अक्षरांची लेणी - डोहाळा गीत
लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो.
एक महिना एक दिवस देवका बाईला येतो अन्नाचा वास ।
दुसर्या महिना उभी व्हती वृंदावनी । देवका बाईच्या डाव्या कुशी चक्रपाणी
तिसर्या महिनी उभी होती अंगणात । पुत्रमनसा देवकाबाईचे मनात
चवथ्या महिनी खीर पोळीचं जेवण । देवका मनसा पुरविते बहिण ।
पाचव्या महिनी चोळी हिरव्या खणाची । देवका बाईची मनसा मनाची ।
सहाव्या महिनी मिरी हीची हुसाळली । देवकाबाईले साया गर्भाची आली ।
सातव्या महिनी कुशीतून सांगे गोठी । कृष्णानं घेतला जन्म कंस मारण्यासाठी ।
आठव्या महिनी धाडा सुईनीला गाडी । देवकाबाईची वेळ परसुदीची आली ।
नवव्या महिनी कुशीतून देव बोले । कृष्णाचा झाला जन्म धरतरी पहा हाले ।
यशोदेच्या प्रमाणे सीतेचेही डोहाळे म्हटले जातात ती पुढे पाहा.
सीता गर्भिण हिला महिना पहिला, बाळ अंकुश राहिला ।
सीता गर्भिण हिले महिना दोनं । फुटले पळसाले पानं.
सीता गर्भिण हिले महिना तिसरा । रामाच्या बागात केळी पिकल्या उशिरा ।
सीता गर्भिण हिले महिने झाले चारं । रामाच्या बगीच्यात आला लवंगाले भार ।
सीता गर्भिण हिले महिने पाच । तुळशीच्या खोडाचे करा पाळणाले गातं ।
पाळणागीताशी संलग्न असलेली डोहाळे गीते :
देवा एक झाला रे महिना, तोंड पाह्माले आना महिना झु बाळा झू
दोन महिने झाले व जावू. काजू करवंद घालावं जेवू ॥ध्रृ॥
तीन महिने झालेवं सासु, इंद्रसभेवर न्हायाले बसु
पाच महिने झालेवं नंद, हिरव्या चोळीवर काढावा चाँद
सात महिने झाले रे भावा, गाडी बैलासी न्यायाले येवा
आठ महिने झालेवं माय. खोल्या पौतारुन सावध राह्म
नऊ महिने झाले रे कंथा, जन्मला पुत्र हारली चिंता
वरील डोहाळे नामकरणाच्या पाळणागीताअगोदर म्हणतात. डोहाळयांना मात्र पालुपद
नसते. ओवी गीतातूनही संलग्नपणे डोहाळयांचा आविष्कार पुढीलप्रमाणे प्रत्ययाला येतो.
मालन गर्भिण सांगुन धाडा आंबा । बंधुच्या मळयात पाचा तोरणाचा आंबा ।
गर्भिण नारीले खाऊ वाटलं आंबट. हौशा भ्रतारानं खाली पाडले कवटं ।
अवघड डोहाळे बंधुच्या नारीचे, आंबा आमराईचे लिंबं आणा औरंगाबादचे ।
गर्भिण नारीले खाऊ वाटलं उंबर, हौशा भ्रतार हिंडू लागला डोंगर ।
बोलले भ्रतार आडभिंती. राणी महिने झाले किती ।
गर्भिण बाईच्या गर्भसाया तोंडावरी. हिरवी चोळी दंडावरी ।
आवसची न्हाली दिवस पुनवेचे धरा ।
मालनीच्या कुशीत जन्मला हिरा ।
गर्भिण नार हात टेकून बसली । धाव धाव देवा गाय गाळात फसली ।
पहिलं बाळांतपण मायबाई तुझ्याघरी । चाँद सुर्याची सावली बाजंवरी ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP