मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अक्षरांची लेणी|

अक्षरांची लेणी - राम ओवी आख्यान

लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो.


रामग्रंथाचा पोथी अध्यात्म झाला एक ।
वनवासा गेला राजा दशरथाचा ल्योक ॥
रामग्रंथाचे पोथी अध्यात्म झाले दोन ।
वनवासा गेली राजा दशरथाची सून ॥
रामग्रंथाचे अध्यात्म झाले तीन ।
वनवासा गेले रामासंग लक्ष्मण ॥
रामग्रंथाचे अध्यात्म झाले चार ।
वनवासा गेले उर्मिलेचे भरतार ॥
रामग्रंथाचे अध्याय झाले पाच ।
सितेचा सासूरवास रामा तुमच्या पुस्तकात ॥
रामग्रंथाचे पोथी अध्याय झाले नवं ।
देवा मारोतीनं देला लंकेला खेवं ॥
उगवले नारायण उगवता जोडीन हात ।
मावळता धरीन पाय ॥
देवा नारायणा चिंता अवघ्याची करून जाय ।
पाह्यटं उठूनी करते झाडलोट ॥
देवा नारायणाचा रथ आला वाडयानेटं ॥
उगवला नारायण उगवला आडभिती ।
पाह्नती चईतर दुनिया वापरती कशी ॥
घेई ना, मी कोणाचं चोरून मारुन ।
देव गं नारायण पाह्यती वरुन ॥
पाह्यटं उठून मले येशीकडं जाणं ।
मारोतीच्या दर्शनाले गोळा झालं अवघे जनं ॥
देवा मारोतीच्या आरतीची वेळ झाली ।
नेणती मैना कापूराले गेली ॥
मारोती मेडयाची आरती होई तिन्ही सांजं ।
नेणंता बाळ वाजवतो झांजं ॥
दिवस मावळता काम सांगा करतीले । दिवा नेते मारोतीले ॥
पंढरीचा देव नाही कोणाच्या देव्हारी ।
तुळशीच्या माळा साधू झाले परोपरी ॥
पंढरी जायाला चंचल झालं मन ।
देवा इठ्ठलाचं कव्हा होईल दर्शन ॥
विठ्ठल पिता रुख्मिण माता ।
हारला शिनभाग दोहीले वया गाता ॥
चंद्रभागी आला पूर वाहून गेला सर्वा घाटं ।
तिर्थाचा घेई घोट भाऊ पुंडलीक ॥
काहून शिनली कुंभारीची ईटीबाई ।
इठ्ठल सख्याचं वझं झालं पाय़ी ॥
तुका म्हणजे जीजा टाक ईवाइनात पाय ।
जावू वैकुंठाले कशाचे बाप माय ॥
पंढरीच्या वाटं साध संताची गंमत ।
दिंडया चालल्या रंगत ॥
संसारी येवून एकादस कर नारी ।
कुडी गेली गावखरी आत्मा गेला थेटावरी ॥

किंवा
स्वर्गलोकात यम धरे मनगट ।
काय केलं पाप-पुण्य, खरं खोटं ॥
स्वर्गलोकात यमराजाचे बंगले ।
पापी उरफाटे टांगले ॥
स्वर्गलोकात यमराजाची जाचणी ।
जिवाले सोडवनं गुरु कर साजणी ॥
संसारी येवूनी भलाई भोग नारी ।
संग नाही येत धन मालाच्या धागरी ॥
भावाच्या शेजी बहिण बसली बिजली ।
सांगती सासुरवास खाली धरितरी भिजली ॥
सासरी जाता डोळा येतं पाणी ।
परघरी गेली तान्ही ॥
नांदाया चालली हिनं वलांडले माळ ।
हाती लुगडयाचे घोळ डोळा लागले पनाळ ॥
सासरी जाता डोळा येती गंगा ।
सखे गं बाईला महिन्याची बोली सांगा ॥
सासरी जाता माय माडीतून पाह्ये ।
कधी येशील कळपातली गायं ॥
गेला मव्हा जीव नको रडू येडया भावा ।
जीवाले समजावा बाई गेली तिच्या गावा ॥
कशाचं घरदार कशाच्या गाई-म्हशी ।
अंत: काळाचे येळ आत्मा गेला उपाशी ॥

किंवा
जीवा जडभारी धरणी केलं अंथरुण ।
जीवाच्या मायबहिणी आल्या पाय उचलून ॥
जीव जडभारी कोणा घालू वझं ।
गौळणबाई तातडीनं येणं तुझं ॥
सुखमधलं दुःख शेज्या पाह्यतील दारुण ।
बैया मही येती पडदे सारुन ॥
सुख मपलं दुःख दुसरीले कळलं कवा?
गौळण मपली गावातली जल्दी घेईल धरवा ॥

किंवा
बोलले बापाची लेकी सासुरवास भोगा । चरकात ऊस झाला भुगा ॥
सुख सांगु येता दुःख उचमळे । पाणी नेतराचं गळे ॥
आंब्याच्या वनी कोयल बोले राधा ।
साती बहिणी उपासी गेले दादा ॥
सटी घालते अक्षर बरम्या करतो तातडी ।
नारीच्या जन्माची रेघ पडली वाकडी ॥
सीता चालली वनाले सैल्या घेतल्या कोसकोस ।
कशाले येता बाई शिरी मह्या वनवास ॥
आरुण्या वनात दगडाची केली उशी ।
सीताबाई तुले झोप आली कशी ॥
जंगलाच्या पाखरा मी तुमच्या आसर्‍यानं ।
तातोबाचे मठी घाल नेऊन ॥
सीता बाळंतीण जवळ नाही कोणी ।
नेतरं लावूनी तातोबा टाके पाणी ॥
सीतेले सासुरवास राम ऐकतो दारुन ।
कवळं याचं मन आले नेतरं भरुन ॥
सीता बाळंतीण हिले बाळांत्याची वाण (कमतरता)
खाली आंथरले केळीचे पान ॥
सीतेला सासुरवास जिले आला तिनं केला ।
रामासारखा जोडा हिले नाही भोगु देला ॥
लाडक्या लेकाचं नाव सीता नाही ठेवू ।
सीतेच्या कर्माचा पवाडा झाला बहू ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP