प्रसंग सतरावा - अहंकाराच्या स्त्रिया सती जातात
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
कल्पना आशा मनसा म्हणती । परद्वारे केली असंख्याती । सत्या निघावें जन प्रचीती । परी ईश्र्वर कबुल न करिती ॥२२१॥
हळहळ विषय नव्हतां तृप्ती । सत्या निघावें भूषण कीर्ति । मागुता वेश्या जन्म शीघ्रगती । हे निबंध साधु बोलती परियेसा ॥२२२॥
सत्ता संताप बोलती वचनीं । संताप म्हणे असाल माझ्या बहिणी । तरी सत्या निघाल वाणें देऊनि । अहेवपणाची ॥२२३॥
संताप बोले कल्पनेसी । तूं सति रिघोन कुळ राखसी । शीघ्र जाऊनि आत्म्यापासी । शीर मागें अहंकाराचें ॥२२४॥
कल्पना म्हणे जी आत्मनाथा । मज बैसवावें मोक्षार्था । जेणें चुके देहविषय व्यथा । धर्मप्रीतिपणें ॥२२५॥
आत्मा म्हणे तुम्ही चौघीजणी । शीर घ्यावें उमगोनी । उडी घालावी वैराग्य दहनीं । पुष्प कळिका करूनियां ॥२२६॥
त्यांनीं उमगूनि घेतलें शीर । मिरऊनि लक्ष चौर्यांशी बाजार । धर्मशिळेवरी उभ्या होऊनि उदार । वैराग्य दहनीं घातलें ॥२२७॥
निंदा आणि कुचेष्टा । या सरदाराच्या बरवंटा । आकांत करितील मोठा । आपुले ठायीं ॥२२८॥
मान अपमान कारकून थोर । करित होते बाष्कळ कारभार । त्यांसी आत्म्यानें केला मार । परी कांहीं न सांगतीच ॥२२९॥
अहंता ममता दोघी वेश्या । या कटकामाजी होत्या कैशा । गर्व सौभाग्य कोतवाला सरसा । भविष्य कराग्रीं दिधलिया ॥२३०॥
तूंपण मीपण दोन्ही क्रिया (स्त्रिया ?) मानीं । ह्या तंव अहंकारासी पाजिती पाणी । त्या खुदळिल्या पाय देऊनी । मग वारुवानें ॥२३१॥
चिंता श्र्लाघ्यता पेंडारिणी । महा बरवंटा मुळापासुनी । मन दंताखुरें धरूनियां वदनीं । भूमीवरी आपटिल्या ॥२३२॥
ऐसें क्षेत्र केलें रहिरास । आत्म्या राउता आलें यश । आतां गड घ्यावयाचा सायास । आरंभियेला ॥२३३॥
दीर्घ गड ब्रह्मांडशिखर । लाग नाहीं नेत्र फिरती गरगर । कडे कपाटें चौफेर दिसे भयासूर । मन तेजी मागें सरे ॥२३४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP