प्रसंग सतरावा - आपापल्या पुरुषार्थाच्या वल्गना
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
आळस म्हणे जेथे होय माझा संचार । त्याचा प्रसिद्ध विटंबिन संसार । तेथें आत्में केवढें मजुर । मजपुढें थारों शके ॥१६२॥
अवगुण म्हणे माझेनि अहंकारें । बहुतांची बुडविली घरें । तेथें आत्में मजुर गव्हारे । काय करावें ॥१६३॥
आतां अवगुण तो बिचारा । अहंकाराचा बंधु धारा । पुरुषार्थे कांपे थरथरां । आपुलेच ठायीं ॥१६४॥
अवगुण म्हणे चित्त द्यावें वचना । मी जेव्हां संचरलों रावणा । तेव्हां भैरवाचा जोगी केला जाणा । जानकीपें भिक्षा मागविली ॥१६५॥
भिक्षा मागोन शीघ्रगत । ऐसेचि ठकिले असंख्यात । आम्हांस आत्म्याचा करितां घात । वाड वेळ न लगे ॥१६६॥
सवेंच चढला अहंकार । मग नेवविली सीता सुंदर । धांवणें काढी रघुवीर । पाठोपाठीं ॥१६७॥
अहंकार चढला वाली वानरा । तेणें नेली सुग्रीवाची तारा । रामें पुरुषार्थ केला खरा । वालीस वधूनियां ॥१६८॥
मागुता अहंकार चढला रावणा। म्हणे मजपासून सीता ने ऐसा जन्मे ना । बिभिषण म्हणे मंदोदरीरमणा । राम सीता नेईल सत्य जाणिजे ॥१६९॥
पिंड होता घारीनें नेला । त्याचा बिभिषण जन्मला । मागुता रामापें टाकूनि आला । नातें बंधूचें धरूनियां ॥१७०॥
अठरा पद्में वानरांचा मेळा । जुंझत जाले होते गोळा । तों बिभिषण देखिला तात वेळा । म्हणती हा कां आला येथें ॥१७१॥
रघुनाथें दिधला आदर । शीघ्र कोपी जाले वानर । याच्या बंधूनें सीता सुंदर । यासी आदर कायसा ॥१७२॥
जूथपती म्हणती रामचंद्रा । आदर दिधला परी हा नव्हे बरा । राक्षसांचा मावा थोरा । कळोनि आदर देतसां ॥१७३॥
सुग्रीव म्हणे विनंति पाहिजे ऐकिली । इहीं कपट करूनि सीता नेली । आसांळी शक्ति लावूनियां गेली । लक्ष्मणाप्रती ॥१७४॥
तुम्हांस आहे याची आवडी । क्रिया घ्या सांडून वेलांडी । बिभिषणें आंघोळी करूनि साबडी । क्रिया देता जाला परियेसा ॥१७५॥
रामा आलों असेन कपटभावें । तरी मज लक्ष्मी भाग्य व्हावें । सकळ मजालसी स्वभावें । हास्य केलें ॥१७६॥
आंघोळ करुनी दुसरी आन । म्हणे मज पुत्र व्हावे गहन । मग ते हांसले खदखदून । राम अधोमुख पाहे ॥१७७॥
आंघोळ करुनी तिसरी आन । म्हणे होईन कलिचा । ब्राह्मण । रघुनाथें झांकिलें लोचन । शरीर कांटाळलें ॥१७८॥
जूथपती बोलती हांसून । कैसें विश्र्वासितां भाविकपणें । कपटी वाहे कपटरूपी आण । रघुनाथा लक्षण कळों यावें ॥१७९॥
मग राम बोले भविष्य उत्तर । तुम्ही आइका होऊनियां सादर । लक्ष्मी आलिया करी अनाचार । सत्ताबळें पुरुषार्थ करीतसे ॥१८०॥
बहुत पुत्र जालिया उपरी । ते होतील अनाचारी । ओळखी मोडूनि श्रीहरि । आठवेच ना ॥१८१॥
उन्मत्त नोळखती माय माउसी । पूर्वज घालिती दासीच्या कुसीं । नमस्कार न करिती साधुसंतांसी । अनेक पापें करितील ॥१८२॥
अश्रुपात करी रघुनाथ । मी घेतो विप्रांचें तीर्थ । तें आचरतील आळंगिल्याची स्थित । व्यापार करितां ॥१८३॥
बिभिषण नर नारायण । शरण आला मज भाव धरून । असत्य नव्हे त्याची आण । कलियुगी तैसे जन होईल ॥१८४॥
ऐका कलियुगींचें आचरण । ब्रह्म जाणे तोंचि सोंवळा ब्राह्मण । येर आचरतां शुचपण । अशुच राहातील ॥१८५॥
अश्रुपातनांत जाली अहिंक्यता । तैसेंच श्रोत्यां वक्त्यां व्हावें तत्त्वा । शेख महंमद बोलिले सगुण वार्ता । कृतयुगीचीं पैं ॥१८६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP