वा

श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय २४ वा

श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य


श्रीदत्तात्रेयाय नम: ॥
गुरु म्हणे दीपका । मनीं आणूनी विवेका ।
निवारूनियां शोकां । कर्म करी मातेचें ॥१॥
श्रीदत्त मुनिवर्य । ज्या नमिती आर्य ।
ज्यांना ध्याती योगिवर्य । स्वत: आचार्य ते झाले ॥२॥
करविती मृत्तिकास्नान । वर्धमान अंजलिदान ।
अवयवपिंडदान । यथाविधान करविती ॥३॥
सर्व क्रिया करवून। रामा म्हणे अत्रिनंदन ।
माता पिता हे दोघेजण । कुठें गेले जाणसी कीं ॥४॥
राम म्हणे ते मेले । या क्रियेनें उद्धरिले ।
तुम्हीं तयां तारिलें । नेलें उत्तमलोकाप्रती ॥५॥
धन्य माझी माता । धन्य माझा पिता ।
आपण क्रिया करवितां । यापरता काय मोक्ष ॥६॥
दत्त म्हणे रामासी । तूं देखोदेख भुलसी ।
कीं प्रत्यक्षप्रमाणासी । मानसी मानसीं वाटतें ॥७॥
जे सृष्टि स्थिती संहार । करिती ते गौरीहर ।
उपजले भूमीवर । मुनीश्वरवेषानें ॥८॥
ईश्वरी जी जगदंबिका । ती तुझी माती रेणुका ।
ईश्वर जो तारी लोकां । हो का पिता जमदग्नि ॥९॥
भूमीवरी अवतरून । नाना धर्म स्थापून ।
कृतकार्य होऊन । अंतर्धान पावले ते ॥१०॥
ते येथें जन्मले । अथवा मरण पावले ।
अथवा स्वर्गा गेले । हें फोल बोलणें ॥११॥
जे सर्वत्र असती । ते येती ना जाती ।
ते येथें आतां कीं नसती । व्यापून असती सर्व जे ॥१२॥
जरी तों इच्छिसी । तरी दावितों तयांसी ।
राम म्हणे दत्तासी । दावा तयांस पाहीन ॥१३॥
असें जंव दोघे बोलती । तंव ते दोघे दिसती ।
दत्त म्हणे रामाप्रती । पाहे हे माता तात तुझे ॥१४॥
पद्मासन घालून । अंगी भस्म चर्चून ।
जटाजूट बांधून । बसे समाधान जमदग्नि ॥१५॥
कंठीं रुद्राक्ष शोभती । गोमुखी धरूनी हातीं ।
दृष्टी करूनी वरती । एकाग्रचित्तीं ध्यान करी ॥१६॥
रुद्राक्ष कुंडलें कानीं । रुद्राक्षभूषणें लेवूनी ।
वल्कलांबर नेसूनी । अजिन पांघरूनी बैसला ॥१७॥
वामभागीं रेणुका माता । सर्वाभरणभूषिता ।
दिव्य कांती लावण्यसरिता । सौभाग्यभूषिता विराजे ॥१८॥
सुटे सुगंध अंगाचा । तेथें जमान झाला भ्रमरांचा ।
पुंज दिसे तेजाचा । अंधकाराचा नाश करी जो ॥१९॥
नखें दिसती अर्धचंद्रापरी । दंत झळकती हिर्‍यांपरी ।
तिच्या लावण्याची सरी । कोण करी जगांत ॥२०॥
रेणुका सुहास्यवदन । पहातसे पतीचें वदन ।
जे सुखाचें सदन । कीं भुवन सुकृतांचें ॥२१॥
याप्रमाणें तयां । राम तो पाहूनियां ।
पावला अत्याश्चर्या । आलिंगाया धांवला ॥२२॥
राम तेथें येऊन । धरूनी दृढ चरण ।
रडे स्फुंदस्फुंदोन । देहभान सोडूनी ॥२३॥
म्हणे कां मज सोडूनी । तुम्ही राहतां लपोनी ।
माझा प्राण तुम्हांवांचूनी । कसा वांचेल सांगा ॥२४॥
असा प्रेमाश्रू टाकून । राम घेई लोळण ।
तंव ते दोघेजण । गुप्त होऊन राहिले ॥२५॥
जातां ते लपून । राम मनीं झाला खिन्न ।
दरिद्र्यांचें धन । हरवताम प्राण कळवळे जसा ॥२६॥
दत्त म्हणे रामासी । अविचारें या मोहासी ।
तूं का व्यर्थ कळवळसी । भूल कसी घेसी हे ॥२७॥
कवण रे तुझी माता । बोल रे कोण तुझा पिता ।
तूं ओळखी आपणा आतां । मोह ममता सोडूनी ॥२८॥
म्हणे राम हें वचन । यथार्थ मानी माझें मन ।
परी मातृस्नेहबंधन । तोडील कोण कवणेपरी ॥२९॥
देतां ब्रह्मांडदान । एक घडीचे स्तनपान ।
सर्वथा नोहे समान । विशेष याहून काय बोलूं ॥३०॥
असें बोलुनी दु:ख । राम टाकी अधोमुख ।
तंव रेणुकेचें मुख । भूमी भेदुनी प्रगटलें ॥३१॥
राम अश्रु पुसोन । पुढें करे वदन ।
मुख दे रामा चुंबन । राम समाधान पावला ॥३२॥
दत्त म्हणे ही माता हा सुत । ज्याच्या स्नेहा नाहीं अंत ।
काय करावा नि:स्नेहसुत । केवळ जंत होतसे ॥३३॥
अद्यापी सर्व लोक । पूजिती रेणुकेचें मुख ।
जें दर्शनें वारी दु:ख । परम सुख देई जें ॥३४॥
मातापुरीं जाऊन । मातृतीर्थीं न्हाऊन ।
रेणुकामुखदर्शन । करितें पावन उभयलोकीं ॥३५॥
दत्त म्हणे रामासी । सत्य करे प्रतिज्ञेसी ।
जिंकी अधार्मिकांसी । विजय घेसी मत्प्रसादें ॥३६॥
मग राम भृगुनंदन । श्रीदत्ता वंदून ।
प्रणीतेमध्यें स्नान करून । संकल्प करिता झाला ॥३७॥
हातीं परशू घेऊन । क्षत्रियांचें करी हनन ।
मार देई तीक्ष्ण । कठोर मन जयाचें ॥३८॥
कुरुक्षेत्रीं भूपातें । बोलावूनी युद्धातें ।
बळें संहारी सर्वांतें । रोषावेशेंकरूनी ॥३९॥
धर्नुर्विद्याप्रवीण । शस्त्रास्त्रीं निपुण ।
तेही करितां रण । टाकिती प्राण धाकानें ॥४०॥
क्षत्रियांच्या कुटुंबिनी । जरी कां असती गर्भिणी ।
रामाची गर्जना ऐकूनी । गर्भ टाकूनी ऐकती धाकें ॥४१॥
असें एकवीस वेळ । युद्ध करूनी प्रबळ ।
क्षत्रियांचें सर्व कुळ । मारी दळभारेंसी ॥४२॥
असें क्षत्रियां मारूनी । त्यांच्या रक्तेंकरूनी ।
पांच तळीं भरूनी । तर्पण करी राम तो ॥४३॥
त्या कालापासूनी । स्यमंतपंचक म्हणुनी ।
कुरुक्षेत्रीं प्रसिद्ध होऊनी । असती दर्शनीं उद्धारक ॥४४॥
मग रोष सोडून । शांतचित्त होऊन ।
सर्व शस्त्रें धुवून । भेटला येऊन दत्तात्रेया ॥४५॥
श्रीदत्ता वंदून । म्हणे तुमच्या तेजेंकरून ।
क्षत्रियांचें केलें हनन । आतां समाधान पावलों ॥४६॥
कोप हा अनिवार्य । यामुळें नेणवे कार्याकार्य ।
डोळां न दिसे आर्यानार्य । पहा अनार्यपणा हा ॥४७॥
म्यां घ्यावया एकाचा सूड । क्षत्रियांचें तोडिलें बूड ।
हा मी केव्हढा मूढ । कोपारूढ व्यर्थं झालों ॥४८॥
एका राजाचा करितां घात । तीर्थयात्रा समस्त ।
मजकरवीं करवी तात । तें मनांत न आणलें ॥४९॥
राजे किती तरी मारिले । तें पाप मज लागलें ।
चित्तीं असे खोचलें । म्हणोनी धरिले चरण हे ॥५०॥
मी आलों शरण । मला करावा पावन ।
म्हणोनी करी नमन । मनीं खिन्न होऊनी ॥५१॥
दत्त म्हणे दुष्ट नृप । मारिले त्यांचा अनुताप ।
कां करिसी हें पाप । नोहे ताप मानूं नको ॥५२॥
दुष्टांचें केलें त्वा हनन । केलें साधूंचें रक्षण ।
केलें धर्माचें स्थापन । हें पप न तव शिरीं ॥५३॥
जरे मनीं मानसी शीण । तरी ऐक माझें वचन ।
ब्रह्मर्षीला बोलावून । करी यज्ञ यथाविधी ॥५४॥
तुझें पाप जाईल । देव संतृप्त होतील ।
विप्रही सुख पावतील । कीर्ती होईल जगीं तुझी ॥५५॥
त्वां मारिलें क्षत्रियांला । स्वबळें विजय घेतला ।
हस्तगत केलें भूमंडळा । भला झालास यशस्वी ॥५६॥
आतां यज्ञ करून । सर्वस्व दे दक्षिणा ।
कश्यपा दे भूदान । होसी पावन तूं खास ॥५७॥
असें वदे अत्रिनंदन । तें रामानें अंगिकारून ।
ऋषिमुनी बोलावून । श्रद्धेनें यज्ञ आरंभिला ॥५८॥
मरीची अत्रि मुनी श्रेष्ठ । अंगिरा ऋतु वसिष्ठ ।
पुलस्त्य पुलह वरिष्ठ । जे प्रेष्ठ परमेश्वरा ॥५९॥
भरद्वाज विश्वामित्र । कश्यप वामदेव पवित्र ।
अगस्त्य गर्ग भृगु तत्पुत्र । जाबालो सुहोत्र गौतम ॥६०॥
हे प्रमुख असती । शिष्यप्रशिष्यांसह येती ।
यज्ञाचा आरंभ करविती । श्रद्धाभक्तिपुर:सर ॥६१॥
भगवान श्रीदत्तात्रेय । असती मुख्य आचार्य ।
तेथें न्यून पडेल काय । साद्गुण्य होय सर्वही ॥६२॥
प्रमादात्कुर्वतां कर्म असें । स्मृतिवाक्य प्रसिद्ध असे ।
यत्स्मरणें सांग होत असे । तो स्वये होतसे आचार्य ॥६३॥
तेथें प्रत्यक्ष देव येती । आपुला हविर्भाग घेती ।
अत्यंत तृप्ती पावते । देव म्हणती धन्य आम्हां ॥६४॥
नित्य होतसे षड्रसान्न । अमित होतसे द्विजभोजन ।
राम देईल वस्त्रें धन । द्विजजन तृप्त झाले ॥६५॥
चातुर्होत्रविधान । करूनियां भृगुनंदन ।
कश्यपाचे पाय धुऊन । करी पूजन श्रद्धेनें ॥६६॥
संकल्प करून । देई कश्यपा भूदान ।
दक्षिणार्थ धनरत्न । देई नंदन रेणुकेचा ॥६७॥
स्वर्णवस्त्रधनेंकरून । करी दत्ताचार्याचें पूजन ।
श्रीदत्तें तें सर्व धन । दिधलें जाण ब्राह्मणांला ॥६८॥
जो दत्त भक्तभावन । त्यासी कासया आचार्यपण ।
काय कीजे दक्षिणा धन । एक सुमत मानी जो ॥६९॥
सर्वा आनंद झाला । दत्त वदे रामाला ।
तूं जगीं हो भला । पुरुषार्थ केला हा मोठा ॥७०॥
तूं बाल असून । दुर्जय क्षत्रिया मारून ।
सर्व लोक सुखी करून । केलास यज्ञ यथाविधी ॥७१॥
हें तुझें यश गातील । ते लोक पवित्र होतील ।
तूं झालास विमल । विपुल पुण्य जोडूनी ॥७२॥
नसतां पाठबळ । अरि असतां विपुळ ।
परी एकटा तूं सकळ । मारिसी खळ निजबळें ॥७३॥
असें अन्य करील कोण । तेव्हां तूं साक्षात् नारायण ।
म्हणोनी केलेंस तुमुल रण । भूप दुर्जन मारिले ॥७४॥
अतएव तूं शूर । अससी खास रणधीर ।
केवळ विष्णू उदार । म्हणुनी संहार झाला हा ॥७५॥
राम म्हणे मी कायसा । प्रसाद हा आपुला असा ।
आपुला अनुग्रह जसा । विजय तसा हा झाला ॥७६॥
असें ते परस्पर बोलती । मुनी जयजयकार करिती ।
हात जोडून म्हणती । तुमची गती तुम्हीच जाणा ॥७७॥
तुम्ही आम्हां दिसता भिन्न । परी एकरूप एकमन ।
करावया लोक पावन । करितां अवतरून ह्या लीला ॥७८॥
असें म्हणूनी वंदिती । आज्ञा घेऊन सर्व जाती ।
असी रामें केली ख्याती । जगती पावन करावया ॥७९॥
श्रीदत्ताचें सख्य करून । राम राहिला संनिधान ।
श्रीदत्त प्रसन्न होऊन । सांगे ज्ञान तयासी ॥८०॥
व्हावया स्वरूपज्ञान । त्रिपुरारहस्य निरूपण ।
करी रामा उद्देशून । दत्त स्वजन उद्धरावया ॥८१॥
ज्याचें करितां श्रवण । होई भ्रमनिरसन ।
कळून ये स्वरूप पूर्ण । उपनिषद्गणरहस्य जें ॥८२॥
दत्त म्हणे रामासी । तूं माझा सखा झालासी ।
मला चिंतूनी मानसीं । जाई तपासी यथेष्ट क्षेत्रीं ॥८३॥
तुझे ठायीं ठेविलें जाण । तें तेज मी पुन: ।
अवतारोनी घेईन । मग तूं ब्राह्मण होशील ॥८४॥
वैवस्वत मन्वंतर । हें सरे तंववर ।
धरूनी सागरतीर । राहे विप्र होऊनी ॥८५॥
सावर्णिकमन्वंतरीं । होसी महर्षी निर्धारी ।
मग महाकल्पावरी । मुक्ती बरी घेशील ॥८६॥
असें दत्तवचन । परशूरामें ऐकून ।
कांहीं काळ राहून । करी सेवन श्रीदत्ताचें ॥८७॥
जेणें एकवीस वेळ । नि:क्षत्र केलें भूमंडळ ।
ज्याचें न गणवे बळ । ज्याला खळ कांपती ॥८८॥
तो राम दक्षिणसागरीं । जाऊनियां तप करी ।
तेथें जाति विप्र दरिद्री । मागती दान तयापाशीं ॥८९॥
राम म्हणे तयांसी । सर्वस्व दिधलें द्विजांसी ।
भूमि दिधली कश्यपाशी । आतां मजपाशीं कांहीं नाहीं ॥९०॥
द्विज म्हणती रामासी । जरी भूमि दिली कश्यपाशी ।
तरी तूं येथें कां बससी । उपभोग घेसी कीं दानाचा ॥९१॥
असें ऐकूनी विप्रवचन । बाणें समुद्र शोषून ।
तेथें राहिला गुप्त होऊन । चिपळोन म्हणून स्थान जेथें ॥९२॥
लांबी चारशें कोस । रुंदी बारा कोस ।
अशा कोंकणपट्टीस । निर्माण केली रामानें ॥९३॥
तीही घेतली ब्राह्मणांनीं । पुढें दाशरथीराम होउनी ।
परशुरामाचें तेज आकर्षूनी । विवाह करूनी जाता घेई ॥९४॥
त्या दिवसापासून । राम चिपळोनीं गुप्त राहून ।
करी तप अनुष्ठान । पुढें महर्षी होणार तो ॥९५॥
रेणुका ही पार्वती । या विषयीं नको भ्रांती ।
एकदां ब्रम्ह्यासी वेदविस्मृती । दैव गतीनें जाहली ॥९६॥
ब्रह्मा दत्तापाशीं येऊन । म्हणे गेलों वेद विसरून ।
दत्त म्हणे रेणुकेचें स्मरण । करितां वेद स्फुरण होईल ॥९७॥
मग ब्रह्मा चिंती एकवीरेंसी । तंव ती धरूनी रूपासी ।
प्रगटली तत्क्षणेंसी । ब्रह्मा तयेसी वंदितसे ॥९८॥
तंव तिच्या अंगापासून । वेद झाले उत्पन्न ।
ब्रम्ह्योंन ते घेवून । म्हणे धन्य झालों मी ॥९९॥
असा जीचा प्रभाव । पाहुनी रेणूचा भाव ।
जी पावली पुत्रीभाव । केवळ भावगम्य जी ॥१००॥
ती अद्यापी माहुरीं । साक्षात् निवास करी ।
निजभक्तांते तारी । जी निवारी संकटा ॥१०१॥
अनुसूया अत्रीचें असे वेश्म । श्रीदत्ताचा आश्रम ॥
रेणुकादेवीचें धाम । दर्शनें कामपूरक ॥१०२॥
कृष्णामलकीचें दर्शन । जे करिती जाऊन ।
ते जाणावे पुण्यजन । होती पावन निर्धारें ॥१०३॥
घेऊनी रेणुकेचें दर्शन । मातृतीर्थी करिती पिंडदान ।
त्यांचे पितर उद्धरून । जाती निर्वाणपदासी ॥१०४॥
चांघ्रकाचे पितर । नरकयातना भोगिती घोर ।
मग चांध्रीक द्विजवर । मातृतीर्थीं पिंड देई ॥१०५॥
त्याचे पितर तत्काळ । मुक्त झाले सकळ ।
असें मातृतीर्थाचें फळ । मिळे तत्काळ निश्चयें ॥१०६॥
पद्मतीर्थ सर्वतीर्थ । हीं दोनीही अति समर्थ ।
कन्याकामदूषित । सूर्यही जेथें पवित्र झाला ॥१०७॥
वेदधर्मा म्हणे शिष्यासी । दत्तें त्या स्थानीं अर्जुनासी ।
योगोपदेश करून त्यासी । परमधामासी पाठविला ॥१०८॥
इति श्रीदत्तमाहात्म्ये चतुर्विंशोsध्याय: ॥२४॥
॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : May 02, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP